हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माचरण आणि साधना आवश्यक ! – डॉ. पूनम शर्मा, सनातन संस्था, विलासपूर

विलासपूर (हरियाणा) येथे हिंदु धर्मजागृती सभा

अयशस्वी ठरलेल्या लोकशाहीला ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना
एकमेव पर्याय ! – कार्तिक साळुंके, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

विलासपूर – स्वातंत्र्यानंतर शासनकर्त्यांनी आम्हा भारतियांवर जी लोकशाही थोपवली, ती विदेशी विचारांवर आधारित आहे. असे करून शासनकर्त्यांनी आम्हाला फसवले आहे. पूर्वीच्या काळी राजा अयोग्य पद्धतीने वागत असल्यास त्याला पदावरून हटवण्याचा अधिकार जनतेला होता; परंतु आजकाल निवडलेले शासनकर्ते कितीही अयोग्य वागत असले, तरी त्यांना ५ वर्षांपर्यंत हटवू शकत नाही. त्यामुळे गेल्या ७० वर्षांत लोकशाही अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्याला हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली आणि हरियाणा समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी येथे काढले. हरियाणा राज्याच्या यमुनानगर जिल्ह्यातील विलासपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ ऑक्टोबर २०१८ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या साधिका कु. पूनम शर्मा उपस्थित होत्या. श्री. साळुंखे यांनी ‘आज जनतेला लहान लहान गोष्टींसाठी आंदोलन करावे लागत आहे. राजकीय नेते भ्रष्ट झाले आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. महिला आणि मुले असुरक्षित आहेत. लोकशाहीत बळावलेल्या या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले आहे. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे’, असे आवाहन केले.

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माचरण आणि
साधना आवश्यक ! – डॉ. पूनम शर्मा, सनातन संस्था, विलासपूर

धर्माचरण आणि साधना यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे चरित्र निर्माण होते. धर्माचरण आणि साधना यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधर्माचे पालन करत प्रजेचे रक्षण केले. महाराजांनी गोमाता, मंदिर आणि धर्मशास्त्र यांचे रक्षण करत धर्मरक्षणाचा आदर्श आमच्यासमोर ठेवला आहे. धनुर्धारी अर्जुनाचा प्रत्येक बाण लक्ष्यवेध करायचा; कारण तो अखंड ‘श्रीकृष्ण, श्रीकृष्ण’ असा नामजप करायचा. हे आहे नामाचे सामर्थ्य. प्रत्येक हिंदूने नामजप करणे आवश्यक आहे. नामजपातून धर्मरक्षणासाठी आपल्यामध्ये आत्मबळ निर्माण होईल, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल, असे उद्गार सनातन संस्थेच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर बोलतांना काढले.

या प्रसंगी समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारे श्री. रवि भूषण यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

क्षणचित्रे

१. HinduJagruti.org संकेतस्थळाचे वाचक २० किलोमीटर प्रवास करून सभेच्या पूर्वसिद्धतेसाठी एका धर्मप्रेमीला सोबत घेऊन आले होते.

२. विलासपूर येथे धर्मशिक्षणवर्गात येणारे दोन धर्मप्रेमी सभा झाल्यानंतर सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment