सनातनचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे ! – महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज, शक्तीधाम आश्रम

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रदर्शन पहातांना शक्तीधाम आश्रमाचे भक्त

प्रयागराज (कुंभनगरी) – तुमचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे, असे कौतुकोद्गार शक्तीधाम आश्रमाच्या जगत्गुरु साई माँ यांचे शिष्य महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासह ४० विदेशी भक्त प्रदर्शन पहाण्यासाठी आले होते. या भक्तांनीही ‘तुमचे प्रदर्शन उत्कृष्ट असून या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत’, असे सांगितले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि सनातन संस्थेचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

उजवीकडे शक्तीधाम आश्रमाचे महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज यांच्याशी चर्चा करतांना पू. नीलेश सिंगबाळ

शक्तीधाम आश्रमाच्या ४० भक्तांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी अनेकांनी हे ज्ञान नाविन्यपूर्ण असल्याचे सांगितले. या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृत्रिका खत्री आणि गुजरात येथील बालसाधक कु. देवेन पाटील यांनी त्यांना इंग्रजी भाषेतून प्रदर्शनाची माहिती सांगितली.

महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज पुढे म्हणाले, ‘‘या ठिकाणी आल्यावर मला पुष्कळ आनंदी वाटत आहे. हे चांगले स्थान आहे. तुम्ही हिंदु धर्माविषयी पुष्कळ चांगले शिक्षण देत आहात. यातून लोकांचे मन, हृदय आणि आयुष्य यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचे काम तुम्ही करत आहात. या संदर्भातील शुद्ध कार्य मी येथे अनुभवत आहे. तुमच्या गुरूंमुळे मी येथे तुमचा समर्पित भाव आणि शक्ती अनुभवत आहे, हे पाहून मला पुष्कळ आनंद झाला. मी गोव्यातील तुमच्या आश्रमाला भेट देण्यासाठी नक्की येईन.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment