मलेशियातील बटू गुहेत असलेले कार्तिकेयाचे विश्‍वप्रसिद्ध जागृत मंदिर !

Article also available in :

१४० फूट उंचीची आणि सुवर्ण रंगाची कार्तिकस्वामींची जगातील सर्वांत मोठी मूर्ती !

 

मलेशियाची राजधानी कौलालंपूरजवळ ४० कोटी वर्षे प्राचीन असलेली अन् प्रचंड मोठी अशी बटू गुहा !

 

कार्तिकेय मंदिराच्या पुजार्‍याने रामराज्याच्या स्थापनेसाठी देवाला दुधाचा अभिषेक आणि विशेष पूजा करून मूर्तीला हार घालतांनाचा क्षण !

 

मंदिराच्या पुजार्‍याने कार्तिकस्वामींच्या गळ्यातील फुलांचा हार आणि अभिषेकाचा प्रसाद सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना देतांनाचा क्षण !

 

१. भारतीय प्राचीन इतिहासातील ‘मलय द्वीप’ म्हणजेच आताचा
मलेशिया देश असणे आणि या ठिकाणी १५ व्या शतकापर्यंत हिंदूंचे साम्राज्य असणे

‘प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा अनेक द्विपांचा समुच्चय आहे. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय साहित्यात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो. १५ व्या शतकापर्यंत मलेशियात ‘इस्लाम’ येईपर्यंत ‘मजापाहित’ आणि ‘श्रीविजय’ या हिंदु साम्राज्यांनी १ सहस्र ५०० वर्षे राज्य केले. २ सहस्र वर्षांपूर्वी मलेशियाच्या इतिहासाविषयी कुठेही विशेष उल्लेख आढळत नाही.

 

२. ४० कोटी वर्षे प्राचीन असलेली बटू पर्वतावरील बटू गुहा

मलेशियाची राजधानी असलेल्या कौलालंपूरपासून १६ कि.मी. अंतरावर ‘बटू’ पर्वतरांग आहे. या पर्वतांमध्ये चुनखडीची एक गुहा आहे. वैज्ञानिकांच्या मते ही गुहा ४० कोटी वर्षे प्राचीन आहे. या गुहेत जायला २७२ पायर्‍या आहेत. पायर्‍या चढून गेल्यावर प्रचंड अशा त्या गुहेत आपण प्रवेश करतो. ही गुहा एवढी मोठी आहे की, तिच्या आत १० मजली इमारत उभी करता येईल. (छायाचित्र क्रमांक २ पहा.) या गुहेत ३ ठिकाणी मोठ्या भोकांतून सूर्यप्रकाश आत येतो.

 

३. जगातील कार्तिकेयाच्या १० स्थानांपैकी बटू पर्वत हे दहावे स्थान असणे

गुहेच्या आत १०० मीटर चालत गेल्यावर कार्तिकेयाचे मंदिर येते. तमिळ हिंदूंची श्रद्धा आहे, ‘कार्तिकेयाचे स्थान असलेले जगात १० पर्वत आहेत. त्यांतील ६ भारतातील तमिळनाडू राज्यात आणि ४ मलेशियात आहेत. या १० स्थानांपैकी हे दहावे स्थान आहे.’ या स्थानाला तमिळमध्ये ‘पत्तू’ असे संबोधतात. तमिळ भाषेत ‘पत्तू’ म्हणजे ‘दहा’. कालांतराने ‘पत्तू’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘बटू’ असे झाले. त्यामुळे आता या पर्वताला मलेशियातील हिंदू ‘बटू पर्वत’ आणि पत्तू गुहेला ‘बटू गुहा’ या नावाने ओळखतात.

 

४. बटू गुहेचा इतिहास

१५० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतातील तमिळनाडू प्रांत आणि श्रीलंका येथून तमिळ लोकांना चहाच्या बागांमध्ये काम करण्यासाठी मलेशियात नेले. हे लोक मलेशियातील विविध प्रांतांमध्ये स्थायिक झाले. यांपैकीच एक म्हणजे श्री. तंबूस्वामी पिल्लै. श्री. तंबूस्वामी हे देवीभक्त होते. त्यांच्या स्वप्नात येऊन श्री दुर्गादेवीने त्यांना सांगितले, ‘बटू नावाची गुहा हे कार्तिकस्वामींचे तपश्‍चर्या क्षेत्र आहे. त्या ठिकाणी भक्तांच्या उपासनेसाठी एका मंदिराची स्थापना कर.’ त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी श्री. पिल्लै हातात कार्तिकस्वामींचे ‘वेल’ नावाचे आयुध घेऊन आपल्या काही मित्रांसमवेत बटू गुहेत गेले. श्री. तंबूस्वामींची श्रद्धा बघून त्या गावाच्या आजूबाजूला चहाच्या बागांमध्ये काम करणारेही त्यांच्या साहाय्याला गेले आणि त्यांनी वर्ष १८९१ मध्ये या गुहेत एका छोट्या मंदिराची स्थापना केली. या गुहेच्या आत एवढी मोठी जागा आहे की, एका वेळी ५ सहस्र भाविक बसून पूजा करू शकतात.

 

५. बटू गुहेतील कार्तिकस्वामींच्या मंदिरातील वार्षिक उत्सव – तायपूसम्

माता पार्वतीने कार्तिकेयाला ज्या दिवशी ‘वेल’ हे आयुध दिले, तो दिवस म्हणजे तायपूसम्. या दिवसाच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी बटू गुहेतील कार्तिकेयाच्या मंदिरात येथील हिंदू ‘तायपूसम्’ उत्सव साजरा करतात.

 

६. बटू पर्वताच्या पायथ्याशी असलेली कार्तिकस्वामींची जगातील सर्वांत मोठी मूर्ती !

बटू पर्वताच्या पायथ्याशी गुहेला जाण्यासाठी पायर्‍या चालू होतात. या ठिकाणी वर्ष २००६ मध्ये मलेशियातील हिंदूंनी १४० फूट उंचीची सुवर्ण रंगाची कार्तिकस्वामींची सुंदर मूर्ती उभी केली. कार्तिकस्वामींची ही नयनमनोहर मूर्ती जगातील सर्वांत मोठी मूर्ती आहे. (छायाचित्र क्रमांक १ पहा.)

 

७. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात श्री
कार्तिकस्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर तेथील पुजार्‍याने
रामराज्याच्या स्थापनेसाठी विशेष पूजा करणे आणि त्या वेळी देवाला
नेसवलेल्या वस्त्राचा रंग सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्या साडीच्या रंगासारखाच असणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि ४ साधक-विद्यार्थी मलेशिया येथे अभ्यास दौर्‍यावर गेले होते. या कालावधीत १.४.२०१८ या दिवशी सकाळी ९ वाजता सर्व जण बटू गुहेत कार्तिकस्वामींच्या दर्शनाला गेले. या वेळी मलेशियातील साधक श्री. पुगळेंदी सेंथीयप्पन हेही उपस्थित होते. कार्तिकस्वामी मंदिराच्या पुजार्‍याला कळले, ‘रामराज्याचा संकल्प’ घेऊन दर्शनासाठी भारतातून कुणीतरी संत आले आहेत.’ तेव्हा त्यांनी स्वतः येऊन सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना रांगेतून बाहेर बोलावून देवाच्या समोर नेले आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्तिकेयाला दुधाचा अभिषेक करून विशेष पूजा केली. (छायाचित्र क्रमांक ३ पहा.) अभिषेकानंतर त्यांनी कार्तिकेयाला नवीन वस्त्र नेसवले. आश्‍चर्य म्हणजे देवाला नेसवलेले वस्त्र आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नेसलेली साडी या दोन्हींचा रंग सारखाच होता. दोन्ही वस्त्रांचे पदरही एकाच रंगाचे होते.

 

८. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सत्कार
होत असतांना प्रत्यक्ष कार्तिकस्वामींनी पुजार्‍यांच्या माध्यमातून
त्यांचा सत्कार केल्याचे अभ्यास दौर्‍यावरील साधक-विद्यार्थ्यांना जाणवणे

पूजेनंतर पुजार्‍याने दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका स्त्रीकरवी सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांचा शाल पांघरून सत्कार केला आणि स्वतः कार्तिकस्वामींच्या गळ्यातील फुलांचा हार आणि अभिषेकाचा प्रसाद त्यांना दिला. (छायाचित्र क्रमांक ४ पहा.) या वेळी अभ्यास दौर्‍यावर सद्गुरु काकूंसमवेत असलेल्या आम्हा साधक-विद्यार्थ्यांना ‘स्वयं कार्तिकस्वामीच तेथे आले आहेत आणि तेच पुजार्‍याच्या माध्यमातून सद्गुरु काकूंचा सत्कार करत आहेत’, असे जाणवले.’

– श्री. विनायक शानभाग, मलेशिया

Leave a Comment