मंदिराजवळील श्रीविष्णूच्या विशाल मूर्तीचे लुटारूंनी तोडलेले शीर दैवी संचार होणार्‍या व्यक्तीच्या सांगण्यावरून पूर्ववत बसवणारे कंबोडिया सरकार !

अंकोर वाट मंदिरातील अष्टभुजा श्रीविष्णूचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

वर्ष २००४ पर्यंत संग्रहालयात ठेवलेले वर्ष १९८४ मध्ये
लुटारूंनी तोडलेले श्रीविष्णूच्या मूर्तीचे शीर पूर्ववत बसवल्यावर पर्यटकांची संख्या वाढणे

आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीने सांगितलेली उपाययोजना कंबोडिया सरकार तात्काळ अमलात आणते; मात्र भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली संत-महंतांनी सांगितलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जाते, हे भारत सरकारसाठी लज्जास्पद !

भारतात असे काही केले, तर अंनिसवाले लगेच त्या व्यक्तीला कारागृहात टाकण्याची मागणी केल्याविना रहाणार नाहीत. प्रत्येक गोष्टीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेतले पाहिजे, तसेच ‘राष्ट्रहितासाठी काय आवश्यक आहे ?’, याचा विचार केवळ सरकारनेच नव्हे, तर सर्वांनीच करायला हवा. तेव्हाच खर्‍या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.’

‘अंकोर वाट’ मंदिराच्या पश्‍चिम द्वाराकडील मुख्य प्रवेशद्वाराला असलेल्या ३ गोपुरांपैकी उजव्या बाजूच्या गोपुरामध्ये आजही श्रीविष्णूची विशाल अष्टभुजा मूर्ती आहे. (छायाचित्र पहा) या मूर्तीविषयी येथील स्थानिक माहितीगाराने दिलेल्या माहितीनुसार, ही मूर्ती वर्ष १८८० मध्ये तेथे उत्खनन करणार्‍या फ्रान्सच्या पुरातत्व विभागाला सापडली. वर्ष १९८४ मध्ये कंबोडियामध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या (‘सिव्हील वॉर’च्या) वेळी काही लुटारूंनी या मूर्तीचे शीर तोडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणात हे शीर भूमीवर पडले; पण आश्‍चर्य म्हणजे लुटारूंना मूर्तीचे पडलेले शीर भूमीवरून उचलताच येत नव्हते. त्यामुळे त्यांना शीर तेथेच सोडून जावे लागले. पुढे हे शीर वर्ष २००४ पर्यंत येथील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले होते.

‘अंकोर वाट’ मंदिरात वार्षिक धार्मिक उत्सव होतो. त्या वेळी येथील दैवी संचार होणार्‍या एका व्यक्तीने सांगितले, ‘‘येथील श्रीविष्णूच्या मूर्तीचे शीर पूर्ववत बसवून घ्यायला हवे. शीर नसलेली मूर्ती अशीच उभी केल्यामुळे राष्ट्रावर देवाची अवकृपा झाली आहे.’’ त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार कंबोडिया सरकारने श्रीविष्णूचे शीर पुन्हा त्या मूर्तीवर बसवले आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे वर्ष २००५ मध्ये कंबोडियात २० लाख पर्यटक फिरण्यासाठी आले. पूर्वी पर्यटकांची संख्या बरीच अल्प होती. मूर्तीचे शीर पुन्हा बसवल्यामुळे कंबोडियाला फार लाभ झाला. ‘श्रीविष्णूच्या मूर्तीवर पुन्हा शीर बसवल्याने सर्व चांगले होण्यास प्रारंभ झाला’, अशी स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे.

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया.

Leave a Comment