भारतियांचे अत्यंत प्रगत प्राचीन जलव्यवस्थापन आणि पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य !

पाण्याचे महत्त्व, त्याचा शोध अन् त्याचे नियोजन, यांचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्या देशात होते. काही सहस्र वर्षांपूर्वी आपण ते प्रभावी पद्धतीने वापरत होतो आणि त्यामुळे आपला देश खर्‍या अर्थाने ‘सुजलाम्, सुफलाम्’ होता; मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की, आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनीच, असे वाटते. आपल्याला धरणे बांधायला शिकवली, ती इंग्रजांनी इत्यादी. दुर्दैवाने आपण आपले प्राचीन जलव्यवस्थापन विसरलो आणि आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतो आहोत. वेळप्रसंगी कलम १४४ लावून युद्ध करत आहोत. आपल्याला आपले समृद्ध ज्ञान, वारसा आणि तंत्रज्ञान यांचा विसर पडला, तर असे होणे अटळ आहे.  

लेखक – प्रशांत पोळ

१८०० वर्षे प्राचीन असलेला आणि आजही वापरात असलेला तमिळनाडू येथील कल्लानाई बांध

१. प्राचीन भारतातील पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ढिसाळ नियोजन

मध्यंतरी दुष्काळाने देशभरात विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातले होते. पाण्यासाठी माणूस सर्वदूर वणवण भटकत आहे. या बिकट परिस्थितीवरून लक्षात येते की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात पाण्याचे नियोजन नीट झालेच नाही. ना नीट धरणे बांधली गेली, ना कालवे खोदले गेले आणि जमिनीत पाणी जिरवण्याचे उपायही फारसे झालेच नाहीत; म्हणूनच देशाच्या फार मोठ्या भागात पाण्याची पातळी जमिनीपासून खूप खाली गेली आहे. अशा या दुष्काळाच्या छायेत वावरणार्‍या देशात अशी जीवघेणी परिस्थिती पूर्वी नव्हती. दुष्काळ पूर्वीही पडायचे; पण त्या काळात पाण्याचे नियोजन व्यवस्थित होते. किंबहुना प्राचीन काळी आपल्या देशात पाण्याचे व्यवस्थापन उत्कृष्ट होते आणि म्हणूनच आपला देश ‘सुजलाम्, सुफलाम्’ होता !

२. भारतात चोल राजा करिकलन यांनी इसवी सन दुसर्‍या शतकात
कावेरी नदीच्या मुख्य पात्रात बांधलेले ‘कल्लानाई बांध’ हे सर्वांत प्राचीन धरण

जगातील पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण भारतात आहे, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल ? इसवी सन दुसर्‍या शतकात चोल राजा करिकलन यांनी बांधलेला ‘अनईकट्टू’ अथवा इंग्रजी भाषेत ‘ग्रँड अनिकट’ (Grand Anicut) किंवा आजच्या बोली भाषेत ‘कल्लानाई बांध’ हा असून तो गेली १८०० वर्षे वापरात आहे. सध्याच्या काळात जिथे धरणांना ३०-३५ वर्षांत भेगा पडतात, तिथे १८०० वर्षे एखादे धरण सतत वापरात असणे, हे एक आश्‍चर्य आहे. कावेरी नदीच्या मुख्य पात्रात बांधलेला हा बांध ३२९ मीटर लांब आणि २० मीटर रुंद आहे. तमिळनाडूमधील तिरुचिरापल्लीपासून केवळ १५ किलोमीटर दूर असलेला हा बांध कावेरी नदीच्या ‘डेल्टा’ प्रदेशात उभारलेला आहे. अत्यंत ओबडधोबड खडकांनी बांधलेले हे धरण बघून असे निश्‍चित वाटते की, त्या काळात धरणे बांधण्याचे शास्त्र चांगले विकसित झाले असावे. ते धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधलेले वाटत नाही, तर कुशल आणि अनुभवी व्यक्तींनी नदीच्या मुख्य प्रवाहात बांधलेले अनुभवसिद्ध धरण वाटते. इंग्रजांनी त्या धरणावर इंग्रजी संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता.

याचाच अर्थ आपल्या देशात धरणे बांधण्याचे, म्हणजेच ‘जल व्यवस्थापनाचे शास्त्र’ फार जुने असावे. नंतर झालेल्या विदेशी आक्रमणांमुळे या प्राचीन शास्त्राचे पुरावे नष्ट झाले आणि इतिहासात डोकावणारे कल्लानाई धरणांसारखे साक्षीदार उरले.

३. जगभरात बांधलेली प्राचीन धरणे

अ. इजिप्तच्या नाईल नदीवर बांधलेली प्राचीन धरणे 

जगाच्या इतिहासात बघितले, तर अत्यंत प्राचीन धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. इजिप्तमधील नाईल नदीवर ‘कोशेश’ येथे इसवी सनपूर्वी २९०० वर्षे आधी बांधलेले १५ मीटर उंचीचे धरण जगातील सर्वांत जुने धरण मानण्यात येते; पण आज ते अस्तित्वात नाही. किंबहुना अर्वाचिन इतिहासकारांनी ते धरण पाहिलेलेच नाही. त्याचा केवळ उल्लेख आढळतो.

इजिप्तमध्येच इसवी सनपूर्वी २७०० वर्षे आधी नाईल नदीवर बांधलेल्या धरणाचे काही अवशेष आजही पहायला मिळतात. ‘साद-अल्-कफारा’ असे त्याचे नंतर नामकरण करण्यात आले. कैरोपासून ३० किलोमीटर अंतरावरील हे धरण बांधल्यानंतर काही दिवसांतच कोसळले. त्यामुळे पुढे अनेक शतके इजिप्तच्या लोकांनी धरणे बांधण्याचे धाडसच केले नाही.

आ. चीन – चीनमध्येही इसवी सनपूर्वी २२८० वर्षांपूर्वीच्या धरणांचे उल्लेख आढळतात; मात्र प्रत्यक्षात वापरात असलेले इतके जुने एकही धरण जगभरात आढळत नाही.

इ. भारत – भारतात कल्लानाई धरणानंतर बांधलेली आणि वापरात असलेली धरणे आढळतात. इसवी सन ५०० ते १३०० मध्ये दक्षिणेतील पल्लव राजांनी बांधलेल्या अनेक मातीच्या धरणांपैकी काही धरणे आजही वापरात आहेत. सन १०११ ते १०३७ या काळात तमिळनाडूमध्ये बांधलेले ‘वीरनाम’ धरण हे त्याचेच उदाहरण आहे.

४. जल व्यवस्थापनासंबंधी बांधलेल्या रचनेत गुजरातमधील
‘रानी का वाव’ ही ७ मजली विहीर ‘युनेस्को’च्या संरक्षित स्मारकांच्या सूचीत समाविष्ट

जल व्यवस्थापनासंबंधी बांधलेल्या अनेक रचना आजही अस्तित्वात आहेत. पूर्वी गुजरातची राजधानी असलेल्या ‘पाटण’ येथे बांधलेली ‘रानी का वाव’ ही विहीर (राजेशाही बारव) आता ‘युनेस्को’च्या संरक्षित स्मारकांच्या सूचीत गेली आहे. भूगर्भातील पाण्याला नीट खेळवणे आणि साठवणे, याचे ते एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन १०२२ ते १०६३ या काळात बांधण्यात आलेली ही ७ मजली विहीर आज ही सुस्थितीत आहे. सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी पती राजा भीमदेव यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती. म्हणूनच विहिरीचे नाव ‘रानी का वाव’ अर्थात् ‘राणीची विहीर’ असे झाले. याच काळात सोरटी सोमनाथ मंदिरावर महंमद गझनी याने आक्रमण केले होते. विहीर बांधल्यानंतर काही वर्षांनी गुजरात हे पूर्णपणे मुसलमान शासकांच्या अधीन गेले. त्यामुळे पुढे जवळपास ७०० वर्षे ती राजेशाही विहीर चिखलाच्या गाळात दुर्लक्षित होती. यातून भूगर्भातील पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती आपल्याला फार पूर्वीपासून होती, हेच निश्‍चित होते.

५. ऋग्वेद आणि यजुर्वेद यांमध्ये पाण्याच्या नियोजनाचे सूक्त आढळणे,
‘स्थापत्यवेद’ हा अथर्ववेदाचा उपवेद असणे आणि त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नसणे

ऋग्वेद आणि यजुर्वेद यांमध्ये पाण्याच्या नियोजनासंबंधी अनेक सूक्त आढळतात. धुळे येथील श्री. मुकुंद धाराशिवकर यांनी त्यावर विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखन केलेे आहे. श्री. धाराशिवकर यांनी केलेल्या लिखाणात एका ग्रंथाचा उल्लेख केला असून दुर्दैवाने त्याचे नाव उपलब्ध नाही. ‘अथ जलाशयो प्रारम्यते’ या ओळीने चालू होणार्‍या ग्रंथात ‘भिंत बांधून जलाशय कसे निर्माण  करावे ?’, याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ २८०० वर्षांपूर्वीचा आहे.

‘स्थापत्यवेद’ हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो. दुर्दैवाने त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नाही. युरोपातील ग्रंथालयात त्याच्या काही प्रती आढळतात. यातील परिशिष्टांमध्ये ‘तडाग विधी’ची (जलाशय निर्मितीची) संपूर्ण माहिती दिलेली आहे.

६. अनेक प्राचीन ग्रंथांत पाण्याची साठवण, त्याचे वाटप,
पावसाचे अनुमान आणि जलाशय निर्मिती यांवर सविस्तर माहिती आढळणे

‘कृषि पराशर’,  ‘कश्यपीयकृषिसूक्ति’ आणि ६ व्या शतकात लिहिलेल्या ‘सहदेव भाळकी’ इत्यादी ग्रंथांत पाण्याची साठवण, त्याचे वाटप, पावसाचे अनुमान आणि जलाशय निर्मिती यांवर सविस्तर माहिती आढळते. ‘नारद शिल्पशास्त्र’ आणि ‘भृगु शिल्पशास्त्र’ यांमध्ये समुद्र अन् नदी येथील किल्ले यांसारख्या विषयांपासून ते पाण्याची साठवण, त्याचे वाटप आणि पाण्याचा निचरा यांवर सखोल विवेचन आढळते. ‘भृगु शिल्पशास्त्र’ ग्रंथात पाण्याचे १० गुणधर्म, तर पराशर मुनींनी पाण्याला १९ गुणधर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे. पाण्यासंदर्भात वेद आणि विविध पुराणे यांमध्ये अनेक उल्लेख येतात. विशिष्ट परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे, याविषयी सविस्तर माहिती मिळते.

७. योजना आयोगाच्या ‘ग्राऊंड वॉटर मॅनेजमेंट अ‍ॅन्ड ओनरशिप’
या अहवालात जल व्यवस्थापन शास्त्रशुद्ध आणि प्राचीन असल्याचे विवेचन असणे

वर्ष २००७ मध्ये योजना आयोगाने ‘ग्राऊंड वॉटर मॅनेजमेंट अ‍ॅन्ड ओनरशिप’ हा अहवाल तज्ञांद्वारे लिहून प्रकाशित केला. संकेतस्थळावरही हा अहवाल उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रारंभीच ऋग्वेदातील पाण्यासंबंधीच्या एका ऋचेचा उल्लेख केला आहे. त्यानंतर भारतीय शास्त्रानुसार जलव्यवस्थापन किती शास्त्रशुद्ध आणि प्राचीन होते, याचे विवेचन केले आहे.

८. दुसरे वराहमिहीर यांनी लिहिलेल्या ग्रंथात भूगर्भामध्ये पाण्याच्या
शोधाविषयीचे श्‍लोक आणि निरीक्षणे यांविषयी वैज्ञानिकांसारख्या नोंदी आढळणे

जलव्यवस्थापनासंबंधी अत्यंत विस्तृत विवेचन दुसरे वराहमिहीर यांनी केले आहे. पहिले वराहमिहीर हे त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानामुळे ओळखले जातात. दुसरे वराहमिहीर हे अनेक कलांत पारंगत होते. त्यांचे वास्तव्य उज्जैनला होते आणि त्या वेळी उज्जैनचे महाराजा सम्राट विक्रमादित्य होते. वराहमिहीर यांनी ख्रिस्ताब्द ५०५ च्या सुमारास विविध विषयांवरील अभ्यासाला प्रारंभ केला. त्यांनी जवळपास ८२ वर्षे ज्ञानसाधना केली आणि त्यांचे देहावसान ख्रिस्ताब्द ५८७ मध्ये झाले.

या वराहमिहिरांचे प्रमुख कार्य म्हणजे त्यांनी लिहिलेला ‘बृहत्संहिता’ नावाचा ज्ञानकोश असून त्यात ‘उद्कार्गल’ (पाण्याची साठवण) नावाचा ५४ वा अध्याय आहे. त्या अध्यायात भूगर्भामध्ये पाण्याचा शोध कसा घेता येऊ शकतो, यासंबंधीचे १२५ श्‍लोक असून त्यात दिलेली माहिती ही अद्भूत आणि चकित करणारी आहे.

वराहमिहीर यांनी भूगर्भातील पाणी शोधतांना मुख्यतः ३ गोष्टींच्या निरीक्षणांवर भर दिला आहे. ‘त्या परिसरात उपलब्ध असलेली झाडे, झाडांजवळ असलेली वारुळे, त्या वारुळांची दिशा, त्यात रहाणारा प्राणी, तेथील जमिनीचा रंग, तिचा पोत आणि तिची चव’ यांचा त्यात समावेश आहे. ‘या निरीक्षणांच्या आधारे भूगर्भातील पाणी नक्की शोधता येईल’, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड सहस्र वर्षांच्याही आधी कोणतीही आधुनिक संसाधने ज्ञात नसतांना वराहमिहीर यांनी पाण्याविषयी ठाम प्रतिपादन केले आहे.

हे सर्व करतांना वराहमिहीर यांनी त्या वेळी आजच्या वैज्ञानिकांसारख्या महत्त्वपूर्ण नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यांनी ५५ वृक्ष, वनस्पती यांचा अभ्यास, मातीचे वर्गीकरण आणि सर्व निरीक्षणे यांचे निकष यांची मांडणी विस्ताराने केली आहे. त्यातील काही निकष पुढीलप्रमाणे –

अ. भरपूर फांद्या आणि तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल, तर पाणी आढळते.

आ. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येतांना दिसल्या, तर पृष्ठभागाजवळ पाणी असते.

इ. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल, तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.

ई. जेव्हा जमीन गरम झालेली असते, तेथील एखाद्याच ठिकाणी जमीन थंड लागली, तर तिथे पाणी असते.

उ. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील, तर हमखास पाणी मिळते.

अशी अनेक निरीक्षणे वराहमिहीर यांनी नोंदवली आहेत.

९. वराहमिहीर यांच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्याच्या जागा
निवडल्यावर प्रत्यक्षात ९५ टक्के पाणी सापडणे आणि दुर्दैवाने पुढे तो प्रकल्प लालफितीत अडकणे

वराहमिहीर यांचे वरील प्रतिपादन खरे कि खोटे, हे पहाण्यासाठी आंध्रप्रदेश येथील तिरुपतीमधील श्री वेंकटेश्‍वर (एस्.व्ही.) विद्यापिठाने अनुमाने १५-१६ वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदून पहायचे ठरवले. वराहमिहीर यांच्या निरीक्षणांनुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील, अशा जागा त्यांनी निवडल्या आणि अनुमाने ३०० बोअरवेल खणल्या. आश्‍चर्य म्हणजे ९५ टक्के ठिकाणी पाणी सापडले. अर्थातच वराहमिहीर यांचे निरीक्षण योग्य होते, हे सिद्ध झाले; मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफितीत अडकला आणि तो नागरिकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

१०. भारतात इंग्रज येण्याआधी पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणे

भारतात इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणे ठिकठिकाणी दिसतात.

राजा भोजने १ सहस्त्र वर्षांपूर्वी बांधलेला भोपाळचा हाच तो मोठा तलाव ! तलावात राजा भोजचा पुतळा उभारण्यात आला आहे.

अ. उत्तर पेशवाईत संभाजीनगर जिल्ह्यातील गोगानाथनगरमध्ये बांधलेले ‘थत्ते नहर’, पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना, बुर्‍हाणपूरला (मध्यप्रदेश) आजही अस्तित्वात असलेली ५०० वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना, पंढरपूर-अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहनकालीन बांधलेली बारव, ‘समरांगण सूत्रधार’ या ग्रंथाच्या आधाराने राजा भोज यांनी बांधलेला भोपाळचा मोठा तलाव, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

आ. गोंडकालीन जल व्यवस्थापन – गढा-मंडला (जबलपूर) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचे राज्य होते. मोगल, आदिलशाही किंवा कुतुबशाही यांना गोंडांना जिंकता आले नाही, तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला. अर्थात खरे चित्र तसे नव्हते. ‘गोंडकालीन जल व्यवस्थापन’, या हिंदी पुस्तकात अनुमाने ५०० ते ८०० वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात पाण्याचे नियोजन किती उत्कृष्टपणे केले होते, याचे वर्णन आहे. त्या नियोजनाचा लाभ म्हणून कुठलाही दुष्काळ किंवा अवर्षण यांची झळ ‘गोंड प्रदेशा’ला कधीही लागली नाही.

जबलपूर शहरात गोंड राणी दुर्गावती यांच्या काळात (अर्थात ५०० वर्षांपूर्वी) ‘बावन ताल’ आणि ‘बहात्तर तलैय्या’ (तलैय्या म्हणजे लहान तलाव) बांधले गेले. हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते, तर जमिनीच्या ‘कंटुर’प्रमाणे त्यांची रचना आहे. काही तलाव आतून एक-दुसर्‍यांशी जोडलेेले आहेत. आज त्यातील अनेक तलाव बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपूरमध्ये पाण्याची पातळी बर्‍यापैकी चांगली आहे आणि त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. त्या काळात पाणी, शेती आणि निसर्ग यांची समृद्धी किती असेल, हेच दिसून येते. याचाच अर्थ पाण्याचे महत्त्व, त्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याकडे होते.’

  

Leave a Comment