प्रभु श्रीरामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेल्या अयोध्यानगरीतील पवित्रतम वास्तू !

श्री हनुमानगढी

श्री हनुमानगढीतिल हनुमानमूर्ती

श्री हनुमानगढी म्हणजेच श्री हनुमानाचे मंदिर ! प्रभु श्रीरामांनी जेव्हा अवतार समाप्त करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांनी हनुमानाला त्यांच्या समवेत येण्यास सांगितले. निस्सीम रामभक्त असलेल्या हनुमानाने त्यांना नम्रपणे नकार दिला. हनुमान म्हणाले,  ‘‘जोपर्यंत पृथ्वीवर प्रभु श्रीरामाचे नाव आहे, तोपर्यंत मी येथेच थांबतो.’’ त्या वेळी प्रभु श्रीरामाने हनुमानाला तिलक लावून सिंहासनावर बसवले. अयोध्यानगरीचे रक्षण करण्यासाठी भगवंताने अयोध्या हनुमानाला दिली आणि अयोध्येच्या बाहेरची गावे भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्या मुलांना दिली. तेव्हापासून हे मंदिर ‘हनुमानगढी’, या नावाने ओळखले जाते. धन्य ते प्रभु श्रीराम आणि धन्य तो श्रीरामभक्त हनुमान !

 

श्रीरामाची राजगद्दी

प्रभु रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला, ते पवित्र स्थान ! याला आता ‘राजगद्दी’ असे संबोधले जाते. या ठिकाणी सध्या श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे. ती महाराज समुद्रगुप्त यांनी प्रतिष्ठापित केली आहे. ज्या वेळी अयोध्येवर मुसलमान आक्रमकांचे शासन होते, तेव्हाच्या काळातही जे खटले अन्य ठिकाणी सुटत नसत, ते खटले या ठिकाणी सोडवले जात असत. राजगद्दी ही प्रत्येक हिंदूसाठी आत्मीयतेची वास्तू असली, तरी आज तिचे केवळ असे अवशेष पाहायला मिळतात.

 

श्री देवी देवकाली मंदिर

श्रीदेवी देवकालीमाता

अयोध्येतील श्री देवकाली माता प्रभु श्रीरामाची कुलदेवी आहे. श्री देवकाली मंदिराची स्थापना श्रीरामाचे पूर्वज महाराजा रघु यांनी केली होती. श्री देवकाली देवीचे वर्णन देवी भागवतातही केले आहे. प्रभु श्रीरामाचा जन्म झाल्यानंतर कौसल्या माता रामलला आणि त्याचे बंधू यांना घेऊन श्री देवकाली मातेच्या दर्शनासाठी आली होती. तेव्हापासून अयोध्या परिसरात कुणाच्या घरी बाळाचे आगमन झाले की, त्याला श्री देवकाली मातेच्या चरणी दर्शनासाठी आणले जाते. त्या बाळाच्या मंगलकार्यांना देवीच्या दर्शनाने प्रारंभ होतो.

आपण रामराज्याची अनुभूती देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्या कार्याला आशीर्वाद लाभावे, अशी श्री देवकाली मातेच्या चरणी प्रार्थना !

 

कनक भवन

कनक भवन हा महाराणी कैकयी यांचा महाल होता ! त्या वेळी हा महाल संपूर्णतः सुवर्णाने बनवलेला होता. जनककन्या सीता विवाह होऊन अयोध्येला आल्यानंतर कैकयी मातेने ‘सूनमुख’ पाहण्याच्या वेळी हा महाल तिला भेट दिला. प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचा हा विशेष महाल होता. नंतर राजा विक्रमादित्य यांनी हा महाल पुन्हा बांधला. नंतर सय्यद मसूद सालार गाजी याने तो तोडला. नंतर टिकमगढच्या महाराणी श्री वृषभानू कुँवर यांनी प्रस्तुत महाल बांधून घेतला. येथे २ प्राचीन शिलालेख आहेत.

 

मोक्षदायिनी अयोध्या !

प्रत्येक भक्ताच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेले प्रभु श्रीराम ! त्यांच्या बाललीलांनी ज्या नगरीला मोहवले, त्यांच्या आज्ञापालनाने जिला उच्च कोटीची शिकवण लाभली, त्यांच्या प्रशासनाने जेथे ईश्‍वरी राज्य अवतरले, त्यांच्या अवतारकार्याने ज्या नगरीला कृतकृतार्थ केले, ती दैवी, परममंगल, अतीभाग्यवान नगरी आहे अयोध्या ! या नगरीच्या कणाकणात, रोमारोमात अद्यापही प्रभु श्रीरामांचे वास्तव्य आहे. तेथील सूक्ष्म दैवी स्पंदने त्याची साक्ष देत आहेत. त्यासह अनेक वास्तू, मंदिरे अजूनही लक्षावधी वर्षांचा हा इतिहास मोठ्या गौरवाने सांगत आहेत. अयोध्या नगरीत आणि परिसरात प्रभु श्रीरामाशी निगडित स्मृती जपलेली १५० हून तीर्थस्थाने आहेत. या तीर्थस्थानांतील काही निवडक तीर्थस्थळांचे दर्शन घेऊन श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करूया ! अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारणीसाठी या दिव्य वास्तूंचे आशीर्वाद मोलाचे आहेत !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात