सनातनचे धर्मजागृतीविषयक कार्य !

सनातनचे कार्य : समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठीची अथक वाटचाल !

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

अ. देवालय स्वच्छता : देवळे ही ईश्वरी चैतन्याचा स्रोत असल्यामुळे त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी सनातनचे साधक भाविकांच्या सहकार्याने देवालय-स्वच्छता चळवळ राबवतात.

आ. जत्रा सुनियोजन : सनातन जत्रांतील अपप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी विविध ठिकाणी ‘जत्रांचे सुनियोजन करा !’ ही चळवळ राबवत आहे. या चळवळीच्या अंतर्गत सनातनचे साधक दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा लावणे, रांगेत उभे असणार्‍यांना पाणी देणे, चप्पल व्यवस्था करणे आणि जत्रेनंतर देवळाची स्वच्छता आदी सेवा ग्रामस्थांच्या सहकार्याने करतात. यांसह जत्रेच्या ठिकाणी मद्यपान, मांसाहार, जुगार, चित्रपटगीते, ऑर्केस्ट्रा, लावणी आदी रज-तम वाढवणार्‍या गोष्टी घडू नयेत, यासाठी देवळांचे विश्वस्त आणि भाविक यांचे प्रबोधन केले जाते.

इ. धार्मिक उत्सवांतील अपप्रकारांविरुद्ध प्रबोधन : सध्या धार्मिक उत्सवांच्या नावाखाली अनेक अपप्रकार सर्रास आढळतात, उदा. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने बळाने वर्गणी गोळा करणे; उत्सवांतील देवतांच्या मूर्ती शास्त्रविसंगत आणि चित्रविचित्र आकारांत बनवणे; उत्सवांत संस्कृतीहीन कार्यक्रमांचे आयोजन करणे; मद्यपान आदी अपप्रकार होत असतात. मिरवणुकांच्या वेळी महिलांशी असभ्य वर्तन, ध्वनीप्रदूषण, सजावटीवर होणारा अनाठायी खर्च आदी बाबीही चिंतनीय आहेत.

असे अपप्रकार रोखणे आणि सार्वजनिक उत्सव मंडळांचे प्रबोधन करणे, यांसाठी सनातन जनजागृती चळवळी राबवते. या चळवळींच्या अंतर्गत अपप्रकार रोखण्यासंबंधीची हस्तपत्रकांचे वितरण करण्यात येते आणि भित्तीपत्रकेही लावण्यात येतात. निरनिराळ्या सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना समस्येचे गांभीर्य सांगून या अपप्रकारांविरुद्ध कृती करण्यास विनंती करण्यात येते. अशा समस्यांविषयी उद्बोधक ठरणार्‍या चित्रफितीही बनवण्यात येतात आणि त्या ठिकठिकाणी प्रसारितही केल्या जातात. असे अपप्रकार होऊ नयेत, यासाठी उत्सवांच्या काळात सनातनच्या साधकांची निरीक्षण पथकेदेखील कार्यरत असतात. प्रसंगी अपप्रकार करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत गार्‍हाणे (तक्रार) नोंदवण्यात येते.

 

 

 

 

 

 

 

ई. देवतांचे विडंबन रोखणे : वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून देवतांचे विडंबन करणारी विज्ञापने प्रसिद्ध होत असतात. तसेच नाटके, चित्रपट यांद्वारेही देवतांचे विडंबन होत असते. असे प्रकार रोखण्यासाठी सनातन संस्था समाजप्रबोधन करते. तसेच प्रबोधनानंतरही देवतांचे विडंबन न थांबवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठीही सनातन प्रयत्न करते.

Leave a Comment