हिंदु सैन्याधिपती छत्रपती शिवाजी महाराज !

Shivaji_Maharaj_666

१० मार्च २०१५ या दिवशी शिवप्रतिष्ठानने आयोजित केलेल्या भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी ४५ हून अधिक वर्षे शिवचरित्रावर अभ्यास केला असून त्यावर जवळजवळ साडेतीन सहस्र पानांहून अधिक लेखन केले आहे. या व्याख्यानामधून श्री. मेहेंदळे यांनी शिवरायांच्या संदर्भातील अफवांचे केलेले सप्रमाण खंडण आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

 

१. शिवरायांनी कधीही, कुठेही मशीद बांधली नाही !

shivaji_maharaj

टीका : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली.

खंडण : अनेक जण प्रश्‍न विचारतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का ? शिवरायांनी कधीही, कुठेही मशीद बांधलेली नाही. लोकांची समजूत आहे की, त्यांनी मशिदींना इनामे दिली; पण शिवचरित्रविषयक मराठी, फारसी, पोर्तुगीज आदी सर्वच्या सर्व कागदपत्रांमध्ये त्यांच्या संदर्भात तसा कागदाचा एक कपटासुद्धा मिळालेला नाही.

 

२. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदीला कधीही इनाम दिले नाही !

टीका : छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदीला इनाम दिले.

खंडण : एखाद्या मुसलमान बादशहाने हिंदु मंदिराला नवीन इनाम करून दिलेले सहसा आढळत नाही. एखादे उदाहरण असले, तर असेल, उदा. इब्राहिम आदिलशहा याने गणपतीवर आरत्या केल्या. तो केवळ हिंदु व्हायचाच राहिला होता. वर्तनाने तो हिंदुच होता. तेव्हा अशा एखाद्या बादशहाने हिंदु मंदिराला एखादे इनाम दिले असेल, नाही असे नाही; पण सहसा नाही.

मग जी इनामे चालू राहिली ती कशी ? बादशहांच्या पदरी हिंदु सरदार, कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला, तर त्याला दुखवता येत नाही. त्याने काम नीट करायला पाहिजे असेल, तर सांभाळून घ्यावे लागते. ही हिंदु नोकर मंडळी परस्पर ती इनामे चालू ठेवायची. त्यामुळे मुसलमानी राजवटीतसुद्धा काही हिंदु इनामे चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतसुद्धा काही २-३ मशिदी अशा आहेत की, ज्यांची इनामे चालू होती. म्हणजे ती पूर्वीपासून चालत आली होती. केवळ इंदापूरच्या मशिदीत तिथल्या काझींनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी भोसल्यांच्या कारकीर्दीत आमचे इनाम चालले नाही. त्यामुळे कुणी शहाणे म्हणत असतील की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदींना इनाम दिले, तर ते निखालस खोटे आहे. तशी कागदपत्रे नाहीत. बखरीत उल्लेख असलाच, तर तो तेवढाच ! कारण बखरी पुष्कळ उत्तरकालीन आहेत. कादंबरीप्रमाणे आहेत. विश्‍वसनीय नाहीत.

 

३. महाराजांच्या सैन्यात लाखभर
नव्हे, तर जेमतेम ८-१० मुसलमान होते !

टीका : महाराजांच्या सैन्यात लाखभर मुसलमान होते,

खंडण : त्यांच्या पदरी वर्ष १६५७ पर्यंत ४-५ मुसलमान होते. वर्ष १६५८ मध्ये अलि आदिलशहाचे शहाजी राजांच्या नावाने फर्मान आहे की, तुमच्या मुलाच्या कृत्याविषयी तुम्हाला उत्तरदायी ठरवणार नाही. हे फर्मान कशासाठी पाठवले आहे ? तर वर्ष १६५८ पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी आदिलशहावर स्वतःहून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८ मधली आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा आदिलशाही सैन्याशी लढा झाला होता; पण ते आदिलशाही सैन्याने केलेले आक्रमण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर आक्रमण केले, असे घडले ते वर्ष १६५८ मध्ये. त्यापूर्वी ते वडिलांचा प्रतिनिधी म्हणून १ सहस्र २०० गावांची जहागिरी सांभाळत होते. त्यांनी १० मार्च १६५७ पर्यंत काम पाहिले. पुण्याचा हवालदार सिद्दी बगदादी, सरहवालदार जैना खान पिरजादे, बारामतीचा हवालदार बेहेलिम खान ही तीन मुसलमान नावे होती. १६५७ नंतर या तिघांचे नखही दिसत नाही. ही कुठे अदृश्य झाली, कुणास ठाऊक ! १६५८ मध्ये स्वराज्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर एकही मुलकी अधिकारी मुसलमान नव्हता. महाराजांचा सरनौबत म्हणून नूर खान बेग याचा १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा उल्लेख दिसतो. त्यानंतर नूर खान बेग कुठे अदृश्य झाला ? माहीत नाही. पाचव्या मुसलमानाचे नाव होते सिद्धी हिलाल ! तो महाराजांकडे येऊन जाऊन होता. कधी आदिलशाहीतही होता; पण तो मुळता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम होता; पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. तो जन्माने हिंदु नसल्याने त्याला हिंदु करून घेता येत नव्हते. एकोणिसाव्या शतकापर्यंत असा एकही माणूस नाही की, जो जन्माने हिंदु नाही, तरीही त्याला हिंदु करून घेतले आहे. पूर्वी शक, कुशाण, हूण हिंदु झाले; पण ते पिढ्यान्पिढ्यांची वहिवाट पडून हिंदु झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान अथवा ख्रिस्ती आला आणि तो म्हणाला की, मला हिंदु करा, तर ते त्या वेळी शक्य नव्हते; कारण प्रश्‍न असा असायचा की, त्याला जात कोणती द्यायची ? कारण हिंदु धर्मातील कुठलीही जात त्याचा स्वीकार करायला सिद्ध नसायची. त्यामुळे जरी एखादा अन्य धर्मीय हिंदु व्हायला तयार झाला, तरी त्याला करून घेतले जात नसते. नेताजी पालकर यांच्या संदर्भात गोष्ट वेगळी होती; कारण ते जन्माने हिंदु होते. त्यांना बलपूर्वक बाटवले गेले होते.

महाराजांच्या नौदलाचे दोन अधिकारी मुसलमान होते. एक दौलतखान आणि एक दर्यासारंग. दर्यासारंगला महाराजांनी १६७९ मध्ये अटक केली म्हणजे त्याचा हिशोब तेथेच संपला.

भारत स्वतंत्र झाल्यावर साधारणतः १० वर्षे भारतीय नौदल आणि भारतीय हवाईदलाचे प्रमुख ब्रिटिश अधिकारी होते; कारण आपल्याकडे त्या क्षेत्रातील तेवढे अनुभवी लोक नव्हते. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या संदर्भात होती. त्या वेळी महाराजांकडे नौदलाचे नेतृत्व करू शकतील, एवढे अनुभवी अधिकारी नव्हते. त्यामुळे दौलतखानाला ठेवले होते. त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळुप यांनी मराठ्यांच्या नौदलाचे नेतृत्व केले.

अफलजखानाचा वध केला, तेव्हा त्यांचे जे अंगरक्षक होते, त्यात एक मुसलमान होता. त्याचे नाव सिद्दी इब्राहिम. त्याचीही स्थिती थोड्याअधिक प्रमाणात सिद्दी हिलालसारखीच असणार.

मदारी मेहतर हे नाव पूर्णतः खोटे आहे. १५०-२०० वर्षांनंतर म्हणजे १ सहस्र ८०० वर्षानंतर लिहिलेल्या कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे; पण त्या काळातील कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख नाही. तेव्हा ८-१० मुसलमान नावे सोडली, तर शिवरायांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कुणीही नव्हते. त्यांच्या राज्यकारभारात मुलकी अधिकारी कुणीही मुसलमान नव्हते.

सिद्दी हिलाल किंवा दौलतखान किंवा दर्यासारंग यांचा फारसी कारकून होता. त्याचे नाव काझी हैदर. तो संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाला जाऊन मिळाला. त्यामुळे त्याला प्रामाणिक माणूस कसे म्हणणार ?

 

शिवराय म्हणतात, तुझ्या सैन्यात
तुर्क (मुसलमान) असतील, तर विजय होईलच कसा ?

या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज स्वतः काय बोलले आणि त्यांनी स्वतः काय केले, हे अधिक महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उक्तीतूनच सारे काही स्पष्ट होते. व्यंकोजी भोसले या धाकट्या भावाला लिहलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मी तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत, तर तुझा विजय कसा काय होईल ? ते होणे शक्य नाही. (तुर्क म्हणजे मुसलमान. आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात.)

 

म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराज !

स्वतः संभाजी महाराज त्यांच्या हस्ताक्षरातील दानपत्रात वडील छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन म्लेंच्छक्षयदीक्षित असा करतात. म्लेंच्छक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांचा नाश करण्याची ज्यांनी दीक्षा घेतली आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज. हेन्री रव्हिंग्टन यांनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असतांना तोफा डागल्या होत्या. त्या हेन्री रव्हिंग्टनने छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलेल्या पत्रात त्यांचा जनरल ऑफ द हिंदु फोर्सेस म्हणजे हिंदु सैन्याचे अधिपती असा उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार परमानंद म्हणतो, लहानपणापासूनच ते यवनांचा अपमान करत आले आहेत, असे शिवभारतात नमूद केलेले आहे. त्र्यंबकेश्‍वराचे सुप्रसिद्ध देऊळ, नाशिकमधील सुंदर नारायणाचे देऊळ मुसलमान बांधकाम पाडून बांधले आहे. त्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत.

 

४. आक्रमणकर्त्यांनी पाडलेले देऊळ
त्याच स्थानावर उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

टीका : छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदी भ्रष्ट केल्या.

खंडण : गोव्यात सप्तकोटीश्‍वराचे देऊळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडले होते. पूर्वी मुसलमानांनीही अनेक वेळा पाडले होते. त्या देवळाचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. वास्तविक पुण्यात महाराजांना देवळे बांधायला पुष्कळ भूमी होती; पण त्यांनी तेथेच देवळे बांधली. तुम्ही जसे हट्टाने ते पाडलेत, तसे ते आम्ही हट्टाने बांधणार; म्हणूनच त्यांनी ते परत तेथेच बांधले. मुसलमानांनी तिरुवण्णामलाई येथील पाडलेले देऊळही छत्रपती शिवाजी महाराजांनी हट्टाने तेथेच पुन्हा बांधले. तमिळनाडूत ख्रिस्ती लोकांमधील कडवे धर्मप्रसारक जेझुइट पाद्री यांनी लिहून ठेवले आहे की, येथील मशिदी महाराजांनी डेसिक्रेट म्हणजे भ्रष्ट केल्या.

संदर्भ : सांस्कृतिक वार्तापत्र, १ एप्रिल ते १५ एप्रिल २०१६

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला किल्ला : रायगड !

ज्यांच्या केवळ स्मरणानेही हिंदुमनाला स्फुरण येते, त्यांचा पराक्रम आठवल्याने हताश मन पुन्हा उभारी घेते आणि ज्यांचे पोवाडे हे भारतभू आजही अभिमानाने गाते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन आहे. त्या काळी अवघ्या काही मावळ्यांचे सैन्य घेऊन पाच पातशाह्यांचा निःपात करणारे, हिंदवी स्वराज्य स्थापना करणारे गोब्राह्मणप्रतिपालक आणि म्लेंच्छक्षयदीक्षित शिवाजी महाराज याच दिवशी छत्रपती झाले ! त्याचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला आजही आपल्याला त्या इतिहासाचे स्मरण करून देतो.

त्या रायगडावरील काही प्रेरणादायी छायाचित्रे…

shivaji-raj-mudra
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
shivaji-maharaj-raigad
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. याच ठिकाणी छत्रपतींचा राज्याभिषेक झाला !
shivaji-maharaj-darbar
याच ठिकाणी छत्रपतींचा दरबार भरत असे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

स्वाभिमानशून्य हिंदूंना शत्रूविरुद्ध लढण्याची
जाज्वल्य प्रेरणाशक्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे अद्भुत आणि शाश्‍वत असे स्फूर्तीस्थान आहेत ! पाच पातशाह्यांशी शक्ती आणि युक्ती यांच्या सामर्थ्यावर लढा देऊन हिंदू शक्तीशाली मोगलांना आव्हान देऊ शकतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखवले ! सर्व वीरांचे आदर्श स्थान असलेल्या शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये शेकडो वर्षांनंतर हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा महाशक्तीशाली आणि बलाढ्य राजसत्तेचा भगवा झेंडा रायगडावर फडकवला ! छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हे हिंदवी स्वराज्य आणि त्याच्या स्थापनेची प्रक्रिया ही संपूर्णतःच एक दैवी प्रक्रिया होती. स्वाभिमानशून्य हिंदूंना लढण्याची प्रेरणा देणे आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची निर्मिती करणे ही एक बुद्धीगअगम्य घटनाच म्हणावी लागेल !

छत्रपती शिवरायांची भवानीमातेवर निःस्सीम श्रद्धा होती. त्यांच्या मुखात अखंड जगदंब जगदंब । असे उच्चारण असे. भवानीमातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन प्रसादरूपी भवानी तलवार प्रदान केली. या तलवारीच्या बळावर त्यांनी पुढे महापराक्रम गाजवून हिंदूंना छळणार्‍या मोगलरूपी दुर्जनांचा नाश केला !

वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्‍वरावरील शिवपिंडीवर रक्ताच्या धारेचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. पुढे देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. छत्रपतींच्या जीवनातील अफझलखानाचा वध, आग्याहून सुटका, सिंहगड जिंकणे आदी सार्‍याच एकापुढे एक घडणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण घटना या कुठल्या दैवी चमत्कारांपेक्षा अल्प नव्हत्या ! त्यामुळे क्रूरकर्मा शत्रूही अवाक् झाला होता ! स्वत:च्या प्राणांची तमा न बाळगता त्यांनी मानवी रूपातील अनेक दैत्यांचे पारिपत्य केले. पुढे हिंदूंच्या रक्षणासाठी महाराजांनी स्वतःला विधिवत् राज्याभिषेक करवून घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली !

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य स्थापनेमागील हेतू

छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. तत्पूर्वी शेकडो वर्षे दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानात मुसलमानी राजवटींनी हैदोस घातला होता. समर्थ रामदासस्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड ।, असे म्हटले आहे. हे मुसलमानांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते. त्यामुळे मोगल सत्ता उलथून श्रींचे राज्य म्हणजे ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू होता. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे व्रत महाराजांनी श्रींची इच्छा म्हणूनच स्वीकारले होते. त्यासाठी आवश्यक अशा पराकोटीच्या त्यागाचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये धर्माचरणाने, भवानीमातेच्या उपासनेने आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने निर्माण झाले होते.

हिंदूंचे तेज जागृत करणार्‍या आग्याच्या मोहिमेची धाडसी योजना !

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहाच्या आडून सर्वोत्कृष्ट आणि धाडसी चाल आखली. तहानुसार त्यांनी औरंगजेबाला २३ किल्ले परत दिले. त्या कालावधीत महाराजांनी राजा जयसिंहास विजापूरच्या स्वारीवर साहाय्य करून विजय मिळवून दिला. त्यामुळे प्रसन्न होऊन औरंगजेबाने चर्चा करण्यासाठी महाराजांना आग्र्‍याला येण्याचे निमत्रंण दिले. या संधीचा लाभ उठवण्याचा धाडसी निर्णय महाराजांनी घेतला. वास्तविक स्वराज्याचा सर्वार्ंत मोठा शत्रू असलल्या क्रूर औरंगजेबाच्या २ सहस्र कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या आग्र्‍यातील दरबारात स्वतःहून जाणे, म्हणजे वाघाच्या जबड्यात स्वत:हून जाण्यासारखे आहे, हे महाराज जाणून होते. तेथे आपल्याला धोका होणार, हेही मुसलमानांची कूटनीती जाणणार्‍या महाराजांना ज्ञात होते; पण हिंदवी स्वराज्यासाठी पराकोटीच्या त्यागाची सिद्धता ठेवणार्‍या आणि ईश्‍वरावर निष्ठा असणार्‍या महाराजांनी ही संधी साधली. या संधीचा लाभ उठवत त्यांनी समस्त हिंदूंमधील तेज अन् सामर्थ्य जागवण्याची धाडसी मोहीम आखली. औरंगजेबाच्या दरबारात हिंदुस्थानातील अनेक हिंदु राजे आणि सरदार चाकरीला होते. मोगलांच्या सेवेमध्ये त्यांच्या अनेक पिढ्या खपल्या होत्या. अशा भरलेल्या दरबारात महाराजांनी प्रवेश केला आणि मी हिंदु राजा असतांना मला सरदारांच्या रांगेत उभे केले, असे म्हणून ते मोगल बादशहा औरंगजेबासमोर उभे राहून सर्वांसमोर त्याचा अपमान करून भर दरबारातून निघून गेले. त्यामुळे औरंगजेबाने महाराजांना अटक करून नजरकैदेत ठेवले आणि त्यांना ठार मारण्याची योजना आखली; मात्र महाराज अलौकिक साहस अन् बुद्धीमत्ता यांच्या क्षमतेवर औरंगजेबाचा कडेकोट बंदोबस्त तोडून पुन्हा स्वराज्यात सुखरूप परत आले. हिंदु स्वसामर्थ्यावर शक्तीशाली मुसलमानांना आव्हान देऊ शकतात, हा संदेश सर्व हिंदूंपर्यंत पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शक्य करून दाखवले. हे एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळे नव्हते. महाराजांची हिंदूंचे तेज जागवण्याची मोहीम यशस्वी झाली होती. पुढे त्याचे परिणाम दिसणार होते.

या मोहिमेमुळे शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरून औरंगजेबाविरुद्ध लढण्यास हिंदूंना प्रेरणा मिळणे

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्‍याहून निसटल्यावर औरंगजेबाची विलक्षण अपकीर्ती झाली. महाराजांच्या मुत्सद्देगिरीची आणि पराक्रमाची कीर्ती मात्र जगभर पसरली. महाराजांच्या या सुटकेने प्रेरणा घेऊन अनेक हिंदू मोगलांविरुद्ध उभे राहिले. आसाममधील लांच्छित बडफूकन हा त्यापैकीच एक वीर योद्धा मोगलांविरुद्ध लढला. औरंगजेबाचा सेनापती राजा जयसिंहाचा मुलगा राजा रामसिंग हा शिवाजी महाराजांचा हितचिंतक झाला. उत्तर हिंदुस्थानातून भूषणसारखे कवी आणि छत्रसाल बुंदेलासारखे वीर महाराजांच्या आश्रयाला आले.

हिंदूंमध्ये वीरश्री जागृत झाल्यास यश त्यांच्या
पायाशी लोळण घेते, हे छत्रपती  शिवाजी महाराजांनी कृतीतून दाखवणे

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील मोहीम ही हिंदवी स्वराज्य स्थापनेतील निर्णायक मोहीम ठरली. महाराज आग्र्‍याहून निसटल्यावर मोगल साम्राज्यास खरी उतरती कळा लागली. पुरंदरच्या तहात द्यावे लागलेले सर्व किल्ले आणि प्रदेश महाराजांनी पुन्हा जिंकून घेतले. महाराजांना अनेक हिंदू राजे आणि सरदार यांचे सहकार्य मिळू लागले. हिंदवी स्वराज्याचा विस्तार दक्षिणोत्तर अशा दोन्ही दिशांना होऊ लागला. औरंगजेबाचा हिंदु सरदारांवरील विश्‍वास उडाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला स्वतःला ५ लाखांच्या सैन्यानिशी दक्षिणेची मोहीम उघडावी लागली. आदिलशाही आणि निजामशाही त्याने १-२ दिवसांतच संपवली; मात्र स्वसामर्थ्याची जाणीव झालेल्या हिंदूंनी (मराठ्यांनी) त्याला जवळपास २५ वर्षे झुंजवले आणि शेवटी त्याचा याच हिंदवी स्वराज्यात मृत्यू झाला.

कवी भूषण म्हणतात, शिवाजी महाराजांनी वेदांचे, प्रसिद्ध पुराणांचे रक्षण केले. जिव्हेवर रामनाम ठेवले. हिंदूंची शेंडी राखली. शिपायांची रोटी राखली. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचे रक्षण केले. मोगलांना थोपवले. बादशहाला धाक घातला. शत्रूंना चक्की पिसायला लावली. सीमांचे रक्षण केले. तलवारीच्या बळावर देव, देश आणि स्वधर्म यांचे रक्षण केले अन् या सर्वांतून हिंदूच्या मनात जाज्वल्य प्रेरणाशक्ती निर्माण केली.

– श्री. वीरेश माईणकर, शिरोडा, सिंधुदुर्ग.

 

प्रत्येक संकटातून तरून देवता आणि गुरु यांच्या कृपेचे संरक्षककवच लाभणे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीला धर्माचे अधिष्ठान होते. ते कुलदेवतेचे निस्सीम उपासक होते, तसेच त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु, तसेच संत यांच्या कृपेचे पाठबळही होते. महाराजांवरही कठीण प्रसंग आले; परंतु प्रत्येक प्रसंगात त्यांना ईश्‍वराने सुखरूप सोडवले. अफझलखानाच्या आक्रमणाच्या वेळी समर्थ रामदासस्वामींनी त्यांना पत्राद्वारे मार्गदर्शन केले होते. आग्रा येथे औरंगजेबाच्या मृत्यूच्या जबड्यात असतांना त्यांना शंभूदेवाने दृष्टांत देऊन निसटण्याची युक्ती सांगितली होती. अशा प्रत्येक संकटातून ते तरू शकले; कारण देवता आणि गुरु यांच्या कृपेचे संरक्षककवच त्यांना लाभले होते. त्यांच्या कार्याला देवता आणि गुरु यांचे आशीर्वाद असल्यानेच ते हिंदवी स्वराज्य संस्थापित करू शकले.

– पू. संदीप आळशी

 

संत तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश !

एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्शन, सत्संग आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी देहू या गावी गेले होते. ईश्‍वरनिष्ठ महापुरुषाला पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांच्या कृपेची याचना करू लागले; परंतु दूरदृष्टीसंपन्न लोकसंत तुकाराम महाराजांनी त्यांना समर्थ रामदासस्वामींना शरण जाण्याचा उपदेश केला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातसुद्धा याचा उल्लेख मिळतो.

राजा छत्रपती ऐकावें वचन । रामदासीं ध्यान । लावा वेंगी  ॥ १ ॥
रामदासस्वामी सोयरा सज्जन । यासि तूं नमन अर्पी बापा  ॥ २ ॥
मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागीं ॥ ३ ॥

– सार्थ श्री तुकारामाची गाथा, पृष्ठ ९९१

अर्थ : हे छत्रपती राजा, मी सांगतो ते ऐक. त्वरित समर्थ रामदासस्वामींच्या भक्तीमध्ये आपले मन लाव. समर्थ रामदासस्वामी शरण आलेल्या भक्ताला आश्रय देणारे सज्जन संत आहेत; म्हणून त्यांना आपले तन, मन आणि धन म्हणजेच सर्वस्व अर्पण कर. रामदासस्वामी साक्षात मारुतीचा अवतार आहेत. ते तुम्हाला उपदेश करतील, यात कसलाच संशय नाही.

(संदर्भ : पृ. २८-२९)

छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय, हे सांगून राजधर्म समजावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तने आणि मार्गदर्शने यांतून प्रेरणा घेतली.

 

रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुभक्तीची घेतलेली परीक्षा

वर्ष १६७२ मध्ये समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली. राजकीय परिस्थितीमुळे राजांना स्वामींचा सहवास अधिक काळ लाभला नाही; परंतु प्रत्यक्ष आणि पत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या समर्थांच्या मार्गदर्शनाचे महाराजांनी तंतोतंत पालन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली !

शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एकदा राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. त्यांनी समर्थांचा पुष्कळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. इतक्यात एका गुहेतून विव्हळण्याचा स्वर ऐकू आला. ते त्या गुहेत शिरले. रामदासस्वामी पोटशूळाने व्यथित होते. यावर एकमेव उपाय म्हणजे वाघिणीचे दूध असल्याचे त्यांनी सांगितल्यावर छत्रपती शिवराय त्यांचा तांब्या घेऊन निघाले. हा देह कधी ना कधी तरी नाहीसा व्हायचाच आहे ना ? सद्गुरुसेवेत खर्ची पडला, तर याचे सार्थक होईल, असा त्यांचा विचार होता.

रानात दुरून येणारी वाघीण पाहून त्यांनी तिला वंदन करून गुरूंना औषधासाठी दूध देण्याविषयी प्रार्थना केली. ते म्हणाले, माझ्या देहावर तुझे मन आसक्त झाले असेल, तर तुझे दूध गुरूंना देऊन मी लगेच परत येतो. वाघिणीचा क्रूर स्वभाव नाहीसा होऊन ती सभ्य गायीप्रमाणे उभी राहिली. राजांनी लगेच तिचे दूध काढून घेतले. राजे तेथून परतणार इतक्यात जय जय रघुवीर समर्थ, असे म्हणून समर्थ तेथे आले. त्यांनी शिवाजींची पाठ थोपटून, शिवबा, तू खरोखरच धन्य आहेस ! असे उद्गार काढले. (५५/१६०)