प.पू. पांडे महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने केलेले अमूल्य मार्गदर्शन

१. हिंदु राष्ट्र स्थापनेमागील आध्यात्मिक दृष्टीकोन

pp_pandye_maharaj‘आज आपण हिंदु राष्ट्रासाठी अखंडपणे झटत आहोत; मात्र आपण हिंदु राष्ट्राचा विचार पुष्कळ स्थूलपणे, म्हणजे केवळ मुसलमान, ख्रिस्ती, निधर्मी आदींकडून होणार्‍या आक्रमणांच्याच संदर्भात करत असून हिंदु राष्ट्राची वास्तविकता आपल्या लक्षातच आलेली नाही. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास का सांगितले आहे ?’, याचा सर्व कार्यकर्त्यांनी सूक्ष्मपणे विचार करायला हवा. मनुष्यातील चैतन्याच्या आधारेच ‘तो जिवंत किंवा मृत आहे’, हे ठरवले जाते. ज्याच्या शरिरातील चैतन्य नष्ट झाले आहे, तो मृत मानला जातो, तसेच विश्‍वही चैतन्याच्या आधारेच चालते. प्राणी, वृक्ष या सर्वांत ते चैतन्य आहे; म्हणून सृष्टी जिवंत आहे. आज संपूर्ण विश्‍वाला चैतन्य पुरवणारा भारत हा एकमात्र चैतन्याचा स्रोत आहे. द्वापरयुगातही भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेली स्वतःचे अस्तित्व असणारी सर्व क्षेत्रे ही भारतातीलच आहेत. भारतातील नद्या आणि पर्वत ही केवळ स्थूल पंचमहाभूते नसून त्यातून चैतन्य अखंड वहात असते. यामुळेच तर गंगा, हिमालय यांना आपण पूजतो. हे चैतन्य इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, भारतात विमानाने येणार्‍या अनेक विदेशी साधकांना भारताच्या वायूक्षेत्रात विमान शिरल्यानंतर ते त्वरित जाणवायला लागते. जर हा चैतन्याचा स्रोतच नष्ट होऊ लागला, तर विश्‍व विनाशाकडे जायला वेळ लागणार नाही, हे निश्‍चित; म्हणूनच या सकल विश्‍वाच्या रक्षणासाठी प.पू. डॉक्टर आपल्याला हिंदु राष्ट्राचे महत्त्व सांगत आहेत. यातूनच आपल्याला ‘भारताचे हिंदु राष्ट्र बनणे का आवश्यक आहे ?’, हे लक्षात येईल.

 

२. विज्ञानयुगातील विकास म्हणजे दुष्टांच्या सुखसोयींसाठी चैतन्यदायी निसर्गाचा नाश !

सृष्टी ही चैतन्याच्या आधारे चालते. हे चैतन्य मिळण्यासाठी हिंदु धर्मात सत्त्वगुणी वृक्षांना (औदुंबर, अश्‍वत्थ, पळस) प्रदक्षिणा घालण्यास सांगितले आहे, तसेच गंगा-नर्मदा आदी नद्यांमध्ये स्नान करण्यास सांगितले आहे. गोमातेचे सात्त्विक दूध पिण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर धर्मशास्त्रांनी पंचमहाभूतांनाच खरे धन मानून म्हटले आहे.

धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः ।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे ॥ – श्रीसूक्त, ऋचा २१

अर्थ : अग्नि, वायु, सूर्य, अष्ट वसु, इंद्र, बृहस्पति आदींना ‘धन’ म्हटले आहे. हे धन मला प्राप्त होवो. हिंदु धर्म संपवण्याच्या दृष्टीने कलियुगातील विज्ञानाचा आधार घेऊन काही जणांनी चैतन्याचा प्रवाह करणार्‍या स्रोतांवर आघात करण्यास प्रारंभ केला आहे. यात काही राजकारण्यांनी सहभाग घेऊन आधुनिकतेच्या आणि विकासाच्या नावाखाली सृष्टीला ओरबाडून संपवण्याचे षड्यंत्र रचले आहे. सध्या भारतात सात्त्विकतेपेक्षा उत्पादनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. या षड्यंत्रानुसार भारतात शेतीसाठी विकृत बियाणांचा, रासायनिक खतांचा वापर करून आणि विदेशी ‘काँग्रेस’ गवत आणून भूमातेचे चैतन्य संपवण्याचे कार्य चालू आहे. जास्त दूध देणार्‍या विदेशी जर्सी गायी आणून चैतन्य देणार्‍या देशी गायींना संपवणे चालू आहे. कारखान्यांतून वायू आणि जल प्रदूषण करून या दोन्ही महाभुतांना संपवण्याचे कार्य चालू आहे, तसेच अमर्याद वृक्षतोड करून निसर्गाचे शोषण चालू आहे. धनसत्ता असणार्‍या दुष्ट प्रवृत्तींच्या सुखसोयींसाठी विकासाच्या नावाखाली या सगळ्यांतून सृष्टीतील चैतन्यच संपवले जात आहे. या केवळ उत्पादन वाढवण्याला आपण ‘विकास’ म्हणत असलो, तरी प्रत्यक्षात त्यासमवेत महागाईसुद्धा वाढतच आहे. मग हे जास्त उत्पादन काय कामाचे ? उद्या महागाई एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यास पैसे देऊन सामुग्री घेण्याऐवजी लूटमार चालू होईल. यासाठी आधुनिक विज्ञानानुसार नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार विकास आवश्यक आहे. साधनेने चैतन्य वाढले, तरच निसर्ग अनुकूल होतो. प्रभु श्रीराम वनवासात असतांना ते ज्या वनातून जात, तेथील वृक्षांनाही वाटे की, आम्ही त्यांना किती देऊ ? याचे कारण वृक्षांमध्ये सजीवता होती, त्यांना श्रीरामाचे चैतन्य हवेहवेसे वाटत होते.

 

३. श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या प्रारंभी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवद्गीता सांगितली, त्याप्रमाणे आपत्काळ असतांनाही प.पू. डॉक्टर आपल्याला साधनेचेच महत्त्व सातत्याने सांगत असणे

भगवंताने महाभारताच्या युद्धाच्या प्रारंभी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवद्गीता सांगितली आणि त्यानंतर थेट युद्धाला प्रारंभ झाला. खरेतर युद्धाच्या अगोदर युद्धनीतीच्या संदर्भात, युद्धातील डावपेचांच्या संदर्भात किंवा शत्रूवर आक्रमणाच्या संदर्भात चर्चा-मार्गदर्शन व्हायला हवे; मात्र भगवान श्रीकृष्णाने रणांगणातही श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला जीवनातील साधनेचे महत्त्व सांगितले. अगदी त्याचप्रमाणे आता आपत्काळ असतांनाही संत आपल्याला साधनेचेच महत्त्व सातत्याने सांगत आहेत. साधना करणार्‍यालाच बळ प्राप्त होते. साधनेने आपल्याला शरिराची नश्‍वरता आणि आत्म्याचे महत्त्व लक्षात येते, तसेच ‘आत्म्याला मृत्यू नाही’, हे कळल्यावर भय नष्ट होऊन निर्भयता येते’, हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगून त्याला क्षत्रिय वर्णानुसार साधनेचे कर्म करण्यास सांगितले.

केवळ युद्धात जिंकण्यासाठी म्हणून नव्हे, तर दुष्ट आणि कपटी वृत्तीच्या विरोधात द्वापरयुगातील ‘कृष्णनीती’, चंद्रगुप्ताच्या काळातील ‘चाणक्यनीती’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ‘गनिमी कावा’ आपण आत्मसात केला पाहिजे. महाभारत युद्धात जेव्हा कर्ण रथाचे चाक काढण्यास उतरला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचे शरसंधान करायला सांगितले. त्या वेळी कर्णाने ‘हे धर्माच्या विरोधात आहे’, हे म्हटल्यावर श्रीकृष्णाने कर्णाला राजसभेत द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आठवण्यास सांगून ‘तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म ?’, असे विचारले. म्हणजे अधर्मियांकडून धर्मशास्त्राचे पालन करणार्‍यांनाच धर्माची आठवण करून दिली जाते. त्याचप्रमाणे दुर्योधनाने केलेल्या टीकेमुळे जेव्हा भीष्माचार्यांनी दुसर्‍या दिवशीच्या युद्धात पांडवांच्या वधाची घोषणा केली, त्या रात्री भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. द्रौपदीला भीष्माचार्यांनी ‘अखंड सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद दिल्यावर ‘पांडवांचा वध केल्यास तुमचा हा आशीर्वाद खोटा ठरेल’, हे लक्षात आणून देऊन भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे पांडवांचे रक्षण केले. ‘शास्त्रानुसार दुष्टाशी दुष्टतेने वागणे योग्य मानले असून सज्जनाशी दुष्टतेने वागणे पापकारक मानले आहे.’

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ८

रज-तम वृत्तींच्या आधारे दुर्जनांचे साहाय्य घेतल्याने दुर्योधनासह कर्णाचाही नाश झाला. याचे आजचे उदाहरण म्हणजे, अमेरिकेने रशियाच्या विरोधात तालिबानला शस्त्रे पुरवली; मात्र तेच तालिबानी अमेरिकेच्या विरोधात उलटून अमेरिकेवर आक्रमण करू लागले. या तुलनेत सात्त्विकता वाढवणारी साधना केल्याने ईश्‍वराची कृपा होऊन आपल्यातील चैतन्य वाढते आणि सत्त्व अन् चैतन्य यांच्या आधारे मूळ समस्याच नष्ट होतात.

ये ब्राह्मणास्त्रिसुपर्णं पठन्ति । ते सोमं प्राप्नुवन्ति ।
आ सहस्रात् पङ्क्तिं पुनन्ति ॥ – त्रिसुपर्ण, अनुवाक २

अर्थ : जे साधक त्रिसुपर्णाप्रमाणे साधना करतात, ते आनंदमय अवस्थेत जातात आणि त्यांना सर्वत्र मधुवत् (मधुर) सृष्टी दिसू लागते. एवढेच नव्हे, तर अशा अवस्थेचे संत किंवा यज्ञपुरुष यांमध्ये सहस्रावधी लोक पावन करण्याची क्षमता असते.

असे साधक प.पू. डॉक्टरांकडून घडवले जात असून त्यांच्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन होऊन जगभरात चैतन्याचा प्रसार करायचा आहे.

 

४. प.पू. डॉक्टर करवून घेत असलेले हिंदु राष्ट्रासाठीचे प्रयत्न

आज लोक विज्ञानयुगातील शिक्षण घेऊन केवळ सुशिक्षित होत आहेत; मात्र त्याच वेळी बलात्कारांचे प्रमाणही वाढत आहे. जर कुणी सुशिक्षित होऊन बलात्कार करत असेल, तर मग ते शिक्षण काय कामाचे ? या दृष्टीनेही मनुष्याची अंतःवृत्ती पालटणार्‍या साधनेचेच महत्त्व लक्षात येते. यामुळेच प.पू. डॉक्टरांनी आपल्याला वृत्ती पालटण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्यास सांगितले आहे. धर्मशास्त्रानुसार मृत्यूनंतर चित्रगुप्त आपल्या कर्मांचा हिशेब करून आपल्याला दंड देतो; मात्र प.पू. डॉक्टरांनी मृत्यूनंतरच्या यमयातना नकोत; म्हणून चूक झाल्यास त्वरित क्षमायाचना आणि प्रायश्‍चित्त सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीगत स्तरावर साधनेचा आढावा घेतो, त्याप्रमाणे जागतिक स्तरावरील आढावा घेण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी दैनिक सनातन प्रभात चालू केले आहे. त्यातून राजकीय आणि सामाजिक स्तरावरील अयोग्य कृती लक्षात आणून देऊन त्यावर योग्य दृष्टीकोनही दिला जातो.

भविष्यकाळातील हिंदु राष्ट्राची प्रतिकृती म्हणून प.पू. डॉक्टरांनी आश्रमांची स्थापना केलेली आहे. या आश्रमांत आजच आपल्याला हिंदु राष्ट्राचे स्वरूप पहायला मिळते. आश्रमात येणार्‍या प्रत्येकाला ‘जीवतत्त्व’ म्हणून पाहिले जाते. कोणताही जाती-पंथ भेद केला जात नाही. जसे ब्राह्मण बनण्यासाठी उपनयन संस्काराने शुद्धीकरण होते, तसेच आश्रमात येणार्‍या प्रत्येकाला प्रथम साधना करण्यास सांगून शुद्ध करून ब्राह्मण केले जाते. त्यानंतर त्याच्या त्याच्या गुणविशेषानुसार आणि कर्मानुसार त्याला सेवेसाठी विभाग दिला जातो. आश्रमात कुणी उच्चशिक्षित आधुनिक वैद्य असो वा अशिक्षित, सर्वांना यातून एकाच स्तरावर आणले जाते. या साधनेत आपल्याकडे असलेले सर्वच ईश्‍वराला अर्पण करण्याचा भाव असल्याने आरक्षण इत्यादीचा प्रश्‍नच उद्भवत नाही. अशा पद्धतीमुळे आरक्षण, जातीभेद, असमानता अशा अनेक सामाजिक समस्या निर्माणच होऊ शकणार नाहीत आणि त्यांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा अवाजवी व्यय वाचू शकतो. यातून या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवमात्राने लक्षात घ्यायला हवे की, प.पू. डॉक्टरांनी साधना म्हणून सांगितलेली प्रत्येक कृती ही हिंदु राष्ट्राच्या ध्येयासाठी पूरकच आहे; कारण त्यांचे कार्य आणि ध्येय हे एकरूपच झालेले आहे. तसेच याद्वारे त्याची स्वतःची आध्यात्मिक उन्नती होऊन तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणार आहे.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.९.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात