अहर्निश सेवारत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात श्री. रमेश शिंदे यांनी अनुभवलेले त्यांचे प्रेम, शिकवण आणि द्रष्टेपण !

अनुक्रमणिका

परात्पर गुरु डॉ. आठवले

 

१. अविश्रांत सेवा करणारे प.पू. डॉक्टर !

१ अ. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भरती असतांनाही सेवा करणे

प.पू. डॉक्टरांची एक (प्रोस्टेटची) शस्त्रक्रिया झाली होती. त्या वेळी ते रुग्णालयात असतांना ग्रंथांच्या लिखाणाचे (मजकुराचे) कागद तिकडे वाचण्यासाठी मागवून घेत. तो वेळही ते वाया घालवत नसत.

१ आ. शस्त्रक्रियेनंतर निवासस्थानी आल्यावर लघवी
साठवणारी पिशवी दोन पायांच्या मधेमधेेे येऊ नये म्हणून कमरेला बांधून सेवा करणे

श्री. रमेश शिंदे

शस्त्रक्रियेनंतर त्यांना निवासस्थानी आणल्यानंतरही ते विश्रांती न घेता अखंडपणे सेवा करत. त्या वेळी त्यांना शस्त्रक्रियेनंतरची ‘कॅथेटर आणि लघवी साठणारी पिशवी’ लावलेली होती. चालतांना ती पिशवी हातात धरावी लागे, तसेच सेवा करतांना ती पिशवी सतत दोन पायांच्या मधेे येऊन अडचण होत असे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ती लघवीची पिशवी कमरेला एका दोरीने बांधून टाकली आणि त्या स्थितीतही सेवा चालू केली. कुठल्याही कारणामुळे सेवेत अडचण निर्माण झाली, असे त्यांनी होऊ दिले नव्हते.

१ इ. साप्ताहिकाची पाने रात्री उशिरा येत असल्याने
साप्ताहिक वेळेत छपाईला जाण्यासाठी झोपेतून उठून लिखाण पडताळणे

आरंभीच्या काळात प.पू. डॉक्टर ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चे लिखाण पडताळत. त्या वेळी प.पू. डॉक्टर छपाईला जाण्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लिखाण पालटून वाचकांना नवीन लिखाण मिळावे यासाठी प्रयत्न करत. (‘अन्यथा वाचकांना ते लिखाण एक आठवडा उशिरा वाचायला मिळेल’, असा त्यांचा दृष्टीकोन असे.) त्या वेळी रात्री उशिरापर्यंत सेवा चालत असे. सकाळी पाने छपाईला पाठवण्यापूर्वी साधकांना रात्रीच ते लिखाण पडताळून देता यावे; म्हणून ते शयनगृहात न झोपता बैठकीच्या खोलीतच (हॉलमध्येच) झोपत. ‘‘साप्ताहिकाची पाने छपाईला पाठवण्यापूर्वी रात्री ती जसजशी अंतिम होतील, तशी ती दाखवण्यास आणा आणि माझ्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श केला तरी मी उठेन’’, असे त्यांनी सांगितलेले असायचेे. त्यानुसार रात्रभर जशी पाने होतील, तशी ती ते पडताळून देत. त्या वेळी त्यांच्या पायाला हात लावल्यावर ते उठून लगेच अगदी जागे असल्याप्रमाणेच सर्व पान पडताळून देत असत. (आपल्याला कुणी अचानक झोपेतून उठवल्यावर सामान्य जागृतावस्थेत येण्यासच काही कालावधी जातो, त्यानंतर विचारांची जाणीव होते.)

१ ई. साधकांना पुरेशी सेवा मिळण्यासाठी दौर्यावर जाण्यापूर्वीच रात्री जागून लिखाण काढून ठेवणे

प.पू. डॉक्टरांचे जाहीर सभा, जिल्ह्यांचे दौरे असे बाहेरील कार्यक्रम ज्या वेळी चालू झाले, तेव्हा आपल्या अनुपस्थितीत साधकांना पुरेशी सेवा मिळावी (सेवा कमी पडू नये), यासाठी प.पू. डॉक्टर दौऱ्यावर जाण्याच्या अगोदर २ – ३ रात्री जागून पुष्कळ लिखाण काढून ठेवत. आम्ही सर्वांनी ते पडताळून पूर्ण होण्यापूर्वीच प.पू. डॉक्टर दौरा संपवून परत येत. साधकांना सेवा मिळावी, यासाठीची त्यांची तळमळ आणि वेग हे दोन्ही कल्पनेच्याही पलीकडचे होते.

१ उ. सेवेसाठी आलेल्या साधकाचा एक क्षणही वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करणे

प.पू. डॉक्टरांना सेवेसाठी आलेल्या साधकाला त्वरित सेवा देणे अपेक्षित असे. ‘साधकाचा क्षणभरही वेळ वाया जाऊ नये’, असा त्यांचा दृष्टीकोन असे. ‘हातातील काम पूर्ण झाले की, सेवा देतो’, अशा विचारांनी आपण त्यांना थोडा वेळ जरी थांबवले, तरी प.पू. डॉक्टरांना ते आवडत नसे. ते स्वतःची सेवा तत्क्षणी थांबवून दुसऱ्यांना सेवा देण्यालाच प्राधान्य देण्यास सांगत.

१ ऊ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या काळातील सेवा

१ ऊ १. अनेक सेवा करत असतांनाही प्रत्येक साधकाच्या कौशल्याप्रमाणे त्याच्यासाठी सेवा आधीच काढून ठेवणे

प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) अमृत महोत्सवाच्या काळात तर महोत्सवाची जवळपास सर्व सिद्धता होत होती. त्याच वेळी प.पू. बाबांच्या संदर्भातील ग्रंथांची सेवाही चालू होती. सेवाकेंद्रात सेवेसाठी इतकी गर्दी होत असे की, बसण्यासही जागा शिल्लक नसे. त्या वेळीही प.पू. डॉक्टर सर्व साधकांना सेवा मिळावी, याकडे लक्ष देत. बरेच साधक त्यांच्या कार्यालयातून सुटल्यावर येऊन सेवा करत. ते येण्यापूर्वीच प्रत्येकाच्या कौशल्याप्रमाणे त्यांची सेवा प.पू. डॉक्टर काढून ठेवत. कोणालाही सेवेसाठी कधी थांबावे लागले नाही आणि नियमित ग्रंथांची सेवाही अखंड चालू होती. प.पू. डॉक्टरांच्या कार्याचा हा वेग म्हणजे एक ईश्वरी कृपाच अनुभवास येत होती. या काळात प.पू. डॉक्टर कधी विश्रांती घेत, हे कळतच नव्हते.

१ उ २. साधकाच्या मनातील शंकेचे समाधान करण्यासाठी स्नान अर्धे झाले असतांना बाहेर येऊन निर्णय देऊन स्नानास जाणे

प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठी बनवलेले प्रदर्शनाचे तक्ते बाहेर काही केंद्रांना पाठवायचे होते. त्या वेळी त्यांचे वर्गीकरण करून ते तक्ते पाठवण्याची सेवा माझ्याकडे होती. प.पू. डॉक्टरांनी मला सेवा समजावून दिली आणि ते स्नानास गेले; मात्र २ – ३ तक्त्यांच्या संदर्भात मला निर्णय घेता येईना. त्या वेळी प.पू. डॉक्टर स्नानगृहातून अर्धवट स्नान केलेल्या स्थितीत (अंगाला साबण लावलेला असतांना) टॉवेल गुंडाळून बाहेर आले आणि मला त्या तक्त्यांचे वर्गीकरण सांगून ते पुन्हा स्नानास गेले. त्यांना माझ्या मनातील निर्णय घेण्याच्या संदर्भातील गोंधळ कसा कळला आणि स्नानगृहातून स्नान आटोपून येण्याऐवजी माझा वेळ वाया जाऊ नये; म्हणून त्यांनी अंगाला साबण लावलेल्या स्थितीतच बाहेर येऊन मला निर्णय सांगून ते पुन्हा स्नानास गेले, हे सर्व मला अत्यंत आश्चर्यजनक आणि स्तिमित करणारे होते.

 

२. प.पू. डॉक्टरांच्या सेवेचा वेग अतुलनीयच !

२ अ. प.पू. डॉक्टरांच्या वाचनाचा वेग कल्पनातीत असल्याने त्यांनी
अन्य सगळी वर्तमानपत्रे वाचून त्यावर दृष्टीकोन देऊन ३० ते ३५ मिनिटांत ती दैनिक कार्यालयात देणे

दैनिक सनातन प्रभातच्या आरंभीच्या काळात प.पू. डॉक्टर दैनिकाच्या कार्यालयात येणाऱ्या गोव्यातील सर्व वर्तमानपत्रांचे वाचन करून त्यांतील वृत्तांवर योग्य दृष्टीकोन लिहून ती सर्व वर्तमानपत्रे ३० ते ३५ मिनिटांत संपादकीय विभागाकडे पाठवत असत. त्यांचा वाचनाचा हा वेग कल्पनातीत आहे; कारण आम्हाला एखादे दैनिकच बारकाईने वाचण्यास ४० ते ४५ मिनिटे लागत. त्याहून अल्प कालावधीत प.पू. डॉक्टरांचे सर्व दैनिकांचे अंक वाचून त्यावर दृष्टीकोनांचे लिखाण करून होत असे.
(जगभरात सर्वाधिक वाचनाचा वेग अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉन एफ्. केनेडी यांचा असल्याचे म्हटले जाते. त्यांचा वाचनाचा वेग मिनिटाला १००० शब्द इतका होता. त्यापेक्षाही कितीतरी अधिक वेग प.पू. डॉक्टरांच्या वाचनाचा आहे. स्वामी विवेकानंद यांचाही वाचनाचा असाच प्रचंड वेग असल्याचे मी वाचले होते.)

२ आ. प.पू. डॉक्टरांनी अन्य सेवा करत लिखाणातील व्याकरण पडताळून
ते कागद संगणकावर दुरुस्तीची सेवा करणाऱ्या ६ ते ७ साधकांना त्यांची आधीची सेवा संपण्यापूर्वीच देणे

प.पू. डॉक्टर ग्रंथांचे लिखाण पडताळून आम्हाला ते लिखाणाचे कागद व्याकरण तपासण्यासाठी देत असत. त्या वेळी आम्ही साधारणपणे ६ ते ७ साधक हे कागद व्याकरण पडताळून संगणकावर दुरुस्तीची सेवा करणाऱ्यांना देत असू. प.पू. डॉक्टरांच्या तुलनेत आम्ही ६ – ७ जण ती सेवा करत असून एकदाही असे झाले नाही की, प.पू. डॉक्टरांनी वाचून ठेवलेले लिखाणाचे कागद आम्ही संपवले. यात प.पू. डॉक्टर मधल्या काळात विविध ठिकाणांवरून येणाऱ्या साधकांना भेटत; कापडी फलकांची छपाई, स्टेन्सिल निर्मिती अशा अन्य सेवाही पहात, तसेच रुग्णांनाही तपासत असत. यातून प.पू. डॉक्टरांच्या वाचनाचा कल्पनातीत वेग लक्षात येतो.

२ इ. लिखाणातील चुका त्वरित लक्षात येणे
आणि त्यासाठी विशिष्ट लेन्स डोळ्यांत असल्याचे गमतीने सांगणे

आम्ही ग्रंथांच्या लिखाणाची पाने २ – ३ वेळा वाचून देऊनही आमच्या लक्षात न आलेल्या चुका प.पू. डॉक्टर त्वरित दाखवून देत. त्या वेळी ‘या चुका आपल्या लक्षात कशा येत नाहीत ?’, असा मनात विचार येई. याविषयी मी एकदा प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘तुम्हाला या पानातील सर्व चुका त्वरित कशा काय दिसतात ?’’ त्यावर प.पू. डॉक्टर गमतीने हसून म्हणाले, ‘‘होय ! माझ्या डोळ्यांत अशा विशिष्ट ‘लेन्स’ आहेत की, त्यामुळे मला त्या चुका त्वरित दिसतात.’’

शारीरिक आणि मानसिक त्रासांवरील उपायांच्या संदर्भातील भेद

१. शारीरिक
एखाद्याचा वरून पडल्यामुळे अस्थिभंग झाला, तर उपायांच्या दृष्टीने तेथे केवळ शारीरिक गोष्टींचा विचार करणे पुरेसे होते. तेथे मानसिक किंवा आध्यात्मिक स्तराचे विश्लेषण उपयोगी पडत नाही.

२. मानसिक
एखाद्याला मानसिक स्तराचा त्रास होत असला, तर उपायांच्या दृष्टीने केवळ मानसिक स्तरावरचा विचार उपयोगी पडत नाही, तर आध्यात्मिक स्तरावरचा विचारही करणे आवश्यक असते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

Leave a Comment