सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या गणेशोत्सव मोहिमेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचा प्रसार

गणेशोत्सव मंडपातील धर्मशिक्षण फलक – धर्मशिक्षणाचे बीज रोवणारा उपक्रम ! भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे : गणेशोत्सवकाळात येथील अनेक मंडळांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मशिक्षण फलक मंडप परिसरात लावले. ‘श्री गणपतीला दुर्वा आणि लाल फूल कसे वहावे ?’, ‘शुभकार्यात श्रीगणेशाचे प्रथम पूजन का करतात ?’ अशी अध्यात्मशास्त्रीय माहिती देण्याच्या जोडीला ‘सार्वजनिक गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ?’, ‘मिरवणूक आणि विसर्जन कसे असावे ?’ आदींविषयी माहिती देणारे प्रबोधनात्मक फलक लावले होते.

‘मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण हा अपप्रचार’ या मथळ्याखालील फलकही मूर्तीविसर्जनामुळे होणार्‍या कथित प्रदूषणाविषयीचा भ्रम दूर करणारा ठरला. या फलकांमुळे भाविकांमध्ये एकप्रकारे धर्मशिक्षणाचे बीज रोवले गेले. अनेक नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडे ‘‘या फलकांमुळे आम्हाला शास्त्र काय आहे ते कळले !’’, असे अभिप्राय व्यक्त केले. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही ‘‘या फलकांमुळे समाजाला आताच्या काळात न मिळणारे धर्मशिक्षण देण्याचा एक चांगला उपक्रम करण्याची संधी मिळाली’’, असे सांगितले.

काही ठिकाणी क्रांतीकारकांची सचित्र माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले आहे.

मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केलेले अभिप्राय समाजाला कोठेही न
मिळणारे धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न ! – महेश खोपकर, अध्यक्ष, ॐ साई मित्र मंडळ, कोथरूड

धर्मशिक्षण फलकांच्या मिळणारे धर्मशिक्षण अन्यत्र कुठेही न मिळणारे आहे. हे फलक पाहून मंडळाच्या परिसरातील अनेक नागरिकांनी कौतुक करत उत्स्फूर्तपणे सांगितले की, मंडळाने लावलेले धर्मशिक्षणाचे फ्लेक्स हे मंडळाचे खरे कार्य आहे. मंडळ या माध्यमातून खरे प्रबोधन करत आहे आणि असे प्रबोधन करायला हवे.

सनातन संस्थेचे कार्य सर्वत्र पोहोचायला हवे !
– श्री शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पुणे शहर

सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ चांगले आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचायला हवे. पुढच्या वर्षी आम्ही गणेशोत्सवात संस्थेचे सर्व उपक्रम राबवू. तसेच सनातनच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनात्मक उपक्रम राबवू. श्री सोमेश्‍वर देवस्थान मंदिरामध्ये धर्मशिक्षणाचे फलकही स्वखर्चातून लावू. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मंदिरातील पुजार्‍यांशी बोलून घेऊन फलक लावण्याचीही अनुमती घेतली आणि समितीच्या कार्यकर्त्यांची पुजार्‍यांची भेट करवून दिली.

एक कार्यकर्ता, जयहिंद मित्र मंडळ

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी जीवनाचा त्याग केला. शालेय विद्यार्थ्यांना मात्र शाळेमध्ये ठराविकच क्रांतिकारकांचा परिचय करून दिला जातो. क्रांतीवीरांची माहिती सर्वांना मिळावी, तसेच धर्मशिक्षण मिळून समाजप्रबोधन व्हावे, या उद्देशाने मंडपामध्ये फलक लावले.

गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण विकास मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विलास काळे हे मंडळाच्या वतीने स्थानिक श्री महादेवाच्या मंदिरात धर्मशिक्षणाचे फ्लेक्स लावणार आहेत.

शिरवळ येथील सत्यज्योत गणेश मंडळाचे सर्वश्री अजय चौगुले आणि विशाल राऊत यांनी त्यांच्या मंडळामध्ये फलक लावले आहेत. धर्मशिक्षणविषयक पुष्कळ उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि नागरिक यांनी व्यक्त केली.

Leave a Comment