भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

१. गुरुमाऊलीचा साधकाच्या जीवनातील प्रवेश म्हणजे आनंदाची दिवाळी !

swati_gaykawad_hasara
कु. स्वाती गायकवाड

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो. रात्रीचा प्रवास करतांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रेडियमवर प्रकाश पडल्यास ते आपल्याला पणत्यांसारखे भासतात. ते आपल्याला वाट दाखवतात. रस्त्यातील अडथळे आणि वळणे लक्षात आणून देतात; म्हणून आपला प्रवास सुखरूप होतो आणि आपण इच्छित स्थळी पोेचू शकतो. तसेच गुरुमाऊलीने आपला आध्यात्मिक प्रवास सुकर केला आहे. कुठे जायचे आहे ?, ते ध्येयही समोर ठेवले आहे. या साधनापथाच्या दोन्ही बाजूंना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या पणत्या लावल्या आहेत. त्या पणत्यांच्या प्रकाशात आपला प्रवास गुरुदेव करवून घेत आहेत. तेच वळणे आणि अडथळे दाखवून देत आहेत. गुरुमाऊलीप्रती किती कृतज्ञता व्यक्त करावी ? खरंच या दिवाळीत आपण अंतर्मनात गुरूंप्रतीच्या कृतज्ञतेचे दीप लावूया. ज्या क्षणी गुरुमाऊलीने आपल्या जीवनात प्रवेश केला, त्या क्षणापासून साधकाच्या जीवनात आनंदाची दिवाळी चालू झाली. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य श्रीगुरुचरणांशी जोडून आनंद घेऊया.

 

२. धनत्रयोदशी

गुरुमाऊलीने आपल्यावर केलेली अपार कृपा अनुभवूया !

धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी जयंती ! साधकाच्या जीवनातील खरे आरोग्य म्हणजे श्रीगुरूंची अपार कृपा, प्रीती आणि वात्सल्य होय. धनत्रयोदशीच्या दिवशी गुरुमाऊलीने आपल्यावर आरोग्याच्या संदर्भात कशी अपार कृपा केली आहे, हे दिवसभर कृतज्ञतापूर्वक आठवून आध्यात्मिक धनत्रयोदशी साजरी करूया.

 

३. नरकचतुर्दशी

गुरुमाऊलीने शिकवलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन
प्रक्रिया गांभीर्याने राबवून त्यांपासून मुक्त होण्यातला आनंद घेऊया !

भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला आनंद दिला, तो हा दिवस ! आपल्यातील स्वभावदोष आणि अहं या नरकासुररूपी वृत्तीचे निर्मूलन करण्यासाठी गुरुमाऊलीने स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. स्वभावदोष आणि अहंं यांच्या बंधनातून तेच आपल्याला मुक्त करत आहेत. ही प्रक्रिया गांभीर्याने राबवून त्यांपासून मुक्त होण्यातला आनंद अनुभवूया.

 

४. लक्ष्मीपूजन

गुरुदेवांनी दिलेल्या गुणांच्या धनामुळे कृतज्ञतापूर्वक
जाणीव ठेवून त्यांच्या चरणी लीन होण्यातला आनंद घेऊया !

या दिवशी श्रीविष्णूने देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले. जेथे लक्ष्मी तेथे भगवान श्रीविष्णूचे अस्तित्व असतेच. गुणांच्या दीपांनी स्वभावदोष-अहंरूपी अंधःकार नाहिसा होतो. या दिवशी गुरुदेवांनीच हे गुणांचे धन दिले आहे, याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून त्यांच्या चरणी लीन होण्यातला आनंद घेऊया.

 

५. बलीप्रतिपदा

मनातील अहंरूपी बलीराजाच्या डोक्यावर श्रीगुरूंचे
चरण आहेत, असा भाव ठेवून त्यांच्या चरणी शरणागत होऊया !

भगवान श्रीविष्णूने वामन अवतार घेऊन ज्या बलीराजाच्या डोक्यावर आपले चरणकमल ठेवून त्याला मुक्त केले, तो हा दिवस ! आपल्या मनातील अहंरूपी बलीराजाच्या डोक्यावर श्रीगुरूंचे चरण आहेत, हा भाव ठेवून त्यांच्या चरणी शरणागत होऊया. आज दिवसभरात मनात येणार्‍या प्रत्येक अहंच्या विचारावर श्रीगुरु त्यांचे चरणकमल ठेवून ते नाहिसे करत आहेत, हे अनुभवूया.

 

६. भाऊबीज

अखंड शरणागत अन् कृतज्ञता भावात रहाणे आणि
अखंड गुरुस्मरण करणे, यांची गुरूंच्या चरणी ओवाळणी देऊया !

हा दिवस दिवाळीला जोडून येतो; म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. हा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. साधक गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुच साधकाच्या जीवनात प्रत्येक नाते निभावतात. खरंच ते आपले माता आणि पिता आहेत. माता-पिता होऊन ते आपल्यावर संस्कार करतात. ते आपले बंधूही आहेत. आपण लहान होऊन त्यांच्याकडे हट्टही करतो. सखा होऊनही तेच येतात. आपण आपले मन त्यांच्याकडेच मोकळे करतो अन् तेच ते जाणू शकतात. खरंच त्यांच्याइतके प्रेम आपल्यावर कोणीही करत नाही. अशा श्रीगुरूंच्या चरणी भाऊबिजेची ओवाळणी म्हणून काय देऊया ?

देव सर्वांचा स्वामी आहे. तो ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याच्याकडे सारेच आहे. आपण त्याला देऊ शकतो, असे काहीच नाही; पण सुदाम्याचे पोहे आनंदाने मागून घेऊन खाणार्‍या कृष्णाप्रमाणे आपली प्राणप्रिय गुरुमाऊली आहे. त्यामुळेे या दिवशी स्वभावदोष आणि अहं निमूर्र्लन प्रक्रिया मनापासून आणि सातत्याने राबवून अखंड शरणागत अन् कृतज्ञता भावात रहाणे अन् अखंड गुरुस्मरण करणे, ही ओवाळणी आपण त्यांना देऊया.

 

७. देवाने आपल्या मनात प्रज्वलित केलेल्या
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याच्या ज्योतीने अज्ञानाच्या
अंधःकारात असलेल्या समाजाला दिशा देण्याचे कार्य करूया !

दिवाळीच्या सर्व दिवसांमध्ये श्रीगुरूंना अपेक्षित असे घडण्यासाठी संकल्प करून सातत्याने प्रयत्न करूया. हिंदु राष्ट्राची स्थापना हे गुरुमाऊलीने दिलेले समष्टी ध्येय आहे. सध्या राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती बिकट आहे. राष्ट्राला अवकळा प्राप्त झाली आहे. ही स्थिती पालटायला हवी. दिवाळीच्या आधी आपण घराची स्वच्छता करतो, तोरणे लावतो, रांगोळ्या काढतो आणि पणत्या लावतो. ही तयारी कशासाठी ? केवळ दिवाळीसाठी. तसेच राष्ट्र-धर्मावर आलेली जळमटे आणि धूळ काढून हिंदु राष्ट्र येण्यातला आनंद घ्यायचा आहे. देवाने आपल्या मनात राष्ट्र-धर्माच्या कार्याची ज्योत प्रज्वलित केली आहे. त्या पणतीने अज्ञानाच्या अंधःकारात असलेल्या समाजाला दिशा देण्याचे कार्य तोच करवून घेत आहे. देवाने त्याच्या या कार्यासाठी आपल्याला माध्यम केले आहे. यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञताभावात राहून जोमाने झोकून देऊन सेवा आणि साधना करूया; म्हणजे हिंदु राष्ट्राची पहाट कधी झाली, हे आपल्याला कळणारही नाही.

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात