भक्त पुंडलिक

Article also available in :

एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृभक्तीही श्रीकृष्णाला पहायची होती. आजमायची होती. भगवंत पंढरीत आले. पंडुलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आत पहातात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता.’देव भावाचा भुकेला । सोडूनी आला वैकुंठाला ॥” आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही, नव्हे तर जागचा हाललाही नाही. आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा ? त्याने बसल्या जागेवरुनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले. सेवेचं व्रतही मोडता येईना अन् भगवंताच्या स्वागताचा गृहस्थधर्म ही पाळता येईना. पुंडलिकापुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याने जवळचं पडलेली एक विट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईतोपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं रहायला सांगितले. आणि आश्चर्य असे की तो सावळा विठूराया कर कटावर ठेवून चक्क त्या विटेवरउभा राहिला. ख-या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात.

पुंडलिकाची असीम मातृपितृभक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला ‘वर’ माग म्हणाले. तर त्याने काय मागावे ? पैसा ,धनदौलत ? शेती वाडी ? भक्त पुंडलिकाने विचार केला. लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असं काही तरी मागावं तो म्हणाला,’ देवा ! मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको ! मला फक्त तू हवा आहेस ! आता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथचं सतत उभा रहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे !” देव म्हणाले ‘तथास्तु’ ! आणि तेव्हापासून हे विटेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून ‘अठ्ठावीस युगे’ म्हणा की सातशे वर्षे म्हणा- भक्तांचं कोड पुरवित आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे ! त्याचे पाय ‘समचरण’ आहेत. सर्वांकडे तो समत्वदृष्टीने पहातो. त्याच्या पायी जो लागतो तोही समत्वदृष्टीप्राप्त करुन घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती !

 

धर्मग्रंथांमध्ये भक्त पुंडलिकाच्या भक्तीचे प्राप्त होणारे काही दाखले

१. भक्त पुंडलिकाने मागितलेला वर – पद्मपुराण

पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते. ‘भक्त पुंडलिकाने पांडुरंगाकडे ‘दर्शनास आलेल्या सर्वांची पापे नष्ट कर’, असा वर मागितला’, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.

 

२. भक्त पुंडलिकाने मागितलेला वर – स्कन्दपुराण

‘इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥
ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥ – स्कन्दपुराण

अर्थ : त्यानंतर अशा प्रकारे स्तुती करून तो आनंदाने देवाला म्हणाला, ‘‘आपण याच रूपामध्ये माझ्याजवळ राहावे. आपल्या केवळ दर्शनाने मूढ, अज्ञानी आणि पापी लोकांनाही मुक्ती मिळावी’, अशी आपल्या चरणी मी पुनःपुन्हा प्रार्थना करतो.’’

 

३. पहिली वारी

‘श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून सर्व भक्तांचा उद्धार करावा’, हा वर पुंडलिकाने देवाकडे मागितला आणि तेव्हापासून ‘वारी’ चालू झाली.

 

४. इसवी सनाच्या आठव्या शतकात आदिशंकराचार्यांनी ‘पांडुरंगाष्टक’ नावाने प्रासादिक लिहिलेले एक स्तोत्र

महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ – आदिशंकराचार्य कृत पाण्डुरङ्गाष्टकम्

अर्थ : भीमा नदीच्या काठी असलेल्या महायोगपिठावर पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनिश्रेष्ठांसह आलेल्या, आनंदाचा स्रोत असणार्‍या, परब्रह्मस्वरूप अशा पांडुरंगाची मी पूजा करतो.

Leave a Comment