परात्पर गुरु डॉ. आठवले मोठे धर्मकार्य करून लोकांना धर्माची शिकवण देत आहेत ! – पू. कात्यायनीदेवी

पू. कात्यायनीदेवी यांच्याशी चर्चा करतांना डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि आचार्य गंगासागरे (उजवीकडे)

प्रयागराज (कुंभनगरी) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे मोठे धर्मकार्य करून लोकांना धर्माची शिकवण देत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींतून धर्माचे रक्षण आणि संघटन यांविषयी ते मोठी प्रेरणा देत आहेत. मला असे वाटते की, ते ईश्‍वराचे कार्य करत आहेत. धर्मामुळेच ईश्‍वर, स्व, आत्मा यांची ओळख होते. चांगला समाज, परमात्मा आणि स्वतःची प्रगती यांसाठी धर्माची आवश्यकता होती, आहे आणि प्रत्येक काळात राहील.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि त्यांचे साधक मोठे धर्मकार्य करत आहेत. माझेही असेच कार्य आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यानंतर धर्म तुमचे रक्षण करील, हे शास्त्र सांगते, असे प्रतिपादन श्रीराम कथा तथा श्रीमद्भागवत कथाच्या प्रवक्त्या पू. कात्यायनीदेवी यांनी ८ फेब्रुवारीला येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ‘ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शना’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी त्यांच्या समवेत आचार्य गंगासागर उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशी त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी चर्चा केली.

पू. कात्यायनीदेवी म्हणाल्या, ‘‘ज्या वेळी अधर्म माजतो, त्या वेळी ईश्‍वर अवतार घेऊन धर्म आणि साधू यांच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात येत असतो. माणूस धर्मापासून दूर जात आहे. असे न होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याने धर्माला ओळखावे, जाणून घ्यावे; कारण धर्माशिवाय कोणत्याही युगात अध्यात्म कधी झालेले नाही. धर्मामुळेच आध्यात्मिक पातळी होते, तसेच  अध्यात्माची माहिती होते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment