६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

Article also available in :

प्रस्तुत लेखात ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनी आणखी पुढे जाण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत, हे दिले आहे. त्यांच्या दृष्टीने साधनेतील कोणत्या सूत्रांना महत्त्व आहे, हे या लेखात स्पष्ट होते. स्वतःच्या मनाने साधना न करता गुरूंना अपेक्षित अशी साधना करणे म्हणजे, गुरुकृपायोगानुसार साधना, हे यातील मूळ सूत्र आहे. हे तत्त्व ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनाच नव्हे, तर सर्व पातळीच्या साधकांना लागू होते. केवळ भेद हाच की, तशी साधना केली नाही, तर ६१ टक्के आणि त्याहून अधिक पातळीच्या साधकांना क्षमता असूनही त्यांच्याकडून तसे झाले नाही म्हणून अधिक दोष लागतो. अशा प्रकारे या लेखातील बहुतेक सूत्रे सर्वांनाच लागू पडतात; म्हणून जलद प्रगती होण्यासाठी सर्वांनीच असे प्रयत्न करायला हवेत.

१. भाव निर्माण झाला की, ६१ टक्के पातळी गाठता येणे

‘साधनेत अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत भावाच्या टप्प्यावर साधना चालू झाली की ६१ टक्के पातळी गाठता येते.

२. मायेतून मुक्त होण्यासाठी क्रियमाणकर्माचा पूर्ण उपयोग करावा लागणे

या पातळीला मायेतून मुक्त होण्याचा देवाचा आशीर्वाद मिळतो; परंतु तसे प्रत्यक्ष होण्यासाठी आपल्या क्रियमाणकर्माचा पूर्ण उपयोग करावा लागतो, नाहीतर आध्यात्मिक पातळी घसरू शकते.

३. साधनेतील वेळ अनावश्यक ठिकाणी जात नाही ना, याकडे कटाक्षाने पहावे लागणे

५० टक्के पातळीपर्यंत साधनेचे अनेकविध मार्ग अवलंबून साधना करावी लागते; परंतु ६१ टक्के पातळीच्या पुढचा प्रवास करतांना मात्र आपला वेळ अनावश्यक ठिकाणी जात नाही ना, याकडे कटाक्षाने पहावे लागते.

४. गुरूंना अपेक्षित असलेली कृती न करणे, भले ती भावाच्या स्तरावर असू दे, तरी ती भावनेतच गणली जाणे

गुरूंनी आखून दिलेल्या सेवेला महत्त्व न देता आपला वेळ इतरांशी भले सत्संगाचे बोलण्यात जरी जात असला, तरी तो अनावश्यकच समजावा; कारण गुरूंना अपेक्षित असलेली कृती न करणे, भले ती भावाच्या स्तरावर असू दे, तरी ती भावनेतच गणली जाते.

५. गुरूंना अपेक्षित असलेली कृती न करता इतर कृती करणे, भले ती सात्त्विक असली, तरी ती स्वेच्छाप्रधानच समजली जाणे

अशा तर्‍हेने काळाला, म्हणजेच गुरूंना अपेक्षित असणारी साधना आपण न करता साधनेतीलच; परंतु इतर सात्त्विक कृती करण्यात आपला वेळ दिला, तर तीही एक स्वेच्छाच ठरते.

६. गुरूंना अपेक्षित असणारी, म्हणजेच काळाला संमत असणारी साधना करणे आवश्यक !

गुरूंनी दिलेली सेवा किंवा गुरूंना अपेक्षित असणारी सेवा ही काळालाही संमत असल्याने ही सेवा करण्यासाठी अधिकाधिक वेळ दिला, तर ईश्‍वरेच्छेने साधना करण्याचे फळ मिळून जलद आध्यात्मिक उन्नती होते.

७. ‘साधनेला आवश्यक तेच कर्तव्य’, असे होणे आवश्यक असणे

६१ टक्के पातळीपर्यंत ‘दिसेल, ते कर्तव्य’ असा मार्ग योग्य आहे; कारण हे एक व्यष्टी साधना करण्याचे प्रमुख सूत्र आहे; परंतु ६१ टक्क्यांच्या पुढे मात्र तो साधक समष्टीचा झाल्याने ‘साधनेला आवश्यक तेच कर्तव्य’, असे व्हायला हवे.

८. गुरुकार्याला हातभार न लावणारी कृती केली, तर त्या कृतीत भाव असूनही ती भावनाच बनणे

५५ टक्के पातळीच्या पुढे शिष्यपद येते. शिष्य म्हणजे गुरूंना अपेक्षित असणारी सेवाच झोकून देऊन करणारा जीव. गुरूंना अपेक्षित नसलेली सेवा केली, म्हणजेच गुरुकार्याला हातभार न लावणारी कृती केली, तर त्या कृतीत भाव असूनही ती भावनाच बनते.

९. ६१ टक्के पातळीच्या पुढे स्थळाचे नाही, तर काळाचे नियम लागू पडणे

६१ टक्के पातळीच्या पुढे स्थळाचे नियम लागू न पडता, आणखी व्यापक स्तरावरील काळाचे नियम लागू पडतात. म्हणजेच ६१ टक्के पातळीच्या पुढे साधक त्याचे व्यक्तीगत आयुष्य त्यागून काळाशी जोडला जाऊ लागतो; म्हणून त्याच्या संदर्भात काळाचा एक प्रमुख भाग असलेल्या ‘वेळे’कडे कटाक्षाने पाहून, ‘आपला वेळ इतर गोष्टी करण्यात वाया जात नाही ना’, याकडे अधिक सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक असते.

१०. ‘दोन सात्त्विक गोष्टींपैकी नेमकी कोणती गोष्ट करायला पाहिजे’, हे कळणे आवश्यक !

६१ टक्के पातळी गाठलेल्या साधकांना त्यांची पातळी न्यून (कमी) झाल्यावर किंवा त्याच पातळीला राहिल्यावर वाटते, ‘अरे, आपण तर साधनेव्यतिरिक्त कुठेच आपला वेळ खर्च केला नाही, तरी आपली पातळी वाढली कशी नाही, तर त्याचे उत्तर एकच, ‘दोन सात्त्विक गोष्टींपैकी नेमकी कोणती गोष्ट करायला पाहिजे’, ते त्यांना कळलेले नसते.

११. ‘गुरुकार्य लवकर पूर्ण होणे, तसेच गुरुकार्याला वेग येणे, या गोष्टींकडे सेवा करतांना अधिक लक्ष दिले नाही, तर आपण काळाचे आशीर्वाद मिळवण्यात न्यून पडणे

एखाद्या साधकाचे एखाद्या सेवेत अधिक कौशल्य असते; परंतु ही सेवा न करता तो दुसरीच सेवा करू लागला, तर त्याच्या साधनेची फलनिष्पत्ती न्यून होते; कारण ही सेवा दुसर्‍या साधकाला करावी लागते. दुसर्‍या साधकाचे यात कौशल्य न्यून (कमी) असल्याने गुरुकार्य लवकर पूर्ण न होणे, तसेच गुरुकार्याला वेग न येणे, या गोष्टींमुळे आपण काळाचे आशीर्वाद मिळवण्यात न्यून पडतो. यात गुरुकार्याची आपण स्वेच्छेने हानी केल्याने आपल्याला समष्टी पातक लागते. अशा अनेक कृती घडल्यास आपली पातळी आपण सतत सेवा करत असूनही हळूहळू न्यून होत जाते.

१२. त्या त्या स्तराला आपल्या उन्नतीसाठी आवश्यक असणारी सेवा करणे आवश्यक !

६१ टक्क्यांच्या पुढे जातांना कोणतीही सेवा करतांना ती आपल्या पुढच्या टप्प्याच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे का, हे पारखूनच घ्यायला हवे. अन्यथा साधनेत पुढच्या टप्प्याला जाण्यात अडथळा येऊ शकतो.

१३. सेवा करतांना अनिष्ट शक्तींचा त्रास होत असेल, तर सेवेपेक्षा आध्यात्मिक उपाय करण्यास अधिक महत्त्व देणे आवश्यक !

काही वेळा आपल्याला नेमून दिलेली सेवा करतांना अनिष्ट शक्तींचा खूपच अडथळा येत असेल किंवा आपल्याला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर सेवेत पालट करण्यास काहीच आक्षेप नाही; परंतु तो पालटही तात्कालीकच असावा. तद्नंतर आपल्या सेवेकडे लवकरात लवकर कसे पोचता येईल, याकडेच आपले लक्ष अधिक असावे. खूपच त्रास वाढला, तर सेवेपेक्षा आध्यात्मिक उपाय करण्याकडे अधिक लक्ष द्यावे.

१४. प्रत्येक कृती योग्यच असली पाहिजे !

६१ टक्क्यांच्या पुढे जातांना प्रत्येक कृती योग्यच केली पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाही पुढच्या पुढच्या टप्प्याच्या परीक्षा खूपच कठीण असतात, तसेच हे आहे.

१५. ६१ टक्के पातळीच्या पुढे प्रवास करतांना ‘गुरुकार्य पुढे नेण्यासाठीच साधना !’, असे सूत्र असणे

साधनेच्या मार्गात त्या त्या टप्प्यावरून प्रवास करतांना साधनेचे नियमही पालटतात, म्हणजेच ६१ टक्के पातळी गाठेपर्यंत ‘प्रकृतीला अनुरूप अशी साधना !’ असे स्वेच्छादर्शक सूत्र असते, तर ६१ टक्के पातळीच्या पुढे प्रवास करतांना ‘गुरुकार्य पुढे नेण्यासाठीच साधना !’, असे सूत्र बनते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१८.२.२०११)

 

Leave a Comment