मुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न !

Article also available in :

मनुष्य हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. पहिल्या ५ महिन्यांत आईचे दूध हे मुलाचे मुख्य अन्न असते, तेव्हा मेंदूची वाढ सर्वांत जास्त होते; म्हणून आईच्या दुधातील घटक असे असतात की, त्यामुळे ते दूध मेंदूची वाढ करण्यासाठी उत्कृष्ट अन्न ठरते. दुधातील प्रोटीन्स, लॅक्टोज (दुधातील साखर) आणि चरबी यांचे शारीरिक पोषण अन् वाढ याविषयी कोणते कार्य आहे, तसेच आईचे दूध हे मुलाच्या विकासासाठी उत्तम कसे आहे, याची माहिती सध्या चालू असलेल्या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने करुन घेऊया.

१. लॅक्टोज (दुधातील साखर)

इतर प्राण्यांच्या दुधाची आईच्या दुधाशी तुलना करतांना असे दिसून येते की, आईच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण सर्वांत जास्त असते. लॅक्टोजमध्ये ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे दोन साखरेचे घटक असतात. गॅलॅक्टोजपासून मेंदूचा घटक असलेले गॅलॅक्टोलायपिड्स आणि सेरेब्रोसाइड्स नावाचे पदार्थ सिद्ध होतात आणि त्यामुळे मेंदूची वाढ होण्यास साहाय्य होते.

२. प्रोटीन्स

आईच्या दुधात प्रोटीन्स सर्वांत कमी, म्हणजेच ०.९ ग्रॅम असतात, म्हणून बालकाचे जन्माच्या वेळेचे वजन दुप्पट होण्यास ५ मास लागतात. उंदराच्या दुधात १२ ग्रॅम प्रोटीन्स असतात, म्हणून उंदराच्या पिलाचे जन्माच्या वेळेचे वजन ६ दिवसांत दुप्पट होते.

३. स्निग्ध पदार्थ

मेंदूच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थ आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थांमुळे प्रथिने आणि साखरेच्या तुलनेत अधिक प्रमाणात ऊर्जा मिळते. प्रयोगाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, गायीच्या आणि आईच्या दुधात चरबीचे प्रमाण ३.८ टक्के असते. गायीच्या दुधातील चरबी वासराला मुख्यतः शारीरिक शक्ति देते; परंतु आईच्या दुधातील चरबी प्रामुख्याने मेंदूच्या पेशींचे रचनात्मक घटक बनविण्यास उपयोगी पडते. आईच्या दुधात इसेंशियल फॅटी अ‍ॅसिड्स असतात. या अ‍ॅसिड्समुळे मज्जापेशींचे आणि मज्जातंतूंचे आवरण उत्तम दर्जाचे होते. बालपणी आईच्या दुधावर वाढ झालेल्या व्यक्तींना स्क्लेरोसिंग एन्सेफॅलाइटिस आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारखे मेंदूचे आजार क्वचित्च होतात.

४. आईचे दूध मुलाच्या सर्वांगीण विकासास उत्तम !

अ. आईच्या दुधात जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे योग्य प्रमाणात असतात. आईचे दूध उष्ण, पातळ, हलके, गोड आणि निर्जंतुक असून त्याला विशिष्ट प्रकारचा वास येतो. प्रत्येक वेळी मूल दूध चोखतांना दुधाचा पहिला भाग गोड, पातळ आणि निळसर रंगाचा असतो, तर शेवटचा भाग साधारणपणे पांढरा अन् तुलनात्मकदृष्ट्या दाट असतो.

आ. दुधात ८८ टक्के पाणी असते आणि तेवढे पाणी बालकाला अगदी पुरेसे असते, म्हणून स्तनपान करणार्‍या निरोगी मुलाला पाणी देण्याची आवश्यकता नसते.

इ. बाटलीने दूध पिणारी मुले जितकी सहज आजारी पडतात, तशी स्तनपान करणारी मुले सहजासहजी आजारी पडत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने असे सिद्ध केले आहे की, विकसनशील देशांमध्ये बाटलीने दूध पिणार्‍या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण स्तनपान करणार्‍या मुलांपेक्षा दहा पटींनी अधिक आहे.

ई. योग्य उष्णतामान असलेले हे दूध बालकाला केव्हाही मिळू शकते, त्यासाठी कसलीही सिद्धता करावी लागत नाही आणि ते सहज पचते. स्तनपान करणार्‍या मुलांमध्ये एक्झिमा आणि दमा यांसारखे अ‍ॅलर्जीमुळे होणारे रोग फारच कमी प्रमाणात आढळतात.

उ. आईच्या दुधात पोलिओ, एन्फलुएन्झा, विषमज्वर, अतिसार, न्युमोनिया, खोकला यांसारख्या रोगांच्या जंतूंचा नाश करणारे घटक असतात. यामुळे स्तनपान करणार्‍या मुलांना अशा प्रकारचे रोग होण्याचा संभव कमी असतो. बाटलीने दूध पिणार्‍या मुलांना स्तनपान करणार्‍या मुलांपेक्षा अतिसार होण्याचा संभव सहापटींनी अधिक असतो, असे आढळून आले आहे. शिवाय आईच्या एका घनमिलिमीटर दुधात २००० ते ४००० जिवंत पांढर्‍या पेशी असतात. पांढर्‍या पेशी म्हणजे जंतू मारणारे सैनिक होत.

ऊ. स्तनपान करणारी मुले अधिक दक्ष, उद्योगी, आत्मविश्‍वास असणारी आणि भावनांवर ताबा ठेवू शकणारी असतात. ती बसायला, चालायला, बोलायला लवकर शिकतात आणि लिहिण्या-वाचण्याच्या समस्या अशा मुलांमध्ये कमी प्रमाणात आढळतात. यावरून असे सिद्ध होते की, आईचे दूध मुलाच्या शरीराच्या आणि मेंदूच्या वाढीसाठी एक आदर्श अन्न आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘ आईचे दूध : भूलोकातील अमृत ‘

Leave a Comment