मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, यवतमाळ, नंदुरबार आणि जळगाव येथे ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ !

अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी
हिंदुत्वनिष्ठांकडून पत्रे, स्वाक्षरी मोहीम, रामनामाचा जागर आणि देवाला साकडे !

  • न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, यासाठी शेकडो भाविकांनी लिहिली सर्वोच्च न्यायालयाला पत्रे ! 
  • निवेदनावर सहस्रावधी भाविकांनी केल्या स्वाक्षर्‍या !
भाजपचे आमदार राज पुरोहित आणि शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट

मुंबई – गिरगाव, झावबा येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विधीमंडळाचे भाजपचे मुख्य पक्षप्रतोद आणि आमदार राज पुरोहित (२), तसेच दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ (१) यांनी भेट दिली. या वेळी दोघांनीही ग्रंथ खरेदी केली. या वेळी राज पुरोहित यांनी ‘‘मी सनातन संस्थेचा समर्थक आहे’’, असेे म्हटले.

 

यवतमाळ येथे रामनवमीनिमित्त वाहनफेरीत
५०० दुचाकी वाहनांसह युवकांचा उत्स्फूर्त सहभाग !

यवतमाळ – ‘रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने शहरात काढण्यात आलेल्या वाहनफेरीमध्ये ५०० दुचाकी वाहनांसह युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वाहनफेरीमध्ये बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच हिंदु धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाहनावर भगवे ध्वज लावले होते. या वेळी युवकांनी ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’, ‘जय शिवाजी-जय भवानी’, ‘वन्दे मातरम्’, ‘हर घर भगवा छायेगा, रामराज्य फिर आयेगा’ अशा घोषणा दिल्या. तसेच दुपारी काढण्यात येणार्‍या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन या फेरीमध्ये करण्यात आले. या वाहनफेरीचा आरंभ दत्त चौकातील दत्त मंदिर येथून करण्यात आला, तर फेरीची सांगता ही जयहिंद चौकातील राम मंदिर येथे करण्यात आली.

 

पुण्यात तुळशीबाग आणि अन्य ठिकाणी रामरायाला साकडे

पुणे – रामनवमी, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमीच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे पुण्यातील पुरातन तुळशीबाग राममंदिरात कीर्तन होते. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त साकडे घातले.

 

रोहा आणि पेण (रायगड) येथे ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ !

रोहा
पेण

रोहा – १३ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अष्टमी राममंदिर, रोहा आणि श्री राममंदिर, पेण येथे श्रीराम मंदिर निर्माणाच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियाना’त ५३ रामभक्त सहभागी झाले होते. या वेळी भाविकांनी रामनामाचा भावपूर्ण जप करून रामाला प्रार्थना केली. अष्टमी राममंदिर येथे रामभक्तांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृतीचे समितीचे श्री. योगेश ठाकूर म्हणाले, ‘हिंदूंना धर्माचे शिक्षण नसल्याने धर्माभिमान जागृत नाही आणि धर्माचरण करायला हिंदु लाजतात. जर आपणाला हिंदु समाजाची स्थिती पालटायची असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे. रामजन्माच्या शुभदिनी आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचा निश्‍चय करूया.’’

वेैशिष्ट्यपूर्ण

अष्टमी राममंदिर येथे रामनामाचा जप चालू असतांना भारद्वाज पक्षाचे आगमन झाले होते. ‘तेथील चैतन्यामुळे तोही तेथे काही काळ थांबला होता’, असे जाणवले. काही रामभक्त या वेळी म्हणाले, ‘‘कीर्तनापेक्षा अशा कार्यक्रमांची आज आवश्यकता आहे.’’

 

नंदुरबारमध्ये विविध मंदिरांत हिंदु राष्ट्रार्थ देवाला साकडे !

ढंढाणे
नंदुरबार

नंदुरबार – श्रीरामनवमीनिमित्त शहरातील वीर भद्रा हनुमान मंदिरासह तालुक्यातील वावद येथील श्रीराम मंदिरात, तसेच ढंढाणे येथील मारुति मंदिरात धर्मप्रेमींनी देवाला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घातले. तसेच भावपूर्ण प्रार्थना केली. वावद आणि नंदुरबार येथे १५, तर ढंढाणे येथे २५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

 

श्रीरामनवमीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यामध्ये सामूहिक रामनामाचा गजर !

यवतमाळ – श्रीरामनवमीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. यामध्ये सकाळी ११ ते १२ या १ घंट्याच्या वेळेमध्ये सामूहिकरीत्या हिंदु धर्मप्रेमींकडून ‘श्रीराम जय राम, जय जय राम’ हा नामजप करून घेण्यात आला.

शिवमंदिर चिखलगाव, वणी येथे १० धर्मप्रेमींनी; गाडगेबाबा मंदिर चौक, वणी येथे ३०० हिंदूंनी; काळाराम मंदिर, वणी येथे १५० हिंदूंनी, तसेच यवतमाळमधील मातामाय मंदिर, पिंपळगाव येथे २० महिलांनी, हनुमान मंदिर, उज्वलनगर येथे १७ धर्मप्रेमींनी; विठ्ठल मंदिर, नेर येथे २० धर्मप्रेमींनी, तर दारव्हा येथे ७ महिलांनी रामनामाचा जप केला.

 

ठाणे आणि कल्याण येथे ‘श्रीराम नामसंकीर्तन’ उपक्रम !

ठाणे – बजरंग दल पुरस्कृत हिंदु चेतना मंडळ, कोलबाड, ठाणे आणि मर्दानी फाउंडेशन ठाणे आयोजित श्री राम जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ उपक्रम राबवण्यात आला. प्रभु श्रीरामाचा पाळणा आणि आरती झाल्यावर रामजन्मभूमीवरील मंदिराच्या उभारणीतील सर्व अडथळे दूर होऊन भव्य राममंदिर लवकरात लवकर उभारले जावे, यासाठी रामरायाला साकडे घालण्यात आले. उपस्थित भविकांनी त्यासाठी भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप केला.

राममंदिराच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी विनंती करणारे पत्र भाविकांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिले. यात २१ पत्रे प्राप्त झाली.

 

कल्याण येथेही कार्यक्रमस्थळी पत्रलेखन !

कल्याण (पश्‍चिम) येथे गजानन महाराज मंदिरात नामजप आणि पत्रलेखन अभियान करण्यात आले. प्रसादासह एकेक पत्र प्रत्येकाला दिले आणि तिथेच लिहून देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांनी पत्र मागवून घेऊन ते लगेचच लिहून दिले.

 

श्रीरामनवमीनिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रम !

जळगाव – श्रीरामनवमीनिमित्त जिल्ह्यातील धानोरा येथे मारुति मंदिरात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा सामूहिक नामजप करण्यात आला. भुसावळ येथे धर्मप्रेमींच्या वतीने प्रभु श्रीरामाच्या मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले आणि सामूहिक नामजप करण्यात आला.

 

कोपरखैरणे येथे राममंदिरासाठी धर्मप्रेमींचे साकडे !

राममंदिराविषयी माहिती देतांना वैद्य उदय धुरी

कोपरखैरणे (नवी मुंबई) – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बजरंग दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामनवमी जन्मोत्सवात धर्मप्रेमींनी राममंदिरासाठी देवाला साकडे घातले. तसेच या वेळी ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत’, यासाठीही प्रार्थना करण्यात आली. येथील सेक्टर ५ येथील जयश्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री. राम रखवारे यांनी सर्व धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घातले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment