आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

औद्योगिकीकरणामुळे आणि धकाधकीच्या जीवनामुळे, तसेच चंगळवादी रहाणीमानामुळे आज सामान्यांच्या दैनंदिन जीवनाचे चक्र पालटले आहे. याचाच परिणाम म्हणून त्यांना विविध रोगांना सामोरे जावे लागते आहे. या रोगांचे मूळ कारण असलेले त्रिदोष न्यून करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा करतात. सध्या लोकप्रिय झालेल्या या आयुर्वेदिक उपचार पद्धतीविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

शरिरात दीर्घकाळ साठून राहिलेली विषारी तत्त्वे शरिराच्या बाहेर काढून शरीर पुन्हा निरोगी करणे हे उद्दिष्ट पंचकर्माने साध्य होते. जसे आपल्या घरातील केरकचरा आपण रोज काढतो, मात्र सणासुदीच्या पूर्वी घरातील सर्व सामान बाहेर काढून पुन्हा झाडल्यास घराच्या सांधीकोपर्‍यात खाचखळग्यात साठलेला भरपूर कचरा पुन्हा निघतो. त्याचप्रमाणे या रोज शौच्य-मार्जनादि क्रिया केलेल्या शरिरातसुद्धा विशिष्ट काळात पंचकर्म केल्याने विशेष – व्याधिक्षमत्व प्राप्त होते. वमन, विरेचन, बस्ति, नस्य, रक्तमोक्षण या पाच उपचारांना पंचकर्म असे म्हणतात.

– संकलक : वैद्य सुमुख नाईक, आयुर्वेदाचार्य (पुणे)

१. वमन

यामध्ये प्रथम रुग्णाला औषधी काढा/दूध/उसाचा रस आदी द्रव्ये प्यायला देतात. नंतर उलटी होण्याचे औषध देऊन दूषित कफ आणि पित्त बाहेर पडून जाते. वमन कर्म साधारणपणे सर्दी, दमा, खोकला, आम्लपित्त, प्रमेह, तारुण्यपीटिका, त्वचेचे विकार, डोकेदुखी, पचनाचे विकार, हृदयाचे विकार यात उपयुक्त आहे.

 

२. विरेचन

या कर्मामध्ये औषधाच्या साहाय्याने जुलाब करवले जातात. विरेचन हे पित्ताच्या आजारांसाठी उपयुक्त ठरते. आम्लपित्त, जलोदर, जंतविकार, त्वचाविकार, कावीळ, वंध्यत्व, पोटाचे विकार, मनोविकार, उच्च रक्तदाब यांवर उपयोगी आहे.

 

३. बस्ती

या कर्मामध्ये गुदमार्गाद्वारे शरिरामध्ये औषधी तेल/दूध/काढा/तूप/मांसरस आदी द्रव्य प्रविष्ट केले जाते. ही विशेषतः वातविकारांसाठी अत्यंत उपयुक्त चिकित्सा आहे. संधीवात, आमवात, पक्षाघात, मणक्यांचे विकार, स्त्रियांचे विकार, जंत, स्थौल्य, बद्धकोष्ठता आदी आजारांवर उपयुक्त ठरते. वातविकार हे क्लिष्ट म्हणजे किचकट आणि दीर्घकाळ शरिरात रहाणारे म्हणून कष्टाने साध्य आहेत ते होऊ नयेत म्हणूनही हे कर्म केले जाते.

 

४. रक्तमोक्षण

जळवांच्या अथवा इतर उपकरणांच्या साहाय्याने शरिरातील केवळ दूषित रक्तच शरिराबाहेर काढण्याच्या कर्माला रक्तमोक्षण म्हणतात. दूषित रक्तामुळे डोकेदुखी, सांधेदुखी, उच्च रक्तदाब निर्माण होतात. रक्तमोक्षणाने आश्‍चयर्र्कारक पालट होतो.

 

५. नस्य

या कर्मामध्ये औषधी तेल नाकाद्वारे शरिरात प्रविष्ट केले जाते. नस्य हे शिरोरोग, डोकेदुखी, मानदुखी, खांदेदुखी, अकाली केस गळणे, पांढरे होणे, चक्कर येणे, दृष्टीचे विकार, मानसरोग, सर्दी, निद्रानाश, स्मरणशक्ती अल्प होणे आदी आजारांमध्ये तसेच पुंसवन हा विशेष उपचारसुद्धा नस्य चिकित्सेने केला जातो. रुग्णाचे बल, त्याचे वय, रोगाची अवस्था, ऋतू, रुग्णाची प्रकृती, आदी घटकांचा विचार करून पंचकर्माची आणि त्यासाठी वापरावयाच्या औषधाची निवड केली जाते, तसेच पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहन (सर्वांगास तेल जिरवणे) आणि स्वेदन (सर्वांगास वाफ देणे) ही कर्मे करावी लागतात. पंचकर्मानंतर काही दिवस विशिष्ट पद्धतीने आहार घ्यावा लागतो. ही पंचकर्म चिकित्सा वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक असते.

Leave a Comment