मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमाप्रमाणे नाव ठेवतांना नेहमी सात्त्विकच ठेवावे; कारण यातून मिळणार्‍या दैवी स्पंदनांचा आपल्याला लाभ होत असतो.

१. नामकरणविधीचे महत्त्व

‘बाळ जन्माला येते, तेव्हा त्याचा अहं जागृत नसल्यामुळे त्याच्या मनात स्वत:विषयी विचार येत नसतात. जसजसे बाळ मोठे होतेे, तसतसे त्याचे मन कार्यरत होते आणि त्याची बुद्धी विकसित होते. बाळाला स्वत:ची जाणीव होण्यापूर्वी त्याच्या मनावर सुसंस्कार करण्यासाठीच हिंदु धर्मात सोळा संस्कारांतर्गत ‘नामकरण’ हा महत्त्वाचा विधी करण्यास सांगितला आहे.

 

२. नामकरण केल्यामुळे होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया

बाळाला हाक मारतांना आपण जे नाव उच्चारतो, त्याचा संस्कार प्रथम बाळाच्या बाह्य मनावर आणि कालांतराने त्याच्या चित्तावर, म्हणजे अंतर्मनावर होतो. जेव्हा बाळाचे नाव उच्चारले जाते, तेव्हा त्याच्या चित्तावरील नामाचा संस्कार जागृत होतो. नामाच्या संस्कारात त्याच्या नामाशी संबंधित असणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती हे गुणधर्म सुप्तावस्थेत असतात. नामोच्चारणामुळे नामाशी निगडित असणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती, हे त्याचे गुणधर्म जागृत होऊन एकत्रितपणे कार्यरत होतात. याचा परिणाम बाळाच्या मनोदेहावर (मनावर), कारणदेहावर (बुद्धीवर) आणि महाकारणदेहावर (अहंवर) होऊन हळूहळू त्याचे वागणे त्याच्या नावातील गुणधर्माशी अनुरूप होऊ लागते. अशा प्रकारे बाळाच्या नामकरणाच्या वेळी ठेवलेल्या नामाचा परिणाम बाळावर आध्यात्मिक स्तरावर होतो.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. बाळाचे नाव राजसिक किंवा तामसिक ठेवल्यामुळे बाळाची, तसेच
नाव उच्चारणारी व्यक्ती आणि सभोवतालचे वातावरण यांची होणारी हानी

सध्या लहान मुलांना टिया, रिया, डब्बू, पावडर, मोबाईल, इंटरनेट अशी चित्रविचित्र नावे किंवा रावण, विरप्पन, महिषासूर, हिटलर अशी आसुरी नावे ठेवण्याची टूम प्रचलित होत आहे. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावर पुढील हानी होते.

३ अ. बाळाची वृत्ती राजसिक किंवा तामसिक बनणे

बाळाचे नाव राजसिक किंवा तामसिक ठेवल्यामुळे त्याच्या चित्तावर राजसिक किंवा तामसिक नावाचा कुसंस्कार होतो. या रज-तम प्रधान नावातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींमुळे बाळाच्या चित्तावर विपरीत परिणाम होऊन कालांतराने त्याची वृत्तीही राजसिक किंवा तामसिक होते.

३ आ. बाळाचे नाव उच्चारणारे आणि ऐकणारे यांची होणारी हानी

राजसिक किंवा तामसिक नाव उच्चारल्यामुळे उच्चारण करणारी व्यक्ती आणि नाव ऐकणारी व्यक्ती यांच्यावर नावातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तम प्रधान शक्तीचा विपरीत परिणाम होऊन त्यांच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण होते.

३ इ. वातावरण दूषित होणे

राजसिक आणि तामसिक नाव उच्चारल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे वातावरणही दूषित होते.

अशा प्रकारे बाळाचे राजसिक किंवा तामसिक नाव ठेवल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ हानी होते.

 

४. बाळाचे नाव सात्त्विक ठेवल्यामुळे होणारे लाभ

४ अ. बाळाला होणारे लाभ

४ अ १. वृत्ती सात्त्विक बनणे : भक्त, संत, देवता किंवा त्यांच्याशी संबंधित अन्य सात्त्विक नाव ठेवल्यावर त्याच्या चित्तावर सात्त्विक संस्कार होतो. सात्त्विक नाव उच्चारल्यामुळे त्याच्या मनात सात्त्विक शक्ती कार्यरत होते आणि वृत्तीही सात्त्विक बनते.

४ अ २. देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होणे :  सात्त्विक नामानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती कार्यरत असल्यामुळे ज्या बाळाचे सात्त्विक नाव ठेवले जाते, त्याचे वाईट शक्तींपासून रक्षण होऊन त्याच्यावर आध्यात्मिक उपाय होतात.

४ अ ३. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या बाळावर सात्त्विक नावातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे आध्यात्मिक उपाय होणे : वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या बाळाचे नाव सात्त्विक असेल, तर त्या नावातून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे त्याच्यावर आध्यात्मिक उपाय होतात अन् त्याला होणारा त्रास अल्प होतो.

४ आ. बाळाचे नाव उच्चारणारे आणि ऐकणारे यांना होणारा लाभ : सात्त्विक नाव उच्चारण करणारी व्यक्ती आणि त्याचे नाव ऐकणार्‍या व्यक्ती यांचे नावाशी निगडित असणारे भक्त, संत किंवा देवता यांचे पुण्यस्मरण होऊन त्यांना स्मरणभक्तीचा लाभ होतो.

४ इ. वातावरणाची शुद्धी होणे : सात्त्विक नावाचे उच्चारण केल्यामुळे किंवा ते लिहिल्यामुळे त्यांतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी आणि दैवी ऊर्जा यांमुळे वातावरणाची शुद्धी होते.

अशा प्रकारे बाळाचे सात्त्विक नाव ठेवल्यामुळे पुष्कळ आध्यात्मिक लाभ होतात.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. मुलांना निरर्थक नावांनी हाक मारल्याने त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होणे
आणि सात्त्विक नावे ठेवून त्या नावाने हाक मारल्यास त्यांना आध्यात्मिक लाभ होणे

AnjaliGadgil_jan2014आजकाल लहान मुलांनाही निरर्थक नावाने हाक मारतात. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होते. बर्‍याचदा चांगल्या नावाचाही अपभ्रंश केला जातो, उदा. निशिगंधा हे एका फुलाचे सुंदर नाव आहे, तर तिला निशा म्हणजे रात्र या नावाने हाक मारली जाते. रात्र या शब्दात तमोगुणी स्पंदने आहेत. हे आपण टाळले पाहिजे. आशिष नाव असेल, तर त्याला आशू अशी हाक मारली जाते. आशिष म्हणजे आशीर्वाद. संपूर्ण नाव घेतले, तर किती चांगले वाटते ना ? आशू या नावातून काहीच साध्य होत नाही. हाक मारतांना आवाजातून वातावरणात जी नादस्पंदने पसरतात, त्याकडेच ईश्‍वरी लहरी लवकर आकृष्ट होऊन त्याचा त्या मुलाला आध्यात्मिक लाभ होत असतो; म्हणून पूर्वीच्या काळी मुलाला अथवा मुलीला देवतांची नावे ठेवण्याची पद्धत होती. ती किती योग्य होती, ते कळते.

आजकाल टिंकू, रिंकी अशीही अयोग्य स्पंदने असणारी नावे ठेवली जातात, तर कधी कधी फॅशन म्हणून आई-वडिलांच्या नावांतील प्रथम असणारे एकेक अक्षर घेऊनही निरर्थक नाव ठेवले जाते. नाव ठेवतांना शास्त्रानुसारच ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आणि दैवी स्पंदनांनी युक्त होईल, अशीच केली पाहिजे. याविषयी आपण समाजातही धर्मजागृती केली पाहिजे.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.१०.२०१६, सकाळी ८.३०)