आयुष्यभर कठीण प्रसंगांत देवाचे साहाय्य घेऊन श्रद्धेच्या बळावर परिस्थितीला सामोरे गेलेल्या कै. पू. देवकी परबआजी !

अनुक्रमणिका

पू. श्रीमती देवकी परबआजी ८५ वर्षांच्या असतांना २२.३.२०१६ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. २.४.२०१६ या दिवशी परबआजी संत झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितले. पू. आजींनी त्यांच्या जीवनात प्रत्येक कठीण प्रसंगात देवाचे साहाय्य घेतले आणि त्या आलेल्या परिस्थितीला श्रद्धेच्या बळावर सामोरे गेल्या. पू. आजींच्या जीवनप्रवासाविषयी त्यांची मुले श्री. बाजी आणि श्री. अंकुश यांनी लिहून दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत. मुलांनी त्यांचा उल्लेख आई असा केला आहे.

पू. श्रीमती देवकी परबआजी

 

१. वडिलांनी गोवा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणे
आणि पोर्तुगीज सैनिक मागे लागल्याने त्यांनी मूळ
गाव सोडून सावर्डे गावातील निर्जन स्थळी रहाण्याचे ठरवणे

वडिलांनी वनखात्यातील नोकरीचे त्यागपत्र देऊन गोवा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्या वेळी त्यांना अटक झाली; पण ते पुराव्याअभावी सुटले, तरीही त्यांची गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी धडपड चालूच होती. पोर्तुगीज सैनिक त्यांच्या मागे लागले; म्हणून ते आमचे मूळ गाव विर्नोडा, पेडणे सोडून इतरत्र राहू लागले. शेवटी त्यांनी सावर्डे गावातील खमडे हे नारळाची बाग असलेले निर्जन स्थळ रहाण्यासाठी निवडले. हे स्थळ बाजारापासून ६ किलोमीटर अंतरावर घनदाट अरण्यात आहे. त्या ठिकाणी हिंस्र प्राणी आहेत.

 

२. वडिलांनी मजुरी करणे, आईने त्यांना साहाय्य
म्हणून लाकडाच्या मोळ्या, तण गोळा करून बाजारात नेऊन विकणे;
पण वडिलांना दारूचे व्यसन लागल्याने स्थिती आणखी बिकट होणे

मोठा भाऊ आणि बहिण यांच्या नंतर आमचा सर्वांचा जन्म आणि बालपण त्या रानातच गेले. घरात खाणारे दहा होते. वडील मजुरी करत होते. त्यांना साहाय्य म्हणून आई लाकडाच्या मोळ्या आणि गवत गोळा करून चालत जाऊन बाजारात विकायची. त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. याच कालावधीत वडिलांचा नारळाच्या झाडावरून पडून अपघात झाला. त्यांना पुष्कळ दुखापत झाली. त्यासाठी कुणीतरी त्यांना दुखणार्‍या जागी दारू लावणे आणि पिणे हा सल्ला दिला. यातून त्यांना दारूचे व्यसन लागले. त्यामुळे आमचे आणखीन हालाखीचे दिवस चालू झाले. ना धड शिक्षण, ना अन्न-वस्त्र अशी आमची स्थिती झाली. वडिलांनी आईला पुष्कळ त्रास दिला; पण आईने त्यांच्याविषयी कधीही अपशब्द काढला नाही.

 

३. आईच्या श्रद्धेमुळे स्थानदेवता आणि वेताळदेव
यांनी कुटुंबाचे रक्षण करणे अन् वडील दारू पिऊन कुठे अडकल्यास
वेताळदेवाने त्यांना घरापर्यंत पोचवणे, तसेच आत्याच्या मुलीलाही प्राण जाण्यापासून वाचवणे

आर्ईच्या श्रद्धेमुळे स्थानदेवता आणि वेताळदेव यांनी आमचे हिंस्र प्राण्यांपासून (वाघ, बिबटे आणि रानडुक्कर यांपासून) रक्षण केले. बाजारातून यायला रात्र झाली किंवा वडील दारू पिऊन कुठे अडकले, तर वेताळदेव त्यांना घरापर्यंत पोचवत असे. आम्ही आजारी पडलो, तर आईने वेताळदेवाला हाक मारताच आम्ही बरे होत होतो. त्या वेळी आत्या आपल्या लहान मुलीला घेऊन आमच्याकडे काही दिवसांसाठी रहाण्यास आली होती. तिच्या मुलीच्या पोटात पुष्कळ जंत झाले असल्यामुळे तिचे पोट फुगले होते. रात्रीची वेळ होती. तिचा प्राण जायला आला होता. त्या वेळी आईने पदर पसरून वेताळाला हाक मारली आणि काही वेळातच ३०० – ४०० जंत तिच्या पोटातून बाहेर पडले. आईच्या देवावर असलेल्या श्रद्धेमुळे ती मुलगी वाचली.

 

४. आईला कधी कधी वेताळदेव प्रत्यक्ष दर्शन देत असे

आईला कधी कधी वेताळदेव प्रत्यक्ष दर्शन देत असे किंवा रात्री आम्ही रहात होतो, तेथे येऊन दांडा आपटून मी आहे, असा संकेत देत असे.

 

५. दुसर्‍या गावावरून गवत काढण्यासाठी येणार्‍या
महिलांना आईने प्रेम देऊन त्यांच्याशी जवळीक करणे
आणि तिच्या प्रेमामुळे ती सगळ्यांना हवीहवीशी वाटू लागणे

आम्ही रहात असलेल्या ठिकाणी दुसर्‍या गावातून महिला लाकडे आणि गवत गोळा करण्यासाठी येत असत. त्यांना भूक लागली असेल; म्हणून आई पेज वाढत असे. अशा प्रकारे आईने त्यांना प्रेम देऊन त्यांच्याशी जवळीक केली होती. तिच्या प्रेमामुळे ती सगळ्यांना हवीहवीशी वाटू लागली.

 

६. मुलांच्या शिक्षणासाठी पुन्हा पेडणे येथे
जाण्याचे ठरवल्यावर आईच्या पोटात दुखू लागणे आणि
वेताळाच्या देवळात जाऊन कौल घेतल्यावर तिची पोटदुखी थांबणे

वर्ष १९७३ मध्ये वडिलांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून २०० रुपये मानधन चालू झाले. आम्ही शिक्षण घेण्यासाठी जंगलमय जीवन संपवून पुन्हा विर्नोडा, पेडणे येथे जाण्याचा दिवस निश्‍चित केला. त्या वेळी आईच्या पोटात पुष्कळ दुखायला लागले. काही उपाय चालेना; म्हणून आई आणि वडील यांनी वेताळाच्या देवळात जाऊन कौल घेतला. त्या वेळी ते स्थळ सोडण्यासाठी वेताळदेव आम्हाला परवानगी देत नव्हता. शेवटी देवाची समजूत घालून प्रतिवर्षी जत्रेला येऊन नारळ अर्पण करतो, असे सांगितल्यावर आर्ईच्या पोटात दुखायचे थांबले. देव आईला सोडायला सिद्ध नव्हता; कारण आई देवाशी एकरूप झाली होती.

 

७. आईने सर्व संकटांना समर्थपणे
सामोरे जाणे आणि वडिलांना पोटाचा कर्करोग
झाल्यावर त्यांच्यासमवेत एक मास रुग्णालयातही रहाणे

जवळजवळ २० वर्षे रानावनात राहून आम्ही गावी आलो. वडिलांचे दारू पिणे सुटेना. त्याच वेळी काही घटना अशा घडल्या की, त्यात आमची पुष्कळ मानहानी झाली; पण आई सर्व संकटांना समर्थपणे सामोरी गेली. तिने कधीही धीर सोडला नाही. एका पाठोपाठ एक संकटे येत होती. याच काळात वडिलांना पोटाचा कर्करोग झाला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जावे लागत होते. शेवटी आई एक मास (महिना) रुग्णालयामध्ये वडिलांसमवेत राहिली.

 

८. वडिलांचे निधन झाल्यावर मानधन
बंद झाल्याने आई आणि बहीण यांनी मजुरी करणे
अन् आईने गावातील लोकांना प्रेम देऊन आपलेसे करणे

वडिलांचे दुखणे पुष्कळ वाढले. आईला रात्रीची झोप मिळत नव्हती. तशा स्थितीत तिने वडिलांना घरी आणले आणि ती त्यांची सेवा करू लागली. शेवटी एप्रिल १९८३ मध्ये वडिलांचे निधन झाले. वडील वारल्यानंतर काही वर्षे त्यांचे मानधन बंद झाले होते. त्या वेळी आई आणि बहीण मजुरी करू लागल्या. आईने गावातील लोकांना प्रेम दिले. सर्वांना आपलेसे करून घेतले. लहानथोर तिला आवय (कोकणी भाषेत आवय म्हणजे आई) या नावाने ओळखू लागले.

 

९. आईने संपर्कात आलेल्या सर्वांवर जिवापाड प्रेम केल्याने सर्वांना आई हवीहवीशी वाटणे

सर्वांवर आई निरपेक्ष प्रेम करू लागली. प्रत्येक जण आपलाच माणूस आहे, असे तिला वाटायचे. गावात कुणी आजारी पडले की, ती धावून जायची आणि त्यांच्यावर तिला ठाऊक असलेले औषधोपचार करायची. त्याने त्यांना गुणही यायचा. घरातील सर्वांनी जेवण घेतल्यावर तिला अन्न शिल्लक राहिले नाही, तरी ती म्हणत असे माझे पोट भरलेले आहे. कुणी आम्हाला वाईट बोलले, तर ती आमची समजूत काढीत असे. गावातील लोक, पाहुणे, सोयरे अशा ज्यांना ज्यांना आईचा सहवास लाभला, त्या सर्वांवर तिने जिवापाड प्रेम केले. त्या सर्वांना आई शेवटच्या क्षणापर्यंत हवीहवीशी वाटत होती.

 

१०. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने काही वर्षे एका संप्रदायानुसार
साधना करणे, त्यानंतर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना
करू लागणे आणि प.पू. डॉक्टरांना पाहिले नसूनही त्यांच्यावर श्रद्धा असणे

१९९६ या वर्षी आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर आई काही वर्षे एका संप्रदायानुसार साधना करत होती. तिने आम्हाला सनातन संस्थेने सांगितल्याप्रमाणे साधना करायला विरोध न करता प्रोत्साहन दिले. नंतर तीही आमच्यासमवेत साधना करू लागली. त्या वेळी तिने प.पू. डॉक्टरांना पाहिले नव्हते; पण आम्ही बाहेर जातांना ती आम्हाला प.पू. डॉक्टरांना नमस्कार करा, असे म्हणून आठवण करून देत असे.

 

११. आईने प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करून
मामेभावाच्या पोटाला विभूती लावल्यावर त्याची
पोटदुखी थांबणे आणि त्यामुळे तिच्या मामेभावाचीही प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा बसणे

एक दिवस आईचा मामेभाऊ श्री. कृष्णनाथ रात्रीच्या वेळी पोटदुखीने आजारी पडला. आईने विभूती घेतली आणि प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करून ती मामेभावाच्या पोटाला लावली. त्यानंतर त्याची पोटदुखी थांबली. त्यामुळे त्याचीही प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा बसली. या प्रसंगापूर्वी तो प.पू. डॉक्टरांना मानत नव्हता.

 

१२. प.पू. डॉक्टरांनी काळजी घेतल्याच्या संदर्भात आईला आलेल्या अनुभूती

१२ अ. आईला शस्त्रक्रियेची भीती वाटत असल्याने
ती त्यांना प्रार्थना करत असणे आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर शुद्धीवर आल्यावर
आईने, शस्त्रक्रियेच्या वेळी प.पू. डॉक्टर बाजूला उभे राहून बघत होते, असे सांगणे

त्या दिवसांमध्ये आईच्या कानाजवळ कर्करोगाची मोठी गाठ झाली होती. ती शस्त्रक्रिया करून काढायची आईला भीती वाटत होती, तरीही तिला रुग्णालयात भरती केले. आई घाबरत होती आणि प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करत होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर आई म्हणाली, शस्त्रक्रियेच्या वेळी प.पू. डॉक्टर बाजूला उभे राहून बघत होते. शस्त्रक्रिया छातीवर आणि कानाजवळ झाली होती; पण नंतर तिला थोडेही दुखले नाही. प.पू. डॉक्टरांनी तिची काळजी घेतल्याचे जाणवले.

१२ आ. रात्री पोटात दुखत असतांना आईने
प.पू. डॉक्टरांना सारख्या हाका मारणे आणि थोड्या वेळाने प.पू. डॉक्टर
पलंगावर बसून तिच्याकडे बघत आहेत, असे तिला दिसल्यानंतर तिची पोटदुखी थांबणे

एक दिवस आई आजारी पडली. तिच्या पोटात दुखत होते आणि ती प.पू. डॉक्टरांना हाका मारत होती. रात्रीच्या वेळी आई पलंगावर झोपत नसे. ती खाली झोपत असे. ती प.पू. डॉक्टरांना सारख्या हाका मारत होती. थोड्या वेळाने प.पू. डॉक्टर पलंगावर बसून तिच्याकडे बघत आहेत, असे तिला दिसले. त्यानंतर तिची पोटदुखी थांबली.

१३. आईशी झालेल्या प्रथमच भेटीत
एका संतांनी आईची आस्थेने विचारपूस केल्यावर
त्यांची आईशी पूर्वीपासूनची ओळख आहे, असे जाणवणे
आणि त्यांनी आईच्या पुण्याईने तुम्ही सनातन संस्थेत आहात, असे सांगणे

आईला एका संतांची भेट झाली. ते संत आईला म्हणाले, आजी, कशा आहात ? त्या वेळी त्यांची पूर्वीपासून आईशी ओळख आहे, असे आम्हाला जाणवले. संत पुढे म्हणाले, आईच्या पुण्याईने तुम्ही सनातन संस्थेत आहात. आम्ही आईला संस्थेत आणले हा आमचा अहं वाढू नये; म्हणून संतांनी आम्हाला त्याची अगोदरच जाणीव करून दिली.

 

१४. आईने आयुष्यभर स्थिर राहून सर्व त्रास सहन करणे,
सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे, मुलांना साधनेसाठी प्रोत्साहन देऊन
प.पू. डॉक्टरांवर प्रेम करायला शिकवणे आणि त्यामुळेच ती संतपदी विराजमान होणे

आईला सरकारकडून मानधन मिळत होते. तिने ते पूर्ण कुटुंबासाठी व्यय (खर्च) केले. आईने आयुष्यभर त्रास सहन केले. कुटुंबावर आलेल्या संकटसमयी ती धीर देत मानहानीला सामोरी गेली. आम्हाला साधनेत प्रोत्साहन दिले. प.पू. डॉक्टरांवर प्रेम कसे करायचे ?, हे तिने आम्हाला शिकवले. आता आईला मोक्षप्राप्ती होऊ दे, अशी प.पू. डॉक्टरांना आम्ही प्रार्थना करतो. आणखी आम्ही तिच्यासाठी काही करू शकत नाही. कुटुंब, शेजारी, नातेवाईक इत्यादींवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आईचा विचार अगोदरच प.पू. डॉक्टरांनी केला होता. त्यामुळेच ती संतपदी विराजमान झाली !

– श्री. बाजी बसु परब (पू. परबआजींचा मोठा मुलगा) आणि श्री. अंकुश बसु परब (पू. परबआजींचा धाकटा मुलगा), विर्नोडा, पेडणे, गोवा.