सनातन संस्थेत कार्य करणारे तरुण हे ‘हिंदु समाज’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ यांची शक्ती आहेत ! – महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती, मथुरा-वृंदावन, उत्तरप्रदेश

महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती (बसलेले) यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेत कार्य करणारे तरुण संकल्पबद्ध असून ते ‘हिंदु समाज’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ यांची शक्ती आहेत. हिंदु राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल आहे. लवकरच आपण हिंदु राष्ट्राचा संकल्प साकार करू, असे प्रतिपादन मथुरा-वृंदावन येथील महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, तसेच समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते.

या प्रसंगी महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती म्हणाले की, हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विकास सनातन संस्थेमुळे होणार आहे’, हे लक्षात येईल. या राष्ट्राची अंतरात्मा हिंदु समाज, संस्कृती आणि परंपरा आहे. याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलेे आणि पेशव्यांनी त्याचा विस्तार केला. आता तोच संकल्प पूर्ण करण्याचे कार्य अनेक संघटना करत आहेत. यामध्ये सनातन संस्था विशुद्ध भावनेने हे कार्य करत आहे. यासाठी आमचे आशीर्वाद असून आमची शक्ती तुमच्यासमवेत आहे.

‘प्रयागस्य प्रवेशे तु पापं नश्यति तत्क्षणात् ।

– मत्स्यपुराण, अध्याय १०४, श्‍लोक १२

अर्थ : प्रयागमध्ये केवळ प्रवेश केल्यानेच पापापासून तत्क्षणी मुक्ती मिळते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment