जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

 

श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये

१. धर्मसंस्थापनेची आराध्य देवता

भगवान श्रीकृष्ण ही धर्मसंस्थापनेची आराध्य देवता आहे.

२. अवतार

श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा आठवा अवतार आहे. तो सोळा कलांनी युक्त असल्यामुळे पूर्णावतार आहे.

३. संबंधित नदी

यमुना नदी ही श्रीकृष्णाशी संबंधित आहे. तिच्यामध्ये अधिक प्रमाणात कृष्णतत्त्व आहे. तिचा रंग श्रीकृष्णाप्रमाणेच सावळा आहे. यमुनेला ‘कालिंदीही’ म्हणतात.

४. कुंडलिनीतील संबंधित चक्र

कुंडलिनीतील अनाहतचक्र हे श्रीकृष्णाशी संबंधित आहे.

५. संबंधित वार

बुधवार हा विठ्ठलाचा वार आहे. विठ्ठल हा कलियुगातील श्रीकृष्णाचाच अवतार आहे.

६. संबंधित तिथी

श्रावणातील कृष्ण पक्षातील गोकुळाष्टमीची तिथी श्रीकृष्णाशी संबंधित आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशीला येणारी ‘गीता जयंती’ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेशी संबंधित आहे.

७. योगमार्गानुसार श्रीकृष्ण तत्त्वाचा रंग भिन्न असणे

७ अ. भक्तीमार्गानुसार

श्रीकृष्णाच्या तत्त्वाचा रंग निळा आहे.

७ आ. ज्ञानमार्गानुसार

श्रीकृष्णाच्या तत्त्वाचा रंग पिवळा आहे.

७ इ. कर्ममार्गानुसार

श्रीकृष्णाच्या तत्त्वाचा रंग पिवळसर-केशरी आहे.

८. प्रिय नैवैद्य

लोणी, दही-पोहे आणि शिरा श्रीकृष्णाला प्रिय आहेत. तसेच उत्तर भारतातील विविध मंदिरांमध्ये श्रीकृष्णाला ५६ भोगांचा (विविध गोड पदार्थांचा) नैवेद्य दाखवण्यात येतो.

९. आयुध

सुदर्शनचक्र आणि पांचजन्य शंख ही आयुधे आहेत.

१०. संबंधित वाद्य

बासरी हे श्रीकृष्णाचे प्रिय वाद्य आहे.

११. संबंधित तीर्थक्षेत्र आणि जागृत देवस्थाने

गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका आणि जगन्नाथपुरी ही श्रीकृष्णाशी संबंधित तीर्थक्षेत्रे आहेत. केरळमधील गुरुवायूर मंदिर, कर्नाटक राज्यातील उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिर ही जागृत देवस्थाने आहेत.

 

श्रीकृष्णाची विविध नावे

कन्हैया, कान्हा, श्यामसुंदर, मुरलीधर, गिरीधर, केशव, माधव, मोहन, मनमोहन, बन्सीवाला, माखनचोर, राधेश्याम, गोविंद, गोपाल, मुरारी, कृष्ण, देवकीनंदन, यशोदानंदन, नंदनंदन, वासुदेव, द्वारकाधिश, त्रिलोकीनाथ, बांकेबिहारी, चक्रधर, नंदकिशोर, लड्डूगोपाल इत्यादी श्रीकृष्णाची अनेक नावे प्रसिद्ध आहेत.

अ. देवकीनंदन, यशोदानंदन आणि नंदनंदन

देवकी, यशोदा आणि नंदराजा यांचा पुत्र असल्यामुळे त्याला अनुक्रमे देवकीनंदन, यशोदानंदन आणि नंदनंदन ही नावे मिळाली.

वसुदेव हे श्रीकृष्णाचे जन्मदाता पिता होते. देवकीने श्रीकृष्णाला प्रत्यक्ष जन्म दिला. त्यामुळे ती त्याची जन्मदाती आई होती. वसुदेवाने जेव्हा श्रीकृष्णाला मथुरेतून गोकुळात नेले, तेव्हा नंदराजा आणि यशोदा यांनी त्याचे पालनपोषण केले. त्यामुळे यशोदा श्रीकृष्णाची पालक माता होती आणि नंदराजांनी त्याचे पितृवत पालन केल्यामुळे ते त्याचे पालक पिता होते. त्यामुळे श्रीकृष्ण वसुदेव, देवकी, यशोदा आणि नंदराजा या चौघांचाही पुत्र होता.

आ. वासुदेव आणि वसुदेवसूत

श्रीकृष्णाच्या जन्मदात्या पित्याचे नाव वसुदेव होते. वसुदेवाचा पुत्र म्हणून त्याला ‘वासुदेव’ म्हणतात. तो वसुदेवाचा पुत्र असल्यामुळे त्याला ‘वसुदेवसुत’ म्हटले आहे.

इ. माखनचोर

श्रीकृष्ण सवंगड्यांसह गोकुळातील गोपींच्या घरी जाऊन मटक्यात ठेवलेले लोणी चोरून खात होता. त्यामुळे त्याला गोपींनी प्रेमाने ‘माखनचोर’ हे नाव ठेवले होते.

ई. श्याम आणि श्यामसुंदर

श्रीकृष्णाचा वर्ण गडद निळा किंवा सावळा होता. त्यामुळे त्याला ‘श्याम’ हे नाव पडले. तो सावळा असूनही दिसायला अतिशय सुंदर होता; म्हणून त्याला ‘श्यामसुंदर’, असेही म्हणतात.

उ. बन्सीधर आणि मुरलीधर

श्रीकृष्णाच्या हातात बासरी असल्यामुळे त्याला ‘बन्सीवाला’ किंवा ‘बन्सीधर’ ही नावे प्राप्त झाली. बासरीला मुरलीही म्हणत असल्यामुळे त्याचे ‘मुरलीधर’ हे नावही प्रचलित आहे.

ऊ. गोपाल

श्रीकृष्णाने गायींचे रक्षण आणि प्रतिपाळ केल्यामुळे त्याला ‘गोपाल’ हे नाव प्राप्त झाले.

ए. गोविंद

श्रीकृष्ण प्रत्येक प्राणीमात्राच्या अंत:करणात आनंदाच्या रूपाने वास करत असल्याने त्याला ‘गोविंद’ म्हणतात.

ऐ. हृषिकेश

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment