बाली येथील जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत आणि समुद्रमंथनात दोरीचे कार्य केलेल्या वासुकी नागाचे बेसाखी मंदिर यांची वैशिष्ट्ये !

‘दक्षिण पूर्व आशियातील १७ सहस्र द्वीपांचा देश म्हणजे इंडोनेशिया. या देशात हिंदूंची संख्या १.७ टक्के एवढीच आहे. त्यातील सर्वाधिक हिंदू बाली द्वीपावर रहातात. ज्याला पुराणांमध्ये ‘वाली’ द्वीप म्हटले आहे, तेच आताचे बाली द्वीप आहे. बाली येथील ८३.५ टक्के लोक हिंदू आहेत. वाल्मीकि रामायणात सीतामातेच्या शोधात सुग्रीवाने वानरसेनेला ‘यावाद्वीप’ (आताचे इंडोनेशियातील ‘जावा’ द्वीप) आणि ‘वालीद्वीप’ येथे पाठवल्याचे उल्लेख आहेत. बाली येथील हिंदूंसाठी पवित्र स्थान म्हणजे ‘अगुंग पर्वत’ आणि पवित्र मंदिर म्हणजे पर्वताच्या पायथ्याशी असलेले ‘बेसाखी मंदिर’ ! महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत विद्यार्थी-साधक २१.३.२०१८ या दिवशी बाली द्वीपावरील बेसाखी मंदिरात दर्शनाला गेले होते. तेथे बालीनीस् पद्धतीप्रमाणे पूजाही केली.

श्री. विनायक शानभाग

१. समुद्रमंथनात दोर बनलेल्या वासुकी नागाचे प्रतीक आणि अखंड जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत !

वासुकी नागाचे प्रतीक आणि अखंड जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत

‘अगुंग पर्वत’ म्हणजे धगधगता आणि अखंड जागृत ज्वालामुखी आहे. येथे प्रत्येक ५-१० मिनिटांनी राखेचा विस्फोट होत असतो. (छायाचित्र क्रमांक – १) ३ सहस्र १०५ मीटर उंच पर्वत असलेला हा ज्वालामुखी गेले वर्षभर जागृत आहे. त्यामुळे अनेक वेळा बाली द्वीपावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. बाली येथील हिंदू या पर्वताला पवित्र मानतात. सत्ययुगात समुद्रमंथनाच्या वेळी रवीचे कार्य केलेला सुमेरू पर्वत जावा द्वीपावर आहे. अगुंग पर्वताकडे पाहिल्यावर असे वाटते की, जणू काही तो समुद्रमंथनात दोर बनलेल्या वासुकी नागाचे तोंडच आहे. या पर्वताची रचना नागाचे तोंड उघडल्यासारखी आहे. बाली येथील लोकांचे म्हणणे आहे की, बाली द्वीप म्हणजे मार्कंडेय महर्षींचे स्थान आहे आणि बाली येथील हिंदू म्हणजे भारतातील कलिंग राज्यातून (आताचे ओडिशा) आलेले मार्कंडेय महर्षींचे वंशजच आहेत. येथे असेही म्हटले जाते की, ‘अगुंग पर्वत’ हे मार्कंडेय महर्षींचे तपःस्थळ आहे.

२. अगुंग पर्वतावर २३ मंदिरांचा समूह असलेल्या बेसाखी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना !

बेसाखी मंदिरात पूजा करतांना १. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि इतर

अगुंग पर्वतावर १ सहस्र मीटर वर चढल्यावर मंदिरांचा एक मोठा समूह आहे. यालाच ‘पुरा बेसाखी’ असे म्हणतात. ‘पुरा’ म्हणजे मंदिर आणि ‘बेसाखी’ म्हणजे वासुकी. अगुंग पर्वत हे वासुकीचे स्थान असल्यामुळे या मंदिराला वासुकीचे नाव दिले असावे. बेसाखी मंदिर हे एकूण २३ मंदिरांचा समूह आहे.

एका मंदिरात द्वारपाल असलेल्या वासुकी आणि तक्षक नाग यांच्यासारख्या नागप्रतिमा
‘पद्मासन’ म्हणून ओळखले जाणारे आणि ब्रह्मा, विष्णु अन् महेश यांची स्थाने असलेली ३ खांबांवरील ३ पीठे

२ अ. हे मंदिर खालून वर असे वेगवेगळ्या ६ टप्प्यांमध्ये बांधलेले आहे.

२ आ. मंदिरात मधल्या ठिकाणी असलेल्या एका मंदिरात दोन्ही बाजूंनी वासुकी आणि तक्षक नाग यांच्यासारख्या नागप्रतिमा आहेत. (छायाचित्र क्रमांक – २)

२ इ. नागप्रतिमांच्या वर ३ खांबांवर ३ पीठे आहेत. ही ३ पीठे म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची स्थाने आहेत. (छायाचित्र क्रमांक – ३) या पिठांना ‘पद्मासन’ असे म्हटले जाते. या पिठांवर देवतेची प्रतिमा नसते.

२ ई. बाली येथील हिंदू देवतेच्या प्रतिमेच्या पूजेऐवजी त्यांची अस्त्रे अथवा वाहन यांची पूजा करतात.

२ उ. या मंदिरात उजवीकडे वार्षिक उत्सवात वापरल्या जाणार्‍या देवतांच्या वाहनांचे स्थान आहे. या ठिकाणी देवतांच्या वाहनांची लाकडी प्रतिमा ठेवली जाते.

२ ऊ. मंदिराच्या समोर एक छोटे पीठ आहे. तेथे मुख्य उत्सवांच्या वेळी आणि प्रतिदिनही नैवेद्य ठेवला जातो.

२ ए. मंदिराच्या डावीकडे वाद्यशाला आहे. तेथे उत्सवाच्या वेळी वाजवली जाणारी वाद्ये आहेत. त्या वाद्यशालेला लागून असलेल्या मंडपात पुजार्‍यांचे साहित्य ठेवण्यासाठीची जागा आहे. ‘मंदिरांच्या कळसांची रचना सुमेरू पर्वतासारखी आहे. त्यात सप्तलोक आणि सप्तपाताळ आहेत’, असे मानले जाते.

३. अद्वैत सिद्धांत आणि आगम पद्धत यांनुसार पूजा

पूजा करण्यासाठी ‘सारोंग’ नावाचे विशेष कपडे परिधान केलेली बालीनीस हिंदु महिला

बेसाखी मंदिरात अद्वैत सिद्धांत आणि बाली येथील प्राचीन आगम पद्धत यांनुसार पूजा केली जाते. मंदिरात पूजा करायला येणार्‍यांनी ‘सारोंग’ नावाचे विशेष कपडे परिधान करणे आवश्यक असते. मंदिरात पादत्राणे घातली, तरी चालतात. मंदिरात एक मुख्य पुजारी असतात आणि इतर अनेक पुजारी असतात. मुख्य मंदिराच्या समोर एक रिकामे पीठ असते. त्या पिठासमोर बसून उदबत्ती लावणे, फुले वाहणे, नमस्कार करणे अशा कृती पुजार्‍यांनी सांगितल्यानंतर करायच्या असतात. त्या वेळी पुजारी बालीनीस भाषेत मंत्र आणि प्रार्थना म्हणतात. बर्‍याच वेळा पुजारी गायत्री मंत्रही म्हणतात. पूजेच्या या पद्धतीला येथील हिंदु अभ्यासक ‘बालीनीस आगम’ असे म्हणतात.

४. मंत्रोच्चार आणि पूजाविधी यांवर तिबेटीयन बौद्धांचा प्रभाव

पुजार्‍यांनी म्हटलेल्या गायत्री मंत्रातील उच्चार वेगवेगळे असतात. ते ऐकायलाही संस्कृत वाटत नाहीत. येथील हिंदू करत असलेले पूजाविधी, मंत्र, फुले वाहण्याची पद्धत, घंटी वाजवण्याची पद्धत हे सर्व तिबेटियन बौद्धांच्या पद्धतीसारखे आहे. मंदिरात कोणतीही मूर्ती नाही. याविषयी येथील हिंदु अभ्यासकांचे मत आहे की, बाली येथील हिंदू निर्गुण उपासना करतात. ‘सगुणातील प्रतिमा पूजा आणि निर्गुणातील ईश्‍वरोपासना याच्यामध्ये असलेली ‘अचिंत्य उपासना’ असे येथे प्रचलित झाले असावे’, असे येथील हिंदु अभ्यासक डॉ. जॉनी अर्था यांनी सांगितले. मंदिराच्या उत्सवाच्या वेळी मंदिरात बळी देणे, मांसाचा नैवेद्य देणे आणि मांसाहार करणे, हे येथे मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.

५.  बेसाखी मंदिराला भेट देण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

बेसाखी मंदिरातील कळसाची असलेली ही विशेष रचना म्हणजे ‘सप्तलोक आणि सप्तपाताळ’ असल्याची हिंदूंची मान्यता आहे.

५ अ. अगुंग पर्वतावरील ज्वालामुखी जागृत झाल्याने वर्षभर बंद असलेले बेसाखी मंदिर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट देण्यापूर्वी केवळ २ आठवडे आधीपासून उघडले असणे

बेसाखी मंदिरात गेल्यावर कळले की, गेल्या एक वर्षापासून तेथील अगुंग पर्वतावरील ज्वालामुखी जागृत होता आणि केवळ २ आठवाड्यांपासून तो शांत झाला आहे. तेथील मंदिरातील मुख्य पुजार्‍याने सद्गुरु काकूंना सांगितले, ‘‘माताजी, तुम्ही खूप भाग्यवान आहात. हे मंदिर गेले अनेक महिने बंद होते. २ आठवाड्यांपूर्वीच उघडले आहे आणि आज तुम्ही मंदिराच्या पवित्र उत्सवाच्या दिवशी आला आहात.’’ हे ऐकून सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘हा दैवी दौरा कधी करावा आणि कुठे करावा, हे ईश्‍वरच ठरवतो.’’

५ आ. जागतिक हिंदु परिषदेचे डॉ. जॉनी अर्था यांच्या साहाय्यामुळे मंदिरात जाता येऊन तेथील विशेष पूजाही करता येणे

आम्ही बेसाखी मंदिराला भेट देण्याचे ठरवले, तेव्हा आम्हाला बाली येथील जागतिक हिंदु परिषदेचे डॉ. जॉनी अर्था साहाय्याला आले. ते आमच्यासह मंदिरात येण्यास सिद्ध झाले. त्यांनी मंदिरात जाण्यासाठी आम्हाला साहाय्य केले. एरव्ही मंदिरात जायचे असेल, तर बालीनीस् लोकांचा पारंपरिक पोषाख परिधान करावा लागतो. त्या दिवशी डॉ. जानी अर्था यांच्या सांगण्यावरून आम्हाला अगदी मंदिराच्या आतपर्यंत जायला मिळाले आणि सद्गुरु काकूंकडून त्यांनी विशेष पूजाही करवून घेतली.’

– श्री. विनायक शानभाग, इंडोनेशिया

Leave a Comment