सम्राट विक्रमादित्याने अयोध्या येथे स्थापन केलेल्या प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन !

Article also available in :

अयोध्येचे महात्म्य आणि तिला गतवैभव प्राप्त करून देणारा सम्राट विक्रमादित्य !

‘आयुष्यात एकदा तरी श्रीरामजन्मभूमीचे दर्शन घेऊन धन्य व्हावे’, अशी आस प्रत्येक हिंदूच्या मनात असते. सम्राट विक्रमादित्याने अत्यंत तळमळीने आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून श्रीरामजन्मभूमी शोधून काढली अन् नंतर तेथे विधीवत् राममंदिर उभारले. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच आज आपण श्रीरामजन्मभूमीचे दर्शन घेऊ शकतो, तसेच श्रीरामाच्या मूळ मूर्तींचेही दर्शन आपल्याला श्री काळाराम मंदिरात होते. त्यामुळे सम्राट विक्रमादित्यांविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी थोडीच ! ‘सम्राट विक्रमादित्यामधील ही तळमळ आणि भाव आमच्यातही निर्माण होऊ दे’, अशी श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना !’

– श्री चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. भारतभरातील ७ मोक्षनगरींमध्ये अग्रस्थानी असलेली अयोध्या !

माता कैकयीने सीतेला सुनमुख पहातांना भेट दिलेला कनक महाल ! राजा विक्रमादित्याने याचीही पुनर्उभारणी केली !

षट्गुणैश्‍वर्य भगवान श्रीविष्णूचे चरणकमल हीच अवंतिकापुरी (सध्याचे उज्जैन) आहे. शिवकांची आणि विष्णुकांची (सध्याचे कांचीपुरम्, तमिळनाडू) या विष्णूच्या दोन्ही जांघा आहेत. नाभीस्थान द्वारकापुरी आणि हृदयस्थान मायापुरी (सध्याचे हरिद्वार) आहे. कंठस्थान (गळा) ही मथुरानगरी आहे, तर नासाग्रावर काशीपुरी (सध्याचे काशी, वाराणसी) आहे. इतक्या ब्रह्मपदांची वर्णने करून ‘परब्रह्मस्वरूप अशी अयोध्या भगवंताचे शिरकमल आहे’, असे ऋषींनी अयोध्येचे वर्णन केले आहे.

यावरून लक्षात येते की, या सप्तपुरी म्हणजे साक्षात भगवान श्रीविष्णूचा देह आहे. आपल्या भारतभूमीत साक्षात भगवंताचा वास आहे. भारतात जन्माला येणे किती भाग्याचे आहे, हे यावरून लक्षात येते. या सातही मुख्य मोक्षनगरींमध्ये (जेथे निवास, जन्म आणि मृत्यू मिळाल्याने मोक्षाची अपेक्षा केली जाऊ शकते, अशा नगरींत) अयोध्यानगरी अग्रस्थानी आहे. जगप्रसिद्ध अशा सूर्यवंशाची उत्पत्ती येथेच झाली, तसेच मोठमोठे धर्मात्मा राजेही येथेच होऊन गेले.

१ अ. अयोध्येचा ३ वेळा उद्धार होणे

या अयोध्यानगरीचा ३ वेळा उद्धार झाला. प्रथम सूर्यवंशी राजा रुक्मानंद याने एकादशीच्या व्रतप्रभावाने अयोध्यानगरीच्या जीवमात्रांना वैकुंठाला नेले होते. काही काळाने याच वंंशामध्ये राजा हरिश्‍चंद्राचा जन्म झाला. त्याने त्याच्या सत्यव्रताच्या प्रभावाने अयोध्येतील प्रजेला वैकुंठाला नेले. त्यानंतर याच श्रेष्ठ रघुवंशात त्रैलोक्याधिपती प्रभु श्रीरामचंद्र अवतरले. त्यांनीही निजधामास जातांना अयोध्यावासियांना शरयू नदीत स्नान करवून दिव्यदेही केले. तसेच सर्वांना स्वत:समवेत घेऊन वैकुंठाला जाण्याची सिद्धता केली. त्यासमयी ते श्री मारुतिरायाला जवळ बोलावून म्हणाले, ‘‘माझ्या पश्‍चात् अयोध्येचे राज्य तू सांभाळ आणि कल्पपर्यंत (शेवटपर्यंत) अचल राज्य कर.’’ ही आज्ञा देऊन प्रभूंनी मारुतीला अयोध्येच्या गादीवर बसवले. तेव्हापासून श्रीरामचंद्रांची आज्ञा शिरसावंद्य मानून मारुतिराया अजूनही तेथेच बसले आहेत. सांप्रत अयोध्येतील मुख्य देवता श्री हनुमानबली हे जागृत आहेत.

१ आ. प्रभु श्रीरामाचे पुत्र लव-कुश यांनी पुन्हा अयोध्यानगरीचे पुनरुत्थान करणे

श्रीराम निजधामास गेल्यावर पुष्कळ काळ अयोध्यानगरी उदास स्थितीत होती. अयोध्येवर दृष्टी फिरवल्यास जिकडे-तिकडे घनघोर अरण्ये, वानरसेना आणि शरयू नदी या ३ गोष्टी दिसत होत्या. याशिवाय चौथे मारुतीचे स्थान होते. इतर कोणत्याही वस्तू अवशिष्ट (शेष) राहिल्या नाहीत. कालांतराने प्रभु श्रीरामाचे पुत्र लव-कुश यांनी स्वर्गद्वार तीर्थावर श्रीनागेश्‍वरनाथ महादेवाची स्थापना केली आणि पुन्हा अयोध्यानगरी यथायोग्य वसवली. ही कथा त्रेता आणि द्वापर युगांतील आहे.

 

२. अयोध्येचा शोध लावून मंदिरांची स्थापना करणारा सम्राट विक्रमादित्य !

२ सहस्र वर्षांपूर्वी उज्जयिनीमध्ये सम्राट विक्रमादित्य राज्य करत होता. एकदा श्रीरामाच्या कृपेने त्याला काही विचार स्फूरले. तो विचार करू लागला, ‘माझा जन्म क्षत्रिय कुळात सूर्यवंशात झाला आहे आणि सूर्यवंशाची मातृभूमी, तर अयोध्या आहे. ती प्रभु श्रीरामचंद्रांचीही जन्मभूमी आहे. त्या भूमीचा शोध लावला पाहिजे.’ असा विचार करून सम्राट विक्रमादित्य अयोध्येत आला आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांसमवेत श्रीरामजन्मभूमीचा शोध घेऊ लागला; परंतु ‘जन्मभूमी हीच आहे’, असा निश्‍चयात्मक दाखला त्याला कुठेही मिळाला नाही.

२ अ. सम्राट विक्रमादित्याला एक दैवी पुरुष भेटणे

सम्राट विक्रमादित्य पश्‍चात्तापयुक्त मनाने शरयू नदीच्या जवळील निर्मली कुंडाच्या ठिकाणी विचार करत बसला. इतक्यात त्याला दिसले की, एक दिव्य पुरुष काळ्या रंगाचा पोशाख घालून आणि काळ्या घोड्यावर बसून तेथे आला. त्याने निर्मली कुंडात स्नान केले, तसेच त्याच्या घोड्यालाही तेथे स्नान घातले. केवळ स्नानमात्रे त्या दोघांची कांती कापरासारखी दिव्य झाली. एकाएकी त्या पुरुषाच्या शरिराचा रंग पालटला. हा चमत्कार पाहून सम्राट विक्रमादित्य फार चकित झाला. ‘हा कुणीतरी दैवी पुरुष आहे’, असा विचार करून राजाने त्याला नमस्कार केला.

२ आ. सदर दैवी पुरुष तीर्थराज प्रयाग असणे आणि त्याने
रामजन्मभूमी शोधण्यासाठी सम्राट विक्रमादित्याला आशीर्वाद देणे

आपला परिचय देऊन राजाने त्याला श्रीरामचंद्रांची जन्मभूमी दाखवण्याची विनंती केली आणि हात जोडून समोर उभा राहिला. राजाची भक्ती पाहून तो पुरुष म्हणाला, ‘‘राजा, तू धन्य आहेस आणि तुझा प्रश्‍नही उत्तम आहे; परंतु मला येथे कालापव्यय करता येत नाही. त्यामुळे हे राजन, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर काशीक्षेत्री सम्राट विश्‍वनाथाच्या दरबारात मिळेल.’’ तो स्वत:चा परिचय देत म्हणाला, ‘‘मी तीर्थराज प्रयाग आहे. जनतेच्या पापरूपी काळीमेला नित्य या निर्मली कुंडात धुतो. मग फिरून जगाची पातके ग्रहण करण्यासाठी माझ्या स्थानी जातो. त्यामुळे मला लवकर निघाले पाहिजे.’’ या वेळी त्याने ‘श्रीराम तुझे मनोरथ पूर्ण करोत’, असा आशीर्वाद राजाला दिला आणि तीर्थराज तेथेच अदृश्य झाले.

 

३. रामजन्मभूमीचा शोध लागण्यासाठी सम्राट विक्रमादित्याने केलेले तप !

३ अ. राजाचा निग्रह पाहून काशी विश्‍वेश्‍वर प्रसन्न होणे

सम्राट विक्रमादित्याने श्रीरामाचे स्मरण केले आणि श्रीकाशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे त्याने भगवान विश्‍वेश्‍वराचे दर्शन घेतले आणि प्रभु श्रीरामाची जन्मभूमी समजण्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करून सम्राट अन्न-जल विरहित, तसेच निश्‍चयपूर्वक शिवनामाचा जप करत तेथेच शिवद्वारी धरणे धरून बसला. राजाचा हा निग्रह पाहून परम करुणामयी भगवान श्री शंकराने एका वृद्ध व्यक्तीचे रूप धारण केले. एका हाती पुस्तक आणि दुसर्‍या हाती वृद्ध गाय घेऊन ब्राह्मणाच्या रूपात शिवराज त्याच्या समोर येऊन उभे राहिले.

३ आ. विश्‍वेश्‍वररूपी वृद्ध व्यक्तीने रामजन्मस्थान शोधण्याचा मार्ग दाखवणे

ते राजाला म्हणाले, ‘‘ही अन्नपूर्णानगरी आहे. येथे निरव (निराहारी) रहाण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या वचनावर विश्‍वास असेल, तर तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल. ही कामधेनु आणि ही पोथी घेऊन तू अयोध्येला जा. तेथे शरयू नदीच्या तिरावर या गायीला चरण्यास सोड. जेथे तिच्या आचळातून दुधाची धारा वाहू लागेल, ‘तिथेच मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आहे’, असे निश्‍चित समज. या पोथीच्या आधाराने अयोध्यानगरीची पुनर्रचना कर. श्री विश्‍वेश्‍वर तुझ्यावर प्रसन्न असून तुझा मनोरथ पूर्ण होईल.’’ हे सांगितल्यावर वृद्ध ब्राह्मणरूपी विश्‍वेश्‍वर तेथेच अंतर्धान झाले. त्यानंतर राजाने ती पोथी आणि गाय यांच्या समवेत श्री विश्‍वेश्‍वराला नमन करून अयोध्येला प्रयाण केले.

प्रभु श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक झाला, ते हे पावन स्थान ! आता ते ‘राजगद्दी’ म्हणून प्रचलित आहे !

 

४. सम्राट विक्रमादित्याला रामजन्मभूमीचा शोध लागल्यावर त्या जागेची विधीवत् पूजा करणे !

श्रीरामचंद्रांचे ध्यान करत सम्राट मोठ्या आनंदाने शरयूच्या तिरावर येऊन पोचला. तेथे त्याने यथाविधी शरयूमातेचे पूजन केले. त्यानंतर नदीला साष्टांग नमस्कार करून प्रभु श्रीरामाची जन्मभूमी दाखवण्याची गायीला प्रार्थना केली. त्यानंतर ती कामधेनु स्वच्छंदपणे शरयूतिरी हिंडू लागली. राजाही तिच्या मागोमाग फिरत होता. कालांतराने एका ठिकाणी तिच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून राजाला अतिशय आनंद झाला. ‘आज मी धन्य झालो, कृतकृत्य झालो’, असे म्हणून त्याने त्या भूमीचे आणि कामधेनूचे विधीवत् पूजन केले. मग वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांना बोलावून त्यांचेही पूजन करून त्यांना संतुष्ट केले. पूर्वी घडलेला सर्व वृत्तांत सांगून त्याने ती पोथी ब्राह्मणांच्या पुढे ठेवली. त्यांना हात जोडून प्रार्थना केली, ‘हे भूदेवांनो, या अयोध्यानगरीची पुनर्रचना करण्याची माझी इच्छा आहे, ती पूर्ण करावी.’ यानंतर त्या ब्राह्मणांनी या पोथीच्या आधारे अयोध्येची सीमा आणि सर्व तीर्थस्थाने यांचा शोध लावला. इतर स्थाने आणि जेथे जाताच प्रभूच्या चरित्राची माहिती समजते, अशी मंदिरे आणि मूर्ती स्थापित केल्या.

 

५. सम्राट विक्रमादित्याने रामजन्मभूमीच्या स्थानी बांधलेली विविध मंदिरे !

सम्राट विक्रमादित्याने सर्वप्रथम ५ मंदिरे उभारून त्या ठिकाणी प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तींची स्थापना केली, तसेच पूजा, नैवेद्य इत्यादींची व्यवस्था केली.

अ. पहिले मंदिर : हे जन्मस्थळी, म्हणजे ज्या ठिकाणी कामधेनूच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या, तेथे बांधण्यात आले. तेथे एका मोठ्या शाळीग्राम शिळेवर राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि रामाच्या चरणाशी मारुति अशा पाचही मूर्ती कोरल्या. तसेच श्री रामयंत्रासहित मूर्तीची स्थापना केली.

आ. दुसरे मंदिर : येथे रत्नसिंहासन आहे. येथेच श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक झाला होता. तेथे पट्टाभिषेक राम-सीतेची मूर्ती स्थापन केली.

इ. तिसरे कनक भवन : तेथे राम-जानकीचे विहारस्थान होते. तेथेही श्रीराम-जानकीच्या मूर्ती स्थापित केल्या.

ई. चौथे मंदिर : हे सहस्रधारातीर्थावर आहे. येथे लक्ष्मण बालाजीची चतुर्भूज मूर्ती स्थापन केली.

उ. पाचवे मंदिर : हे आदिशक्तीच्या स्थानावर बांधले आहे. तेथेही एकाच भव्य शिलेमध्ये श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती या आदिशक्ती त्रिमूर्ती यंत्रासहित स्थापित केल्या. हे स्थान सध्या ‘देेवकाली’ या नावाने प्रसिद्ध आहे.’

(संदर्भ : श्री अयोध्या महात्म्य, लेखक : यशवंतराव देशपांडे)

 

सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले सम्राट
विक्रमादित्याने अयोध्या येथे स्थापन केलेल्या प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन !

रामराज्यासम असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद !

 

१. काही कारणाने श्रीरामजन्मभूमीवर जाण्यास अडचण
येऊन श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ मार्गातील मठात थांबणे

महर्षींनी २.८.२०२० या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अयोध्येतील रामजन्मभूमीचे दर्शन घेण्यास सांगितले होते. त्या दिवशी काही कारणाने श्रीरामजन्मभूमीवरील दर्शन बंद ठेवण्यात आल्यामुळे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रत्यक्ष रामजन्मभूमीकडे जाता आले नाही. त्या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ मार्गातील एका मठात थांबल्या. त्या मठातील महंतांनी त्यांना श्री काळाराम मंदिराविषयी माहिती दिली.

 

२. प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन होण्याविषयी
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना मिळालेला संकेत आणि प्रत्यक्ष दर्शन

मठात मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री काळाराम मंदिरात गेल्यानंतर श्री काळाराम मंदिराचे पुजारी श्री. गोपाळराव दिगंबर देशपांडे आणि त्यांचे पुतणे अन् मंदिराचे व्यवस्थापक श्री. राघवेंद्र यशवंत देशपांडे यांनी त्या मूर्तीचा इतिहास सांगितला. त्यातून उलगडले की, सम्राट विक्रमादित्याने श्रीरामजन्मभूमीवर स्थापन केलेली मूळ मूर्ती आता श्री काळाराम मंदिरात स्थापन केली आहे. ती मूर्ती हे श्रीरामपंचायतन आहे. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या मूर्तीचे भावपूर्ण दर्शन घेतले. प्रत्यक्षातही रामजन्मभूमीजवळील मठात प्रवेश करतांनाच श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवले होते की, ‘आज प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन होईल.’

सर्वत्र बाह्य परिस्थिती अत्यंत कठीण आहे. अशा स्थितीत प्रभु श्रीराममंदिरातील मूळ आणि प्राचीन मूर्तीचे दर्शन होणे हा, हिंदु राष्ट्राच्या, म्हणजेच रामराज्याच्या स्थापनेसाठी मिळालेला मोठा आशीर्वादच आहे ! ही महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपाच आहे ! भगवंताला खर्‍या भक्ताला भेटण्यासाठी परिस्थितीचे कोणतेही बंधन नसते, हेच खरे !’

– श्री. अनिमिष नाफडे, अयोध्या. (३.८.२०२०)

या पंचायतनामध्ये श्रीराम हे पद्मासनामध्ये बसलेले आहेत, त्यांच्या डावीकडे सीतामाता आहे, श्रीरामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मणाची मूर्ती आहे. लक्ष्मणाच्या हातामध्ये छत्र आहे. एका बाजूला पंखा हातात धरून भरत आणि चामर घेतलेले शत्रुघ्न आहेत. त्यांच्या समोर हनुमान विराजमान आहेत.

श्री रामपंचायतनात विराजमान १. श्रीराम २. सीतामाई ३. लक्ष्मण ४. भरत ५. शत्रुघ्न

अहिरावणाचा वध करण्यासाठी मारुतिरायाने देवीचे रूप धारण केले होते. त्यामुळे येथील हनुमानाची मूर्ती देवीच्या वेशात आहे आणि तिच्या पायाखाली अहिरावण आहे. या सर्व मूर्ती एकाच शाळीग्राम दगडाच्या बनलेल्या आहेत. मूर्तीच्या चरणांशी श्रीरामयंत्र आहे. वाल्मीकि रामायणात दिलेल्या श्‍लोकाप्रमाणे या मूर्तीची रचना आहे.

हनुमानाची देवीच्या वेशातील मूर्ती

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये मूर्ती आधी स्थापित झाल्या आणि नंतर मंदिर बांधले गेले.

 

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना
श्रीरामपंचायतनातील मूळ मूर्तीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

अत्यंत लोभस, लडीवाळ आणि आकर्षणशक्ती असलेली श्रीरामपंचायतनातील मूर्ती !

‘रामपंचायतनातील या मूर्तीचे रूप अत्यंत सुंदर, देखणे आणि लोभस आहे. या मूर्तीच्या मुखावर लडीवाळ भाव आहे. त्या मूर्तीमध्ये विशिष्ट प्रकारचे आकर्षण आहे. त्यामुळे मनुष्याची दृष्टी त्यांच्यावर खिळून रहाते. मी त्या मूर्तीकडे आकर्षित झाले. आपले अत्यंत जवळचे माणूस अनेक वर्षांनी भेटले की, कसा आनंद होतो, तसा आनंद मला या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर झाला. आतून गदगदून आले आणि भाव दाटून आला.

मी महर्षींच्या आज्ञेने गेली २ – ३ वर्षे अयोध्येला येत आहे; मात्र आता या मूर्तीचे दर्शन झाले. हिंदु राष्ट्र स्थापनेची, म्हणजेच रामराज्याच्या स्थापनेची वेळ जवळ येत आहे, तसे श्रीरामतत्त्वाला जागृती येत आहे. याचाच शुभसंकेत म्हणून प्रभु श्रीरामाच्या या मूळ मूर्तीचे दर्शन आम्हाला घडले आहे.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (३.८.२०२०)
श्रीरामपंचायतनाला भावपूर्ण नमस्कार करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

सम्राट विक्रमादित्य यांनी स्थापन केलेल्या मंदिरातील
प्राचीन रामपंचायतन विराजमान असलेले अयोध्येतील श्री काळाराम मंदिर !

‘बाबराच्या आक्रमणात श्रीरामजन्मभूमी विटंबित होण्यापूर्वी तेथे असलेले भव्य श्रीराममंदिर सम्राट विक्रमादित्याने सुमारे २००० वर्षांपूर्वी बांधले होते. त्या वेळी सम्राट विक्रमादित्याने स्थापित केलेली श्रीरामपंचायतन मूर्ती सध्या अयोध्येतील श्री काळाराम मंदिरात विराजमान आहेत.

१. बाबराच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती शरयू नदीत प्रवाहित करणे

वर्ष १५२८ मध्ये बाबराने श्रीरामजन्मभूमीवरील मंदिरावर आक्रमण केले. मोगल आक्रमक बाबर अयोध्येच्या दिशेने येत आहे, हे समजल्यानंतर श्रीराममंदिराचे तत्कालिन पुजारी श्यामानंद सरस्वती यांना कळून चुकले की, ‘या यवनी आक्रमणात मूर्तीचे भंजन होऊ शकते आणि स्वतःचे प्राण दिले, तरी मी मूर्ती वाचवू शकणार नाही.’ त्यामुळे त्यांनी १५२८ या वर्षी ही मूर्ती शरयू नदीमध्ये प्रवाहित केली. ही मूर्ती शरयू नदीमध्ये २२० वर्षे होती.

२. पंडित नरसिंहराव मोघे यांना झालेला स्वप्नदृष्टांत आणि मूर्तींची शरयूतिरी स्थापना !

श्री. गोपाळराव देशपांडे

१७४८ या वर्षी महाराष्ट्रातील पंडित नरसिंहराव मोघे हे त्या वेळी शरयू नदीकिनारी तपस्या करत होते. या वेळी त्यांना दृष्टांत झाला की, ‘शरयूमध्ये लक्ष्मण घाटावर माझी मूर्ती आहे. ती काढून श्री नागेश्‍वरनाथ मंदिराजवळ तिची स्थापना करावी.’ त्या वेळी नरसिंहराव मोघे यांना त्या मूर्तीचे दर्शनही झाले. हा दृष्टांत त्यांना ३ वेळा झाला. दुसर्‍या दिवशी स्नानासाठी शरयूतिरी गेल्यावर पंडित मोघे यांना ती मूर्ती प्राप्त झाली. ही मूर्ती काळ्या रंगाची होती. पंडित नरसिंहराव मोघे यांना ती मूर्ती प्राप्त झाली, तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे काळे राम आहेत.’’ तेव्हापासून त्यांचे नाव ‘काळाराम’ असे प्रख्यात झाले. तत्पूर्वी जेव्हा ही मूर्ती श्रीरामजन्मभूमीवरील मंदिरात स्थापित होती, त्या वेळी देवाचे नाव ‘विष्णुहरि’ असे होते. पंडित मोघे यांना झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी या मूर्तीची स्थापना अयोध्येतील श्री नागेश्‍वरनाथ मंदिराजवळ केली. श्री नागेश्‍वरनाथ मंदिर १०८ ज्योर्तिलिंगांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना प्रभु श्रीरामाचा धाकटा पुत्र कुश याने केली होती.

३. मंदिराला भेट दिलेल्या थोर विभूती

प.प. श्रीधरस्वामी यांनी या मंदिरात ४ वेळा चातुर्मासाचे व्रत केले होते. या मंदिरातच प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या आईने देहत्याग केला होता. समर्थ रामदासस्वामी आणि प.पू. गोंदवलेकर महाराज यांनी या मंदिरात दर्शन घेतले आहे.

४. नवीन मंदिराच्या उभारणीनंतरही मूळ मूर्ती श्री काळाराम मंदिरातच विराजमान असतील !

श्री. राघवेंद्र देशपांडे

आता श्रीरामजन्मभूमीवर नव्याने श्रीराममंदिराची उभारणी होत आहे. श्री काळाराम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ‘यावच्चन्द्रदिवाकरौ…’ या नियमाप्रमाणे, म्हणजे ‘जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत’, तोपर्यंत; म्हणजेच अनंत काळासाठी आहे. आरंभी विक्रमादित्यांनी श्रीरामजन्मभूमीवर स्थापन केलेली ही मूर्ती प्रभु श्रीरामाच्या दृष्टांतानुसारच श्री काळाराम मंदिरात स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ही मूर्ती श्री काळाराम मंदिरातच असणार आहे.’

– श्री. गोपाळराव दिगंबर देशपांडे, पुजारी आणि त्यांचे पुतणे श्री. राघवेंद्र यशवंत देशपांडे, व्यवस्थापक, श्री काळाराम मंदिर, अयोध्या.

 

महर्षींची सर्वज्ञता आणि द्रष्टेपण !

१. ‘नाडीवाचनातून महर्षि आम्हाला श्रीरामजन्मभूमीवर दर्शन घेण्यास सांगतांना नेहमी ‘समर्थ रामदासस्वामी यांनी पूजन केलेल्या मूर्तीचे दर्शन घ्या’, असे सांगत असत. सध्याच्या श्रीरामजन्मभूमीवरील मूर्ती अलीकडच्या काळातील आहेत. काळाराम मंदिराचा इतिहास समजल्यानंतर लक्षात आले की, ‘महर्षि आम्हाला सांगत असलेली मूर्ती हीच आहे.’ २.८.२०२० या दिवशी आम्ही श्रीरामजन्मभूमीवर दर्शन घेण्यासाठी निघालो होतो आणि नंतर माहिती मिळाल्यामुळे श्री काळाराम मंदिरात आलो. असे असले, तरी ‘आमचे श्री काळाराम मंदिरात येणे ईश्‍वरनियोजितच होते’, हे यातून लक्षात आले. महर्षींची सर्वज्ञताही यातून दिसून येते.

२. काही वर्षांपूर्वीच महर्षींनी ‘सनातन संस्थेच्या सर्व साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी श्रीरामपंचायतनाचे चित्र साधकांना समवेत ठेवण्यास सांगितले आहे. आज श्री काळाराम मंदिरातील रामपंचायतनाच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर महर्षींनी दिलेल्या श्रीरामपंचायतनाच्या चित्रामागचाही कार्यकारणभाव लक्षात आला.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

यवनी आक्रमणांच्या काळात धर्म आणि संस्कृती वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी शक्तीने आणि प्रसंगी युक्तीनेही कष्ट घेतले. बाबराच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी श्रीराममंदिराचे पुजारी श्यामानंद सरस्वती यांनी ती मूर्ती शरयू मातेच्या स्वाधीन केल्या, त्यामुळे ती सुरक्षित राहिली. नंतर पंडित मोघे यांनी स्वप्नदृष्टांतानुसार ती पुन्हा स्थापित केली, त्यामुळे आज त्या मूर्तीचे दर्शन घडत आहे. आज आपण पहात असलेली प्राचीन मंदिरे, हा आपल्या पूर्वजांनी अत्यंत कष्टाने रक्षण केलेला अमूल्य वारसा आहे. त्या सर्वांना त्रिवार वंदन ! आपल्या पुढील पिढीला हा इतिहास कळावा, यासाठी आपल्या पराक्रमी आणि धर्मनिष्ठ पूर्वजांप्रमाणेच राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील होणे, हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता !

अयोध्येत गेल्यावर सर्व भक्तांनी श्री काळाराम मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन घेऊन अत्यंत जागृत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा आशीर्वाद अवश्य घ्यावा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment