सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – ३)

सर्वसामान्य आणि साधना न करणार्‍या व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते अन् प्रतिदिन देवपूजा, पोथीवाचन, उपवास इत्यादी कर्मकांडातील साधना नियमित करणार्‍या व्यक्‍तींची आध्यात्मिक पातळी २५ ते ३० टक्के असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला व्यक्‍ती संतपदाला पोहोचते. हे संत समष्टीच्या कल्याणासाठी नामजप करू शकतात. मृत्यूनंतर त्यांना पुनर्जन्म नसतो. ते पुढील साधनेसाठी वा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात.

सनातनचे १०१ वे संत पू. श्री. अनंत आठवले

२७ जून २०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तीर्थरूप अनंत बाळाजी आठवले (ती. भाऊकाका) (वय ८३ वर्षे) हे सनातनच्या १०१ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले. भगवान श्रीकृष्णाला गुरुस्थानी मानून साधना करणार्‍या ती. भाऊ यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला. ती. भाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ शाब्दिक अभ्यास केला नाही, तर गीतेतील तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ?, यासाठी प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर हे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोचावे, यासाठी त्यांनी गीताज्ञानदर्शन हा अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि अनेक समर्पक अन् सुंदर उदाहरणांद्वारे त्यांनी गीतेचा भावार्थ उलगडला. गीतेचा अभ्यास केल्याने ती. भाऊंची ज्ञानयोगातून साधना झाली.

सनातनचे १०२ वे संत पू. श्री. शिवाजी वटकर 

१६ जुलै २०१९ या दिवशी पू. श्री. शिवाजी वटकर हे सनातनच्या १०२ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले. पू. शिवाजी वटकर पूर्वी एका जहाज आस्थापनात मोठ्या पदावर कार्यरत होते. उच्चपदस्थ अधिकारी असूनही त्यांच्या सहज वागण्या-बोलण्यातून तसे कधीच जाणवायचे नाही. ते कोणतीही सेवा अगदी मनापासून, तळमळीने आणि भावपूर्ण रितीने करतात. त्यांच्यामध्ये ‘भाव’ आणि ‘तळमळ’ या गुणांचा अपूर्व संगम पहायला मिळतो. त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध सात्त्विक चीड असून देव आणि धर्म यांची विटंबना होऊ नये, यासाठी ते अत्यंत जागरूक असतात. कुठेही देवतांचे विडंबन होत असल्याचे कळले की, स्वतःचा कोणताही विचार न करता ती रोखण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात.

सनातनचे १०३ वे संत  पू.   श्री. सदाशिव सामंतआजोबा

९ ऑगस्ट २०१९ ह्या दिवशी देवद आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. आज्ञापालन या गुणामुळे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांनी नाम, सत्संग, सेवा, त्याग आणि प्रीती या सर्व टप्प्यांंनुसार साधना केली. त्यांना सेवेची अत्यंत तळमळ असून या वयातही त्यांना सतत सेवेचाच ध्यास असतो.देहबुद्धी न्यून असलेले आणि देेवावर दृढ श्रद्धा असलेले सामंतकाका अखंड भावावस्थेत असतात.  त्यांनी कोणत्याच गोष्टीचा कर्तेपणा स्वतःकडे कधीच घेतला नाही. त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच अतिशय प्रेमळ होता. पू. सामंतआजोबा हे लहानपणापासून सद्वर्तनी होते. कोणत्याही परिस्थितीत आनंद कसा शोधायचा, हे ते पहायचे.

सनातनच्या १०४ व्या संत पू. श्रीमती सुलभा जोशीआजी

१० मार्च २०२० सांगवी (पुणे) येथे झालेल्या आध्यात्मिक सोहळ्यात पू. (श्रीमती) सुलभा जोशी (वय ७९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या १०४ व्या संतपदी (व्यष्टी संत) विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. धार्मिक वातावरणात वाढलेल्या आणि बालपणापासून दत्तभक्तीचा संस्कार झालेल्या श्रीमती सुलभा जगन्नाथ जोशी यांनी ‘परेच्छेने कसे वागावे ?’ हे अध्यात्मातील तत्त्व पूर्णपणे आचरणात आणले. त्याचप्रमाणे सांसारिक कर्तव्ये शांत आणि समाधानी वृत्तीने पार पाडून ‘आदर्श सहजीवन कसे असावे ?’ याचे उदाहरणही त्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. इतरांचा विचार करणे, परेच्छेने वागणे, वात्सल्यभाव, तसेच निरपेक्ष आणि अनासक्त वृत्ती या सर्व गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे ‘इतरांचा विचार करणे’, हा त्यांच्या स्वभावातील मोठा पैलू आहे.