पर्यावरणप्रेमींचा दुटप्पीपणा नव्हे, तर निवळ हिंदुद्रोह !

गणेशोत्सव : धर्मशास्त्रासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. आपले आराध्य देवतेचे कार्य कोणते, त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आदी सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्रीय माहिती मिळाल्यास देवतेप्रती आपला भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन श्री गणेशासंदर्भातील धर्मशास्त्रीय तसेच अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

‘समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेश ! दुःखाचे हरण करणार्‍या आणि सर्वांना सौख्य देणार्‍या श्री गणरायाविषयी आपणा सर्वांच्या मनात विशेष स्थान असल्यामुळेच गणेशोत्सवात समष्टी उत्साह ओसंडून वहात असतो.

मुळात आजपासून १२५ वर्षांआधी लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थी या व्यष्टी स्तरावर साजरा केल्या जाणार्‍या सणाला १० दिवसांच्या एका लोकोत्सवाचे रूप प्राप्त करून दिले. तोच हा गणेशोत्सव ! ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्री गणेशाचे वाजत गाजत आगमन होते, तर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, या आर्त भावाने त्याला निरोप दिला जातो, ही रीत काही गेली सव्वाशे वर्षे पालटलेली नाही. पालटली ती आपणा सर्वांची मानसिकता अन् त्यामुळे या उत्सवाला आलेले विकृत स्वरूप !

१. हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न !

आजचा सामान्य हिंदू हा धर्मशिक्षणाच्या अभावी नि भोळेभाबड्या स्वभावामुळे पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाला बळी पडत आहे. सर्वश्रेष्ठ अशा वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभलेला हिंदु समाज प्रत्येक गोष्टीत ठायी ठायी ईश्‍वराचा वास असल्याची शिकवण देणार्‍या महान हिंदु धर्माला विसरून पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत आहे. त्यातच त्याला प्रौढी वाटू लागली आहे. नेमक्या याच दिशा चुकलेल्या विचारधारेचा अपलाभ उठवत हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मापासून दूर नेण्याचा घाट घातला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणवणारे स्वयंघोषित सुधारक आणि त्यांच्या संघटनांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या काळात सक्रीय होतात. ‘गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होते’, अशी टूम या लोकांनी काही वर्षांपूर्वी काढली. विसर्जनाऐवजी मूर्तीदान करण्याचा धर्मविरोधी विचार हिंदूंच्या मन:पटलावर पेरण्याचा प्रयत्न चालवण्यात आला. सश्रद्ध हिंदु समाजाकडून मात्र याला विशेष प्रतिसाद न मिळाल्याने गेल्या ४-५ वर्षांपासून ‘इको-फ्रेंडली गणेश’ या गोंडस नावाखाली ‘कागदी लगदा अथवा तत्सम वस्तूंपासून गणेशाची मूर्ती बनवा !’, अशाप्रकारे अपप्रचार केला जात आहे. हिंदूंना धर्मशास्त्रविरोधी कृती करण्यास प्रवृत्त केले जात आहे.

२. निसर्गद्रोही पर्यावरणवादी !

हे कथित पर्यावरणप्रेमी ज्या कागदी लगद्याच्या मूर्तीचा पुरस्कार करतात, त्याने किती प्रदूषण होते, हे प्रत्येक हिंदूने जाणणे आवश्यक आहे.

२ अ. मुंबईतील प्रसिद्ध शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था (Institute of Chemical Technology, Mumbai) यांनी कागदी लगद्यापासून बनवलेल्या ४ मूर्ती घेऊन या विषयाचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, १० किलो कागदी मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड, असे विषारी धातू आढळून आले.

२ आ. सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेनेे साधा कागद ‘डिस्टील्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले. कागद विरघळवलेल्या या पाण्यात ‘ऑक्सिजन’ची (प्राणवायूची) मात्रा शून्यावर आल्याचे त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाले. हेे अत्यंत घातक आहे. यातून कागदी लगदा किती हानीकारक आहे, हे वैज्ञानिक स्तरावर आपल्या लक्षात येते.

२ इ. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने दिनांक ३.५.२०११ या दिवशी ‘सणांचे पर्यावरणपूरक साजरीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना’ या नावाने एक परिपत्रक काढले. यामध्ये ‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन मिळावे’, ‘कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात, यांसाठी पुढाकार घ्यावा’, तसेच ‘कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना विशेष सवलत द्यावी’, असे नमूद केले होते. ही सूचना पर्यावरणाला घातक असल्याने या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी ‘राष्ट्रीय हरित लवाद’ (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल), पुणे यांनी या शासन निर्णयाला स्थगिती दिली आहे.

३. पर्यावरणवाद्यांचा हिंदुद्रोह उघड !

दुसरीकडे महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या क्षेत्रात प्रतिदिन निर्माण होणारे सांडपाणी, त्यावर केली जाणारी प्रक्रिया आणि तिची विल्हेवाट यांविषयी शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार प्रतिदिन ६ अब्ज २१ कोटी ३ लक्ष लिटर सांडपाण्याची निर्मिती होते. त्यापैकी केवळ ३ अब्ज ६३ कोटी ८६ लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच प्रतिदिन २ अब्ज ५७ कोटी १७ लाख लिटर एवढे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसेच नद्या किंवा खाड्या यांत सोडले जाते. ही आकडेवारी केवळ शहरी भागांतील आहे. तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रांतील कारखान्यांतून रसायनयुक्त सांडपाणी जवळच्या नद्या किंवा खाड्यांमध्ये जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे होणारी प्राणी आणि वनस्पती यांची जीवितहानी स्वयंघोषित समाजसुधारक आणि पर्यावरणवादी यांना का दिसत नाही ?

थोडक्यात पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली नव्हे, तर पर्यावरणद्वेषासह केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरांना खंडित करण्यासाठी पुरोगामी मंडळींचा कागदी लगदा अथवा तत्सम वस्तूंपासून बनवलेल्या मूर्तीचा पुरस्कार, हा निवळ खोटेपणा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. श्री गणेशमूर्ती ही धर्मशास्त्रानुसार शाडूच्या मातीपासून बनवणे अपेक्षित आहे. अशी मूर्तीच शंभर टक्के पर्यावरणपूरक अर्थात् खर्‍या अर्थाने इको-फ्रेंडली असते.

४. हिंदूंमध्ये वैचारिक सुस्पष्टता आवश्यक !

एकूणच काय, तर धर्मशास्त्रविरोधी कृती समाजात रूढ होऊ न देणे, हे जाणून पुरोगाम्यांच्या विरोधात सनदशीर आणि संघटितपणे चळवळ उभी करायला हवी. तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांचे अज्ञान घालवून त्यांच्यात वैचारिक सुस्पष्टता निर्माण होणे, हीसुद्धा काळाची आवश्यकता आहे. हिंदूंचे प्रबोधन आणि त्यांच्यात जागृती करणे, ही श्री गणेशाची उपासनाच आहे, हे प्रत्येक गणेशभक्ताने जाणून प्रयत्न करावेत, अशी बुद्धी बुद्धीदात्या गणरायाने सर्वांना द्यावी, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’

– एक वास्तविक पर्यावरणप्रेमी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment