हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

​‘आपण आपल्या जीवनात कुठलीही गोष्ट जशीच्या तशी स्वीकारत नाही किंवा स्वीकारू शकत नाही. शेतातून किंवा बाजारातून धान्य घरी आणले आणि त्याचा एखादा खाद्यपदार्थ करायचा झाला, तर तो चाळणे, निवडणे, स्वच्छ करणे, वाळवणे, सुकवणे, धुणे, शिजवणे अन् तो विशिष्ट प्रकारे खाणे इत्यादी अनेक संस्कार त्यावर केले, तरच त्यातून पूर्ण समाधान मिळते. ‘संस्कार’ म्हणजे सुखाने उपभोग घेण्यासाठी केलेली सिद्धता ! तुळशीविवाहानंतर विवाहसोहळ्यांना प्रारंभ होतो. येथे विवाह संस्काराविषयी माहिती दिली आहे.


​१. विवाह संस्कार आणि त्याचा उद्देश

हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, काव्यात्मकता, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उन्नयन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे. वेदांमध्ये विवाहाचा मुख्य उद्देश प्रजोत्पादन आणि विशेष करून पुत्रोत्पादन हा सांगितला आहे. ऋग्वेदाच्या विवाह सूक्तात वधूला पुत्रोत्पादनासाठी सर्वाधिक आशीर्वाद दिले आहेत. पुत्राच्या जन्माच्या समवेत ‘गृहस्थाश्रम चालवणे’ हाही विवाहामागचा हेतू आहे.

 

२. धर्मनियंत्रित काम आणि गृहस्थाश्रम यांसाठी आवश्यक असलेला विवाह संस्कार !​

स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामेच्छा असते अन् धर्मनियंत्रित काम म्हणजे ‘विवाह संस्कार’ होय. विवाह संस्कारामुळे श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम प्राप्त होतो. हिंदु धर्मातील अन्य ३ आश्रम हे गृहस्थाश्रमावर आधारित आहेत. गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी आपल्याकडे विवाहाची पद्धत सांगितली आहे आणि ती अत्यंत उत्कृष्ट आहे. देव, अग्नि आणि विद्वान ब्राह्मण यांच्या साक्षीने त्या दोघांनी विवाहबद्ध व्हायचे असते.

 

३. हुंड्याची चुकीची पद्धत

अलीकडे हुंड्याची पद्धत बंद झाली असली, तरी ‘मुलीच्या पालकांना लग्न (थाटामाटात) करून द्या आणि जमेल तितके सोने द्या’, असे वराकडचे लोक म्हणतात. ही पद्धत बंद केली पाहिजे. वधू स्वतः पायावर उभी असली, तरी त्यांचे पालक म्हणावे तितके धीट झाले नाहीत.

 

४. विवाह संस्कार करतांना घ्यावयाची दक्षता !

अ. प्रथम ‘वराचे कुळ कसे आहे ?’, हे पहावे. कन्या दिल्यानंतर त्याच्या कुळाची माहिती घेऊ नये.

आ. बुद्धीमान पुरुषाला कन्या द्यावी. वधूही बुद्धीमान, रूपवान, शीलवान आणि निरोगी असावी.

इ. वरापेक्षा वधू वयाने लहान असावी.

ई. वधू जवळच्या नात्यातील नसावी. जवळच्या नातेसंबंधात म्हणजे मामे, आते आणि मावस या भावंडांमध्ये किंवा सगोत्र विवाह करू नये.

उ. पत्रिका पाहून विवाह करावा.

 

५. विवाहाच्या ८ प्रकारांपैकी अधिक चांगला असलेला ‘ब्राह्म विवाह’ !

विवाहाचे ८ प्रकार सांगितले आहेत. त्यांतील पहिला प्रकार, म्हणजे ‘ब्राह्म विवाह’ ! हा संस्कारदृष्ट्या अधिक चांगला. ‘उभय वधू-वर आणि कुटुंबीय यांनी वधू अन् वर यांची निवड करून वधू पक्षाने लग्न लावून देणे’, यास ‘ब्राह्म विवाह’ असे म्हणतात. आपल्याकडे बहुतेक विवाह या प्रकारेच होतात.

५ अ. सत्त्वगुण सुखकारक असल्यामुळे अग्नि, देव आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने विवाह केल्यास तो सुखदायक होणे

या विवाहात अनेक प्रकारचे विधी आणि प्रत्येक विधीचे वेगवेगळे मंत्र आहेत, उदा. सीमान्तपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन इत्यादी. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतला, तर ‘या प्रकारानेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुणीला वाटेल. ‘नोंदणी पद्धती’ने (रजिस्टर) विवाह न करण्याकडे मुले वळतील. ‘नोंदणी पद्धती’ने विवाह केल्याने कदाचित् पैसे वाचतील, वेळही वाचेल; पण तेथे सत्त्वगुण नसल्याने सुखाची शाश्‍वती देता येणार नाही. वेदमंत्रांमध्ये सत्त्वगुण प्रकर्षाने असतो. सत्त्वगुण सुखदायक असल्याने संस्कार करतांना वातावरणही सात्त्विक आणि आनंददायक असते. अग्नि, देव आणि ब्राह्मण किंवा ज्ञानी लोक हे सत्त्वगुणी असतात; म्हणून विवाह या तिघांच्या साक्षीने करावा.

– सौ. मृणालिनी ठकार (ज्यो. भास्कर), (संदर्भ : आनंदी ज्योतिष, दिवाळी विशेषांक २०१७)

Leave a Comment