विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व

Article also available in :

‘हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे. स्त्री-पुरुषांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विवाहाशी संबंधित असतात, उदा. स्त्री-पुरुष यांच्यामधील प्रेम, त्यांच्यातील संबंध, संतती, जीवनातील अन्य सुखे, समाजातील स्थान आणि जीवनातील उन्नती. विवाह निश्‍चित करण्यापूर्वी भावी वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळतात का, हे पाहणे योग्य असते. त्यासाठी दोघांच्याही जन्मपत्रिका योग्य असाव्यात, तसेच जन्मकुंडल्या जुळवणारा ज्योतिषीही ज्ञानी असावा. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व, तसेच वैवाहिक जीवन आनंदी होण्यासाठी काय करावे, याविषयी सदर लेखात विवेचन केले आहे.

 

१. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचा उद्देश

विवाहानंतर पती-पत्नीला पुढील आयुष्य समर्थपणे मार्गक्रमण करायचे असल्यानेे त्यांचा स्वभाव जुळणे, एकमेकांशी पटणे, एकमेकांना समजून घेणे, हा भाग सर्वात महत्त्वाचा असतो. तसेच त्यांच्या जीवनातील आर्थिक स्थिती, गृहसौख्य, संततीसौख्य, आरोग्य इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु या सर्व गोष्टी भविष्यातील असल्याने विवाह निश्‍चित करतांना त्यांचा अंदाज घेता येणे कठीण असते. अशा वेळी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जातो. जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार असतात. जन्मकुंडली म्हणजे आपल्या पूर्वसुकृताचा (प्रारब्धाचा) आरसा असल्याने त्यात प्रारब्धाधीन गोष्टी कळून येतात.

 

२. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवतांना
गुणमेलन, ग्रहमेलन आणि पत्रिकामेलन करण्याचे महत्त्व

२ अ. गुणमेलन

श्री. राज कर्वे

वधू-वरांचा स्वभाव एकमेकांना पूरक असावा, हा गुणमेलनाचा मुख्य उद्देश आहे. पती-पत्नी अगदी विरुद्ध प्रकृतीचे असतील, तर जीवनात पदोपदी असंतोष वाटेत येतो, उदा. गुणमेलनात कोणत्या राशीच्या व्यक्तींचे कोणत्या राशीच्या व्यक्तींशी पटते अथवा मुळीच पटत नाही, ते दिलेले असते, उदा. कर्क आणि कुंभ या राशींच्या व्यक्तींचे एकमेकांशी पटत नाही. कर्क राशीची व्यक्ती साधारणपणे कलाप्रिय, भावनाशील, निसर्गप्रेमी असते. याउलट कुंभ राशीची व्यक्ती साधारणपणे विरक्त, आपले काम वगळता अन्य कशातही रुचि नसणारी, संशोधकवृत्ती असणारी असते. यामुळे त्यांचे आचार-विचार, आवडी-निवडी, जीवनशैली इत्यादी एकमेकांच्या अगदी विरुद्ध असल्याने त्यांचे पटत नाही. याउलट पती-पत्नीची प्रकृती एकमेकांना अनुकुल असल्यास त्यांच्यात सामंजस्य राहते. तसेच जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली, तरी ते एकमेकांना समजून घेऊन आधार देऊ शकतात.

२ आ. ग्रहमेलन आणि पत्रिकामेलन

यामध्ये आर्थिक स्थिती, गृहसौख्य, संततीसौख्य, आरोग्य इत्यादी गोष्टींचा विचार करून ‘वैवाहिक जीवन किती प्रमाणात यशस्वी होईल ?’, याचा विचार केला जातो.

 

३. मंगळ दोष

मंगळ दोषाच्या विषयी समाजात अवास्तव भय आणि अपसमज असल्याचे दिसून येते. मंगळ हा दाहक ग्रह असल्याने वैवाहिक जीवनात अडथळे उत्पन्न करतो; मात्र पंचांगात मंगळ दोषाचे अनेक अपवाद दिले आहेत, ज्या योगे जवळपास ९० टक्के मंगळ दोष असलेल्या जन्मकुंडल्यांमधील मंगळ ग्रह निर्दोष होतो. त्यामुळे मंगळ दोषाच्या संदर्भात ऐकीव माहिती ग्राह्य न धरता ‘कुंडलीत मंगळ दोष आहे का ?’ आणि असल्यास ‘मंगळ कुठल्या कारणाने निर्दोष होत आहे का ?’, याची ज्योतिषाकडून खात्री करून घ्यावी.

 

४. सध्याच्या विज्ञानयुगातही वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवून घेणे श्रेयस्कर !

सध्या भारतीय समाजावर पाश्‍चिमात्य (कु)संस्कृतीचा प्रभाव असल्याने तिचे अंधानुकरण केले जात आहे. त्यामुळे एकेकाळी विश्‍वगुरुपदी असलेल्या भारताची प्रत्येक क्षेत्रात अधोगती होत असल्याचे दिसून येते. विवाहाच्या संदर्भात याचा विचार केल्यास भारतात घटस्फोटांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. प्रेमविवाहाच्या संदर्भात वधू आणि वर यांचा एकमेकांशी अगोदरपासून परिचय असल्याने ‘कुंडली पाहण्याची आवश्यकता आहे का ?’, असा प्रश्‍न बहुतेकांना पडतो. याचे उत्तर ‘अवश्य पाहावे’ असे आहे. याचे कारण ‘दुरून डोंगर साजिरे’ या म्हणीप्रमाणे ‘मुलगा आणि मुलगी यांचे आरंभी एकमेकांशी पटते’, असे जरी वरकरणी दिसत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती निराळी असते. विवाहानंतर येणार्‍या अडचणींना सामोरे जातांना त्यांना एकमेकांच्या प्रकृतीतील दोष दिसू लागतात. परिस्थितीशी जुळवून घेता येत नसल्याने त्यांचे वारंवार खटके उडू लागतात. त्यामुळे ‘आपले पटत नाही, तर आपण वेगळे होऊया’, असा टोकाचा निर्णय घाईघाईने घेण्याची त्यांची मानसिकता असते. तसेच सध्याची युवापिढी बर्‍याचदा ‘बाह्य आकर्षणा’ला प्रेम मानते. प्रेमप्रकरणांत काही वेळा फसवणूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ज्योतिषांचे मत घेणे केव्हाही श्रेयस्कर !

 

५. वैवाहिक जीवन आनंदी होण्यासाठी साधना करा !

सध्याचे युग हे कलियुग असल्याने मनुष्याच्या वाटेला सुखापेक्षा दुःख अधिक प्रमाणात येते. मनुष्याची जीवनशैली निसर्गाला प्रतिकूल झाल्याने सर्व साधने हाताशी असतांनाही तो ‘आनंदी’ नाही. वैवाहिक जीवनाच्या संदर्भात विचार केल्यास आज गुण्यागोविंदाने नांदणारी कुटुंबे फार अल्प प्रमाणात आढळतात. वैवाहिक जीवन आनंदी होण्यासाठी ‘साधना करणे’ हाच उत्तम मार्ग आहे. ‘साधना’ म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न. ईश्‍वरप्राप्ती म्हणजे ईश्‍वरातील गुण स्वतःत आणणे आणि स्वतःतील दोष दूर करणे. वैवाहिक जीवनातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे पती-पत्नीच्या एकमेकांकडून आणि कुटुंबियांकडून असणार्‍या अपेक्षा ! प्रत्येक मनुष्यात अहंकार असल्याने प्रत्येक प्रसंगात तो ‘समोरचा कसा चुकतो आणि मी कसा योग्य आहे’, असा विचार करीत असतो. आपण स्वतःला पालटू शकतो; पण दुसर्‍याला पालटू शकत नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे. पती-पत्नीने ‘आपण कुठे कमी पडतो ?, आपण समोरच्याला काय साहाय्य करू शकतो ?’, असा विचार केल्यास कौटुंबिक वातावरण पुष्कळ सुधारेल. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, हीच साधना आहे. ‘जीवनात आनंदप्राप्ती कशी करावी ?’, हे विज्ञान नव्हे, तर अध्यात्मशास्त्र शिकवते. जीवनातील प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकीकरण केल्यास जीवन खर्‍या अर्थाने आनंदी होईल.’

– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१०.१२.२०१९)

 

वाचकांना नम्र आवाहन !

जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी करावयाचे संस्कार हिंदु धर्माने सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाहसंस्कार’ ! विवाहातील धार्मिक विधींमागील शास्त्र सांगण्यासह विवाहातील अपप्रकारांवर बोट ठेवतांनाच विवाह आदर्शरित्या कसा करावा, याचे दिशादर्शन सनातन संस्थेचा लघुग्रंथ ‘विवाहसंस्कार – शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’ यात केले आहे. सनातन संस्थेचे ग्रंथ Sanatanshop.com या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ उपलब्ध आहेत. याचा वाचकांनी अवश्य लाभ घ्यावा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व”

Leave a Comment