परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

Article also available in :

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हात, तळपाय, जीभ, ओठ आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भाग गुलाबी झाले आहेत. हे त्यांच्या देहात स्थुलातून झालेले दैवी पालट आहेत. अशा प्रकारे देहामध्ये दैवी पालट होण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

गुलाबी रंगाची छटा आलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ओठांचा आतील भाग

 

गुलाबी रंगाची छटा आलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तळहात

 

गुलाबी रंगाची छटा आलेले आणि नितळ त्वचा झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण

 

१. देहामध्ये ईश्वराचे दिव्य चैतन्य कार्यरत झाल्यामुळे
देह दैवी होऊन त्यामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट होणे

जेव्हा देहामध्ये ईश्वराचे दिव्य चैतन्य कार्यरत होते, तेव्हा देहातील पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्रमाण न्यून होऊन तेजतत्त्वाचे प्रमाण वाढते. त्यामुळे देहातील विविध अवयव आणि इंद्रिये यांची शुद्धी होऊन त्यांतून दैवी तेज सूक्ष्मातून किरण आणि स्थुलातून विविध रंगछटा यांच्या स्वरूपात वायूमंडलात प्रक्षेपित होते. त्यामुळे देह दैवी बनून त्यात झालेले दैवी पालट स्थुलातूनही दिसून येतात.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५० टक्के
विष्णुतत्त्व पंचतत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असल्यामुळे
त्यांचा देह दैवी होऊन त्यामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५० टक्के विष्णुतत्त्व कार्यरत असल्यामुळे त्यांच्या देहामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व पंचतत्त्वांच्या स्तरावर कार्यरत झाले आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य देहामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट झाले आहेत. उदा. जीभ आणि नखे यांच्यावर स्थुलातून ‘ॐ’ उमटणे, डोके आणि देह यांच्यावरील काही केस सोनेरी, चंदेरी किंवा मोरपिशी होणे, त्वचा आणि हाताच्या बोटांची पुढची पेरे तुकतुकीत दिसणे, देहावरील कांती पिवळसर किंवा गुलाबी रंगाची दिसणे आणि ही कांती तेल लावल्याप्रमाणे चमकणे आणि उजळणे इत्यादी.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूल देहावरील
विविध अवयवांवर गुलाबी रंगाची छटा येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तळपायांचा रंग गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव

पृथ्वीवर माजलेल्या वाईट शक्तींपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचा पावन स्पर्श पृथ्वीरूपी ‘भूदेवी’ला होतो. ‘भूदेवी’ ही श्रीविष्णूची पत्नी असून ती त्याची परम भक्त आहे. जेव्हा भूदेवीला वाईट शक्तींचा त्रास असह्य होतो, तेव्हा ती श्रीविष्णूला शरण जाऊन तिची वाईट शक्तींपासून मुक्तता करण्यासाठी आर्ततेने प्रार्थना करते. तेव्हा श्री विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांतून पृथ्वीच्या दिशेने, म्हणजे भूदेवीकडे तारक शक्तीचे प्रक्षेपण होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तळपायांतून गुलाबी रंगाच्या तारक शक्तीची वलये भूमीकडे जातात. तारक शक्तीचा रंग गुलाबी असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तळपायांवर गुलाबी रंगाची छटा आलेली आहे.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताच्या तळव्यांचा रंग गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव

परात्पर गुरु डॉ. आठवले हे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध करत असतांना त्यांच्याकडून मारक शक्ती आणि चैतन्य पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते. त्याच वेळी वाईट शक्तींपासून विश्वातील समस्त जिवांचे रक्षण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून तारक शक्तीचेही प्रक्षेपण होते. त्या वेळी विराटरूपधारी श्री विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विश्वातील समस्त जिवांना त्यांच्या विशाल ओंजळीत घेतात. तेव्हा त्यांच्या ओंजळीतून प्रीती आणि तारक शक्ती यांच्या लहरींचे संरक्षककवच त्यांच्या ओंजळीतील समस्त जिवांच्या भोवती निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या तळहातांचा रंग गुलाबी झालेला आहे.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ओठांचा रंग गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव

जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांशी संभाषण करतात, तेव्हा त्यांच्या वाणीतून प्रीतीमय लहरींचे प्रक्षेपण होते. स्थुलातून शब्दांचा उच्चार करत असतांना या प्रीतीमय लहरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ओठांतून वातावरणात प्रक्षेपित होतात. त्याचप्रमाणे जेव्हा परात्पर गुरुदेव साधकांना भेटल्यावर दैवी स्मितहास्य करतात, तेव्हा त्यांचे मुख, ओठ, गाल आणि तोंडवळा यांतून प्रीतीच्या गुलाबी रंगाच्या किरणांचे प्रक्षेपण होते. त्यामुळे त्यांचे ओठ गुलाबी दिसतात. तसेच काही वेळा साधकांशी बोलत असतांना त्यांच्या गालांवर गुलाबी रंगाची छटा दिसते.

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जिभेचा रंग गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव

‘जीभ’ ही आपतत्त्वाशी संबंधित आहे. जिभेच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारची चव कळते. जेव्हा श्रीविष्णूचे तारक तत्त्व आपतत्त्वाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातून कार्यरत होते, तेव्हा त्यांच्या जिभेवर गुलाबी रंगाची छटा येते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णुस्वरूप असल्यामुळे त्यांची वाणी दिव्य आहे. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांशी स्थुलातून बोलतात, तेव्हा त्यांच्या विशुद्ध चक्रातील चैतन्य त्यांच्या जिभेच्या माध्यमातून कार्यरत होते आणि साधकांना परात्पर गुरुदेवांची मधुर वाणी ऐकू येते. या मधुर वाणीमध्ये त्यांच्या हृदयातील प्रीती ओतप्रोत भरलेली असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जिभेवर प्रीतीचे स्वरूप असणाऱ्या गुलाबी रंगाची छटा येते.

३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोळ्यांच्या
पापण्यांच्या आतील भाग गुलाबी होण्यामागील कार्यकारणभाव

जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले हे शिवात्मा दशेत असतात, तेव्हा ते जगद्गुरु म्हणून कार्यरत होतात. या अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये श्री दत्तगुरूंचे तत्त्व कार्यरत होऊन ते विश्वातील समस्त प्राणीमात्रांकडे कृपाळू आणि वात्सल्यपूर्ण दृष्टीने पाहून त्यांना सूक्ष्मातून मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार करतात. त्या वेळी त्यांच्यामध्ये समस्त जिवांप्रती असणारी ‘विश्वव्यापी प्रीती’ कार्यरत होते. या प्रीतीचा रंग गुलाबी असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील भागामध्ये प्रीतीसदृश्य गुलाबी रंगाची छटा आलेली आहे.

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील विविध
अवयवांवर गुलाबी रंगाची छटा दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

४ अ. तारक शक्ती आणि प्रीती यांच्या लहरींचे प्रक्षेपण होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले विश्वातील समस्त जिवांचा उद्धार करण्यासाठी जेव्हा तारक रूप धारण करून कधी गुरु किंवा कधी विष्णुस्वरूप अंशावतार म्हणून कार्यरत होतात, तेव्हा त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात तारक शक्ती आणि प्रीती यांच्या लहरींचे प्रक्षेपण होते.

४ आ. आनंदाच्या लहरींचे प्रक्षेपण होणे

जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या साधनेचे प्रयत्न पाहून त्यांच्यावर प्रसन्न होतात, तेव्हा त्यांच्याकडून समस्त विश्वात गुलाबी रंगाच्या आनंदाच्या लहरींचे प्रक्षेपण होते.

४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या माध्यमातून संपूर्ण
विश्वात धर्मसंस्थापना करण्यासाठी श्रीविष्णूची क्रियाशक्ती कार्यरत होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. त्यामुळे संपूर्ण विश्वात धर्मसंस्थापना करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून श्रीविष्णूची क्रियाशक्ती कार्यरत झालेली आहे. त्यामुळे ती आवश्यकतेनुसार पंचमहाभूतांच्या स्तरावर प्रक्षेपित होते. जेव्हा ही शक्ती तेजतत्त्वाच्या स्तरावर प्रक्षेपित होते, तेव्हा परात्पर  गुरुदेवांच्या देहातील विविध अवयवांवर गुलाबी रंगाची छटा येते.

४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या माध्यमातून तारक शक्ती,
वात्सल्यभाव, प्रीती,आनंद आणि श्रीविष्णूची क्रियाशक्ती यांच्या सूक्ष्म लहरींचे प्रक्षेपण होणे

तारक शक्ती, वात्सल्यभाव, प्रीती, आनंद आणि श्रीविष्णूची क्रियाशक्ती यांच्या सूक्ष्म लहरींचा रंग गुलाबी आहे. जेव्हा या लहरींचे घनीकरण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहात होते, तेव्हा त्यांच्या विविध अवयवांमध्ये दैवी पालट होऊन त्यांचा रंग स्थुलातून गुलाबी होतो.

५.परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण लहान बाळासारखे नितळ दिसणे
आणि त्यांच्या चरणांच्या त्वचेवर चकाकी येणे यांच्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण लहान बाळासारखे, नितळ दिसत आहेत. तसेच चरणांच्या त्वचेवर चकाकीही आली आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

५.अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण गुलाबी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. त्यामुळे त्यांच्या देहातून सतत ईश्वरी शक्ती आणि चैतन्य यांचे सभोवतालच्या वायूमंडलात अन् पाताळाच्या दिशेने प्रक्षेपण होत असते. परात्पर गुरु यांच्या चरणांतून सतत मारक शक्तीचे प्रक्षेपण पाताळाच्या दिशेने झाल्यामुळे त्यांच्या चरणांवर गुलाबी रंगाची छटा दिसते.

५.आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण लहान बाळासारखे नितळ दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

त्यांच्या चरणांतून अखिल ब्रह्मांडातील जिवांचा उद्धार करण्यासाठी निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याचे प्रक्षेपण झाल्यामुळे त्यांच्या चरणांची त्वचा लहान मुलांच्या पायाच्या त्वचेप्रमाणे मऊ आणि नितळ दिसत आहे. व्यक्तीच्या मनाच्या स्थितीचा परिणाम तिच्या देहावरही होत असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मन बाळाप्रमाणे नितळ आणि निर्मळ असल्यामुळे त्यांचे चरणही लहान बाळासारखे नितळ दिसतात, तसेच त्यांच्या चरणांवरील त्वचेतून आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरावर ईश्वरी चैतन्याचे प्रक्षेपण झाल्यामुळे त्यांच्या चरणांच्या त्वचेवर चकाकी आलेली आहे. सर्वसामान्य मनुष्यामध्ये चैतन्याचे प्रमाण न्यून झाल्यामुळे त्यांच्या वयाच्या, म्हणजे ८० वयाच्या व्यक्तीच्या तळपायाची त्वचा राठ दिसते; याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात ईश्वरी चैतन्य कार्यरत असल्यामुळे त्यांच्या तळपायांच्या त्वचेमध्ये वरील दैवी पालट झाल्याचे दिसून येते.

कृतज्ञता

श्रीगुरूंच्याच कृपेमुळे त्यांच्या दैवी लक्षणांच्या संदर्भात वरील ज्ञान मिळाले यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१३.५.२०२२)

६.कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील गुलाबी झालेल्या विविध अवयवांतून त्यांच्यातील तारक शक्ती, वात्सल्यभाव, प्रीती, आनंद आणि श्रीविष्णूची क्रियाशक्ती यांचे जणू दर्शनच होते. यासाठी मी श्री विष्णुस्वरूप आणि श्री दत्तस्वरूप असणाऱ्या परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

Leave a Comment