संस्काराचे अधिकार आणि साजरा करण्याची पद्धत

अनुक्रमणिका

१. अधिकार (संस्कार कोणाचे करतात ?)
२. संस्कार साजरा करण्याची पद्धत
अ. वाईट शक्तींचा परिणाम नष्ट करण्याच्या पद्धती
३. शुभ प्रभावांचे आकर्षण
४. संस्कार आणि आधारविधी
५. संकल्पाचे महत्त्व


१. अधिकार (संस्कार कोणाचे करतात ?)

`प्राचीन काळी मुलांप्रमाणे मुलींचेही संस्कार होत असत. त्यांचा व्रतबंधही होत असे; पण वेदकाळी मुलींचे संस्कार मागे पडत चालले आणि ‘पत्नी’ या नात्याचा विवाहसंस्कार तेवढा समंत्रक असा चालू राहिला. संस्कार मुख्यतः त्रैवर्णिकांना (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना) सांगितले आहेत. ‘शूद्रांनी विहित असे दहा संस्कार अमंत्रक (मंत्राविना) करावेत आणि मुलींचेही संस्कार अमंत्रकच करावेत’, असे सांगितले आहे. ‘वेडे आणि मुके यांचे संस्कार करू नयेत’, असे शंखस्मृतीत म्हटले आहे.’ गर्भाधान, पुंसवन आणि सीमंतोन्नयन हे तीन संस्कार केवळ स्त्रीदेहाशी संबंधित आहेत.

 

२. संस्कार साजरा करण्याची पद्धत

संस्काराच्या दोन-तीन दिवस आधी घराची रंगरंगोटी इत्यादी करावी. तसेच घराच्या प्रवेशद्वारावर श्री गणपतीच्या चित्राची स्थापना करावी. घरापुढे मोकळे स्थान (जागा), अंगण इत्यादी असेल, तर तिथे मांडव घालावा. भूमी सारवून स्वस्तिक, कमळ इत्यादी शुभचिन्हांनी युक्त अशी रांगोळी काढावी. संस्कारापूर्वी संस्कार्याने (जिच्यावर संस्कार करावयाचे आहेत, ती व्यक्ती), तसेच इतर नातलगांनी नवीन कपडे, आभूषणे परिधान करावी. आप्तेष्टांनी संस्कार्याला अहेर करावा. सध्याच्या परिवर्तनाच्या (बदलत्या) काळात उपनयन आणि विवाह या संस्कारांचे महत्त्व अल्प होऊन, संस्कारांपेक्षा समारंभाची ऐट आणि प्रतिष्ठा यांचे अनावश्यक स्तोम माजले आहे. त्यामुळे या संस्कारांचा खरा लाभही मिळत नाही. अशा लोकांनी आत्मशोधन करून, ‘हे समारंभ नसून संस्कार आहेत’, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

२ अ. वाईट शक्तींचा परिणाम नष्ट करण्याच्या पद्धती

वाईट शक्तींचा परिणाम नष्ट करण्यासाठी पुढील कृती करू शकतो.

१. ‘संस्काराच्या प्रसंगी अतीमानुष शक्तींनी संस्कार्यावर आक्रमण (हल्ला) करू नये, यासाठी त्यांच्या प्रीत्यर्थ बलीदान करून त्यांची प्रार्थना करतात.
२. मुंडनसंस्कारात मुलाचे कापलेले केस गोमयाच्या पिंडात (गाईच्या शेणाच्या गोळ्यात) ठेवून ते गोठ्यात पुरतात किंवा नदीत फेकतात. त्यामुळे कोणत्याही भूतपिशाचाला त्या केसांच्या आधारे मुलापर्यंत जाता येत नाही, अशी समजूत आहे.
३. भुताखेतांना घालवण्याचा एक उपाय म्हणजे त्यांची निंदा-निर्भत्सना करणे.
४. ‘यदत्रसंस्थितं भूतं०’ इत्यादी मंत्रांनी ‘भुतांनो, तुम्ही या स्थानातून निघून जा’, असे त्यांना सांगतात. ब्रह्मचारी आणि स्नातक हे त्याचसाठी हातात दंड धारण करतात.
५. सर्षपांना (मोहर्‍यांना) भुते घाबरतात, अशी समजूत आहे; म्हणून संस्कारक्षेत्राच्या भोवती मोहर्‍या फेकतात.

 

३. शुभ प्रभावांचे आकर्षण

अनेक देवतांची स्तुती, प्रार्थना आणि आवाहन या गोष्टी केल्या जातात.’

 

४. संस्कार आणि आधारविधी

सर्व संस्कारांच्या आरंभी १. श्री गणपतिपूजन, २. पुण्याहवाचन, ३. मातृकापूजन, ४. नांदीश्राद्ध आणि ५. आचार्यवरण हे विधी केले जातात. नंतर तो तो विशिष्ट संस्कार केला जातो; म्हणून या पाच विधींचे विवेचन पुढील सूत्रात देऊन त्यापुढे प्रत्येक संस्काराविषयी विवेचन दिले आहे. या विधींना ‘आधारविधी’ म्हणू. आधारविधी आणि संस्कार यांचे तौलनिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

‘संस्कार महत्त्व (टक्के)
१. आधारविधी
२. संस्कार ९५
एकूण १००’

टीप – प्रत्येक आधारविधीचे महत्त्व १ टक्का; म्हणून पाच विधींचे महत्त्व ५ टक्के (संकलक प.पू. डॉ. जयंत आठवले यांना ध्यानात मिळालेले ज्ञान)

 

५. संकल्पाचे महत्त्व

प्रत्येक विधीच्या आरंभी संकल्प असतोच; कारण विधीच्या परिणामकारकतेत संकल्पाचा वाटा ७० टक्के असतो, तर प्रत्यक्ष कृतीचा वाटा केवळ ३० टक्के असतो. असे असले, तरी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असते; कारण नुसत्या संकल्पाने आनंद मिळत नाही, तर कृतीमुळे आनंद मिळतो. त्यामुळे पुन्हा ती कृती करण्याचा संकल्प मनात येतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’

Leave a Comment