आरोग्यप्राप्तीसाठी प्रतिदिन उन्हाचे उपाय करा ! (अंगावर ऊन घ्या !)

आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणार्‍या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता पुष्कळ उणावली आहे. यामुळे ज्यांच्या अंगावर ऊन पडत नाही किंवा अंगावर ऊन पडण्याचे प्रमाण अल्प आहे, अशांनी आवर्जून उन्हाचे उपाय करावेत (अंगावर ऊन घ्यावे.)
वैद्य मेघराज माधव पराडकर

 

१. आयुर्वेदानुसार अंगावर ऊन घेण्याचे लाभ

अ. सूर्यदेव आरोग्य देतो. यामुळेच ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’ म्हणजे ‘सूर्यदेवाकडे आरोग्य मागावे,’ असे सांगितले आहे.

आ. आयुर्वेदानुसार सध्याच्या काळात आढळणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, जीवनसत्त्वांची न्यूनता (कमतरता), स्थूलपणा, पाझरणारे त्वचाविकार, सर्दी, विविध प्रकारचे वावडे (अ‍ॅलर्जी), संधीवात, अंगावर सूज येणे, शरिरातील संप्रेरकांच्या (हॉर्मोन्सच्या) विकृतीमुळे होणारे विकार, उदा. थायरॉईड्संबंधी विकार, अन्नपचन न होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध आदी विकार देहातील अग्नीवर आवरण आल्यामुळे किंवा तो मंद झाल्याने होतात. अंगावर ऊन घेतल्याने देहातील अग्नीवरील आवरण दूर होऊन अग्नि प्रदीप्त होण्यास, तसेच वरील विकार दूर होण्यास साहाय्य होते.

इ. प्रतिदिन योग्य प्रमाणात अंगावर ऊन घेतल्याने शरिरात वाढलेले दोष (रोगकारक द्रव्ये) दूर होण्यास साहाय्य होते.

 

२. सूर्यकिरणांचे गुणधर्म

अ. सूर्यकिरण उष्ण (गरम), तीक्ष्ण (लगेच कार्य करणारे, तीक्ष्ण सुईप्रमाणे आत घुसणारे), रूक्ष (कोरडे, शुष्क) आणि लघू (हलके) या गुणधर्मांचे असतात.

आ. कोवळ्या उन्हात हेच गुणधर्म अत्यंत सौम्य, तर कडक उन्हात हे जास्त तीव्र असतात.

इ. उन्हाळ्यात सूर्य पृथ्वीच्या जवळ असल्याने दुपारच्या वेळी ऊन जास्त कडक असते. हिवाळ्यात सूर्य पृथ्वीपासून लांब असल्याने दुपारच्या वेळी ऊन तुलनेने अल्प कडक असते.

ई. पृथ्वीच्या मध्यरेषेच्या जवळील, म्हणजे विषुववृत्ताच्या जवळील प्रदेशांत ऊन जास्त कडक असते. विषुववृत्तापासून जसे दूर जाऊ, तशी उन्हाची तीव्रता न्यून होत जाते.

उ. दमट हवामान असलेल्या प्रदेशांत (उदा. किनारपट्टीचा भाग) हवेतील आर्द्रतेमुळे ऊन अंगाला बोचत नाही, म्हणजे ते तुलनेने अल्प तीक्ष्ण असते. कोरड्या हवामानात (उदा. विदर्भ, मराठवाडा) आर्द्रता न्यून असल्याने उन्हाची तीक्ष्णता वाढते अन् ते अंगाला बोचते.

 

३. ऋतूंनुसार अंगावर ऊन घेण्यासंबंधीचे नियम

अ. दिवाळीनंतर थंडी पडते. या काळात दुपारपर्यंत वातावरण थंड असते. काही तरी गरम घ्यावे, अशी इच्छाही निर्माण होत असते. अशा वेळी दुपारचे कडक ऊनही थंडी निघून जाईपर्यंत मनाला चांगले वाटत असल्यास ते अंगावर घ्यावे.

आ. हिवाळ्यातील थंडी न्यून झाल्यावर लगेच वसंत ऋतूला आरंभ होतो. या काळात शरिरात क्लेद (ओलावा) वाढतो. तो दूर होण्यासाठी सोसवेल एवढ्या प्रमाणात अंगावर ऊन घ्यावे.

इ. तीव्र उन्हाळ्यात, म्हणजे ग्रीष्म ऋतूत ऊन नकोसे वाटते. अशा वेळी सकाळचे कोवळे ऊनच अंगावर घ्यावे. दुपारचे कडक ऊन अंगावर घेऊ नये. त्यामुळे पित्ताचे विकार निर्माण होतात आणि शक्ती क्षीण होते.

ई. पावसाळ्यात ढगाळ वातावरण असते. जास्त पावसामुळे वातावरणात थंडपणा आलेला असतो. अशा वेळी कधी आकाश निरभ्र होऊन ऊन आले, तर त्याचा थंडी घालवण्यापुरता उपयोग करून घ्यावा. या दिवसांत सूर्य पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याची तीव्रता जास्त असते. यामुळे फार काळ उन्हात थांबू नये.

उ. पावसाळा संपल्यावर दिवाळीपर्यंतचा काळ शरद ऋतू असतो. या काळात उष्णता अचानक वाढते; म्हणून याला ‘ऑक्टोबर हीट’ असेही म्हणतात. या काळातही कडक ऊन कटाक्षाने टाळावे.

ऊ. कोणत्याही ऋतूत सकाळचे कोवळे ऊन किंवा मावळत्या सूर्याचे सौम्य ऊन चांगले असते.

 

४. सूर्यकिरणांसंबंधी आधुनिक वैद्यक शास्त्रात झालेले संशोधन

अ. शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व (विटामिन डी) बनण्यासाठी अंगावर ऊन घेणे आवश्यक आहे. औषधांतून ‘ड’ जीवनसत्त्व पोटात घेतले, तरी त्याचा अंगावर ऊन पडले, तरच लाभ होतो, अन्यथा नाही.

आ. सूर्यकिरणांमध्ये अतीनील (अल्ट्राव्हायलेट) किरणही असतात. यांचे UVA, UVB आणि UVC असे प्रकार आहेत.

१. अतीनील किरणांच्या प्रकारांपैकी केवळ UVB या लहरीच शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व (विटामिन डी) बनण्यास उपयुक्त आहेत. या किरणांच्या तरंगांची लांबी (वेवलेन्थ) २८० ते ३१५ नॅनोमीटर असते. ‘नॅनोमीटर’ हे सूक्ष्मातीसूक्ष्म लांबी मोजण्याचे एक परिमाण आहे.

२. भारतात UVB लहरी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेतील उन्हात असतात.

३. ऊन थेट त्वचेवर पडले, तरच ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होऊ शकते. ढगाळ वातावरणात उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे अशा उन्हाचा किंवा ऊन काचेतून पडले तरीही त्याचा ‘ड’ जीवनसत्त्वासाठी लाभ होत नाही.

४. UVA, UVB आणि UVC या तीनही प्रकारच्या अतीनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.

इ. शरिराच्या ज्या भागांवर दैनंदिन जीवनात सूर्यप्रकाश पडतो, उदा. हात, तळपाय, तोंडवळा (चेहरा), तेथेच वारंवार प्रखर ऊन पडले, तर त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी ज्या भागांवर दैनंदिन जीवनात सूर्यप्रकाश पडत नाही (उदा. पाठ, पोट आणि दंड) त्या भागांवर ऊन घ्यावे.

 

५. अंगावर ऊन घेण्याविषयी लक्षात घ्यायची सूत्रे

अ. शरीर निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन अंगावर ऊन पडणे आवश्यक असल्याने ज्यांच्या अंगावर थेट ऊन पडत नाही, अशांनी प्रतिदिन न्यूनतम १५ ते २० मिनिटे उन्हात राहून अंगावर ऊन घ्यावे.

आ. ऊन अंगावर घेतांना ते ऋतूंनुसार अंगावर ऊन घेण्यासंबंधीचे नियम पाळून घ्यावे.

इ. स्वतःला किती ऊन सोसते, याचा अंदाज घेऊनच अंगावर ऊन घ्यावे. आधुनिक वैद्यक शास्त्राचे संशोधन आहे; म्हणून ‘ड’ जीवनसत्त्व मिळवण्यासाठी ऋतूंचे नियम डावलून सोसत नसतांना दुपारचे कडक ऊन अंगावर घेऊ नये. (उन्हाचे उपाय आरोग्यप्राप्तीसाठी आहेत. ‘ड’ जीवनसत्त्व मिळाले; पण कडक उन्हामुळे दुसरा विकार झाला, असे होऊ नये.)

ई. ‘ड’ किंवा अन्य जीवनसत्त्वे शरिरात योग्य त्या प्रमाणात असण्यासाठी शरिरातील अग्नी चांगला राखणे आवश्यक आहे. अग्नी चांगला असेल, तर कधीही जीवनसत्त्वांची कमतरता भासत नाही. यासाठी नेहमी पुढील ३ पथ्ये पाळावीत.

१. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे, तसेच दुपारी झोपू नये.

२. भूक लागल्यावरच आहार घ्यावा. भूक लागलेली नसतांना थोडेही खाऊ नये.

३. तहान लागल्यावरच पाणी प्यावे. तहान लागलेली नसतांना पाणी पिणे टाळावे.

उ. उन्हाचे उपाय करतांना आधुनिक शास्त्राचे संशोधन आहे; म्हणून ‘उन्हामुळे कर्करोग होतो’, ही भीती मनात बाळगू नये. शरिरातील अग्नि चांगला असेल, तर कर्करोग होत नाही. तो चांगला ठेवण्यासाठी वरील सूत्रात सांगितलेली ३ पथ्ये नियमित पाळावीत.’

 

६. अंगाला तेल लावून उन्हात बसल्याने होणारे लाभ

६ अ. आयुर्वेदानुसार

‘अंगाला तेल लावल्यावर ते त्वचेतून शरिरात शोषले जाते. अशा वेळी उन्हात बसल्याने त्वचेचे तापमान वाढते. यामुळे त्वचेचा रक्तप्रवाह वाढतो आणि तेल शरिरात चांगल्या प्रकारे शोषले जाण्यास साहाय्य होते.

६ आ. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार

त्वचेतील कॉलेस्टेरॉलच्या एका प्रकारापासून प्रकाशाच्या अतीनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांच्या उपस्थितीमध्ये ‘ड जीवनसत्त्व (विटामिन डी)’ बनते. कॉलेस्टेरॉल हा एक स्निग्ध पदार्थ आहे. त्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्व बनण्यासाठी सूर्यकिरण आणि स्निग्ध पदार्थ दोन्ही महत्त्वाचे आहेत. तेल लावून उन्हात बसल्याने हे दोन्ही घटक शरिराला मिळून ‘ड’ जीवनसत्त्व चांगले बनू शकेल, असे अनुमान करता येते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०१८)

आधुनिक वैद्यकशास्त्र जे सांगते, ते आयुर्वेदाच्या
कसोटीवर पडताळून मगच आचरणात आणणे आवश्यक !

‘आयुर्वेद हे ईश्‍वरनिर्मित परिपूर्ण आणि प्रगत शास्त्र आहे. या शास्त्राला त्रिकालाबाधित शाश्‍वत सिद्धांतांचा भक्कम पाया आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र (अ‍ॅलोपॅथी) हे मानवमिर्मित आणि प्रगतीशील शास्त्र आहे. या शास्त्रात प्रतिदिन नवनवीन संशोधन होत असते. या संशोधनामुळे शरीरशास्त्रातील बारकावे समजण्यास साहाय्य होते; परंतु बर्‍याच वेळा असे संशोधन एकांगी असते. संशोधनाअंती ‘अमुक केल्याने लाभ होतो’, असा निष्कर्ष आल्यावर तसे केल्याने काही हानी होईल का, हे पडताळले जातेच असे नाही. त्यामुळे अ‍ॅलोपॅथी जे सांगते, ते आयुर्वेदाच्या सिद्धांतांच्या कसोटीवर पडताळून मगच ग्राह्य धरावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment