कंबोडिया येथे कुणीही ओळखीचे नसतांना ईश्‍वराच्या कृपेने प्रवासातच एका व्यक्तीने साहाय्यासाठी येणे, ही भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि अध्यात्म
विश्‍वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’

इंडोनेशियातील अभ्यासदौरा संपवून कंबोडिया देशाकडे प्रयाण करतांनाचा वृत्तांत !

१५ व्या शतकापर्यंत दक्षिण-पूर्व आशियात हिंदु राजांचे राज्य होते. एकेकाळी जगभर पसरलेल्या हिंदु संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी साधक सध्या दक्षिण-पूर्व आशियायी देशांच्या दौर्‍यावर आहेत. आजपासून कंबोडिया येथील मान्यवरांच्या घेतलेल्या भेटीगाठी, प्राचीन स्थळांची वैशिष्ट्ये आणि तेथील हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे लेख प्रसिद्ध करत आहोत !

१. क्वालालंपूर विमानतळावर श्री. दामोदर नावाच्या
व्यक्तीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना वाकून नमस्कार करणे

‘बाली (इंडोनेशिया) येथून आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह कंबोडियाला जात होतो. त्या वेळी प्रवासात क्वालालंपूर येथे काही घंटे थांबावे लागले. तेथून कंबोडियाची राजधानी नोम फेन येथे जायचे होते. आम्ही विमानतळावर असतांना आमच्या बाजूला एक भारतीय व्यक्ती आली. सहज त्या व्यक्तीची ओळख झाली आणि त्याने आम्हाला सांगितले की, तेही कंबोडियाला चालले आहेत. त्यांचे नाव आहे श्री. दामोदर ! ते मूळचे भारतातील तेलंगण राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील आहेत. श्री. दामोदर यांची जर्मनी, मलेशिया आणि कंबोडिया अशा तीन देशांत उपाहारगृहे आहेत. जेव्हा त्यांना कळले की, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या अध्यात्मातील अधिकारी आहेत आणि त्या प्रथमच कंबोडियाला जाणार आहेत, तेव्हा त्यांनी स्वतःहून आम्हाला साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली. त्यांनी सद्गुरु काकूंना वाकून नमस्कार केला.

डावीकडून श्री. सत्यकाम कणगलेकर, श्री. विनायक शानभाग, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, कु. अक्षरा, श्री. आनंद, श्री. दामोदर आणि श्री. दिवाकर आगावणे

२. श्री. दामोदर यांनी कंबोडियातील नोम फेन
विमानतळावर साहाय्य करण्यासह शाकाहारी भोजनाचीही सोय करणे

श्री. दामोदर यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले, ‘‘कंबोडियातील विमानतळावर उतरल्यावर माझा भाऊ आणि कामगार येतील, त्यांची तुमच्याशी ओळख करून देतो.’’ कंबोडियाची राजधानी नोम फेन येथील विमानतळावर उतरल्यावर त्यांनी आम्हाला व्हिसा घेण्यासाठी साहाय्य केले. विमानतळावरून बाहेर पडल्यावर स्थानिक भ्रमणभाषचे ‘सिम कार्ड’ घेण्यासाठीही त्यांनी आम्हाला साहाय्य केले.

सद्गुरु (सौ.) काकूंनी त्यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेल्या कार्याविषयी सांगितले. जेव्हा श्री. दामोदर यांना कळले की, साधक सेवा म्हणून हा अभ्यासदौरा करत आहेत, तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘माझ्याकडून एक सेवा होऊ द्या. पुढील २ दिवस तुमच्या जेवणाची सोय माझ्या उपाहारगृहात करतो. भारतीय शाकाहारी जेवण तुमच्या निवासस्थानी माझा भाऊ प्रतिदिन पोहोचवेल.’’

३. श्री. दामोदर यांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्याकडून साधनेविषयी
मार्गदर्शन घेऊन स्वतः नामजप करण्यासह उपाहारगृहातही दत्ताचा नामजप लावणे

दामोदर यांनी आम्हा ५ जणांसाठी २ दिवस दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले. शेवटच्या दिवशी त्यांनी सद्गुरु काकूंना विनंती केली की, त्यांनी उपाहारगृहात यावे. आम्ही सद्गुरु काकूंसह श्री. दामोदर यांच्या ‘रूची भारतीय रेस्टॉरंट’मध्ये गेलो. त्या वेळी दामोदर यांनी त्यांच्यासह काम करणार्‍यांची ओळख करून दिली. या वेळी त्यांची ९ वर्षांची मुलगी अक्षराही होती. नंतर त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या कठीण प्रसंगांविषयी सांगून सद्गुरु काकूंचे साधनेविषयी मार्गदर्शन घेतले. तेथे उपस्थित असलेले श्री. दामोदर यांचे मित्र श्री. आनंद यांनीही सद्गुरु काकूंना सांगितले की, व्हिएतनाम या देशात माझ्या ओळखी आहेत. तुमचे जेव्हा व्हिएतनामला जाण्याचे नियोजन असेल, तेव्हा मी तुम्हाला त्यांची माहिती देईन. मी भारतात आल्यावर भाग्यनगर येथील तुमच्या साधकांना भेटीन.’’

सद्गुरु काकूंनी सांगितल्याप्रमाणे श्री. दामोदर यांनी लगेच दत्तगुरूंचा नामजप करणे प्रारंभ केले. त्यांनी त्यांच्या उपाहारगृहात दत्ताचा नामजप लावण्यास प्रारंभ केला. पत्नीलाही नामजपाविषयी सांगितले.

४. भगवंतच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती विदेशात पोहोचवत आहे !

कंबोडिया येथे आमची कुणाशी ओळख नव्हती. ‘देवानेच आमच्यासाठी श्री. दामोदर यांना पाठवले’, अशी आम्हाला अनुभूती आली. ‘सद्गुरु काकू यांच्यासमवेत प्रत्येक देशात जातांना देव कोणालातरी साहाय्याला पाठवतोच’, याची आम्हाला पदोपदी प्रचीती येते. भगवंत अशा तर्‍हेने प्रत्येक देश सनातनच्या रामनाथी आश्रमाशी जोडत आहे. यावरून हेही शिकायला मिळाले की, परात्पर गुरु डॉक्टरांची महती देव कशा तर्‍हेने प्रत्येक देशात पोहोचवत आहे. रामनाथी आश्रमातील एका खोलीत राहून आपल्या जगभरातील साधकांसाठी काय पाहिजे आणि काय नको, याची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. विनायक शानभाग, नोम फेन, कंबोडिया.

Leave a Comment