डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) आणि आयुर्वेदीय उपचार

वैद्य मेघराज पराडकर

 

१. डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) म्हणजे काय ?

‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. ‘हा विकार ‘स्वाईन A (H1N1)’ या विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होतो. हे विषाणू डुकरांमध्ये सहज आढळतात; म्हणून या रोगाला ‘डुक्करज्वर’ म्हणतात. डुकराचे मांस खाणे आणि डुक्करज्वर यांचा मात्र काहीच संबंध नाही. हा विषाणू हवेत ८ घंटे जिवंत राहू शकतो. या रोगाने बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणार्‍या तुषारांमध्ये हे विषाणू असतात. यांचा रोगप्रतिकारक शक्ती अल्प असलेल्या व्यक्तीचे नाक, डोळे, तोंड इत्यादी भागांशी संपर्क आल्यास विषाणूंचे संक्रमण होते,’ असे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते.

 

२. डुक्करज्वराची (स्वाइन फ्ल्यू) लक्षणे

डुक्करज्वराची लक्षणे ही सर्वसाधारण तापासारखीच असतात. यात थंडी वाजणे, १०० अंश फॅ. पेक्षा जास्त ताप येणे, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी ही लक्षणे आढळतात. क्वचित् पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब इत्यादी लक्षणांचाही समावेश असतो.

 

३. डुक्करज्वराचे (स्वाइन फ्ल्यू) निदान कसे करतात ?

स्वाइन फ्ल्यूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या मानाने काही काळ अगोदर दिसतात. सर्दीच्या लक्षणांपेक्षा स्वाईन फ्ल्यूची लक्षणे अधिक तीव्र स्वरूपाची असतात. स्वाईन फ्ल्यू झालेल्या व्यक्तीला २ ते ३ आठवडे सतत अशक्तपणा जाणवत रहातो, नाक सतत बंद असते किंवा वहात रहाते. नंतर डोकेदुखी आणि घसादुखी यांचा त्रास होतो. त्यानंतर ताप येऊन अंग दुखते.

आधुनिक वैद्य आरंभी ‘रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट’ करण्याचा समादेश देऊ शकतात; पण याचे निदान सकारात्मक झाले, तरी आपणाला ‘डुक्करज्वर नाही’, असे सिद्ध होत नाही. केवळ प्रयोगशाळेत केलेल्या निरीक्षणावरूनच डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) आहे किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकते. स्थानिक आरोग्यकेंद्रात या निदानपद्धती उपलब्ध असतात.

 

४. डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) – आयुर्वेदीय विचार

‘रोगाः सर्वेऽपि मन्देऽग्नौ ।’ म्हणजे ‘पचनशक्ती मंद झाल्याने सर्व रोग होतात’, असे आयुर्वेद सांगतो; कारण शरिराची रोगप्रतिकारक शक्ती पचनशक्तीवरच अवलंबून असते. डुक्करज्वरही याला अपवाद नाही.

 

५. डुक्करज्वरावर (स्वाइन फ्ल्यू) आयुर्वेदीय उपचार

आयुर्वेदामध्ये तापाचे असंख्य प्रकार सांगून त्यांची चिकित्साही सांगितली आहे. डुक्करज्वरही एकप्रकारचा तापच आहे. कोणताही ताप किंवा सर्दी झाल्यास घाबरून न जाता पुढील उपचार करावेत, तसेच पथ्येही पाळावीत. या उपचारांनी दुष्परिणाम होण्याची भीती बाळगू नये.

५ अ. लंघन (उपवास)

अंगात ताप असतांना पचनशक्ती मंद असते. या वेळी पचण्यास जड असे अन्नपदार्थ टाळावेत. या वेळी कडक उपवास केल्यास उत्तम; पण तो शक्य नसल्यास ताप उतरेपर्यंत भाजलेल्या लाह्या किंवा चुरमुरे यांचा चिवडा, राजगिर्‍याचे लाडू, मुगाचे कढण किंवा वरण यांसारखा हलका आहार घ्यावा.

५ आ. सुंठमिश्रित पाणी पिणे

पिण्याच्या पाण्यामध्ये एका लिटरमागे पाव चमचा सुंठ चूर्ण (वाळवलेल्या आल्याची पूड) घालून ते उकळून थंड करून प्यावे.

५ इ. वाफारा घेणे

सर्दी झाल्यास कापराची वडी पाण्यात घालून वाफ घ्यावी.

५ ई. औषधी काढे

१. मूठभर तुळशीची पाने, १ सें.मी. जाडीचा आल्याचा किंवा सुंठीचा तुकडा, ५ ते ६ काळी मिरी, चमचाभर धने ही औषधे घेऊन ठेचून ४ पेले पाण्यामध्ये उकळून त्यांचा १ पेला काढा करावा. हा काढा सकाळ – सायंकाळ अर्धा पेला प्रमाणात गरम करून घ्यावा.

२. चमचाभर लवंगांचा वरीलप्रमाणे काढा करून घेणेही लाभदायक ठरते.

५ उ. काय करावे आणि काय करू नये ?

१. शिंकतांना, खोकतांना, जांभई देतांना, हसतांना तोंडापुढे रुमाल धरावा.

२. आपल्या परिसरात डुक्करज्वराचा रुग्ण आढळल्याचे लक्षात आल्यास काही दिवस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घराबाहेर पडतांना नाकावर स्वच्छ रुमाल बांधावा किंवा ‘मास्क’ वापरावा.

३. प्रतिदिन सकाळी खोबरेल तेल किंवा साजूक तूप यांचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांत घालावेत. घरातून बाहेर जातांना हाताची करंगळी तेल किंवा तूप यांमध्ये बुडवून तिला लागलेले तेल नाकाला आतून लावावे.

४. अंगात ताप असतांना अंघोळ करणे टाळून ओल्या कपड्याने अंग पुसून लगेच कोरडे करावे.

५. खाण्या-पिण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा शिकेकाई, रिठे अथवा उष्ण पाणी यांनी धुवावेत. (ही सवय कुठल्याही संसर्गजन्य आजारासाठी प्रतिबंधात्मक म्हणून उपयोगी ठरते.)

६. नियमित व्यायाम करावा. अंगात ताप असतांना मात्र व्यायाम करू नये.

७. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.

८. ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या रुग्णांपासून लांब रहावे.

९. हस्तांदोलन करणे अथवा आलिंगन देणे टाळावे.

१०. पुरेशी झोप घ्यावी.

११. संतुलित आणि ताजा आहार घ्यावा.

१२. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

 

६. रोगांचा प्रसार टाळण्यासाठी धर्माचरण करा !

आयुर्वेदामध्ये साथीच्या रोगांमागे ‘अधर्म हेच मूळ कारण असते’, असे सांगितले आहे. धर्माचरणामुळे अशा रोगांना आळा बसतो. यासाठी हिंदु धर्मात सांगितलेल्या आचारांचे पालन करणे, हा सर्व रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय आहे. जंतूंच्या संसर्गास कारण ठरणार्‍या पाश्‍चात्त्यांच्या ‘शेक हॅण्ड’पेक्षा हिंदु धर्माने सांगितलेला ‘नमस्कार’ या संदर्भातही लाभदायक आहे, हे येथे लक्षात ठेवण्यासारखे आहे.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment