विदेशी व्यक्तींचा स्पर्श झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवलेला सात्त्विक स्पर्श अन् असात्त्विक स्पर्श यांतील भेद !

१. सात्त्विकतेचा अथवा चैतन्याचा अंश नसलेला देह निष्प्राण कलेवरासमान !

श्री. सत्यकाम कणगलेकर

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ सध्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा आध्यात्मिक अभ्यासदौरा’ करत आहेत. त्याअंतर्गत विविध देशांतील अनेक स्थळांना भेटी देऊन तेथील प्रथा-परंपरा, संस्कृती इत्यादींविषयी माहिती घेण्याची सेवा चालू आहे. या वेळी तेथे विविध देशांतून अनेक पर्यटकही आलेले असतात. भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या आणि स्वतः दैवी आकर्षणाने ओतप्रोत असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ यांना पाहून अनेक विदेशी पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांच्यासह छायाचित्र काढून घेण्याची विनंती करतात. छायाचित्र काढतांना काही वेळा पर्यटकांचा त्यांना स्पर्शही होतो. ‘अशा वेळी विदेशी लोकांच्या स्पर्शामध्ये जिवंतपणा वाटत नाही’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणतात. इंडोनेशियामध्ये असतांना अशाच एका प्रसंगाचे विवरण करतांना सद्गुरु काकूंनी सांगितले, ‘‘मनुष्याच्या देहावर आध्यात्मिक साधनेतून निर्माण झालेल्या सात्त्विकतेचा किंवा चैतन्याचा संस्कार हवा. नाहीतर तोच देह एखाद्या कलेवरासारखा निष्प्राण भासतो. साधनेतून ईश्‍वरी चैतन्य जागृत होते. त्यामुळे देहाला जिवंतपणा येतो.’’ यातून साधनेचे महत्त्व लक्षात येते.

२. विदेशात राहूनही योग्य साधना केल्यास विदेशी साधक आणि
एस.एस.आर.एफ.चे संत पू. रेन्डी इकारान्तियो यांच्याप्रमाणे देहावर चैतन्याचा संस्कार करणे शक्य !

विदेशात मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. योग्य आचरण होत नाही. स्त्री-पुरुष यांच्या कपाळांवर कुंकू किंवा तिलक नसतो. वासनांधतासुद्धा येथे मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे साधना किंवा धर्माचरण यांचा संस्कार त्यांच्या देहावर झालेला नसतो. असे असले, तरी विदेशात राहून योग्य आध्यात्मिक साधना करणार्‍या ख्रिस्ती साधकांच्या स्पर्शातही जिवंतपणा जाणवतो. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारान्तियो यांच्यासमवेत छायाचित्रे काढण्याचे प्रसंग आले, तेव्हा त्यांच्यातील चैतन्यच जाणवले. यातून ‘केवळ भोगवादी आचरण नाही, तर साधना करून मोक्षप्राप्ती करणे, हाच मानवी जीवनाचा उद्देश आहे’, हे लक्षात येते. गुरुकृपेने सनातनच्या सर्व साधकांना योग्य साधना समजली आहे. ती कृतीत आणण्यासाठी मार्गदर्शनही मिळत आहे. त्यासाठी आपण सर्वजण परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी शरण जाऊन कृतज्ञता व्यक्त करूया !’

– श्री. सत्यकाम कणगलेकर, बाली, इंडोनेशिया. 

 

इंडोनेशियातील अभ्यासदौर्‍यातील अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !

१. इंडोनेशियात असलेला मांसाहाराचा अतिरेक

श्री. दिवाकर आगावणे

‘येथे जवळजवळ सर्वच लोक नियमित मांसाहार करतात. फार शोधून कुठेतरी एखादे शाकाहारी जेवणाचे उपाहारगृह मिळते. आपण शाकाहारी जेवण मागितले, तरी ‘ते पूर्ण शाकाहारी असेल’, असे नाही. बर्‍याच वेळा येथे काही शाकाहारी पदार्थांमधे अंड्यांचा वापर केला जातो. येथे सर्वत्र माशांपासून बनवलेल्या तेलाचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो. अशा असात्त्विक अन्नामुळे सर्वत्र रज-तमाचे वातावरण वाढत आहे. त्यामुळे येथील जेवणालाही विशिष्ट वास असतो. या देशाला भेट देणार्‍या भारतियांचीही दयनीय अवस्था दिसून आली. सहलीसाठी येथे येणारे भारतीय मांसाहार आणि मद्यपान सर्रास करतांना दिसतात. येथील स्थानिकांनी आधीच दिलेल्या माहितीमुळे आम्ही येथे येण्यापूर्वीच जेवणाचे नियोजन करून ठेवले आहे. सध्या अन्नाची तयार पाकिटे (Ready to Eat) मिळतात. पोहे, उपमा अशा पदार्थांची पाकिटे आम्ही भारतातूनच आणली आहेत. त्यात केवळ गरम पाणी घातले की, ३-४ मिनिटांतच पदार्थ तयार होतो.

२. मजापाहित राज्याच्या पताकेवर आधारित असलेला इंडोनेशियाचा राष्ट्रध्वज !

इंडोनेशियाचा राष्ट्रध्वज १३ व्या शतकात तेथे असलेल्या मजापाहित या हिंदु साम्राज्याच्या पताकेवर आधारित आहे. त्यामध्ये वर लाल आणि खाली पांढरा अशा दोन समान रंगांच्या पट्ट्यांचा समावेश आहे. यामध्ये लाल रंग धैर्याचा आणि पांढरा रंग पवित्रतेचा दर्शक आहे. लाल म्हणजे मानवी शक्ती आणि पांढरा म्हणजे मनुष्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्वाला नेणारी आध्यात्मिक शक्ती ! असे दोन्ही मिळून संपूर्ण मनुष्य होतो. काही जण सांगतात की, लाल रंग हा गुळाचा आणि पांढरा हा नारळापासून बनवलेल्या साखरेचा अन् तांदुळाचा आहे. येथील लोकांच्या दैनंदिन खाण्यामध्ये गूळ आणि तांदूळ हे पदार्थ प्राधान्याने आढळतात. त्यामुळेही येथील लोकांच्या नित्य राहणीमानाच्या अगदी जवळचा असा हा राष्ट्रध्वज आहे.’

– श्री. दिवाकर आगावणे, इंडोनेशिया.

Leave a Comment