सनातनचे राष्ट्ररक्षणविषयक कार्य !

सनातनचे कार्य : समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठीची अथक वाटचाल !

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी ‘धर्मशास्त्र’ हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

१. राष्ट्रीय अस्मितांचे रक्षण : राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांचा अवमान रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये यांमध्ये प्रवचने घेणे, तसेच पत्रके, भित्तीपत्रके अन् प्रबोधनपर फलकांचे प्रदर्शन भरवणे आदी माध्यमातून प्रबोधन करण्यात येते.

२. संस्कृतीचे संवर्धन : दैनंदिन व्यवहारात स्वभाषेचा वापर करणे, नित्य भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करणे आदी माध्यमांतून स्वसंस्कृतीचे संवर्धन; पाश्चात्त्य कुप्रथांच्या विरोधात जनजागृती यांसारख्या विषयांवर पत्रके, भित्तीपत्रके आणि सनातनने प्रबोधनपर फलक यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येते.

 

३. पर्यावरण संतुलन उपक्रम : आधुनिक विज्ञानाने पर्यावरणाची केलेली हानी काही प्रमाणात भरून निघावी, या हेतूने पर्यावरण संतुलन उपक्रम, उदा. वृक्षदिंडी, पर्यावरणदिंडी आदी कार्यांत सनातनचा सक्रीय सहभाग असतो.

४. वृक्षारोपण : भूमीवरील मातीची होणारी धूप नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच वायूप्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

५. शिक्षणक्षेत्रातील अपप्रकारांविरुद्ध चळवळ : शिक्षणक्षेत्रातील ‘रॅगिंग’सारखी अनिष्ट प्रथा, शालेय प्रवेश देतांना पालकांकडून देणग्या स्वीकारणे आदी अपप्रकारांच्या विरोधात सनातन चळवळ राबवते.

 

६. विनामूल्य प्रथमोपचार अन् आपत्कालीन प्रशिक्षणवर्ग : अपघात, नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती अशा संकटांच्या वेळी यांतील आपद्ग्रस्तांना तातडीने प्रथमोपचाराची आवश्यकता असते. अशा वेळी आपण प्रथमोपचार प्रशिक्षित असल्यास स्वतःला, तसेच इतरांना साहाय्य करू शकतो. राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीकोनातून सनातन प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे विनामूल्य आयोजन करत असते. प्रथमोपचार प्रशिक्षणाचा समाजाला उपयोग व्हावा, म्हणून अनेक शाळा आणि महाविद्यालये यांमधून विद्यार्थ्यांसाठी; समाजसेवी संघटना, महिला मंडळे आदींसाठीही विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतात. तसेच जत्रा, कुंभमेळे आदी ठिकाणी प्रथमोपचार सेवाही पुरवण्यात येते.

७. समाजहितकारी संस्थांसमवेत कार्य : भ्रष्टाचाराला आळा घालणे, विक्रेत्यांना उघड्यावर खाद्यपदार्थ विकण्यास प्रतिबंध करणे, अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करणे इत्यादींसाठी लढणार्‍या विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन कार्यरत आहे. ग्रामस्वच्छता, राष्ट्र अन् धर्मजागृतीपर पथनाट्ये, प्रभातफेर्‍या आदी सामाजिक उपक्रमांतही सनातन अन्य संस्था अन् संघटना यांच्यासमवेत सहभागी होते.

Leave a Comment