असे सांभाळा शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ !

Article also available in :

अनुक्रमणिका

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ आणि आरोग्यसंपन्न रहाते. आयुर्वेदाने सांगितलेले नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आखल्यास ‘जीवेत शरदः शतम् ।’ याप्रमाणे १०० वर्षे  आरोग्यसंपन्न आयुष्य जीवन जगा, हा आयुर्वेदीय ऋषीमुनींचा आशीर्वाद प्रत्येकाला निश्‍चितच मिळेल.

शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य.

शारीरिक स्वास्थ्य : सुदृढ, बलवान, बांधेसूद आणि भरदार शरीर, तेजस्वी डोळे, कांतीमान त्वचा, तुकतुकीत केस, चांगली भूक, शांत झोप, नाडी, श्‍वास, लघवी, शौच, सांध्याच्या हालचाली, इतर सर्व अवयवांची आणि सर्व इंद्रियांची कार्ये व्यवस्थित आणि सुलभरीतीने होणे ही शारीरिक स्वास्थ्याची लक्षणे होत.

मानसिक स्वास्थ्य : मनामध्ये कोणतेही दुःख किंवा तणाव नसणे, काम-क्रोधादी षड्रिपूंवर ताबा असणे, कर्तव्यात दक्ष असणे, प्रत्येक कृती कौशल्याने आणि उत्साहपूर्ण करणे ही मानसिक स्वास्थ्याची लक्षणे होत.

आध्यात्मिक स्वास्थ्य : सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ आणि आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने भगवद्भक्ती करणे आणि त्यात समाधानी असणे हे आध्यात्मिक स्वास्थ्य होय.

समाजस्वास्थ्य : आपण समाजाचा एक घटक असून समाज सुखी असेल, तरच आपण सुखी होऊ; म्हणून इतरांसाठी झटण्याची मनोवृत्ती असणे, सर्वांविषयी प्रेम, क्षमाशीलता, समाजकार्यासाठी वेळ देणे यामुळे समाजस्वास्थ्य टिकून राहू शकते.

केवळ रोगांपासूनच नव्हे, तर भवरोगांतून म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त करून मानवाला दुःखापासून कायम मुक्त करणे आणि मोक्षाची प्राप्ती करून देणे हेच आयुर्वेेदाचे अंतिम ध्येय आहे.

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ = धर्म आचरण्याचे पहिले साधन शरीर होय, असे कालिदासाचे वचन आहे (कु.सं.५.३३).

भिषग्वर्य चरकानेही ‘धर्मार्थकाममोक्षाणामारोग्यं मूलमुत्तम्’ = धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचे आरोग्य हे मूळ आहे, असे सांगितले आहे.

 

१. आयुर्वेदात सांगितल्यानुसार व्यायाम केल्याने होणारे लाभ !

१ अ. व्यायामामुळे शरिरातील काळी शक्ती नष्ट होऊन देहातील चैतन्य वाढणे, अ‍ॅक्युप्रेशर
आणि व्यायाम यांमुळे शरीर अन् सूक्ष्मचक्रे यांतील काळे आवरण नष्ट होऊन त्यांची शुद्धी होणे

‘व्यायामामुळे शरिरातील सूक्ष्मचक्रांच्या (सप्तचक्रांच्या) भोवती असलेले काळ्या शक्तीचे आवरण चक्रांच्या जागी (म्हणजेच त्या बिंदूवर) दाब दिल्याने प्रारंभी विरळ होते. व्यायाम करण्यामध्ये सातत्य ठेवल्यास ते नष्ट होते. त्यामुळे सूक्ष्मचक्रांच्या अधिपत्याखाली असलेल्या अवयवांमधील काळी शक्ती विरळ होते आणि शरिरातील सूक्ष्मचक्रांची शुद्धी होते.

१ आ. व्यायामामुळे स्नायू आणि हाडे यांची कार्यक्षमता वाढणे

व्यायामामुळे होणार्‍या स्नायू आणि हाडे यांच्या लयबद्ध हालचाली, स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण या क्रियांमुळे स्नायू अन् हाडे यांच्याभोवती असलेले काळ्या शक्तीचे थर, म्हणजेच रज-तम कणांचे बंध विरळ होतात. त्यामुळे स्नायू आणि हाडे मोकळी होऊन त्यांतील जडत्व कमी होऊन हलकेपणा जाणवतो आणि शिथिलता कमी होऊन कार्यक्षमता वाढते. व्यायाम करतांना प्रार्थना आणि नामजप केल्यास स्नायू आणि हाडे यांची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढून ते टिकून रहाते.

१ इ. व्यायामामुळे क्षात्रवृत्ती वाढणे

साधकांसाठी व्यायाम करणे, हे युद्ध असून व्यायामामुळे साधकाची क्षात्रवृत्ती ३० टक्क्यांनी वाढते.

१ ई. व्यायामामुळे मेंदू आणि मन यांना जोडणारा कृष्णतत्त्वाचा बंध
प्रकाशमान होऊन चैतन्य मिळणे, त्यामुळे शरीर चमकदार अन् चैतन्यमय दिसणे

व्यायामामुळे मनातील रज-तम कण न्यून होऊन काळ्या शक्तीचे आवरण अल्प होते. त्यामुळे मनाची शक्ती २ टक्क्यांनी वाढते. व्यायामामुळे मन आणि मेंदू यांना जोडणारा कृष्णतत्त्वाचा बंध प्रकाशमान होऊन त्याचे चैतन्य मनामध्ये परावर्तित होते. त्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी होते. हेच चैतन्य पुढे शरिरातील सर्व अवयवांमध्ये पसरते. त्यामुळे काळी शक्ती नष्ट होऊन व्यायाम करणार्‍या व्यक्तीचे शरीर चमकदार आणि चैतन्यमय दिसते.

उ. व्यायामामुळे शरीरातील ऊर्जा आणि रस यांचे शक्ती अन् चैतन्यरस यांत रूपांतर
होऊन शरीर आणि मन यांची शुद्धी होणे, शरिरातील चरबी घामाद्वारे बाहेर टाकली जाणे

आयुर्वेदामध्ये ‘व्यायाम हा शरिरातील रस आणि तेजतत्त्व जागृत करणारा आहे’, असे म्हटले आहे. व्यायामामुळे शरिरामध्ये तयार होणारी ऊर्जा आणि रस साठवले जाते. पुढे त्यांचे शक्ती आणि चैतन्यरस यांत रूपांतर होते. त्यामुळे शरीर आणि मन यांची शुद्धी होऊन कार्यक्षमता वाढते. शरिरातील रस जागृत झाल्याने शरिरातील आपतत्त्वाचे प्रमाण संतुलित रहाते. शरिरामध्ये (सूक्ष्मरूपात) असणारी टाकाऊ मूलद्रव्ये चरबीच्या स्वरूपात असतात. ती व्यायामामुळे घामाच्या द्वारे बाहेर पडतात.’ – सौ. कोमल जोशी (वर्ष २००६)

 

२. निरोगी जीवनाचा कानमंत्र

१. शरीर आरोग्यदायी रहाण्यासाठी आहार चांगला असावा लागतो. आहार चांगला असण्यासह सात्त्विक असला, तर शरिराचा सत्त्वगुणही वाढायला साहाय्य होते. सात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते. शरिराचा सत्त्वगुण वाढला, तर ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते.

२. शरिरातील स्नायूंना पुरेसा व्यायाम न मिळाल्याने ते अशक्त होऊन अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. बैठी / संगणकीय कामे करणार्‍यांमध्ये हे विशेषत्वाने दिसून येते. स्नायूंना अशक्तपणा येऊ नये, यासाठी प्रतिदिन थोडावेळ स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम करावा.

 

३. रोग होऊ नयेत; म्हणून आयुर्वेदाने सुचवलेले उपाय

१. प्रज्ञापराध होऊ न देणे

२. मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवणे आणि काम, क्रोध इत्यादी आवेगांचे नियंत्रण करणे

३. खोकला, उचकी, शौच, लघवी इत्यादी नैसर्गिक वेग दाबून न धरणे

४. आरोग्यासाठी हितकर आणि अहितकर आहार-विहार कोणते याविषयी विचार करून त्याप्रमाणे हितकर आहार-विहार करणे

५. वसंत ऋतूत कफ वाढू नये; म्हणून उलटी करावी, शरद ऋतूत पित्त वाढू नये; म्हणून रेचक द्यावे, पावसाळ्यात वात वाढू नये म्हणून एनिमा द्यावा

६. देश आणि काल यांप्रमाणे दिनचर्या अन् ऋतूचर्या आखावी

७. प्रत्येक कृती विचारपूर्वक करणे

८. विषयांविषयी आसक्ती न ठेवणे

९. दान करणे, दुसर्‍यास साहाय्य करणे

१०. सत्य बोलणे, तप आणि योगसाधना करणे

११. आप्तांची (ज्ञान प्राप्त झालेले) सेवा करणे, त्यांच्या उपदेशाने वागणे

१२. सद्वर्तन करणे

१३. सर्वांशी स्नेहभावाने आणि समतेने वागणे

१४. अध्यात्मशास्त्राचे चिंतन करणे आणि त्याप्रमाणे वागणे

 

४. शीतपेयांतील आरोग्यास घातक ठरणारे घटक

१. कार्बन डायऑक्साईड : ‘शीतपेय फेसाळण्याची क्रिया या वायूमुळे होते.

दुष्परिणाम : हा वायू प्रमाणाबाहेर पोटात गेल्यास ढेकर येणे, गरगरणे, बेशुद्ध होणे, असे होते.

२. कॅफिन : मेंदूला उत्तेजना (कीक) देते, त्यामुळे तात्पुरती तरतरी वाटते.

दुष्परिणाम : शरीर वारंवार मागणी करू लागते आणि व्यसनी बनवते.

३. फॉस्फरीक अ‍ॅसिड : हे तीव्र आम्ल चुरचुरणारी चव देते. प्रत्येक घोट जाळत जातो. दिलखुलाससपणाची भावना निर्माण होते.

दुष्परिणाम : दातावरचे आवरण अन् हाडे ठिसूळ करते. यकृत अन् आतडी यांच्यावर परिणाम करून निकामी करते.

४. अ‍ॅस्फोर्टेम : मधुरता अन् गोडी आणते. हा पदार्थ साखरेपेक्षा १८० पट गोड असतो.

दुष्परिणाम : मेंदू, मज्जातंतू, रक्त यांवर घातक परिणाम करते. कर्करोग, मधुमेह यांसारख्या रोगांना निमंत्रण देते.

५. एथायलिन : द्रावण अधिक थंड राखण्याचे काम करते.

दुष्परिणाम : पचनसंस्था, मूत्रपिंड, मेंदू, हृदय यांवर मंद गतीने विपरीत परिणाम करते.’

(सत्यवेध, १.११.२०१०)

 

५. पाश्‍चात्त्यांना गाढ झोपच ठाऊक नसल्याने विश्‍वभर झोपेची औषधे प्रचंड खपत असणे

‘गाढ झोप आम्हाला ठाऊक नाही. गाढ झोप शिखिध्वजाची, मुचकुंदाची, कपिलाची, वसिष्ठांची आणि निष्पाप बालकाची ! शंकराचार्यांसारख्या सिद्ध महापुरुषाची ! ती अखंड अद्वैतात स्थिर आहे. पाश्‍चात्त्य आता गाढ झोपेवर संशोधन करत आहेत. गाढ झोप काय आहे, ते त्यांना ठाऊक आहे का ? नाही. विश्‍वभर झोपेची औषधे प्रचंड खपत आहेत, मद्य  आहे. अतीउग्र नशा आणणार्‍या पदार्थांचा प्रचंड वापर केला जात आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’, मे २०११)

 

६. अहंमुळे आरोग्य बिघडण्याची कारणे

१. जिवाच्या भोवती असणार्‍या अहंच्या वाढत्या आवरणामुळे जिवाच्या मनाची कारकता वाढून स्थूलदेहातील लोह आणि कॅल्शियम यांचे संतुलन बिघडते.

२. अहंमुळे स्थूलदेहाला जडत्व येऊन जिवाची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता लोप पावते. शरिरातील पेशींमधील चैतन्य अल्प होऊन स्नायू आणि हाडे यांना शिथिलता आणि शुष्कता येते.

३. अहंमुळे मेंदूभोवती असलेल्या कृष्णतत्त्वाचे विघटन होऊन मेंदूची कार्यक्षमता अल्प होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होऊन विविध शारीरिक आणि मानसिक विकार होतात. साधनेमुळे अहंचा लय झाला की, रोगाचे प्रारब्ध सहन करता येते.

Leave a Comment