शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !

Article also available in :

अनुक्रमणिका

सुलभ आरोग्यदायी दिनचर्या

वैद्य मेघराज पराडकर

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीर निरोगी रहावे, यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतूचर्या सांगितल्या आहेत. साधकांनी त्यांचे पालन केल्यास आरोग्य सुधारण्यासह साधनेची फलनिष्पत्तीही वाढते. आज आपण दिनचर्येविषयी कृतीत आणावयाची काही सूत्रे समजून घेऊ. दिनचर्या पाळण्यासाठी वेगळा वेळ न देता दैनंदिन व्यवहारातच या गोष्टी सोप्या पद्धतीने कशा आचरणात आणता येतील, याचा विचार या लेखात करण्यात आला आहे.

 

१. ब्राह्ममुहूर्तावर उठणे

आयुर्वेदामध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठावे, असे सांगितले आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी ९६ ते ४८ मिनिटांचा काळ. या वेळेत उठल्यास शौचाची संवेदना आपोआप निर्माण होऊन पोट साफ होते. ज्यांना ब्राह्ममुहूर्तावर उठणे शक्य नाही त्यांनी न्यूनातिन्यून सकाळी ७ वाजेपर्यंत तरी उठावे. हळूहळू लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. सूर्योदयानंतर झोपून राहिल्यास अंग जड होणे, आळस येणे, पचनसंस्था बिघडणे, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास उद्भवू शकतात.

 

२. सकाळी उठल्यावर पाणी पिऊ नये !

काही योगशिक्षक सकाळी उठून तांब्याभर पाणी पिण्यास सांगतात. योगशास्त्राचे सर्व नियम पाळून नियमितपणे आसने, प्राणायाम इत्यादी करणार्‍यांना असे पाणी प्यायल्यास काही अपाय होत नाही; परंतु सामान्य माणसाने सकाळी अनावश्यक पाणी प्यायल्यास त्याची पचनशक्ती मंद होते. पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी. तो मंद होणे, हे सर्व रोगांचे कारण आहे.

 

३. शौच

पुष्कळ जणांचे सकाळी चहा घेतल्याविना शौचाला होत नाही, असे गार्हा्णे (तक्रार) असते. बर्‍याच वेळा हा सवयीचा परिणाम असतो. ज्यांना सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही त्यांनी साधारण १ आठवडा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण उष्ण पाण्यातून घ्यावे. सकाळी उठल्यावर २ मिनिटे फेर्‍या मारून शौचाला जाऊन बसावे; पण कुंथू नये (जोर करू नये). असे आठ दिवस केल्यास हळूहळू सकाळी उठल्यावर पोट साफ होण्याची सवय लागते.

अ. ‘शौचाला होण्यासाठी तांब्याभर पाणी पिणे’ ही सवय असल्यास ती मोडावी

‘सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यायले, तरच शौचाला होते’, अशी सवय असेल, तरीही सकाळची ही पाणी पिण्याची सवय मोडावी. पाणी पिऊन शौचाला होण्यापेक्षा जठराग्नी (पचनशक्ती) चांगला असणे महत्त्वाचे आहे. तो चांगला राहिला, तर योग्य वेळी आपणहून  शौचाला होतेच, त्यासह आरोग्यही चांगले रहाते.’

४. मुखमार्जन

प्रथम कुंचल्याने (ब्रशने) दात स्वच्छ करावेत. त्यानंतर (सनातन) दंतमंजन किंवा (सनातन) त्रिफळा चूर्ण यांनी हळूहळू दात घासावेत आणि हिरड्यांनाही ते चूर्ण लावावे. यामुळे हिरड्या बळकट होतात. कोणत्याही टूथपेस्टमध्ये (अगदी काही नामवंत स्वदेशी आस्थापनांच्या टूथपेस्टमध्येही) फ्लुराइड आणि सोडियम लॉरिल सल्फेट नामक हानीकारक घटक असतात. त्यामुळे टूथपेस्टचा वापर टाळावा.

दातांचे आरोग्य राखण्यासाठी घ्यावयाची काळजी

२ ते ४ चमचे काळे तीळ सकाळी चावून खाल्याने दातांचे आरोग्य सुधारते. पिष्टमय पदार्थ, साखर किंवा इतर गोड पदार्थ अत्यधिक प्रमाणात अन् सतत खाल्ल्याने दात किडण्याचा धोका वाढतो. दातांच्या आरोग्यासाठी अधिक आंबट पदार्थ किंवा अतिशय थंड वा उष्ण (गरम) पदार्थ किंवा पेये टाळावीत. कोणताही पदार्थ, विशेषतः चॉकलेट खाऊन झाल्यावर लगेच ब्रशने दात घासून खळखळून चूळ भरावी.

 

५. नाकात औषध घालणे (नस्य)

नाकात २-२ थेंब तेल वा तूप घालणे याला नस्य असे म्हणतात. नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते. डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे. थंडीच्या दिवसांत नस्य सकाळी करणे शक्य नसल्यास दुपारी जेवणानंतर लगेचच करता येते.

५ अ. पूर्वसिद्धता

ड्रॉपर असलेली औषधाची लहान रिकामी बाटली स्वच्छ धुवून कोरडी करून तिच्यात खोबरेल तेल घालून ठेवावे. सकाळी दात घासण्यापूर्वी ही बाटली गरम पाण्यात ठेवावी, म्हणजे दात घासून होईपर्यंत हे तेल कोमट होते.

५ आ. कृती

दात घासून झाल्यावर नाक शिंकरून घ्यावे. त्यानंतर तोंडावर कोमट पाणी मारून तोंडवळा थोडा शेकून घ्यावा. नंतर तोंडवळा पुसून झोपलेल्या स्थितीत उशी डोक्याऐवजी मानेखाली घेऊन नाकपुड्या सरळ उभ्या येतील अशा बेताने डोके थोडेसे वळवावे आणि दोन्ही नाकापुड्यांमधील पडद्यावर (Nasal septumवर) दोन्हीकडून कोमट खोबरेल तेलाचे २-२ थेंब सोडून १ मिनिट त्याच स्थितीत थांबावे. घशात आलेले तेल नंतर थुंकून टाकावे, ते गिळू नये. नस्याच्या वेळी घशाशी आलेले तेल गिळल्यामुळे पचनशक्ती मंद होते. १ मिनिटानंतर पूर्वीप्रमाणे तोंडवळा कोमट पाण्याने शेकून कोमट पाण्याच्या गुळण्या करून टाकाव्यात.

नस्यासाठी खोबरेल तेलाप्रमाणेच गायीचे साजूक तूप किंवा तिळाचे तेलही वापरू शकतो. पित्ताचा त्रास असलेल्यांनी खोबरेल तेल किंवा तूप वापरावे.

 

६. तोंडात तेल धरणे (गंडूष)

नस्य झाल्यावर २ चमचे कोमट तेल (तीळतेल किंवा खोबरेल तेल) ५ मिनिटे तोंडात धरावे. यांमुळे दात आणि हिरड्या निरोगी रहातात. ज्यांचे दात शिवशिवतात किंवा ज्यांना तोंडात लाळ येण्याचे प्रमाण अल्प आहे, त्यांनी हे अवश्य करावे. तोंडात तेल धरलेले असतांनाच पुढे सांगितलेले कर्णपूरण इत्यादी विधी करता येतात. त्यामुळे वेळ वाचतो. ५ मिनिटांनंतर हे तेल थुंकून टाकावे, ते गिळू नये. तेल थुंकून टाकल्यावर आवश्यकतेनुसार कोमट पाण्याने चूळ भरावी.

 

७. कानात तेल घालणे (कर्णपूरण)

तोंडामध्ये तेल धरलेले असतांनाच कुशीवर झोपून एका कानात कोमट तेलाचे ३-४ थेंब घालावेत. २ मिनिटे याच स्थितीत रहावे. त्यानंतर कानात कापसाचा बोळा ठेवून दुसर्‍या कुशीवर वळून दुसर्‍या कानातही कोमट तेल घालावे. कर्णपूरणासाठी खोबरेल तेल, तीळतेल किंवा सरकीचे तेलही वापरू शकतो.

७ अ. लाभ

कानात तेल घातल्याने कानाचे आरोग्य सुधारते. कान दुखणे, चक्कर येणे, उभे राहिल्यावर रक्तदाब न्यून होणे, चालतांना तोल जाणे यांसारख्या व्याधींमध्ये नियमित कर्णपूरण करण्याने लाभ होतो. जे लोक नेहमी कानाला इअरफोन लावून असतात त्यांनी नेहमी कर्णपूरण करावे.

७ आ. कर्णपूरण करतांना घ्यायची दक्षता

कर्णपूरणासाठी वापरायचे तेल चांगले उष्ण (गरम) करून थंड करावे आणि नंतर स्वच्छ कोरड्या बाटलीत भरावे. तेलामध्ये किंवा बाटलीमध्ये पाण्याचा अंश राहिल्यास तेलाला बुरशी येऊ शकते. असे तेल कानात घातल्यास कानाला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. कानाला छिद्र असेल किंवा कानाला जंतूंचा संसर्ग झाला असेल, तर कर्णपूरण करू नये. कानात तेल घातल्यावर ते घशात आल्यास कानाला छिद्र आहे, असे अनुमान करता येते. अशा वेळी कानाच्या वैद्यांकडून कान पडताळून घ्यावा. काही वेळा कानात तेल घातल्यावर कानातील मळ फुगल्याने कान दुखू लागतो. कानाला दडे बसतात. अशा वेळी कापूस लावलेल्या काडीने कानातील मळ हळूवारपणे काढावा. मळ कडक असल्यास तज्ज्ञ वैद्यांकडून पडताळणी करून घ्यावी.

 

८. औषधी धूर घेणे (धूमपान)

नाक किंवा तोंड यांच्या वाटे औषधी धूर घेणे म्हणजे धूमपान.

८ अ. लाभ

वारंवार सर्दी होणे, दमा, डोके जड होणे, खोकला यांसारख्या व्याधींमध्ये धूमपानामुळे लाभ होतो. वातावरणात थंडी वाढल्यामुळे होणार्‍या आणि औषधे घेऊनही बर्‍या न होणार्‍या खोकल्यावर धूमपान ही नामी मात्रा आहे. धूमपानामुळे श्वसनमार्गात साठलेला अतिरिक्त कफ दूर होऊन श्वयसनसंस्था निरोगी रहाण्यास साहाय्य होते.

८ आ. पूर्वसिद्धता

२ चौरस इंच कागदाची सुरळी करून विडीप्रमाणे पोकळ नळी बनवावी. नळी एकीकडे थोडी निमुळती असावी. निमुळत्या भागाला कडेने सेलोटेप चिकटवावी, म्हणजे नळी उघडणार नाही. नळीच्या रुंद छिद्रातून तिच्यामध्ये ओवा भरावा. ओव्याच्या ठिकाणी वाळवलेल्या तुळशीच्या पानांचा चुराही वापरता येतो, तसेच चिलीम उपलब्ध असल्यास कागदाच्या ठिकाणी तिचा वापर करता येतो.

८ इ. कृती

ओवा भरलेल्या नळीचा निमुळता भाग तोंडात हळूवारपणे धरून रुंद भाग लाइटरने किंवा काडीने पेटवावा. नळीसह ओवा जळत असतांना ओव्याचा धूर सावधपणे तोंडावाटे आत घ्यावा आणि तोंडानेच बाहेर सोडावा. धूर बाहेर सोडतांना नळी तोंडातून कडेला काढावी. अशा प्रकारे ३-४ वेळा ओव्याचा धूर तोंडाद्वारे श्वासासह आंत ओढून घेऊन सोडावा. सर्व झाल्यावर नळीतील उरलेला ओवा डबीत भरून ठेवावा आणि जळलेला कागद टाकून द्यावा. डबीतील ओवा दुसर्‍या दिवशी वापरता येतो.

 

९. अंगाला तेल लावणे (अभ्यंग)

त्यानंतर संपूर्ण अंगाला तेल लावावे. यासाठी खोबरेल, तीळतेल, सरकीचे तेल यांपैकी कोणतेही तेल चालते.

९ अ. लाभ

नियमित अभ्यंग केल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, तरतरी येते, दृष्टी सुधारते आणि अंग पुष्ट होऊन बळकटी येते. सांध्यांना वंगण मिळते. थंडीच्या दिवसांत कोरड्या हवेत थंडीमुळे त्वचा फुटते, तसेच पायाला भेगा पडतात. अशा वेळी अभ्यंग केल्यास लगेच लाभ दिसून येतो. अभ्यंगामुळे स्थूल माणसाचा मेद (चरबी) झडतो आणि कृश माणसाचे शरीर पुष्ट होते. हे कार्य मेद धातूमधील सूक्ष्म अन्न वाहून नेणार्‍या वाहिन्या मोकळ्या झाल्याने साध्य होते. नियमित अभ्यंग केल्याने त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत.

९ आ. पूर्वसिद्धता

एका बाटलीत अभ्यंगासाठीचे तेल भरून घ्यावे. तेलात १०० मि.ली.ला २ ग्रॅम या प्रमाणात कापराची भुकटी विरघळवून घ्यावी. अंगाला तेल लावण्यापूर्वी ते कोमट करून मग लावावे.

अभ्यंगासाठीचे तेल (सनातन) गोमूत्राच्या लहान रिकाम्या बाटलीतही भरू शकतो. सकाळी दात घासण्यापूर्वी ही बाटली गरम पाण्यात बुडवून ठेवली, तर अभ्यंगाच्या वेळेपर्यंत हे तेल कोमट होते.

९ इ. कृती

केस वगळून संपूर्ण अंगाला लावण्यासाठी एका वेळेला २० मि.ली. तेल लागते. हे तेल तोंडवळ्यापासून पायांपर्यंत संपूर्ण अंगाला लावून घ्यावे. यासाठी ५ मिनिटे कालावधी पुरेसा होतो. तेल चोळतांना आवश्यकतेनुसार दाब देऊ शकतो.

९ इ १. विविध अवयवांना तेल चोळण्याची दिशा

मालीश करण्याच्या अनेक पद्धती असल्या, तरी या ठिकाणी न्यूनातिन्यून वेळेत करता येईल, अशी पद्धत दिली आहे.

९ इ २. अभ्यंगासंबंधी विशेष सूचना

अ. एका हाताला तेल लावून झाल्यावर दुसर्‍या हाताला लावण्यासाठी दुसरे तेल न घेता पहिल्या हाताचेच अतिरिक्त तेल दुसऱ्या हाताला लावता येते. याप्रमाणे पायांनाही करता येते. असे केल्यामुळे अल्प तेलात कार्य साधते.

आ. धर्मशास्त्रानुसार विशिष्ट वारी अभ्यंगाच्या तेलात मिसळण्याचे पदार्थ 

अभ्यंगाच्या तेलात रविवारी फुले, मंगळवारी माती, गुरुवारी दूर्वा आणि शुक्रवारी गोमय (गायीचे शेण) मिसळून त्या तेलाने अभ्यंग केल्यास या दिवशी अभ्यंग केल्याने लागणार्‍या दोषांचे निवारण होते.

इ. जेवण झाल्यानंतर न्यूनातिन्यून ३ घंटे अभ्यंग करू नये. त्यामुळे जठर आणि आतडी यांच्याकडे जाणारा रक्तप्रवाह काही प्रमाणात स्नायू अन् त्वचा यांच्याकडे वळवला जातो आणि त्या ठिकाणी असलेल्या विषस्वरूप आमाचे (अपचित अन्नाचे) सूक्ष्म कण, त्वचा आणि स्नायू यांच्याकडे नेले जाऊन तेथे विकार निर्माण करतात.

 

१०. व्यायाम

१० अ. व्यायामाचे प्रमाण

अभ्यंग केल्यावर शरिराच्या अर्ध्या शक्तीने व्यायाम करावा. व्यायाम करत असतांना तोंडाने श्वांस चालू झाला म्हणजे अर्धी शक्ती वापरली गेली, असे समजावे. अजून व्यायाम करायचा असल्यास थोडा वेळ थांबून श्वास पुन्हा नाकावाटे सुरळीत चालू झाल्यावर करू शकतो. न्यूनतम २० मिनिटे व्यायाम करावा. सूर्यनमस्कारही घालू शकतो.

१० आ. व्यायामाविषयी काही प्रायोगिक सूचना

१. व्यायाम प्रथमच करत असल्यास पहिल्याच दिवशी खूप व्यायाम करू नये. व्यायाम प्रत्येक दिवशी थोडा थोडा वाढवावा आणि स्वतःला झेपेल एवढाच करावा.

२. व्यायामानंतर शरिराचे तापमान वाढते. थंडीच्या दिवसांत सकाळी उठल्यावर खूप थंडी वाजत असेल, तर २ मिनिटे जागच्या जागी धावल्यामुळे थंडी वाजण्याचे प्रमाण लगेच न्यून होते.

३. व्यायामानंतर २ मिनिटे सुक्या अंगपुसणीने किंवा हातांनी सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात न्यून होतो, तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युतप्रवाह निर्माण होऊन तो शरिरातील रोगांना नष्ट करतो.

४. व्यायाम झाल्यावर ३० मिनिटांनंतर स्नान करावे. या मधल्या ३० मिनिटांमध्ये कपडे धुणे, वाचन अथवा नामजप करू शकतो.

५. अभ्यंगानंतर व्यायाम करायचा नसल्यास २० मिनिटांनंतर स्नान करू शकतो. अगदीच घाई असल्यास अभ्यंगानंतर ५ मिनिटांनंतरही स्नान करू शकतो. तेल लावल्यावर ५ मिनिटांमध्ये ते त्वचेमध्ये जिरू लागते. अंग चोळण्याच्या ५ मिनिटांत हे साध्य होते. तरीही तेल लावून २० मिनिटे थांबू शकत असल्यास उत्तम.

६. सकाळी प्रशिक्षण वर्गाला जायचे असल्यास (सामूहिक व्यायाम करायचा असल्यास) धूमपानापर्यंत कृती करून प्रशिक्षण वर्गाला जावे. प्रशिक्षण वर्ग झाल्यावर १५ मिनिटे शांत बसून वाचन अथवा नामजप करावा. त्यानंतर ५ मिनिटे अंगाला तेल लावून थोडा वेळ थांबून स्नान करावे.

७. अभ्यंग करून (अंगाला तेल लावून) व्यायाम केल्यावर घाम येत नाही, असे नसते. उलट अभ्यंग करून व्यायाम केल्याने तेलाचे कार्य चांगले घडून येते.

 

११. स्नान

११ अ. स्नानासाठीचे पाणी

अंगाला तेल लावलेले असल्याने स्नानासाठी कोमट पाणी घ्यावे. स्नान करतांना प्रथम आपले डोके भिजवावे, मग पाय भिजवावेत. पहिल्यांदाच पाय ओले केल्यास शरिरातील उष्णता वर जाऊन आरोग्याला अपाय होतो. डोक्यावर उष्ण पाणी घेतल्याने केस गळतात, म्हणून डोक्यावर नेहमी कोमट पाणी घ्यावे. थंड पाण्याने अंघोळ करणारा डोक्यावर थंड पाणी घेऊ शकतो. थंडीच्या दिवसांत थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

११ आ. स्नान करतेवेळी मोठ्याने नामजप अथवा स्तोत्र म्हणण्याचा लाभ

अंगावर एकाएकी पाणी ओतल्यामुळे प्राण आणि उदान वायूंच्या गतींमध्ये असंतुलन निर्माण होते. काहींना स्नान झाल्यावर एकाएकी थकायला होते, तेव्हा त्यामागे प्राण आणि उदान वायूंची गती असंतुलित होणे, हे एक कारण असू शकते. पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर ओततांना मोठ्याने नामजप केल्यास किंवा एखादे स्तोत्र म्हटल्यास प्राण आणि उदान वायूंची गती संतुलित रहाते आणि अंघोळीनंतर थकवा येण्याचे प्रमाण उणावते.

११ इ. उटणे लावणे

अभ्यंगामुळे अंगाला लागलेले अतिरिक्त तेल उटणे लावल्याने जाते. यासाठी (सनातन) उटणे, हरभर्‍याचे किंवा चण्याचे पीठही वापरू शकतो. उटणे लावल्याने चरबी न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे स्थूल माणसांनी उटणे लावावेच.

११ ई. साखरविरहित चहा किंवा कशाय यांच्या भुकटीचा उटण्याप्रमाणे वापर करणे

चहात घालण्याची साखर पाणी उकळल्यावर न घालता ती चहा गाळून झाल्यावर गाळलेल्या चहामध्ये घातल्यास इंधन (गॅस) वाचते, साखर नेहमीपेक्षा अल्प प्रमाणात लागते आणि ती चहाच्या भुकटीत मिसळत नाही. अशी साखर विरहित चहाची भुकटी उन्हात वाळवून तिचा उटण्याप्रमाणे वापर करता येतो. चहाऐवजी धने-जिरे यांचा कशाय करत असल्यास त्या भुकटीचाही असाच वापर करता येतो.

११ उ. स्नानाच्या वेळी साबण लावू नये

स्नानाच्या वेळी साबण लावू नये. साबणातील कृत्रिम द्रव्यांमुळे त्वचा रूक्ष बनते. साबणाऐवजी वर सांगितल्याप्रमाणे उटणे लावावे. एका वेळी अंगाला लावण्यासाठी २ चमचे उटणे पुरेसे होते. उटण्याप्रमाणेच मुलतानी माती किंवा वारुळाची मातीही वापरता येते, तसेच शिकेकाई, आवळकाठी, रिठे, तीळ यांचे चूर्ण एकत्र करून त्याचा साबणासारखा वापर करता येतो.

स्नान करतांना साबण न लावणे हे आदर्श असले, तरी अंगाला लागलेले अतिरिक्त तेल काढण्यासाठी काही जणांना साबण लावणे सोईचे वाटते. अशा वेळी साबण लावल्यावर अंग जास्त रगडू नये. त्वचेवरील सर्व तेल साबणाने न काढता तेलाचा थोडासा ओशटपणा त्वचेवर राहू द्यावा. अंग पुसल्यानंतर त्वचेवर आवश्यक तेवढा तेलकटपणा रहातो, तेल कपड्यांना लागत नाही आणि या तेलकटपणाचा त्रास न होता त्वचा मऊ रहाण्यास लाभ होतो.

११ ऊ. शॅम्पूपेक्षा शिकेकाई वापरा !

स्नान करतांना केसांना शॅम्पू मुळीच लावू नये. साबणासारखा फेस येणार्या् शॅम्पूमध्ये सोडियम लॉरिल सल्फेट नावाचे विषारी द्रव्य असते. शॅम्पूपेक्षा (सनातन) शिकेकाई वापरू शकतो.

११ ए. स्नान कधी करू नये ?

ताप, तोंडाला चव नसणे, अपचन, पोटफुगी, अतिसार (रेच होणे) यांसारखे विकार, अतिशय भूक लागणे, डोळे अन् कान दुखणे, तोंडवळा एकाएकी वाकडा होणे अशा स्थितींत स्नान करू नये, तसेच काही खाऊन किंवा जेवल्यावरही स्नान करू नये. खाल्ल्यावर स्नान करायचे झाल्यास ते ३ घंट्यांनंतर करावे.

 

१२. केसांना तेल लावणे

अंघोळ झाल्यावर केसांना तेल लावावे. केस किंचित ओले असतांना तेल लावल्यास ते चांगले लागते. तेल लावतांना ते केसांच्या मुळांना लागेल असे लावावे. यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे न्यून होते.

सध्या पेठेत (बाजारात) तेलकटपणा नसलेली केसांसाठीची तेले मिळतात. त्यांमध्ये वनस्पतीज तेल नसून खनिज तेल असते. अशा तेलांचा केसांसाठी काहीही लाभ नसतो. डबल रिफाइण्ड, ट्रिपल रिफाइण्ड यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांसाठी अत्यंत पोषक असते.

 

१३. आहाराविषयी मार्गदर्शक सूत्रे

नेहमी आधीचा आहार जिरल्यावर हित आणि मित आहार घ्यावा. भूक नाही आणि जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत, अशी स्थिती असतांना जेवणापूर्वी अर्धा घंटा १ सें.मी. आल्याचा तुकडा मीठ लावून चावून खावा, म्हणजे भूक लागते. तरीही भूक लागली नाही, तर ४ घास न्यूनच खावे. योग्य वेळी भूक लागणे, हे आरोग्याचे लक्षण आहे. अल्पाहार वा जेवण करून लगेच स्नान करू नये. खाल्ल्यावर स्नान करायचे असल्यास मध्ये ३ घंट्यांचा अवधी जाऊ द्यावा; मात्र स्नान करून लगेच आहार घेता येतो.

 

१४. जेवणानंतर वज्रासनात बसणे आणि वामकुक्षी

ज्यांना शक्य असेल त्यांनी जेवणानंतर ५-१० मिनिटे वज्रासनात बसावे, म्हणजे पचनसंस्थेला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊन पचन क्रिया सुधारते. या वेळेत नामजप अथवा स्वयंसूचनांचे सत्र करू शकतो. दुपारी जेवणानंतर वयोवृद्ध (६० वर्षांहून अधिक वय असलेले) साधक विश्रांती घेऊ शकतात. जे पहाटे लवकर उठतात, तेही दुपारी २० मिनिटे वामकुक्षी घेऊ शकतात. इतरांनी शक्यतो दुपारी झोपणे टाळावे. अगदी झोपायचेच असल्यास बसल्या बसल्या झोप घ्यावी. दुपारचे भोजन पचण्यास हलके असल्यास दुपारी जास्त झोपही लागत नाही.

 

१५. पाणी पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे

१५ अ. दिवसभरात किती पाणी प्यावे ?

पाणी किती आणि कधी प्यावे याविषयी पुष्कळ मतभेद आढळतात. या मतभेदांमुळे सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये पाणी कधी प्यावे याविषयी पुढील सूत्र दिलेले आहे.

ऋते शरन्निदाघाभ्यां पिबेत् स्वस्थोऽपि चाल्पशः ।

– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ५

अर्थ : शरद आणि ग्रीष्म ऋतू वगळता निरोगी माणसाने दिवसभरात थोडेच पाणी प्यावे. तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्याला पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला अनुक्रमे तहान आणि भूक लागते. तहान लागते त्या वेळी एकाएकी घटाघट पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे, असे आयुर्वेद सांगतो.

संस्कृतमध्ये क म्हणजे पाणी आणि त्या कने, म्हणजे पाण्याने फलित होतो, तो कफ. अनावश्यक पाणी प्यायल्यामुळे शरिरात कफदोष वाढून पचनशक्ती मंद होते. काहीजणांना वैद्यांनी त्यांच्या रोगाला अनुसरून भरपूर पाणी पिण्यास सांगितलेले असते. ते पाणी रोग्याने एकाएकी न पिता दिवसभरातून थोडे थोडे प्यावे. ज्यांना पाव, ब्रेड यांसारखे मैद्याचे पदार्थ खाणे टाळता येत नाहीत, त्यांनी असे पदार्थ खातांना मध्ये मध्ये कोमट पाणी प्यावे, म्हणजे ते पदार्थ पचतात.

१५ आ. जेवतांना पाणी प्यावे कि पिऊ नये ?

याविषयी मार्गदर्शक सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपाः ।

– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ५

अर्थ : जेवतांना मधे मधे थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे पचन व्यवस्थित होते. जेवणानंतर (भरपूर) पाणी प्यायल्यास व्यक्ती स्थूल होते, म्हणजे अनावश्यक चरबी वाढते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास भूक मंदावते, जेवण न्यून जाते आणि व्यक्ती कृश होते; पण असे कृश होणे आरोग्याला अपायकारक असते.
जेवतांना मधे मधे थोडे थोडे पाणी पिणेच योग्य आहे. जेवणात द्रव पदार्थ भरपूर असल्यास वेगळे पाणी पिण्याची आवश्यकता नसते.

१५ इ. उभ्याने पाणी प्यायल्याने खरेच गुडघेदुखी होते का ?

‘काहीजण म्हणतात की, उभ्याने पाणी प्यायल्याने गुडघ्यांचा संधीवात होतो. हे लोक एखादी व्यक्ती उभ्याने पाणी पितांना दिसली रे दिसली, की तिला एवढ्या आग्रहीपणे हे सूत्र सांगतात की, पाणी पिणारी व्यक्ती भांबावून जाते. ‘उभ्याने पाणी पिणे’, म्हणजे एक महाभयंकर अपराध आहे, अशा स्वरूपाचे ते सांगणे असते. खरेतर ‘उभ्याने पाणी प्यायल्याने संधीवात होतो’, याला काही शास्त्रीय आधार नाही. बसून पाणी पिणे, हे आदर्श असले, तरी ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)

 

१६. संगणकीय सेवा करतांना पाळावयाची पथ्ये

संगणकाच्या पुढ्यात सतत बसून राहिल्यामुळे शरिराची विशेषतः आतड्यांची हालचाल न्यून होते. त्यामुळे सतत बैठे काम करणार्‍यांना बद्धकोष्ठता आणि कालांतराने बद्धकोष्ठतेमुळे पित्ताचा त्रास उद्भवतो, तसेच एकसारखे संगणकाकडे बघून डोळ्यांवरही ताण येतो. संगणकाचे असे दुष्परिणाम टाळण्यासाठी साधारण प्रत्येक घंट्याने (तासाने) २ मिनिटे चालावे. चालता चालता मान, खांदे आणि हात मोकळे करावेत.

प्रत्येक २० मिनिटांनंतर डोळ्यांना २० सेकंदांची विश्रांती द्यावी, म्हणजे डोळे बंद करावेत आणि डोळ्यांची हालचाल करावी. नंतर २० फुटांपेक्षा जास्त अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद पहावे. याला २०-२०-२० चा नियम असे म्हणतात.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)

 

१७. चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

१७ अ. चहाचे दुष्परिणाम

चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो. चहामुळे शरिराची हानीच अधिक होत असली, तरी चहाचे व्यसन जडल्यामुळे सामान्य माणसाला चहा सोडता येत नाही.

१७ आ. चहाला पर्याय

१७ आ १. धने-जिर्‍याचा कशाय

चहापेक्षा धने-जिर्‍याचा कशाय पिणे चांगले असते.

१७ आ २. बडिशेप इत्यादींचा कशाय

प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायात पुढील औषधी घटक वापरून कशाय करण्याचा प्रघात आहे. बडिशेप, धने, जिरे, ओवा, बाळंतशेप, गोखरु, वावडिंग, सुंठ आणि ज्येष्ठमध या वस्तू सम प्रमाणात घेऊन थोड्या भाजून मग दळून घ्याव्यात. प्रतिदिन काढा करण्यासाठी कपभर पाण्यात पाऊण चमचा दळलेली भुकटी घालून उकळून घ्यावे आणि कशाय गाळून उष्ण असतांना घ्यावा. त्यात साखर, मीठ, दूध इत्यादी काही घालावे लागत नाही.

१७ आ २ अ. लाभ : हा काढा पोटाला पुष्कळ चांगला असतो. यातील बडिशेप आणि धने पोट स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहेत, जिरे शरिरातील उष्णता न्यून करते, ओव्यामुळे पोटात वायू (गॅसेस्) होत नाही, वावडिंगामुळे जंत होत नाहीत, सुंठीमुळे कफ होत नाही आणि ज्येष्ठमधाने काढ्याला गोडी येते अन् घसा स्वच्छ रहातो.

१७ आ ३. तुळशीचा काढा

प्रत्येक ऋतूनुसार ठराविक औषधी वनस्पतींचा काढा घेणे आरोग्याला अतिशय उपयुक्त ठरते. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा आवश्यकतेनुसार साखर घालून घेऊ शकतो. या काढ्यात दूध घालू नये. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांत तुळशीचा काढा घेतल्याने सर्दी, खोकला, ताप येणे इत्यादी विकार होत नाहीत. तुळस विषघ्न असल्याने शरिरातील विषारी द्रव्यांचा नाश होतो, तसेच पचन सुधारून भूक चांगली लागू लागते.

१७ आ ३ अ. तुळशीचा काढा करण्याची पद्धत

मंजिर्‍यासहित तुळशीची २५-३० पाने १ कप पाण्यात उकळावीत. पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा. काढा गाळून उष्ण असतांनाच आवश्यकतेनुसार साखर घालून किंवा न घालता प्यावा. तुळशीचा काढा करण्यापूर्वी ३ घंटे तुळशीची पाने पाण्यात भिजवून ठेवल्यास काढ्यात तुळशीचा अर्क अजून चांगला येतो. सकाळ-सायंकाळ काढा करणार असू, तर एक वेळ वापरलेल्या पानांसमवेत थोडी नवीन पाने वापरू शकतो.

आयुर्वेदामध्ये दिलेली दिनचर्या अशा पद्धतीने पाळण्यासाठी आपल्याला अतिरिक्त वेळ द्यावा लागत नाही. प्रतिदिन अशी दिनचर्या पाळल्यास आपण पुष्कळ रोग टाळून जीवनातील अमूल्य वेळ वाचवून साधना चांगल्या पद्धतीने करू शकतो.

 

१८. नैसर्गिक शारीरिक वेग रोखू नयेत !

अधोवात (गुदद्वारातून सरकणारा वायू), शौच, लघवी, शिंक, तहान, भूक, झोप, खोकला, श्रमामुळे लागलेली धाप, जांभई, अश्रू, उलटी आणि शुक्रधातूची च्युती (वीर्यपात) हे १३ नैसर्गिक वेग आहेत. हे वेग आल्यास ते कधीही रोखून धरू नयेत, तसेच ते वेग जाणूनबुजून निर्माणही करू नयेत, उदा. शौचाची संवेदना झाल्यावर ती रोखून धरू नये आणि शौचास होत नसल्यास कुंथू नये. नैसर्गिक वेगांविषयी हे पथ्य प्रयत्नपूर्वक पाळल्यास शरीर निरोगी रहाते. बहुतेक वेळा गाडी लागते म्हणून गोळी घेऊन नैसर्गिकपणे होणारी उलटी रोखून धरली जाते. त्या वेळी औषधाच्या योगाने उलटीचा वेग रोखून धरला जातो. असे एक लहानसे कारणही पुढे अनेक मोठ्या रोगांना आमंत्रण देऊ शकते, म्हणून नैसर्गिक वेग बळाने रोखून न धरता ते येऊ द्यावेत. त्यांचे शरिराला आवश्यक ते कार्य झाले की, हे वेग आपोआप थांबतात.

१८ अ. मनोवेग आवरा !

वर सांगितलेले १३ शारीरिक वेग हे अधारणीय, म्हणजे रोखून न धरण्यासारखे आहेत; परंतु लोभ, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, आसक्ती हे मनाचे वेग नैसर्गिक असले, तरी प्रयत्नपूर्वक रोखून धरावेत.

 

१९. शांत निद्रा आणि डोळ्यांचे
आरोग्य राखणे यांसाठी करावयाच्या कृती

१९ अ. रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !

रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे. अंथरुणाला तेल लागू नये म्हणून डोक्याभोवती वेगळे कापड बांधावे. घडी सोडलेली जुनी गांधी टोपी किंवा जुनी कानटोपीही वापरू शकतो.

१९ आ. पायांच्या तळव्यांना तूप लावणे

प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना अर्धा चमचा देशी गायीचे साजूक तूप ५ मिनिटे चोळावे. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि झोपही शांत लागते. तूप चोळण्यास काशाची वाटी मिळाली, तर उत्तम; पण ती नसल्यास हाताच्या तळव्यांनी तूप चोळावे. तूप चोळल्यावर ते अंथरुणाला लागू नये म्हणून दोन्ही पावले वेगवेगळ्या कपड्यांत गुंडाळून ठेवावीत. जुने पायमोजेही वापरू शकतो. सकाळी उठल्यावर पाय साबण लावून धुवावेत म्हणजे पायाचे तूप निघून जाईल. पायाला लावण्यासाठी देशी गायीचे साजूक तूप उपलब्ध नसल्यास खोबरेल तेल लावावेे.

१९ इ. डोळ्यांत तूप घालणे

प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही डोळ्यांमध्ये १-१ थेंब तूप घातल्यास डोळे निरोगी रहातात आणि चष्म्याचा क्रमांक वाढत नाही.

१९ इ १. पूर्वसिद्धता : एक काचेची लहान रिकामी बाटली स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी. सनातन इत्राची रिकामी बाटलीही वापरू शकतो. बाटलीसह एका निराळ्या डबीत कानात थेंब घालण्याचा किंवा लहान मुलांना औषध देण्याचा जाडसर प्लास्टिकचा ड्रॉपर ठेवावा. देशी गाईच्या शुद्ध घरगुती तुपाच्या वर जी निवळी (पातळ तूप) असते, ती या बाटलीत भरावी. तुपाची निवळी न मिळाल्यास देशी गाईचे घरगुती शुद्ध तूप घ्यावे. साजूक तूपही न मिळाल्यास आयुर्वेदीय औषधालयांमध्ये मिळणारे त्रिफळा घृत नावाचे तूप घ्यावे. तूप प्लास्टिकच्या बाटलीत घालू नये; कारण प्लास्टिकचा काही अंश तुपात विरघळतो आणि असे तूप डोळ्यांत घातल्यावर डोळे चुरचुरतात. तूप थिजले (गोठले) असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ती बाटली गरम पाण्यात धरून तूप विरघळवून घ्यावे. बाटली पाण्यातून काढून बाटलीला लागलेले पाणी कपड्याने पुसून घ्यावे.

१९ इ २. कृती : अंथरूण घालून झोपण्याची सिद्धता झाल्यावर अंथरुणात पडल्या पडल्या दोन्ही डोळ्यांमध्ये १-१ थेंब तूप घालावे आणि बाटली बाजूला ठेवून झोपून जावे.

 

२०. रात्री दूध पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे

रात्री झोपतांना दूध प्यायल्याने पचनशक्ती मंदावते आणि कफाचे विकार होतात. त्यामुळे शक्यतो रात्री झोपतांना दूध न पिता सकाळी उठल्यावर स्नानानंतर दूध प्यावे. दूध प्यायल्यानंतर किंवा दुधासह काही खाऊ नये; कारण अन्य पदार्थांमध्ये मिठाचा अंश असतो ज्याचा दुधाशी झालेला संयोग शरिराला अपायकारक असतो. दूध प्यायल्यावर काही खायचे असल्यास ते साधारण एका घंट्याने खावे. रात्री दूध प्यायचेच झाल्यास त्यात १ कप दुधाला अर्धा चमचा या प्रमाणात हळद घालून ते प्यावे.

दूध पितांना ते उष्णच प्यावे. एका वेळी १ कप एवढेच दूध प्यावे. अधिक दूध प्यायल्यास ते पचतेच असे नाही. पुष्कळ साधक आम्लपित्ताचा त्रास होतो म्हणून थंड दूध पितात. आम्लपित्तामध्ये थंड दूध प्यायल्याने तात्पुरता लाभ झाला, तरी थंड दूध पचनशक्ती बिघडवून टाकते. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते आणि अजीर्ण झाल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे कधीही थंड दूध पिऊ नये.

 

२१. झोपणे

शक्यतो पूर्वेस किंवा दक्षिणेस डोके करून झोपावे. पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा ह्रास होतो, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे. झोपेच्या वेळी अति वार्यामचे सेवन करू नये; कारण तसे केल्याने शरिरात रूक्षता वाढते, त्वचेचे आरोग्य बिघडते आणि सांधे जखडतात.

प्रत्येकाने आपल्याला आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे. सामान्य माणसाला सर्वसाधारण ६ ते ८ घंटे झोप पुरते. आपण किती झोप घेतल्यास दिवसभरात आपली कार्यक्षमता चांगली रहाते, याचा स्वतःच अभ्यास करून त्यानुसार आपल्या झोपेचा अवधी ठरवावा आणि दुसर्याक दिवशी उठेपर्यंत तेवढी झोप पूर्ण होईल या बेताने योग्य वेळेस नामजप करत झोपावे.

आयुर्वेदामध्ये दिलेली दिनचर्या अशा पद्धतीने पाळण्यासाठी आपल्याला अतिरिक्त वेळ द्यावा लागत नाही. प्रतिदिन अशी दिनचर्या पाळल्यास आपण पुष्कळ रोग टाळून जीवनातील अमूल्य वेळ वाचवून साधना चांगल्या पद्धतीने करू शकतो.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)

Leave a Comment