हिवाळ्यातील विकारांवर सोपे उपचार

Article also available in :

‘हिवाळ्यात ऋतूमानानुसार थंडी आणि कोरडेपणा वाढतो. त्यांचा योग्य प्रतिकार न केल्यास विविध विकार होतात. यांतील बहुतेक विकार ‘तेलाचा योग्य वापर करणे आणि शेक देणे’, या उपचारांनी आटोक्यात येतात.

 

१. हिवाळ्यातील विकारांत उपचारांसाठी वापरायचे तेल

खोबरेल तेल थंड असते, तर अन्य सर्व खाद्य तेले उष्ण असतात. ज्यांना उष्ण तेलाने त्रास होतो, त्यांनी पुढे दिलेल्या उपचारांसाठी खोबरेल तेल वापरावे. मोहरीचे तेल जास्त उष्ण असते.

कोणत्याही वाटीभर खाद्य तेलात १ – २ लसणीच्या पाकळ्या किंवा इंचभर आले किंवा वेखंड यांचा तुकडा ठेचून घालावा आणि ते तेल मंद आचेवर उकळावे. तेल उकळल्यावर गॅस बंद करावा आणि ते थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवावे. अशा रितीने बनवलेले तेल उष्ण गुणधर्माचे असते. अशा तेलाने हिवाळ्यामुळे आलेली थंडी घालवण्यास साहाय्य होते.

 

२. शेक देण्याचे पर्याय

शेक देण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करावा. गरम पाण्याची पिशवी नसेल, तर एखादा जाड कपडा इस्त्रीने गरम करून त्याने शेकावे. हिवाळ्यातील ऊन अधिक कडक नसते. या उन्हात काही वेळ बसल्याने शेक घेतल्याप्रमाणे लाभ होतो. अंघोळीच्या वेळी गरम पाण्याने शेकता येते.

 

३. हिवाळ्यात वाढणारे काही विकार आणि त्यांवरील उपचार

३ अ. त्वचेला चिरा (कात्रे) पडणे

वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा आणि ओठ यांना चिरा (कात्रे) पडतात. विशेषतः तळपाय आणि तळहात यांठिकाणी या चिरा पडतात. त्वचा कोरडी झाल्याने खाज येते. अशा वेळी खाजवल्याने त्वचा खरवडून निघते आणि तेथे आग होऊ लागते. काही वेळा मूत्रमार्गाच्या टोकाची त्वचा आकसते आणि तिथेही चिरा पडतात. यामुळे लघवी होतांना वेदना होतात.

३ अ १. उपचार

अ. प्रतिदिन त्वचेला तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ राहते आणि तिला पडलेल्या चिरा लवकर भरून येतात.

आ. ओठ सारखे कोरडे होत असल्यास दिवसातून ३ – ४ वेळा ओठांना तेल लावावे.

इ. मूत्रमार्गाच्या टोकालाही दिवसातून २ – ३ वेळा तेल लावावे.

ई. थंडीपासून रक्षण होण्यासाठी लोकरीचे कपडे, उदा. स्वेटर वापरावेत.

३ आ. पडसे (सर्दी) आणि खोकला

वैद्य मेघराज माधव पराडकर

रात्री दंवात फिरल्याने पडसे (सर्दी) होते. बरेच जण सकाळी व्यायामासाठी चालण्यास जातात. या वेळी डोके, नाक, तोंड आणि कान झाकलेले नसेल, तर दंवामुळे सर्दी किंवा खोकला होतो. रात्री झोपेत बहुतेक वेळा तोंड उघडे राहते, थंडीमुळे नाक चोंदते आणि श्‍वासोच्छ्वास तोंडाने चालू होतो. ही थंड हवा सातत्याने घशात गेल्याने घशाला सूज येते आणि खोकला चालू होतो. थंडीमुळे नाकाच्या अंतस्त्वचेला सूज येते आणि नाकाच्या बाजूने असलेल्या हाडांतील पोकळ्यांमधल्या स्रावाला अडथळा निर्माण होतो. यामुळे पडसे (सर्दी) होते.

३ आ १. उपचार

अ. दिवसातून २ – ३ वेळा पाण्याची वाफ घ्यावी. उष्ण वाफेमुळे श्‍वसनमार्ग मोकळा होतो. कफ सुटण्यास साहाय्य होते.

आ. दिवसातून २ – ३ वेळा करंगळी तेलात बुडवून तिने दोन्ही नाकपुड्यांना आतल्या बाजूने थोडे तेल लावावे. यामुळे नाक आतून कोरडे होत नाही. नाकाची सूज न्यून होते. नाकामध्ये येणारी थंड हवा गरम होऊन आत जाते. वातावरणातील परागकण किंवा धूळ नाकाला आतून लावलेल्या तेलाला चिकटून राहतात. त्यामुळे त्यांच्यापासून अ‍ॅलर्जी होऊन सर्दी किंवा खोकला होण्याचा धोका टळतो.

इ. पडसे असतांना दिवसभर दोन्ही कानांत कापसाचे बोळे घालावेत.

ई. रुमाल किंवा ओढणी ‘नाक, तोंड आणि कान झाकले जातील आणि श्‍वासही चालू राहील’, अशा रितीने बांधून झोपावे.

उ. रात्री पंखा लावून झोपू नये. अगदीच उकाडा होत असल्यास ‘सीलिंग फॅन’ऐवजी फिरत्या ‘टेबल फॅन’चा उपयोग करावा. यामुळे थंड वारा सतत अंगावर न येता फिरता राहतो आणि त्याचा अधिक त्रास होत नाही.

३ आ २. सर्वसाधारण उपचार

अ. केशर आणि वेखंड पाण्यात उगाळून त्याचा लेप नाकाच्या आजूबाजूस आणि कपाळावर लावावा.

आ. झोपतांना कान, डोके झाकावे, दिवसा पायात चप्पल घालाव्यात.

इ. मोहरी, ओवा किंवा वेखंडाचे चूर्ण तव्यावर गरम करून रूमालात त्याची पुरचुंडी बांधून नाकाच्या आजूबाजूस शेक घ्यावा.

ई. गरम पाण्याच्या किटलीच्या तोटीतून बाहेर येणारी वाफ हुंगावी, निलगिरी तेल किंवा लसूण अधून मधून हुंगावा.

उ. हळदीचे चूर्ण १ ते २ चमचे तुळशीच्या रसात चाटवावे.

ऊ.सुंठ, मिरे, पिंपळी, तुळस, दालचिनी आणि पातीचा चहा यांचा काढा घ्यावा.

ए. जास्त ताप किंवा अंग दुखत असल्यास त्रिभुवनकीर्ती रस किंवा आनंदभैरव रस घ्यावा.

ऐ. हलका आहार घ्यावा, लंघन करावे. सुंठ, मिरी, पिंपळी घालून सिद्ध केलेली भाताची पेज किंवा मुगाचे किंवा कुळीथाचे कढण किंवा मुळ्याचा रस घ्यावा.

ओ. चित्रक हरितकी अवलेह १-१ चमचा २ वेळा १ मास घ्यावा.

खोकल्यासाठीचे आयुर्वेदीय उपाय

अ. कंटकारी अवलेह, तालिसादी चूर्ण आणि कनकासव ही औषधे दिवसातून दोन वेळा घेणे.

आ. सकाळी आणि रात्री पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे.

इ. दुधात हळद घालून घेणे.

३ इ. थांबून-थांबून लघवी होणे किंवा लघवी होण्यास वेळ लागणे

हे विकार आधीपासून असल्यास थंडीमुळे यांत वाढ होण्याची शक्यता असते.

३ इ १. उपचार

अ. ज्यामध्ये बसता येईल, एवढ्या आकाराचा टब घ्यावा. प्रतिदिन सकाळी उठल्यावर टबमध्ये स्वतःला सोसेल एवढे गरम पाणी घ्यावे आणि त्यात १० ते १५ मिनिटे बसावे. टबमध्ये बसल्यावर पाणी नाभीपर्यंत येईल, असे पाहावे.

आ. दिवसातून २ – ३ वेळा ५ ते १० मिनिटे ओटीपोटावर शेक द्यावा.

३ ई. बद्धकोष्ठता

थंडीमुळे गुदद्वार आकसते आणि बद्धकोष्ठता निर्माण होते. गुदद्वार आकसल्याने बर्‍याच वेळा ‘शौचाला गेल्यावर त्रास होईल’, या भीतीने शौचाला जायचे टाळले जाते. त्यामुळे मलाशयात मल जास्त काळ थांबून कडक बनतो. थंड पाण्याने गुदद्वार धुतल्याने ते आणखी आकसते आणि बद्धकोष्ठता निर्माण होते.

३ ई १. उपचार

अ. रात्री झोपतांना सोललेल्या सुपारीएवढा कापसाचा बोळा कोणत्याही खाद्य तेलात बुडवून गुदद्वारातून गुदमार्गात सरकवून ठेवावा. हा कापसाचा बोळा शौचाला होतांना पडून जातो. या बोळ्यामुळे गुदमार्गाचे स्नायू मऊ राहतात आणि ते सहज विस्फारित होतात. मलाचे खडे बनत नाहीत. मूळव्याध आणि परिकर्तिका (फिशर – गुदद्वाराला चिर पडणे) या विकारांत असा बोळा ठेवणे लाभदायक असते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक आहे, त्यांनी कापसाचा बोळा भिजवण्यासाठी एरंडेल तेल वापरावे.

आ. शौचासाठी बसल्यावर गुदद्वारावर, तसेच कटीवर (कमरेवर) गरम पाणी मारावे. यामुळे गुदद्वाराचे स्नायू विस्फारित होतात. कटीवर गरम पाणी घेतल्याने शौचाचा वेग येण्यास साहाय्य होते.

३ उ. मानेचे, तसेच अन्य स्नायू आखडणे

थंडीमुळे मानेचे स्नायू आखडल्यास मान धरते. ज्यांना आधीपासून सांधेदुखी आहे, त्यांचे सांधे थंडीत स्नायू आखडल्याने आणखी दुखू लागतात.

३ उ १. उपचार

अ. दिवसातून २ – ३ वेळा आखडलेल्या स्नायूंना तेल लावावे. तेल लावण्यापूर्वी ते कोमट करावे. तेल फार चोळू नये.

आ. तेल लावल्यावर ५ ते १० मिनिटे शेक द्यावा. शेक देत असतांना दुखणार्‍या भागाची हालचाल करावी. शेकाच्या उष्णतेमुळे स्नायू सैल होतात. अशा स्नायूंची हालचाल केल्याने त्यांचे आखडणे न्यून होते.

३ ऊ. टाचा दुखणे

थंड लादीवरून चालल्याने किंवा थंड लादीवर पाय ठेवून बसल्याने टाचा दुखू लागतात.

३ ऊ १. उपचार

अ. पायांत सपाता (चपला) घालाव्यात.

आ. टाचा शेकाव्यात.

इ. एकाच ठिकाणी अधिक वेळ राहावे लागत असल्यास (उदा. संगणकासमोर बसणे, स्वयंपाकासाठी शेगडीसमोर उभे राहणे) पायांखाली गोणपाट किंवा पायपुसणे घ्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर (१८.१२.२०१९)

 

ज्यांना थंडी मानवत नाही, त्यांनी घर बांधतांना दगडी (संगमरवर, कोटा,
ग्रॅनाईट इत्यादी) लाद्यांऐवजी मातीच्या किंवा सिरॅमिकच्या लाद्या बसवून घेणे उपयुक्त !

‘संगमरवर, कोटा, ग्रॅनाईट आदी दगडी लाद्या अधिक थंड असतात. थंडीमध्ये अशा लाद्यांचा अधिक त्रास होतो. या लाद्यांच्या तुलनेत मातीच्या किंवा सिरॅमिकच्या लाद्या गरम असतात. ज्यांना थंडी मानवत नाही, त्यांनी घर बांधतांना दगडी लाद्यांऐवजी मातीच्या किंवा सिरॅमिकच्या लाद्या बसवून घेणे उपयुक्त ठरते.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर

 

‘सीलिंग फॅन’पेक्षा फिरता ‘टेबल फॅन’ चांगला !

‘सीलिंग फॅन’मुळे अंगावर सतत वार्‍याचा झोत बसत राहतो. सतत अंगावर वारा घेणे आरोग्याला हानीकारक असते. रात्रीची झोप ६ घंटे असेल, तर तेवढा वेळ, म्हणजे दिवसाचा एक चतुर्थांश वेळ अंगावर सतत वारा येत राहतो. सततच्या वार्‍यामुळे शरिरात कोरडेपणा वाढतो, स्नायू आखडतात; मान, पाठ, कटी आणि अन्य सांधे यांचे दुखणे वाढते, श्‍वसनमार्ग कोरडा होतो आणि वारंवार पडसे, खोकला आदी त्रास होतात. रात्री झोपतांना उकाडा होतो; म्हणून पंख्याची गती अधिक ठेवून झोपतात; परंतु रात्री थंडी पडू लागते, तेव्हा आपण झोपेत असल्याने पंखा बंद केला जात नाही. या काळात शरिराला नको असतांना थंड वार्‍याचा झोत सहन करावा लागतो. शरिराची प्रतिकारक्षमता चांगली असेपर्यंत ते सततच्या पंख्याच्या वार्‍यामुळे होऊ शकणार्‍या विकारांचा प्रतिकार करते; परंतु प्रतिकारक्षमता न्यून झाल्यावर या वार्‍यामुळे विकार उद्भवू लागतात. बर्‍याच वेळा ‘सततच्या पंख्याच्या वार्‍यामुळे हे विकार होत आहेत’, हे रुग्णाच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे रोगाचे कारण चालूच राहते आणि ‘कितीही औषधे घेऊनही गुण येत नाही’, अशी स्थिती निर्माण होते. अशा वेळी पंख्याचा वारा बंद केल्याने प्रकृतीत सुधारणा होऊ लागते.

‘सीलिंग फॅन’पेक्षा फिरता ‘टेबल फॅन’ कधीही चांगला. फिरत्या पंख्यामुळे हवेचा झोत सतत एकाच ठिकाणी येत नाही. यामुळे ‘सीलिंग फॅन’मुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१९)

Leave a Comment