प.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट !

संतांच्या केवळ अस्तित्वानेही वातावरणाची शुद्धी होते. संतांच्या सहवासातील वस्तूंवरही त्यांच्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये कार्यरत असणारी पंचतत्त्वे इतर ठिकाणापेक्षा अधिक संवेदनशील झालेली असतात. त्यामुळे अवतारी कार्य चालू असतांना त्यांच्या सूक्ष्म देहातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा परिणाम त्यांच्या रहात्या खोलीवर होऊन खोलीतील वातावरणात पंचमहाभूतांच्या स्तरावर विविध प्रकारचे पालट होतात. हे बुद्धीअगम्य पालट म्हणजे कोणते चमत्कार नसून साधनेचा सभोवतालच्या घटकांवर कोणता परिणाम होतो, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी केवळ हे दैवी पालट टिपले’, असे नाही, तर त्यामागील सूक्ष्मातील प्रक्रिया आणि कारणमीमांसाही सांगितली आहे. या पालटांच्या अभ्यासादरम्यान हेही लक्षात आले की, वाईट शक्तींविरुद्धचा सूक्ष्मातील लढा जसा तीव्र होत आहे, तसेच सनातनला ईश्‍वरी साहाय्यही लाभत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची निवासाची खोली, हे अशा चांगल्या पालटांचे उगमस्थान असते. त्यानंतर जगभरातील साधकांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अल्पाधिक भेदाने असे पालट अनुभवायला मिळाल्याची अनुभूती येते. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हेच सिद्ध होते ! येथे त्यातील काही निवडक चांगले पालट प्रसिद्ध करत आहोत.

 

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत झालेले चांगले पालट

अ. खिडकीच्या काचेतून तेजतत्त्वामुळे सुस्पष्ट दिसत असलेले बाहेरील दृश्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील खिडकीच्या काचेतून तेजतत्त्वामुळे सुस्पष्ट दिसत असलेले बाहेरील दृश्य

आ. खिडकीच्या काचेमध्ये बाहेरून पहातांना
(खोलीतील दृश्याऐवजी) आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे दिसणारे बाहेरील दृश्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील खिडकीच्या काचेमध्ये बाहेरून पहातांना (खोलीतील दृश्याऐवजी) आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे दिसणारे बाहेरील दृश्य

इ. पारदर्शक काचेत मूळ घटकापेक्षा सुस्पष्ट प्रतिबिंब दिसणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या दाराच्या पारदर्शक काचेत दिसणारे त्याच खोलीच्या आगाशीतील पिवळ्या ‘रेलिंग’चे प्रतिबिंब मूळच्या रेलिंगपेक्षाही अधिक सुस्पष्ट दिसत आहे. हा आपतत्त्वाच्या स्तरावरील एक चांगला पालट आहे. (वर्ष २०१४)

ई. पांढर्‍या भिंतीवर उत्साहवर्धक हिरवट छटा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत पांढर्‍या भिंतीवर उत्साहवर्धक हिरवट छटा आली आहे. हा तेजतत्त्वाच्या स्तराचा पालट आहे.

उ. आंब्याच्या झाडाला आश्रमाच्या दिशेने असणार्‍या फांदीला अधिक प्रमाणात आंबे लागणे

आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला एप्रिल २०१३ आणि एप्रिल २०१४ या दोन वर्षांपासून आश्रमाच्या दिशेने असणार्‍या फांदीला सर्वांत अधिक आंबे लागतात.

 

२. प.पू. डॉक्टरांशी संबंधित वस्तूंमध्ये झालेले चांगले पालट

३१.१२.२००९ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या वापरातील पांढर्‍या रंगाच्या एका बंडीचा रंग हाताच्या बाह्या, पोट आणि छाती या ठिकाणी गुलाबी झाल्याचा दिसला. कपड्यांचे रंग अनेक दिवस वापरून कालांतराने फिकट होतात, हे पाहिले आहे; परंतु पांढर्‍या कपड्यांचा मूळ रंग जाऊन त्या ठिकाणी दुसरा रंग आल्याचे यापूर्वी पाहिलेले नाही.

संतांमध्ये सत्त्वगुणाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले असते. संतांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंमध्येही सात्त्विकता संक्रमित होऊ लागते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वापरातील वस्तूही सत्त्वगुणी बनून त्यांच्यात चांगले पालट झाले आहेत. या वस्तू जतन केल्या असून त्यांच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने संशोधन चालू आहे.

अ. प्रीतीमुळे बंडी काही ठिकाणी गुलाबी होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीतीमुळे त्यांच्या वापरातील पांढर्‍या रंगाच्या बंडीचा रंग पालटून तो काही ठिकाणी गुलाबी झाला आहे. (वर्ष २००९)

१. तीव्र त्रास असणार्‍या साधकांच्या कपड्यांना आलेला गुलाबी रंग चैतन्यमय क्षेत्रात ठेवल्यास निघून जाणे
तीव्र त्रास असणार्‍या साधकांच्या कपड्यांना गुलाबी रंग येण्यास प्रारंभ झाल्यावर हे कपडे विभूती लावून किंवा त्याला श्रीकृष्णाचे चित्र बांधून किंवा एखाद्या चैतन्य असलेल्या ठिकाणी ठेवले असता, ८ दिवसांनी गुलाबी रंगातील मायावीपणा निघून गेल्याने हा रंग हळूहळू निघून जाऊ लागतो, असे आढळले.

२. त्रास नसणार्‍या, तसेच चांगल्या शक्तीची स्पंदने असलेल्या साधकांच्या कपड्यांचा गुलाबी रंग चैतन्यमय क्षेत्रात ठेवल्यास वाढणे
त्रास नसलेल्या, तसेच चांगल्या शक्तीची स्पंदने असलेल्या साधकांच्या कपड्यांना गुलाबी रंग आला असता, हे कपडे चैतन्याच्या सान्निध्यात ठेवल्यावर त्यांच्या गुलाबी रंगात वृद्धी होत असल्याचे दिसून आले.

३. त्रास नसणार्‍या, तसेच चांगल्या शक्तीची स्पंदनेही नसलेल्या साधकांच्या कपड्यांच्या गुलाबी रंगात चैतन्यमय क्षेत्रात ठेवल्यास अगदी अल्प प्रमाणात चढ-उतार होणे
त्रास नसणार्‍या; परंतु देहात चांगली शक्ती नसलेल्या साधकांच्या कपड्यांच्या बाबतीत मात्र चैतन्याच्या सान्निध्यात हे कपडे ठेवले असता, त्यांच्या गुलाबी रंगाच्या छटेत अगदी अल्प प्रमाणात चढ-उतार होतात, असे आढळून आले.

४. प.पू. डॉक्टरांच्या कपड्यांना आलेल्या गुलाबी रंगाचे वैशिष्ट्य
अ. ‘या रंगात चमकदारपणाचे, तसेच पारदर्शकपणाचे प्रमाण अधिक असते.

आ. प.पू. डॉक्टरांच्या देहात परिपूर्ण चैतन्य असल्याने त्यांनी वापरलेल्या कपड्यांना सर्वत्र सारखाच, म्हणजेच एकसमान गुलाबी रंग येतो.

इ. या रंगातून दिव्य गंधाचे आणि थंड लहरींचे प्रक्षेपणही होते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आ. दैवी अत्तर निर्माण होणे आणि त्यात वाढ होणे

१. प.पू. डॉक्टरांच्या तळपायांना तेल चोळण्याच्या (काचेच्या बरणीतील) कांस्यवाटीत अत्तर निर्माण झाले. (वर्ष २००७) २. कांस्यवाटी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत (काचेच्या बरणीतील) अत्तर वाढल्याचे दिसत आहे. (वर्ष २०११)

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर click करा – प.पू. डॉक्टरांच्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तराचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

इ. दाढीचे पाते २ वर्षे वापरूनही बोथट न होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधील तेजतत्त्वामुळे दाढीचे पाते त्यांनी २ वर्षे वापरूनही बोथट झालेले नाही. अशी पाती संग्रही ठेवली आहेत.

ई. मग मुठीजवळ पांढरा झालेला आढळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील निर्गुण तत्त्वामुळे त्यांनी ७ वर्षे वापरलेला मग मुठीजवळ पांढरा झाला आहे. (वर्ष २०१४)

उ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चित्रावरील काचेत दिव्याचे (ट्यूबलाईटचे) तरंगाप्रमाणे दिसणारे प्रतिबिंब

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या चित्रावरील काचेत दिव्याचे (ट्यूबलाईटचे) तरंगाप्रमाणे दिसणारे प्रतिबिंब

 

३. आपोआप निर्माण झालेले दैवी पदार्थ आणि दैवी आकार !

खोलीतील दत्ताच्या चित्राच्या मागे बाजूला आपोआप निर्माण झालेली पांढरी विभूती. ती विभूती गोळा करतांना डबीत उमटलेला ‘ॐ’ गोलात दाखवला आहे.

 

वर्ष २००९ पर्यंत वापरलेल्या आणि नंतर जतन केलेल्या बंद डब्यात वर्ष २०१३ मध्ये रव्यासारखा पदार्थ निर्माण झाला.

 

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या रुद्राक्ष असलेल्या पिशवीला आलेला शंखाचा आकार

 

४. प्रतिदिन पूजा करत असलेले त्यांच्या खोलीतील
संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात कालानुसार झालेले पालट

मूळ छायाचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन पूजा करत असलेले त्यांच्या खोलीतील संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र (वर्ष २०१०). कालांतराने या छायाचित्रात अनेक चांगले पालट दिसून आले.

मुखमंडल पिवळे होणे आणि प्रभावळ विरळ होणे

छायाचित्रातील मुखमंडल मूळ चित्रापेक्षा पिवळे होणे, हे ज्ञानदानाचे, तर ‘प्रभावळ तुलनेने विरळ होणे’, हे सूक्ष्मातील कार्यासाठी निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे निर्देशक (मार्च २०१२)

मुखमंडल अधिक पिवळे होणे आणि प्रभावळ गुलाबी होणे

संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील ‘मुखमंडल अधिक पिवळे होणे’, हे उच्च स्तराचे ज्ञान देण्याचे आणि ‘प्रभावळ गुलाबी होणे’, हे प्रीतीची उधळण होत असल्याचे निर्देशक (मार्च २०१३)

मुखमंडल पांढरट पिवळे आणि प्रभावळ गडद अन् गुलाबी होणे

छायाचित्रातील ‘तोंडवळा पांढरट पिवळा आणि जरासा अस्पष्ट होणे’, हे निर्गुण तत्त्वाकडे होणारी वाटचाल दर्शवते, तर ‘प्रभावळ गडद आणि गुलाबी होणे’, हे धर्मप्रसारासाठी आवश्यक असणारी कार्यकारी शक्ती प्रकट झाल्याचे दर्शवते. (मार्च २०१६)

 

खोलीतील अन्य वैशिष्ट्यपूर्ण पालट पुढीलप्रमाणे आहेत

१. लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत.

२. खोलीतील भिंतीतून प्रक्षेपित होणारी चांगली स्पंदने हातांनी स्पर्श करून अनुभवता येतात.

३. खोलीत दैवी गंध येणे, दैवी प्रकाश दिसणे, दैवी नाद ऐकू येणे इत्यादी अनुभूतीही येतात.

४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील तापमान अन्य खोल्यांच्या तापमानांच्या तुलनेत अल्प असणे आणि खोलीमध्ये थंडावा जाणवणे

५. खोल्यांतील प्रकाशामध्ये वाढ होणे, तसेच देवतांच्या चित्रांतील प्रकाश वाढणे

६. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत असलेल्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे कोणत्याही दिशेने पाहिले असता ते श्‍वास घेत असल्याचे जाणवते

७. परात्पर गुरु डॉक्टरांच्या रहात्या खोलीतील चारही बाजूंच्या (दिशांच्या) भूमीकडे पाहिले असता भूमी मागे-पुढे आणि वर-खाली हलतांना जाणवणे

८. परात्पर गुरूंच्या खोलीचे आकारमान वाढून खोली भव्य वाटणे

 

बुद्धीअगम्य पालटांसंदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे विश्‍लेषण

‘विविध चांगल्या आणि वाईट अनुभूतींसंदर्भात माझ्या संदर्भातील वस्तूस्थिती ज्ञानेश्‍वरीत सांगितल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आहे.

हे मजचिस्तव जाहले । परि म्यां नाहीं केलें ।

– ज्ञानेश्‍वरी, अध्याय ४, ओवी ८१

अर्थ : हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही.

यातील ‘मजचिस्तव जाहले’ (माझ्यामुळे झाले), म्हणजे माझ्या अस्तित्वामुळे झाले, यातील ‘मी’पण हे परमेश्‍वराचे आहे, तर ‘म्यां नाही केलें’ (मी केले नाही), म्हणजे कर्तेपण माझ्याकडे नाही. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे सूर्य उगवतो, तेव्हा सर्व जण उठतात, फुले उमलतात इत्यादी. हे केवळ सूर्याच्या अस्तित्वाने होते. सूर्य कोणाला सांगत नाही की, ‘उठा’ किंवा फुलांना सांगत नाही की, ‘उमला’ !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले.

 

सनातनच्या आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा !

‘सनातन आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून साधनेमुळे व्यक्तीचे अंतर्मन, बाह्यमन आणि शरीर यांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करत आहे. या संशोधनाचा म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शरिरावर उमटणारी आध्यात्मिक चिन्हे सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ही चिन्हे कोणत्या कारणांमुळे उमटतात, हे शोधण्यात साहाय्य करण्याविषयी वैज्ञानिकांनाही आवाहन केले आहे. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी असतो’, या उक्तीप्रमाणे साधनेमुळे होणार्‍या परिणामांकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले, शिकण्याची आणि विचारण्याची वृत्ती ठेवली, तरच ईश्‍वर या संदर्भातील अमूल्य ज्ञान देईल अन्यथा ‘हे खोटे आहे !’, ‘हे असे कसे होऊ शकते ?’, अशा बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्‍वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून मुकण्याचा करंटेपणा तुमच्याकडून होईल.’ – संपादक 

 

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांच्या वापरातील वस्तूंतील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सदर्‍यावर गुलाबी छटा येण्यामागे काय कारण आहे ?

२. परात्पर गुरु डॉ. आठवले अंघोळीसाठी वापरत असलेल्या मगवर फिकट गुलाबी छटा येण्यामागे काय कारण आहे ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर,

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment