बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी हनुमान !

1366648034_hanuman_idol_300

 

हनुमंताचे एकमुखी, पंचमुखी आणि एकादशमुखी स्वरूप जगप्रसिद्ध आहे.

बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वमरोगता ।
अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणाद्भवेत् ॥ – पराशरसंहिता, पटल ७६, श्‍लोक १५

अर्थ : हनुमानाची आराधना केल्याने बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य, निर्भयता, आरोग्य, चपळता आणि वाक्शक्ती इत्यादी गुण प्रसादाच्या रूपाने उपासकाला प्राप्त होतात.

 

१. पंचमुखी हनुमानाचे ध्यान

पंचमुखहनुमत्कवच स्तोत्रात पंचमुखी हनुमंताचे ध्यान पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

पञ्चवक्त्रं महाभीमं त्रिपञ्चनयनैर्युतम् ।
बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम् ॥ – पंचमुखहनुमत्कवच स्तोत्र, श्‍लोक २

अर्थ : विराट स्वरूपाचा हनुमान पाच मुख, पंधरा नेत्र आणि दहा भुजा यांनी सुशोभित आहे अन् तो सर्व प्रकारच्या अभिष्ट सिद्धी प्रदान करणारा आहे.

 

२. शिवाची पंचमुखे आणि शिवावतार पंचमुखी हनुमान

शिवाची तत्पुरुष, सद्योजात, वामदेव, अघोर आणि ईशान या नावाने विख्यात असणारी पाच मुखे आहेत. ही मुखे अनुक्रमे पूर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण आणि ऊर्ध्व या दिशांना स्थानापन्न आहेत. पंचमुखी शिवाचा अवतार हनुमानही पंचमुखी आहे.

 

३. पंचमुखी हनुमान 

३ अ. हनुमानाची पंचमुखे

panchamukhi_hanuman

३ आ. दहा आयुधे 

खड्गं त्रिशूलं खट्वाङ्गं पाशमङ्कुशपर्वतम् ।
मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुम् ॥
भिन्दिपालं ज्ञानमुद्रां दशभिर्मुनिपुङ्गवम् ।
एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम् ॥ – पंचमुखहनुमत्कवच स्तोत्र, श्‍लोक ९ आणि १०

अर्थ : नऊ हातांमध्ये खड्ग, त्रिशूळ, खट्वांग (पलंगाच्या पायाच्या आकाराचे शस्त्र), पाश-अंकुश-पर्वत (ही तीनही आयुधे एकाच हातात), मुष्टी (मुठीच्या आकाराचे शस्त्र), गदा, वृक्ष, कमंडलू आणि भिंदिपाल (फेकून मारण्याजोगे लोखंडाचे एकप्रकारचे शस्त्र) धारण करणार्‍या अन् दहाव्या हाताने ज्ञानमुद्रा करणार्‍या हनुमानाला मी भजतो.

श्री हनुमानाच्या एका श्‍लोकात त्याला वामहस्तगदायुक्तम् म्हणजे डाव्या हातात सदैव गदा विराजमान असलेला असे म्हटले आहे.

३ इ. हनुमान आणि गरूड यांच्यातील अद्भुत साम्य !

ज्याप्रमाणे वैकुंठात भगवान विष्णूची सेवा करण्यात गरुड तल्लीन असतो, तसेच प्रभु श्रीरामांच्या सेवेत हनुमान सतत मग्न असतो. गरुडाने स्वतःच्या आईला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी स्वर्गातून अमृत आणून दिले होते. बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून दिली. ज्याप्रमाणे गरुडाच्या पाठीवर श्रीविष्णु आरूढ होतात, तसेच राम-लक्ष्मण हनुमानाच्या पाठीवर बसले आहेत. अहिरावणाने राम-लक्ष्मणांचे अपहरण केल्यावर हनुमानाने त्यांची मुक्तता करून स्वतःच्या खांद्यावर बसवून आणले होते. गरुडाप्रमाणे हनुमानही अमर आहे.

३ ई. पाच अवतारांच्या प्रचंड शक्तीने संपन्न असणारा
आणि महान कार्यसिद्धी प्रवण असणारा पंचमुखी हनुमान !

हनुमान भगवान शंकराचे अवतार आहेत. गरुडसुद्धा अवतार आहे. वराह, नृसिंह आणि हयग्रीव हेही अवतारच आहेत. अशा रितीने पंचमुखी श्री हनुमानात पाच अवतारांची शक्ती समान रूपाने एकवटली आहे. त्यामुळे प्रचंड शक्तीसंपन्न असणारा हनुमान कोणतेही महान कार्य सहजतेने पूर्णत्वाला नेण्यास समर्थ आहेत.

३ उ. पंचमुखी हनुमानाच्या जन्माचा इतिहास

एकदा पाच मुख असलेला एक भयानक राक्षस प्रकट झाला. त्याने कठोर तपश्‍चर्या करून त्याच्यासारखे रूप असणाराच त्याचा वध करू शकेल, असे ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले. वरदान मिळताच तो राक्षस उन्मत्त होऊन सर्वांना भयंकर त्रास देऊ लागला. आम्हाला त्रासातून मुक्त करावे, अशी सर्व देवतांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवंताने दिलेल्या आज्ञेनुसार मंगळवार, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला पुष्य नक्षत्रात सिंह लग्न असतांना हनुमंताने पंचमुखी अवतार धारण केला. त्यांची वानर, नृसिंह, गरुड, अश्‍व आणि वराह अशी पाच सुंदर मुखे होती. पंचमुखी हनुमान राक्षसाजवळ गेला आणि त्याने त्याचा वध केला.

३ ऊ. हनुमानाने पंचमुख आणि त्रिनेत्र
धारण करण्यामागील आध्यात्मिक भावार्थ

हनुमानाची पंचमुखे अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारी आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारी आहेत. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.
संदर्भ : मासिक कल्याण, फेब्रुवारी २००७