जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण पैलू !

१. श्रीकृष्णाचे कुटुंबीय

अ. ‘श्रीकृष्णाचे पालक पिता नंद हे ‘आभीर’ जातीचे होते. त्यांना आज ‘अहीर’ या नावाने ओळखले जाते. श्रीकृष्णाच्या जन्मदात्या पित्याचे नाव वसुदेव होते. ते आर्यांचे प्रसिद्ध ‘पंच जन’ यांतील एक ‘यदु’ गणक्षत्रिय होते. त्यांना त्या वेळी ‘यादव’ असे संबोधले जात होते.

आ. श्रीकृष्णाची पणजी ‘मारिषा’ आणि सावत्र आई रोहिणी (बलरामची आई) ‘नाग’ जनजातीच्या होत्या.

इ. वसुदेवाने श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर त्याला गोकुळात नंदाकडे पोहोचवले आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला त्याने मथुरेत आणले. या यशोदापुत्रीचे नाव ‘एकानंशा’ होते. ती आजही ‘विंध्यवासिनी देवी’ या नावाने पूजली जाते.

ई. जैन परंपरेनुसार श्रीकृष्णाच्या चुलत भावाचे नाव तीर्थंकर नेमिनाथ हे होते. ते हिंदु परंपरेत ‘घोर अंगिरस’ या नावाने प्रसिद्ध होते.

 

२. राधा

श्रीकृष्णाच्या राधेचा उल्लेख महाभारत, हरिवंशपुराण, विष्णुपुराण आणि भागवतपुराण यांत नाही. तिचा उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराण, गीत गोविंद आणि जनश्रुति यांमध्ये आहे.

 

३. श्रीकृष्णाच्या देहाची वैशिष्ट्ये

३ अ. देहाला सुगंध येणे

श्रीकृष्णाचा रंग मेघश्यामल होता. त्याच्या देहातून एक मादक गंध स्रवत असे. त्यामुळे गुप्त मोहिमेच्या वेळी, उदा. जरासंध मोहिमेच्या वेळी श्रीकृष्णाला हा गंध लपवण्याचा प्रयत्न करावा लागे.

द्रौपदीतही हे वैशिष्ट्य होते. तिने अज्ञातवासात सैरंध्रीचे कार्य निवडले. त्यामुळे चंदन, उटणे, अत्तर इत्यादींमध्ये तिच्या शरिरातून स्रवणारा गंध लपून जात असे.

३ आ. लवचिकता

श्रीकृष्णाचे स्नायू (मांसपेशी) मृदु होते; परंतु युद्धाच्या वेळी ते प्रसरण पावत असत. त्यामुळे सर्वसाधारणपणे मुलींप्रमाणे दिसणारे त्याचे लावण्यमय शरीर युद्धाच्या वेळी अतिशय कठोर दिसत असे. या दृष्टीने कर्ण, द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांची शरिरे म्यूटेंट (अतिमानवीय) होते.

 

४. शिक्षण आणि साधना

अ. श्रीकृष्णाने औपचारिक शिक्षण काही मासांतच (महिन्यांतच) पूर्ण केले.

आ. ‘घोर अंगिरस म्हणजे नेमिनाथ यांच्याकडे राहून श्रीकृष्णाने साधना केली होती’, असे मानले जाते.

 

५. आधुनिक ‘मार्शल आर्ट’ या प्रकाराचा जनक

अ. ‘अनुश्रुती’नुसार श्रीकृष्णाने ‘मार्शल आर्ट’चा विकास ब्रज क्षेत्राच्या वनांत केला होता. दांडिया रास हे त्याचेच रूप आहे. श्रीकृष्णाला ‘कलारीपायट्टु’चा (केरळची एक प्राचीन युद्धविद्या) प्रथम आचार्य मानले जाते. यामुळे ‘नारायणी सेना’ भारतातील सर्वांत घोर प्रहारक सेना झाली होती.

आ. श्रीकृष्णाने ‘कलारिपायट्टू’चा पाया रचला. नंतर बोधिधर्मन मार्गक्रमण करत आता मार्शल आर्टच्या रूपात हे शास्त्र विकसित झाले.

 

६. श्रीकृष्णाने वसवलेल्या नगरी

श्रीकृष्णाने २ नगरींची स्थापना केली होती – द्वारका (पूर्वीचे कुशावती) आणि पांडव पुत्रांद्वारे इंद्रप्रस्थ (पूर्वीचे खांडवप्रस्थ)

 

७. श्रीकृष्णाचा रथ आणि अश्‍व

श्रीकृष्णाच्या रथाचे नव ‘जैत्र’ होते आणि त्याच्या सारथ्याचे नाव दारुक/बाहुक होते. त्याच्या अश्‍वांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक अशी होती.

 

८. श्रीकृष्णाची आयुधे

अ. श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव ‘शारंग’ आणि मुख्य आयुध चक्राचे नाव ‘सुदर्शन’ होते. ते चक्र लौकिक, दिव्यास्त्र आणि देवास्त्र, अशा तीन रूपांत कार्य करू शकत होते. त्याच्या योग्यतेची केवळ २ विध्वंसक अस्त्रे होती – पाशुपतास्त्र (शिव, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकडे होते.) आणि प्रस्वपास्त्र. (शिव, वसुगण, भीष्म आणि श्रीकृष्ण यांच्याकडे होते.)

आ. कृष्णाच्या खड्गाचे नाव ‘नंदक’, गदेचे नाव ‘कौमौदकी’ आणि शंखाचे नाव ‘पांचजन्य’ होते. तो गुलाबी रंगाचा होता.

 

९. सर्वश्रेष्ठ धनुर्धर

‘अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर होेता’, असे मानले जाते; परंतु वास्तवात श्रीकृष्ण या विद्येत सर्वश्रेष्ठ होता आणि ते सिद्धही झाले होते. मद्र राजकुमारी लक्ष्मणा हिच्या स्वयंवरातील पण द्रौपदीच्या स्वयंवरातील पणापेक्षाही कठीण होता. त्या वेळी कर्ण आणि अर्जुन दोघेही अयशस्वी झाले होते. तेव्हा श्रीकृष्णाने लक्ष्यवेध करून लक्ष्मणा हिची इच्छा पूर्ण केली. लक्ष्मणानेही श्रीकृष्णाला आधीच पती मानले होते.

 

१०. श्रीकृष्णाने केलेली युद्धे

अ. श्रीकृष्णाने अनेक मोहिमा आणि युद्ध यांचे संचालन केले; परंतु त्यांतील ३ सर्वाधिक भयंकर युद्धे होती – महाभारत, जरासंध आणि कालयवन यांच्या विरुद्ध, तसेच नरकासुराच्या विरुद्ध

आ. श्रीकृष्णाच्या जीवनात सर्वांत भयानक द्वंद युद्ध सुभद्रेच्या प्रतिज्ञेमुळे अर्जुनाशी झालेे. त्यात दोघांनी सर्वांत विनाशक शस्त्र क्रमशः सुदर्शनचक्र आणि पाशुपतास्त्र काढले होते. नंतर देवतांच्या मध्यस्थीने दोघेही शांत झाले.

 

११. श्रीकृष्णाने केलेला राक्षसांचा वध

अ. श्रीकृष्ण १६ वर्षांचा असतांना त्याने विश्‍वप्रसिद्ध चाणूर आणि मुष्टीक यांसारख्या मल्लांचा वध केला.

आ. त्याने मथुरेत दुष्ट रजकचे डोके हाताने प्रहार करून कापून टाकले.

इ. श्रीकृष्णाने आसाममध्ये बाणासुराशी युद्ध केले. त्या वेळी भगवान शिवाशी युद्ध करतांना ‘माहेश्‍वर ज्वरा’च्या विरुद्ध ‘वैष्णव ज्वरा’चा प्रयोग करून विश्‍वात प्रथम ‘जीवाणू युद्ध’ केले होते.

 

१२. श्रीकृष्णाचे शेवटचे दिवस

अ. शेवटची वर्षे सोडल्यास श्रीकृष्ण द्वारकेत ६ मासांहून (महिन्यांपेक्षा) अधिक काळ कधीच राहिला नाही.

आ. श्रीकृष्णाच्या परमधामगमनाच्या वेळी त्याचा एकही केस पांढरा झाला नव्हता, तसेच त्याच्या देहाला एकही सुरकुती नव्हती.

इ. श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ आणि त्याचे वय यांविषयी पुराणे आणि आधुनिक संशोधक यांत मतभेद आहेत. काही जण त्याचे आयुष्य १२५ वर्षे, तर काही जण ११० वर्षे असल्याचे सांगतात. दुसरे मत अधिक योग्य वाटते.

 

१३. श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेच्या रूपात आध्यात्मिकतेची वैज्ञानिक व्याख्या सर्वांसमोर ठेवली आहे. ती मानवतेसाठी आशेचा सर्वांत मोठा संदेश आहे.’

(संदर्भ : संकेतस्थळ)