कुंभनगरीतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला पू. पूर्णदास महाराज यांची भेट

डावीकडून पू. पूर्णदास महाराज आणि जगदीशदास महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराज यांनी येथे केले. ३१ जानेवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्यासमवेत राजस्थान, बाडमेर, समदडी, देवलीयारी येथील द्वारकाधीश पीठाचे महामंडलेशवर जगदीशदास महाराजही उपस्थित होते. त्यांचा सन्मान सनातन संस्थेचे श्री. नीलकंठ नाईक यांनी केला.

पू. पूर्णदास महाराज पुढे म्हणाले, ‘‘काँग्रेसने देशात सर्व समस्या निर्माण केल्या असून ती चोर आहे. स्वतःची चोरी लपवण्यासाठी यांना सत्ता पाहिजे. सत्तेत आले की, चोरी लपवता येते, हे मी निवडणुकांमध्येही नेत्यांना उघडपणे सांगत असतो. त्याचप्रमाणे राष्ट्रहिताच्या विषयी ठामपणे जनजागृती करत असतो. सध्या देशाचे वाटोळे होण्याची वेळ आली आहे. आम्ही हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत; परंतु लोकांना केवळ स्वार्थ दिसत आहे. देशाचे चांगले व्हावे, याचा विचार करणारे आपल्यासारखे अल्प आहेत. यासाठी हिंदु राष्ट्र आले पाहिजे, अन्यथा येणार्‍या पिढीसाठी वाईट दिवस येतील.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment