सांप्रत बौद्ध राष्ट्र असूनही भगवान श्रीविष्णूवरील श्रद्धा दर्शवणार्‍या महाभारत आणि रामायण यांतील प्रसंगांवर आधारलेले कंबोडियाचे पारंपरिक ‘अप्सरा नृत्य’ !

Article also available in :

कौंडिण्य ऋषींचे क्षेत्र असलेल्या कंबोडियाच्या अभ्यासदौर्‍याला आरंभ !

‘महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहायचे. ‘खमेर नावाचे हिंदु साम्राज्य येथे वर्ष ८०२ ते १४२१ पर्यंत होते’, असे म्हटले जाते. खरेतर कंभोज प्रदेश हा कौंडिण्य ॠषींचे क्षेत्र होते, तसेच कंभोज देश हा नागलोकही होता. ‘कंभोज देशाच्या राजाने महाभारत युद्धात भाग घेतला होता’, असाही उल्लेख आढळतो. नागलोक असल्यामुळे ते शिवक्षेत्रही आहे आणि येथील महेंद्र पर्वतावर श्रीविष्णूचे वाहन गरुड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे विष्णुक्षेत्रही आहे. अशा तर्‍हेने हरिहर क्षेत्र असलेल्या या कंभोज देशात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत असलेले ४ विद्यार्थी साधक यांच्या झालेल्या आध्यात्मिक दौर्‍यातील काही क्षणचित्रे येथे देत आहोत. 

१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत असलेले विद्यार्थी साधक
इंडोनेशिया येथून विमान प्रवास करून कंबोडियाची राजधानी ‘नोम फेन’ येथे पोहोचणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत असलेले ४ विद्यार्थी साधक यांनी २२ मार्चला इंडोनेशियातील बाली बेटावरून कंबोडियाचा विमान प्रवास चालू केला. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पुढील विमानाची वेळ होईपर्यंत ७ घंटे थांबल्यानंतर पुढचा विमान प्रवास चालू केला. २३ मार्चला सकाळी २ घंटे प्रवास केल्यानंतर सकाळी १०.४० वाजता आम्ही कंबोडियाची राजधानी ‘नोम फेन’ येथे पोहोचलो. आमच्याकडे २३ मार्चचा अर्धा दिवस आणि २४ मार्चचा पूर्ण दिवस एवढाच वेळ होता. त्यातच आम्हाला कंबोडियाचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, कंबोडियाच्या राजाचा राजवाडा, कंबोडियाचे पारंपरिक ‘अप्सरा’ नृत्य आणि राष्ट्रीय स्मारक एवढी ठिकाणे बघायची होती. नोम फेनला २३ मार्चला पोहोचल्यावर समजले की, त्या दिवशी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या परिसरामध्ये समुद्रमंथनाचा देखावा असलेले ‘अप्सरा’ नृत्य दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही त्या दिवशी ते नृत्य पहायचे ठरवले.

२. ‘बौद्ध’ राष्ट्र असूनही तेथील लोकांची भगवान श्रीविष्णु आणि
भगवान शिव यांच्यावर श्रद्धा असणे, तसेच त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात असणे

कंबोडिया जरी ‘बौद्ध’ राष्ट्र असले, तरी तेथील लोकांची भगवान श्रीविष्णु आणि भगवान शिव यांच्यावर श्रद्धा आहे. कंबोडियाच्या लोकांचे मानणे आहे की, भगवान श्रीविष्णु त्यांचा रक्षक आहे. यावरून गरुड, वासुकी, समुद्रमंथन, सुमेरू पर्वत, रामायण, महाभारत, अशी हिंदु धर्माशी संबंधित नावे आणि त्याचे महत्त्व त्यांना ज्ञात असल्याचे लक्षात आले. याचाच एक पुरावा, म्हणजे प्रत्येक दिवशी कंबोडियाच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या परिसरामध्ये होणारे ‘अप्सरा’ नृत्य ! कंबोडियाच्या नृत्य शैलीला ‘अप्सरा नृत्य’ असे म्हटले जाते. ‘येथील हिंदु मंदिरांच्या भिंतींवर वेगवेगळ्या मुद्रेमध्ये असलेल्या अप्सरा आणि त्यांची नृत्यशैली बघायला मिळते. कदाचित् या मूर्तींवरून ही नृत्यकला आली असेल’, असे वाटते.

३. ‘अप्सरा’ नृत्यामध्ये प्रतिदिन वेगवेगळा देखावा असणे, त्या नृत्यामध्ये
सहभागी कलाकारांनी भारताच्या पारंपरिक वेशभूषेशी जुळणारी वेशभूषा करणे !

१. अप्सरा नृत्यातील समुद्रमंथनाचा प्रसंग सादर करतांना कलाकार. यामध्ये एका बाजूला देव आणि दुसर्‍या बाजूला दानव दिसत आहेत. दानवांच्या हाती नागाचे मुख दाखवण्यात आले आहे, तर देवांच्या हाती नागाची शेपूट दिसत आहे. मध्यभागी कूर्मावतार धारण केलेले श्रीविष्णु दिसत आहेत.

‘अप्सरा’ नृत्यामध्ये प्रतिदिन वेगवेगळा देखावा असतो. कधी रामायणातील सीता अपहरण आणि वानर-असुर युद्ध, कधी महाभारतातील निवडक प्रसंग, तर कधी समुद्रमंथनाचा देखावा असतो. ज्या दिवशी आम्ही ‘नोम फेन’ला पोहोचलो, त्या दिवशी आम्हाला गुरुकृपेने समुद्रमंथनाचा देखावा असलेले ‘अप्सरा’ नृत्य बघायला मिळाले. (छायाचित्रे क्रमांक १ आणि २ पाहा) त्यात गाणारे, वाद्य वाजवणारे आणि नृत्य करणारे, असे अनेक वेगवेगळे कलाकार पारंपरिक वेशभूषेत असतात. ही वेशभूषा भारताच्या पारंपरिक वेशभूषेशी जुळणारी आणि अतिशय सुंदर आहे. ‘भारतापासून ३ सहस्र कि.मी. दूर असलेल्या कंबोडियासारख्या बौद्ध राष्ट्रात सनातन हिंदु धर्माची परंपरा नृत्य रूपाने जिवंत आहे आणि ती त्यांची जीवनशैली आहे’, हे बघून आमची ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

४. कंबोडियामध्ये समुद्रमंथनाचा देखावा दाखवण्याचे कारण स्पष्ट करतांना पूर्वज हिंदू
असल्याचे सांगणारे आणि ‘भगवान श्रीविष्णु देशाचे रक्षण करतो’, अशी श्रद्धा असणारे कंबोडियाचे नागरिक !

२. दुसर्‍या प्रसंगात समुद्रमंथन झाल्यानंतर मिळालेले अमृत, तसचे इतर वस्तू घेऊन बसलेल्या देवता दाखवण्यात आल्या आहेत.

‘अप्सरा’ नृत्य चालू होण्यापूर्वी आमची त्या नृत्यकलेचे विशारद आणि शिक्षक यांची भेट झाली. त्यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे बघून ‘तुम्ही भारतातून आलेला दिसता. तुमच्या साडीवरून मी ओळखले. आमच्याकडे आज ‘अप्सरा’ नृत्यामध्ये समुद्रमंथनाचा देखावा आहे’, असे सांगितले. त्यावर सद्गुरु काकूंनी त्यांना विचारले, ‘‘कंबोडियामध्ये समुद्रमंथनाचा देखावा दाखवण्याचे कारण काय ?’’ तेव्हा ते नृत्यविशारद म्हणाले, ‘‘जरी मी बौद्ध असलो, तरी आमचे पूर्वज हिंदूच होते. येथे सर्वजण जेवढे बुद्धाला मानतात, तेवढेच भगवान श्रीविष्णुलाही मानतात. भगवान श्रीविष्णु आमच्या देशाचे रक्षण करतो, अशी आमची श्रद्धा आहे.’’ त्यानंतर आम्ही समुद्रमंथनाचा देखावा आणि अन्य पारंपरिक देखावे असलेले ते नृत्य पाहिले.’

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया

समुद्रमंथनाच्या वेळी कूर्मावतार धारण केलेल्या आणि मोहिनी अवतारात असुरांना मोहित करणार्‍या श्रीमन्नारायणाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

Leave a Comment