कंबोडियातील महेंद्र पर्वतावर उगम पावणार्‍या कुलेन नदीला तत्कालीन हिंदु राजांनी पवित्र गंगानदीचा दर्जा देणे आणि प्रजेला गंगानदीप्रमाणे पवित्र पाणी मिळण्यासाठी अन् भूमी सुपीक होण्यासाठी पाण्यात १ सहस्र शिवलिंग कोरणे

कुलेन नदीचे पाणी अडवून तिच्या पात्रात असलेल्या दगडांवर कोरलेली शिवलिंग ! पहिल्या छायाचित्रात शाळुंकेसह असलेली शिवपिंडी, तर दुसर्‍या छायाचित्रात अनेक शिवलिंग दिसत आहेत ! या शिवलिंगांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

१. पूर्वी कंभोज देशाची राजधानी महेंद्र पर्वतावर
असणे, हिंदु राजांनी स्थापिलेल्या पर्वतावरील नगरीचे अवशेष
आता सापडणे आणि पर्वतावर उगम पावणार्‍या नदीला पवित्र गंगानदीचा दर्जा देणे

कंभोज देशाच्या उत्तरेला महेंद्र पर्वत आणि उत्तरेहून दक्षिणेकडे वहाणारी मेकांग नदी आहे, तसेच दक्षिणेला समुद्र आहे. विशाल कंभोज देशाची राजधानी महेंद्र पर्वतावर होती. या पर्वताला स्थानिक भाषेत आता कुलेन पर्वत, असे म्हणतात. हिंदु राजांनी त्या वेळी या पर्वतावर जी नगरी स्थापन केली होती, तिचे अवशेष आता सापडत आहेत. १० व्या शतकापर्यंत हिंदु राजे महेंद्र पर्वतावरून राज्यकारभार चालवत. त्या वेळी त्यांनी पर्वतावर उगम पावणार्‍या कुलेन नदीला पवित्र गंगानदीचा दर्जा दिला.

२. कुलेन नदी गंगानदीप्रमाणे पवित्र करण्यासाठी
राजा जयवर्मन (दुसरा) याने त्या नदीचे पाणी अडवणे,
काही मासांत (महिन्यांत) नदीत १ सहस्राहून अधिक शिवलिंगे,
तसेच शेषशायी श्रीविष्णु अन् श्री महालक्ष्मी यांची शिल्पे कोरून नंतर नदीचे पाणी
पुनर्प्रवाहित करणे, ८ व्या शतकात कोरलेली ही शिवलिंगे आणि शिल्पे यांचे दर्शन आजही घेता येणे

८ व्या शतकात राजा जयवर्मन (दुसरा) याने कुलेन नदी गंगानदीप्रमाणे पवित्र बनवण्यासाठी काय करू शकतो ?, असा विचार करून एक योजना आखली. त्या वेळी त्याच्या मनात एक विचार आला की, गंगानदी ही भगवान शिवाच्या जटेतूून येत असल्यामुळे ती पवित्र आहे. त्याप्रमाणे कुलेन नदी जर भगवान शिवाच्या मस्तकावरून वाहिली, म्हणजेच भगवान शिवाचा जर या नदीच्या पाण्याला स्पर्श झाला, तर तीही पवित्र होईल. एवढेच नव्हे, तर ही नदी जेथे वहात जाईल, तेथील भूमीही सुपीक होईल. राजाचा असा भाव होता की, प्रजेला शिवलिंगाचा स्पर्श झालेल्या नदीचे पवित्र पाणी मिळावे. त्यासाठी राजाने कुलेन नदीचे पाणी पात्रात अडवले. त्यानंतर त्याने काही मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत कुलेन नदीत १ सहस्राहून अधिक शिवलिंगे कोरली, तसेच शेषनागावर पहुडलेले श्रीविष्णु आणि त्यांच्या चरणांजवळ बसलेली श्री महालक्ष्मीदेवी यांची अनेक छोटी शिल्पे अन् एक मोठे शिल्प कोरले. हे काम पूर्ण झाल्यावर राजाने नदीचे पाणी पुनर्प्रवाहित केले. ८ व्या शतकात कोरलेली ही शिवलिंगे अद्यापही अस्तित्वात असून कुणालाही त्यांचे दर्शन घेता येते. नदीमध्ये, तसेच नदीच्या कडेने उत्तरेकडे २०० मीटर चालत गेल्यावर ही शिल्पे दिसतात. नदीचे पाणी जेव्हा संथ गतीने वहाते, तेव्हा हेे दृश्य अतिशय सुंदर दिसते.

३. खमेर साम्राज्यातील बहुतेक मंदिरे आणि वास्तू
यांच्या बांधकामासाठी महेंद्र पर्वतावरील खडक वापरलेले असणे

महेंद्र पर्वत हा वाळूच्या खडकांनी बनलेला पर्वत आहे. त्यामुळे खमेर साम्राज्यातील बहुतेक मंदिरे आणि वास्तू यांच्या बांधकामासाठी वापरलेले वाळूचे खडक महेंद्र पर्वतावरून आणले असावेत, असे इतिहासतज्ञांचे मत आहे. महेंद्र पर्वतावर १ छोटा आणि १ मोठा, असे २ धबधबे असून  पर्वतावर येणारे बहुतेक पर्यटक अन् भाविक हे धबधबेही आवर्जून पहातात.

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

Leave a Comment