‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून त्यांना प्रसन्न करणारे शिष्योत्तम परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

श्री. प्रकाश जोशी
प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली भव्य नगरी आणि ती नगरी प.पू भक्तराज महाराजांना दाखवतांना परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले (डावीकडे)

९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा इंदूर येथे आयोजित केला होता. ‘न भूतो न भविष्यति’ असे ज्याचे वर्णन करतात, असा तो सोहळा संपन्न होण्यासाठी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि हे सर्व करतांना साधकांनाही सेवेच्या माध्यमातून घडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचे चक्षुर्वैसत्यं अनुभव घेतलेले श्री. प्रकाश जोशी यांनी केलेले वर्णन येथे पाहूया.

१. एक वर्ष आधीपासूून अमृत महोत्सवाची सिद्धता चालू करणे

‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाची सिद्धता जवळजवळ एक वर्ष आधीपासूूनच चालू केली होती. ते प्रतिमास होणाऱ्या अभ्यासवर्गात सोहळ्याचे स्वरूप सांगत असत. त्यासाठी आवश्यक तो आर्थिक व्यय करण्यास निधी कसा उपलब्ध करता येईल, याविषयी त्यांचा सतत विचार चालू असायचा.

२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘भजन, भ्रमण आणि भंडारा’ या
त्रिसूत्रीवर आधारित चित्रे सिद्ध करण्याचे ठरवणे आणि त्याप्रमाणे साधकांना सेवा देणे

‘‘इंदूर येथे मोठी नगरी वसवून तेथे प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे’’, असे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी आम्हाला सांगितले. त्यासाठी त्यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘भजन, भ्रमण आणि भंडारा’ या त्रिसूत्रीवर आधारित चित्रे सिद्ध करायची’, असे ठरवून त्याप्रमाणे साधकांना सेवा दिली. ‘सेवा नीट आणि वेळेत होते कि नाही ?’, याचा ते सतत पाठपुरावा घेत. शेवटचे काही दिवस तर साधक रात्रंदिवस सेवा करत होते. त्यांना मोठ्या आकारातील खंजिरी, जेवणाचे मोठ्या आकारातील डाव इत्यादी चित्रे काढून त्यांतून प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनदर्शन घडवायचे होते.

३. ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र सर्वांना कळावे’,
यासाठी त्यांच्या जीवनावर गोव्यातील साधकांकडून नाटक बसवून घेणे

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी सर्वांना प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र कळावे, यासाठी गोव्यातील साधकांकडून त्यांच्या जीवनावर एक नाटक बसवून घेतले. नाटकाची संहिता पडताळणे, कलाकार साधकांची निवड करणे, नाटकाच्या तालमीचा कालावधी ठरवून ती नीट होते कि नाही हे पहाणे इत्यादी सर्व गोष्टी ते स्वतः पहात. या सर्वांतून त्यांनी साधकांची साधना करवून घेतली. नाटक फार सुंदर झाले. आरंभी काहींना वाटत होते की, प.पू. भक्तराज महाराज यांची भूूमिका साकारणे कुणाला जमणार नाही; परंतु श्री. विवेक पेंडसेेे यांनी ती भूमिका चांगली वठवली. ही केवळ परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचीच कृपा आहे.

४. ‘सोहळ्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी
लॉटरीची कल्पना सुचणे आणि ती गोव्यामध्ये अमलात आणणे

त्या काळात आतासारखा संस्थेचा प्रसार झाला नव्हता. त्यामुळे ‘महोत्सवानिमित्त लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल ?’, असा विचार करत असतांना लॉटरीची (सोडतीची) कल्पना सुचली आणि आम्ही ती गोव्यामध्ये अमलातही आणली. त्याची सगळी सिद्धता परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी करवून घेतली. लॉटरीची तिकिटे छापणे, त्याच्या विक्रीसाठी अनेकांना संपर्क करून तिकीटविक्री करणे, या सगळ्या गोष्टी काळानुरूप त्यांनी आमच्याकडून करवून घेतल्या.

५. प.पू. भक्तराज महाराज यांनी गुरुपौर्णिमेसाठी जमा
झालेले पैसे मागून घेणे, तरीही काही अडचण न येता गुरुपौर्णिमा साजरी
होणे आणि यातून त्यांनी प.पू. डॉक्टरांची परीक्षा घेऊन त्यांना घडवले असणे

एक वर्ष अगोदर नियोजन चालू होते. मे-जूनमध्ये गुरुपौर्णिमेसाठी पैसे जमा झाले होते. त्याच वेळी प.पू. भक्तराज महाराज मुंबईला आले आणि त्यांनी जमलेला निधी मागून घेतला. त्यामुळे ‘गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची ?’, असा प्रश्ने परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना पडला; पण काही अडचण न येता गुरुपौर्णिमा साजरी झाली. अशा रीतीने प.पू. भक्तराज महाराजसुद्धा परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची परीक्षा पहायचे. त्यातूनच त्यांनी आम्हाला शिकवले अन् घडवले.

६. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी एक मास
अगोदर इंदूर येथे सिद्धतेला आरंभ करून नियोजनातील सर्व बारकावे पहाणेे

एक मास अगोदर इंदूर येथे अमृतमहोत्सवाच्या सिद्धतेला आरंभ झाला होता. प.पू. भक्तराज महाराज यांच्या काही भक्तांकडून तेथील सिद्धता परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले करवून घेत होते. आम्ही काही मोजके साधक १० दिवस अगोदर सिद्धतेसाठी गेलो होतो. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे सगळीकडे लक्ष होते. नगरी वसवायची असल्याने व्यासपीठ, स्वयंपाकघर, प्रसाधनगृहे यांसह सगळी योजना करायची होती. ४०० ते ५०० लोक (प.पू. भक्तराज महाराजांचे नातेवाईक, भक्त आणि साधक) रहायला येणार होते. फेब्रुवारी मास असल्यामुळे थंडीचे दिवस होते. त्यामुळे अंथरुण-पांघरुणांचीही सोय करायची होती. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष होते.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अमृत महोत्सवाच्या ३ दिवसांच्या कार्यक्रमांचे
उत्तम नियोजन करणे, कार्यक्रम हिंदीतून होणे आणि अनुभव नसलेल्या अन्
हिंदी भाषा चांगली बोलता न येणाऱ्यां साधकांकडूनही चांगले कार्यक्रम करवून घेणे

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी अमृत महोत्सवाच्या ३ दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन केलेे. त्यामध्ये यज्ञ, व्यासपिठावरील कार्यक्रम, प.पू. भक्तराज महाराज यांची मिरवणूूक, विमानातून पुुष्पवृष्टी इत्यादी गोष्टींचे नियोजन केले. व्यासपिठावरील कार्यक्रमांत आमच्यासारख्या काहीच न येणार्याष साधकांकडून त्यांनी कार्यक्रम करवून घेतले. ते केवळ त्यांच्या कृपेमुळेच झाले. सगळे कार्यक्रम हिंदीतून होते. आम्हाला हिंदी भाषाही जेमतेम अवगत होती; परंतु तरीही त्यांनी आमच्याकडून कार्यक्रम करवून घेतले, हे वैशिष्ट्य होते.

८. कार्यक्रमांच्या नियोजनाचे दायित्व देऊन
करवून घेतलेली सेवा आणि शिकायला मिळालेली सूत्रे

८ अ. कार्यक्रम बघून ‘तो घ्यायचा कि नाही’, हे ठरवायची सेवा असणे
आणि कसोटीच्या वेळी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी साहाय्य करणे

माझ्याकडे कार्यक्रमांचे नियोजन दिले होते. एकेक व्यक्ती यायची आणि सांगायची, ‘मला कार्यक्रम करायचा आहे.’ त्यांचा कार्यक्रम बघून ‘तो घ्यायचा कि नाही’, हे ठरवणे आणि तसे त्यांना सांगणे माझ्यासाठी अवघडच होते, उदा. एखाद्याचा कार्यक्रम चांगला नसल्यास त्याला ते कसे सांगायचे, असा मला प्रश्न पडायचा. अशा वेळी ज्यांचा कार्यक्रम निवडला नव्हता, ते परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्याकडे जायचे आणि गाऱ्हाणे करायचे. त्यामुुळे माझी कसोटी लागायची; परंतु परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले मला साहाय्य करायचे, म्हणजे तेच सगळे करायचे आणि मी निमित्त असायचो.

८ आ. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी दोन दिवस आधी
अचानकच नियोजनाच्या सिद्धतेची पहाणी करण्यास येणे आणि प्रत्येक
गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून ‘त्याचे पुढे काय करायचे ?’ हे संबंधितांना सांगणे

दोन दिवस आधी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले प.पू. रामानंद महाराज यांना घेऊन सकाळी ७.३० वाजता मी निवासाला होतो, तेथे आले आणि म्हणाले, ‘‘चला, काय सिद्धता झाली आहे, ती बघून येऊ.’’ मला याची पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे माझी धावपळ झाली. माझे वैयक्तिक आवरायचे होते. मी विचार केला, ‘फेरी लगेच मारून होईल’; म्हणून मी सदरा घातला आणि त्यांच्यासह गेलो. त्या वेळी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले प्रत्येक गोष्टीचा नीट बारकाईने अभ्यास करून संबंधितांना पुढील सूचना देत होते. त्यांनी कार्यक्रमस्थळी ३.३० घंटे फिरून सूूचना दिल्या. अशा प्रकारे त्यांनी माझ्यासारख्या दगडाकडून सेवा करवून घेतली.

९. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी केलेल्या सेवेने
प्रसन्न होऊन प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना श्रीकृष्ण-अर्जुनाचा
चांदीचा रथ देऊन ‘यापुढे हा रथ तुम्हाला सांभाळायचा आहे’, असे सांगणे

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांची मनोभावे (परिपूर्ण) सेवा केली. त्यात कसलीही उणीव ठेवली नाही. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना श्रीकृष्ण-अर्जुनाचा चांदीचा रथ दिला. प.पू. भक्तराज महाराज परात्पर गुरु डॉक्टरांना तो रथ देत असतांना त्यांनी आम्हालाही समवेत बसवले होते. प.पू. भक्तराज महाराज यांनी अर्धा-पाऊण घंटा मार्गदर्शन केले. त्यातले बरेचसे मला कळले नाही. ते सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उद्देशून होते. ते आम्हाला काय कळणार ? रथ देतांना प.पू. भक्तराज महाराज परात्पर गुरु डॉ. आठवले यांना म्हणाले, ‘‘यापुढे हा रथ (गुरूंच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा रथ) तुम्हाला सांभाळायचा आहे.’’

प.पू. भक्तराज महाराज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी त्यांना रथ दिला होता, हे प.पू. भक्तराज महाराज यांनी देह ठेवल्यावर माझ्या लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी ६ मासांनी देहत्याग केला. आज प.पू. भक्तराज महाराज यांच्या या रथाचा (अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा) केवढा मोठा प्रसार झाला आहे, तो आपण पहातच आहोत.

१०. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी
आईप्रमाणे हाताला धरून नेल्यामुळे जीवनाची दिशा पालटणे

मला अशा गोष्टींचा अनुभव नसल्यामुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले जे सांगतील, त्याप्रमाणे मी केले. माझी कुवत नसेल किंवा अहंमुळे मला जमले नसेल; परंतु मला याचा पुष्कळ अभ्यास करता आला नाही. एवढे असूनही त्याचा लाभ असा झाला की, परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी आम्हाला (साधकांना) हाताला धरून नेल्यामुळे माझ्या जीवनाची दिशा पालटली. जसे आई मुलाला समवेत घेऊन जाते, तसे त्यांनी आम्हाला नेले. ‘किती शिकायचे ?’ हे शेवटी मुलांवर अवलंबून असते.

११. २० – २५ वर्षे साधकाला समवेत ठेवून घडवण्यासाठी
सातत्याने प्रयत्न करणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

मी दगड होतो. त्यामुळे हे सर्वकाही माझ्या डोक्यावरून गेले. म्हणतात ना, ‘दगडावर पाणी पडत राहिले की, एक ना एक दिवस त्याला छिद्र पडते.’ तसे एवढी वर्षे त्यांनी मला समवेत ठेवल्यामुळे आता कुठेसे या दगडाला छिद्र पडले आहे. याचे कारण म्हणजे ‘मला अध्यात्मात प्रगती करायची; म्हणून मी संस्थेमध्ये आलो’, असे नव्हते, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा लोकांना लाभ व्हावा, त्याचा प्रसार व्हावा’, अशी माझी तळमळ होती; म्हणून मी आलो होतो. त्यामुळे माझ्या हातून कार्यच झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हे ठाऊक असणार. त्यामुळे त्यांनी माझ्यासारख्या दगडाला २० – २५ वर्षे समवेत ठेवले आणि घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे आता कुठे माझ्यात पालट व्हायला लागला, किंबहुना ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे मला कळायला लागले आहे.

१२. जीवनात येणाऱ्यां प्रसंगांकडे अध्यात्माच्या
दृष्टीने आता बघता येते, ही गुरूंची मोठी देण असणे

पूर्वी सर्व गोष्टींचा बुद्धीने विचार व्हायचा. त्यामुळे जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती; पण आता प्रगती झालेली नसली, तरी आतून समाधान आहे. पोकळी भरून निघाली आहे. जीवनात येणार्या प्रसंगांकडे आध्यात्मिक दृष्टीने बघता येते, हीच गुरूंची मोठी देण आहे. यापुढील प्रगती तेच करून घेणार आहेत, याची मला शाश्वती आहे. माझ्यासारख्या दगडाला समवेत घेऊन त्याला छिद्र पाडले, हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोठेपण सिद्ध करते. (माझ्यासारख्या अनेक जणांची अशीच अवस्था असणार.)

‘अशीच परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची कृपा यापुढेही राहून त्यांनी लवकर आम्हा सर्वांची आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. प्रकाश जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मे २०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात