धर्मवीरत्व : धर्मवीर संभाजी राजांच्या शौर्याची परिसीमा !

धर्मवीर संभाजी राजांच्या शौर्याची परिसीमा !

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ‘काफीर’ हिंदूंवर मुसलमान आक्रमकांनी केलेल्या क्रूर, अमानुष आणि पाशवी अत्याचारांचे उदाहरण म्हणजे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कविराज कलश यांना दिलेल्या नरकयातना ! आज अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथेच नाही, तर भारतातील काश्मीरमध्ये अधूनमधून घडणार्‍या अल्पसंख्यांक हिंदूंविषयीच्या हृदयद्रावक घटना म्हणजे धर्मांधांनी शंभूराजांप्रमाणे हिंदूंना नरकयातना देण्याची क्रौर्यपरंपरा जपल्याचा पुरावाच ! त्यामुळे काळाची पावले ओळखून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जागृत व्हा !

 

१. शंभूराजांची धिंड

शंभूराजांची आणि कविराजांची (कवी कलश) वस्त्रे भर रस्त्यात उतरवली गेली. त्यांच्या अंगावर विदुषकांचे चट्ट्यापट्ट्याचे झगे चढवले गेले. गळ्यात गुरांच्याही मानेला जाचेल, अशा काथ्याच्या पेंढ्या बांधल्या गेल्या. अट्टल गुन्हेगारांच्या डोक्यावर जशा इराणमध्ये ठेवल्या जातात, तशाच ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांच्या लांबट टोप्या ठेवल्या गेल्या. त्यावर बारीक घुंगरू बांधले गेले होते. काही हशम ते दोन्ही उंट धरून पुढे चालू लागले. ताशे-तुतार्‍या मोठमोठ्याने वाजू लागल्या. राजांना आणि कविराजांना उघड्या बोडक्या उंटावर उलटे बसवण्यात आले होते. त्यांना त्या जनावरांशी करकचून बांधले होते. राजांना हात उंचवायला लावून त्यामध्ये भोकाची एक फळी अडकवली गेली होती. फळीमध्ये दोन्ही हात गुंतवलेले. त्या दोघांच्या मानाही लाकडी खोक्यात अडकवल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या माना इकडे कि तिकडे वळविता येत नव्हत्या. ते दोघे कैदी म्हणजे रांडापोरांची मोठी करमणूक बनली होती. उनाड पोरे हातामध्ये बारीक खडे आणि चिखलाचे गोळे घेऊन राजांवर फेकून मारत होते. शिंगे, कर्णे, ढोल, तुतार्‍या यांचा एकच कोलाहल उडाला होता. हशम मुद्दाम खोडसाळपणाने जोरात उंट पळवत होते. पळवता पळवता त्यांना मध्येच गर्रकन वळवत होते. ती उंच पाठीची जनावरे गर्रकन फिरली की, त्या राजकैद्यांचे झोक जात. अंगाला बांधलेले दोर आणि साखळ्या चांगल्याच काचत. राजांच्या आणि कविराजांच्या डोळ्यांपुढे चांदण्या चमकत. भोवळ आल्यासारखे होई. ते एका बाजूला कोसळत, कलंडत. त्या मुक्या जनावरांचीसुद्धा दमछाक होत होती. वारंवार बसणारे हादरे, दचके आणि हिसक्यांनी राजांच्या शरिराला अनंत वेदना होत होत्या. त्या पाहून त्यांची खिल्ली उडवणार्‍या पोरकटांना हास्याच्या उकळ्या फुटत होत्या.

 

२. कविराज कलश यांचे हाल

कविराजांनी रागाने बेसावध फौलादखानाचा खुवा गवसून लाथ घातली, तसा फौलादखान दणकन पुढे तोंडावर कोसळला. नाठाळ रानरेड्यांना अगर पिसाळलेल्या हत्तींना बंद करावे, तसे कविराजांना आणि शंभूराजांना आत फेकले गेले होते. त्यांच्या अंगाखाली भाताचे थोडेफार पिंजर आणि मातीच होती. काल उघड्या उंटावर बसल्याने त्यांच्या पार्श्‍वभागावरची आणि मांडीची कातडी कमालीच्या घर्षणाने अक्षरशः सोलून गेली होती.

२ अ. कविराजांची जीभ छाटली

…. बलाढ्य शरीरयष्टीचा एक पठाण कविराजांच्या छाताडावर बसला. दुसर्‍या दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटल्यासारखे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी पकडली. एकाने त्यांच्या तोंडावर जोरकस तडाखा हाणला. जबड्यात हात घातला. त्या गडबडीत कविराजांचे समोरचे चार दात निखळून पडले. त्या धटिंगणाचा हात कविराजांची जीभ बाहेर खेचायचा प्रयत्न करीत होता. तेव्हा कलशांचे डोळे पांढरे झालेले. श्‍वास कोंडलेला. तेवढ्यात पुढे खेचली गेलेली कविराजांची जीभ एकाच्या कट्यारीने छाटली. अर्धवट मुंडी तुटून आपले पंख फडफडवीत जागेवरच तळमळणार्‍या कोंबडीसारखी त्यांची अवस्था झाली. कविराजांच्या तोेंडातून शब्दाऐवजी रक्ताचा लोळ गळत होता. ठसके बसून डोळ्यांतून अश्रू पाझरत होते. श्‍वास कोंडला. तळमळ वाढली होती.

२ आ. कविराजांच्या डोळ्यांत तप्त लालजर्द सळ्या फिरल्या

….रागाच्या भरात औरंगजेबाने एके सकाळी रुहुल्लाखानाला हुकूम दिला, ‘‘जाऽ त्या कवी कलशाच्या डोळ्यांत तापती सळई फिरवून त्या कुत्त्याचे डोळे काढा !’’ खोजे, हशम आणि इतर फौजी तिकडे धावले. हुकमाची तामिली झाली. कविराजांचे ते पाणीदार डोळे आणि त्यातल्या चमकत्या बाहुल्या नाहीशा झाल्या. पातशहाच्या इच्छेप्रमाणे हशम पुढे सरसावले. रांजणातून रवी गोलाकार फिरवावी, तशा त्या तप्त, लालजर्द सळ्या कविराजांच्या डोळ्यांतून फिरल्या ! चर्र चर्र आवाज आला. डोळ्यांत धूर माजला. चर्येवरची कातडी थरथरली इतकेच; पण तोंडातून भीतीची, आक्रोशाची आरोळी उठली नाही.

२ इ. कविराजांवर शंभूराजांवरील अत्याचारांची रंगीत तालीमच

….दुपारीच औरंगजेबाच्या धटिंगणांनी कारभार आटोपला. कविराजांचे हात, पाय असे एकएक अवयव तोडण्यात आले. ते रक्तमांस नदीच्या दरडीवर भिरकावले गेले. पंधरा मैलांच्या परिघात पसरलेल्या पातशहाच्या तळावर खूप सन्नाटा पसरला होता. कवी कलशांना हालहाल करून मारल्याची बातमी सर्वत्र झाली होती. कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू शंभूराजांवर केल्या जाणार्‍या प्रत्येक अत्याचाराची रंगीत तालीमच असायची !

 

३. शंभूराजांची त्वचा टराटरा फाडली !

…. शंभूराजांना खांबाशी घट्ट बांधले गेले. दोन बलदंड शरिराचे राक्षस पुढे झाले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून तंबूरताशे जोरजोराने वाजवले जाऊ लागले. तसेच ते दोन्ही राक्षस ‘दीनऽ दीन ऽऽ’’ करत बेंबीच्या देठापासून ओरडू लागले. राजांची त्वचा टराटरा फाटू लागली. कातडी सोलली जाऊ लागली. आतडी तुटू लागली. त्या दोघांच्या हातावर रक्ताचे ओघळ फुटून रक्ताच्या धारा खाली सांडू लागल्या.

३ अ. रक्तामांसाच्या चिंध्या झाल्या

शंभूराजांनी जीव बचावण्यासाठी हंबरडा फोडला नाही; पण दातात दात रुतवून तो अत्याचार सहन करण्याचा ते प्रयत्न करीत होते. वस्रांच्या चिंध्या कराव्यात, तशा त्यांच्या रक्तामासांच्या चिंध्या होत होत्या. तो लोळागोळा होणारा मानवी देह जागच्या जागी थरथरत होता. अंगातून रक्ताचे उमाळे लागलेले. महादेवाच्या पिंडीवरून अभिषेकाचे दहीदूध पायदळी पडावे, तसे रक्त राजांच्या पायाभोवती गोळा झालेले. त्यांच्या बकर्‍यासारख्या सोलल्या गेलेल्या देहाकडे बघून औरंगजेब खदखदा हसत होता. राजांचे फाडलेले जिवंत शरीर जागच्या जागी थडथड उडत होते.

३ आ. शिर धडावेगळे केले

तो जिवंत देह सोलून ते दोघे हैवान बाजूला झाले. त्या बरोबर पातशहाने त्या फरशधारी पाच धटिंगणांना इशारा केला. त्या दैत्यांचे हात थरथरले, पण क्षणभरच. दुसर्‍याच क्षणी ते शंभूराजांवर तुटून पडले. एकाने आपल्या हातातल्या कुर्‍हाडीचे धारदार पाते जोराने राजांच्या मानेत घुसवले. तशी रक्ताची एक चिळकांडी उडाली. मुंडी अर्धी तुटली. खाली ओघळू लागली. त्या पाठोपाठ दुसरा एक जोरदार घाव बसला शिर धडावेगळे झाले.

३ इ. रक्तपिपासू औरंगजेब

पातशहाच्या समोर खोजांनी तबकात राजांची मुंडी धरली. औरंगजेबाने ती हातामध्ये घेतली. त्या गरम शिरावरून, रक्ताने माखल्या दाढीवरून त्याने खुषीत हात फिरवला. काही वर्षांपूर्वी आपल्या थोरल्या भावाची – दाराची मुंडीही त्याने अशीच अगदी थंडपणे चाचपून बघितली होती. असदखानाच्या हवाली मुंडी करत पातशहा गरजला, ‘‘या काफरबच्चाच्या मुंडीत भाल्याचं टोक घुसवा. हे मुंडकं दक्षिणेत गावोगाव नाचवा. दहशत बसवा. हा औरंगजेब जोवर जिंदा आहे, तोवर ह्या दख्खनच्या मिट्टीमध्ये दुसरा कोणी संभा पैदा होता कामा नये !’’

औरंगजेबाने त्या दैत्यांना पुन्हा इशारा केला. दुसर्‍याच क्षणी ते सारे शंभूराजांवर तुटून पडले. कुर्‍हाडींची धारदार पाती नाचली. खांबाला जखडलेल्या देहातून रक्ताचे पाट वाहू लागले. मासांचे तुकडे खाली मातीत कोसळले. रक्तमांस इतस्ततः पडले. भीमामाई शहारली ! काळोखात बुडालेला सख्खा सह्याद्री दुःखानं हेलावून गेला !!’

संदर्भ : ‘संभाजी’, लेखक – श्री. विश्‍वास पाटील

 

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन
आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. ‘फेसबूक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांवरून गुढीपाडव्याविषयी जात्यंधांकडून अपप्रचार केला जात आहे. जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

वाचण्यासाठी भेट द्या : गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण