सनबर्न फेस्टिव्हलच्या याआधीच्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा मुक्त व्यापार चालू होता – श्री. शंभू गवारे, सनातन संस्था

‘सनबर्न फेस्टिव्हल’ कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार

चांदणी चौक (जिल्हा पुणे) येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या
विरोधात बावधन ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे निषेध आंदोलन

संस्कृतीरक्षणासाठी हिंदूंना असे आंदोलन करावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! सरकार अशा कार्यक्रमांवर स्वतःहून बंदी का आणत नाही ?

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात आंदोलन करतांना ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ

पुणे  – पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात चांदणी चौकात बावधन, लवळे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. ‘बावधन-लवळे येथे कोणत्याही परिस्थितीत ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ दिला जाणार नाही’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि विद्येचे माहेरघर समजले जाणार्‍या पुण्यामध्ये मद्यपान अन् व्यसनाधीनतेला चालना देणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ देऊ नये. आतापर्यंत या कार्यक्रमाच्या आयोजकांनी गोवा सरकारचा, तसेच मागील वर्षी महाराष्ट्र सरकारचा कर बुडवला आहे. सरकारी नियम धाब्यावर बसवले आहेत. असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. या आंदोलनात ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मिळून ४०० हून अधिक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. (संस्कृतीरक्षणासाठी संघटित होणारे ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवल्यास संस्कृतीहीन कार्यक्रम करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ! – संपादक)

‘रस्ता बंद’ आंदोलन करतांना ग्रामस्थ

उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना

१. श्री. समीर तांगडे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – सरकार एकीकडे गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव साजरे करण्यासाठी जाचक अटी घालते आणि सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होऊनही तो कार्यक्रम होऊ देते. सरकारने जनभावना लक्षात घेऊन सनबर्न फेस्टिव्हलला पुण्यात थारा देऊ नये अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल.

२. श्री. किरण दगडे-पाटील, नगरसेवक – हिंदूंच्या सणांना एक न्याय आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’साठी दुसरा न्याय असे का ? या कार्यक्रमाला आम्ही शेवटपर्यंत विरोध करत राहू. त्यासाठी आम्हाला अटक झाली, तरी चालेल.

३. श्री. चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समिती – सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी सर्व नियम, अटी धाब्यावर बसवूनही आणि कर चुकवूनही असा कार्यक्रम होऊ दिला जातो. यावरून आयोजकांनी सर्व यंत्रणाच विकत घेतल्याचा संशय येतो.

४. सौ. पियुषा दगडे-पाटील, सरपंच, बावधन – मी बावधनची प्रथम नागरिक (सरपंच) म्हणून या कार्यक्रमाला विरोध करून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीन.

५. श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती – भ्रष्टाचाराची आणि करचुकवेगिरीची पार्श्‍वभूमी असलेला सनबर्न फेस्टिव्हल भारतातून हद्दपार होईपर्यंत समितीचा विरोध चालूच राहील.

६. श्री. शंभू गवारे, सनातन संस्था – सनबर्न फेस्टिव्हलच्या याआधीच्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा मुक्त व्यापार चालू होता. सरकारनेच अशा कार्यक्रमांवर बंदी घालायला हवी.

उपस्थित मान्यवर

कोथरूडचे नगरसेवक श्री. किरण दगडे-पाटील, बावधनच्या सरपंच सौ. पियुषा दगडे-पाटील, माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, बावधनचे माजी सरपंच श्री. राहुल दुधाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन दगडे, श्री. आझाद दगडे, सौ. वैशाली दगडे, सर्वश्री वैभव मुरकुटे, सचिन धनदुडे, सुनील दगडे, धनंजय दगडे, गणेश कोकाटे, उमेश कांबळे, सौ. वैशाली कांबळे, सर्वश्री निळकंठ बजाज, दीपक दुधाणे, नितीन दगडे, लवळे येथील श्री. विजय शितोळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे

क्षणचित्रे

१. या वेळी वाहतुकीला अडथळा न होता प्रातिनिधिक स्वरूपात २ मिनिटे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

२. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते.

३. प्रसिद्धीमाध्यमांच्या ११ प्रतिनिधींनी या आंदोलनाचे वार्तांकन केले.

पुणेकरांनो, तुम्हाला येणारी पिढी नेभळट, व्यसनाधीन आणि देशाचे अधःपतन करणारी हवी कि सुसंस्कृत, राष्ट्र-धर्मप्रेमी आणि देशाला प्रगतीपथावर नेणारी हवी ?, असे प्रश्‍न उपस्थित करणारे फलक अन् फलकाला अनुसरून पाश्‍चात्त्य कुप्रथा मद्यपान यांच्या आहारी गेलेला एक युवक आणि संस्कृतीचे पालन, तसेच धर्माचरण करणारा दुसरा युवक, असा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकात्मक देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment