प.पू. डॉक्टरांच्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तराचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

प.पू. डॉक्टरांच्या कपाटात ठेवलेल्या आणि त्यांनी
वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या
अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे
केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला खोटे ठरवणारे असतात तथाकथित पुरोगामी, तर अध्यात्म विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी सनातन संस्था आहे खरी पुरोगामी !

१. प.पू. डॉक्टरांच्या कपाटात ठेवलेल्या आणि त्यांनी
वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप अत्तर निर्माण होणे

१ अ. प.पू. डॉक्टर रहात असलेल्या खोलीतील आरशाच्याकपाटाच्या
खणातून सुगंध येऊन चांगले वाटणे, गंधाचेमूळ शोधण्याचा
प्रयत्न करणे आणि प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली काशाची
वाटी दिसल्यावर सुगंधाची मूळ उत्पत्ती त्यातून झाली, असे वाटणे

ऑगस्ट २००७ मध्ये प.पू. डॉक्टर रहात असलेल्या खोलीत एकदा मी छायाचित्रे काढण्याची सेवा करत होते. तेव्हा त्यांच्या आरशाच्या कपाटाच्या खणातून सुगंध येत असल्याचे मला जाणवले. मी तिथे बसून सुगंध घेऊ लागले. त्या सुगंधामुळे मला चांगले वाटत होते. या गंधाचे मूळ शोधायला हवे, असा विचार करून मी तेथील वस्तू बारकाईने पाहू लागले. तेव्हा मला तिथे एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली काशाची वाटी दिसली. मनात विचार आला, खणाला येणार्‍या सुगंधाची मूळ उत्पत्ती या काशाच्या वाटीतून झाली आहे. येथूनच सुगंध पसरून तो खणाला येत आहे. त्यानंतर मी अर्धा घंटा ती कास्यवाटी हातात घेऊन बसले होते. तेथून गेल्यावर हाताला पुष्कळ सुगंध येत असल्याचे माझ्या लक्षात आले. तो सुगंध सुमारे १ घंटा टिकून होता. ती कास्यवाटी जुलै २००७ मध्ये प.पू. डॉक्टर पुष्कळ आजारी असतांना त्यांच्या पायांना तेल चोळून उष्णता न्यून करण्यासाठी वापरली आहे, असे समजले.

काशाच्या वाटीत आपोआप अत्तर निर्माण होणे

काशाच्या वाटीत आपोआप अत्तर निर्माण होणे

१ आ. कास्यवाटीत अत्तर निर्माण झाल्याचे समजल्यावर मनातील विचारांचा उलगडा होणे

त्यानंतर नोव्हेंबर २००७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या त्या कास्यवाटीत गंधाचे घनीकरण होऊन अत्तर निर्माण झाल्याचे मला समजले. तेव्हा कास्यवाटीविषयी माझ्या मनात आलेल्या वरील विचारांचा उलगडा मला झाला.

– कु. गायत्री बुट्टे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. संतांच्या उपयोगातील वस्तूंमध्ये सत्त्वगुण वाढल्याने त्या वस्तूंमध्ये चांगले पालट होत असणे

सामान्य व्यक्तीमध्ये सत्त्व : रज : तम यांचे प्रमाण २० : ३० : ५० असे असते, तर संतांमध्ये हेच प्रमाण ७५ : २० : ५ असे असते. याचा अर्थ सामान्य व्यक्तीच्या तुलनेत संतांमधील तमोगुणाचे प्रमाण पुष्कळ अल्प होऊन सत्त्वगुणाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले असते. साधना करणे म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे. ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न, म्हणजेच ईश्वराचे गुण आत्मसात करून त्याच्याशी एकरूप होण्यासाठीचे प्रयत्न. संतपद येणे म्हणजे साधनेच्या प्रवासात ईश्वराशी एकरूप होण्याच्या टप्प्याच्या निकट पोहोचणे. त्यामुळे तेव्हा अंगी काही अंशी देवपण आलेले असते; म्हणूनच संतांच्या स्पर्शाने त्यांच्या उपयोगातील वस्तू सत्त्वगुणी बनून त्यांच्यात चांगले पालट होतात आणि त्यामुळेच अनमोल साठा म्हणून त्या जतन करून ठेवण्याची प्रथा आहे. वरील कारणामुळेच प.पू. डॉक्टर यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत अत्तर निर्माण झाल्याची शक्यता आहे.

३. प.पू. डॉक्टर यांनी वापरलेल्या काशाच्यावाटीत आपोआप
निर्माण झालेल्या अत्तराची वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही किंवा ती वस्तू आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक वस्तूतील स्पंदनांचे निदान अचूक लावू शकतात. भक्त, साधक संतांनी सांगितलेले शब्दप्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध केली असेल, तरच ती खरी वाटते. येथे प.पू. डॉक्टर यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तरातून कशी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे वैज्ञानिकदृष्ट्या पडताळण्याच्या उद्देशाने आर्. एफ्. आय. रीडिंग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

४. आर्. एफ्. आय. रीडिंग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांची ओळख

आर्.एफ्.आय. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) रीडिंग उपकरणाच्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्विक ऊर्जा मोजू शकतो, तर पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पहाता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. पिप प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. निळा (आकाशी) रंग सात्त्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे, तर सोनेरी छटा असलेला पिवळा रंग उच्च स्तरीय वैश्विक स्पंदने दर्शवतो.

५. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

५ अ. आर्. एफ. आय. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) नोंद आणि तिचे विवरण

प.पू. डॉक्टर यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेले अत्तर प्रयोगासाठी ठेवण्यापूर्वी वातावरणातील आर्. एफ्. आय. नोंद १२१ मेगाहटर्स आली. याचा रंग नारिंगी आहे आणि तो रंग तेव्हा वातावरणात दाब आणि नकारात्मकता असल्याचे दर्शवतो. काचेच्या बरणीत ठेवलेली अत्तराची वाटी प्रयोगासाठी ठेवल्यानंतर आर्. एफ्. आय. द्वारे तेथील कंपनसंख्या १३७ मेगाहटर्स दर्शवली. त्याचा रंग पिवळा आहे आणि तो सकारात्मक स्पंदने दाखवतो. याचा अर्थ अत्तरामुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन तेथे सकारात्मक स्पंदने निर्माण झाली.

५ आ. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)द्वारे प्रभावळीचे केलेले वर्णन आणि त्याचे विविरण

बरणीसहित असलेली अत्तराची वाटी प्रयोगासाठी ठेवल्यावर वातावरणात असललेली जांभळ्या रंगाची नकारात्मक वलये अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या पिवळ्या वलयांनी दूर ढकलली आणि पिवळी प्रभावळ बरणीभोवती पसरली. म्हणजे पिपद्वारेही अत्तरामुळे वातावरणात झालेला चांगला पालटच दर्शवला गेला. अत्तराची बरणी ठेवलेल्या पटलावरही उच्च आध्यात्मिक स्तराचा आकाशी रंग दिसत आहे, तसेच अत्तराची वाटी असलेली बरणीसुद्धा गतीमान अशा हिरव्या रंगाची दिसत आहे.

वरील निरीक्षणांतून असे दिसून येते की, प.पू. डॉक्टर यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेले अत्तर उच्च आध्यात्मिक स्तराचे असून ते आध्यात्मिक लाभ करून देणारे आहे.

– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, डोंबिवली) (१९.४.२०१२)

६. प.पू. डॉक्टर यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत
आपोआप निर्माण झालेल्या अत्तराच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

६ अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील कपाटाच्या खणात अत्तर तयार झालेल्या वाटीचा सुगंध घेतांना माझ्या ब्रह्मरंध्रावर संवेदना जाणवून भावजागृती झाली. – श्री. पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.११.२००७)

६ आ. काशाच्या वाटीत बनलेल्या अत्तराचा सुगंध

गुरु शिखरी, माऊंट अबू येथे दत्त महाराजांची अखंड धुनी पेटत असते. तेथे जसा अत्तराचा सुगंध येतो, तसा काशाच्या वाटीत बनलेल्या अत्तराचा सुगंध आहे. – श्री. जोशी, मुलुंड (६.११.२००८)

६ इ. वर्ष २००७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील कपाटाच्या खणात आपोआप निर्माण
झालेल्या अत्तराविषयी वर्ष २०१० आणि वर्ष २०११ मध्ये घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना

६ इ १. अत्तराचा दिव्य गंध घनीभूत झालेल्या ठिकाणी अत्तराचे थेंब तयार होण्यास आरंभ होणे

वर्ष २००७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील कपाटाच्या खणात निर्माण झालेले अत्तर असलेली काशाची वाटी काचेच्या बरणीत ठेवली आहे आणि ती काचेची बरणी प्लास्टिकच्या निळ्या झाकणाच्या डब्यात ठेवली आहे. त्या बरणीला घट्ट झाकण असूनही त्यातील अत्तराचा दिव्य गंध बाहेरच्या प्लास्टिकच्या डब्यात दरवळत असतो. हाच गंध आता प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणाच्या आतील बाजूस घनीभूत होऊन तेथे अत्तराचे छोटे छोटे थेंब तयार होण्यास आरंभ झाला आहे. (वर्ष २०११ मध्ये पाहिले असता काचेच्या बरणीत आणखी काही अत्तराचे थेंब जमा झाल्याचे आढळून आले.)

६ इ २. अत्तराचे निर्गुणात जाणे

प्लास्टिकच्या डब्याच्या निळ्या झाकणाच्या बाहेरच्या बाजूला पांढरा रंग येऊ लागला आहे. अत्तर निर्गुणात जाण्यास आरंभ झाल्याचे ते दर्शक आहे.

६ इ ३. झाकणावरील याच पांढर्‍या रंगाच्या जवळ आपोआप अनेक ओरखडे आले आहेत.

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१०)

७. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांच्या निष्कर्षांच्या संदर्भात सनातन संस्था अधिक संशोधन करत आहे. या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्य मिळाल्यास आम्ही आभारी होऊ.

(संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल :sankalak.goa@ gmail.com)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment