सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा भाव असणारे सहजावस्थेतील संत : प.पू. रामानंद महाराज !

सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या
चरणी कोटी कोटी प्रणाम !

प.पू. रामानंद महाराज यांच्या सहवासात असतांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहे.

 

प.पू. रामानंद महाराज

 

१. प.पू. रामानंद महाराज यांच्यामध्ये एक आदर्श शिष्य,
गुरु, परात्पर गुरु अशी अनेक रूपे पहाण्याचे भाग्य लाभणे

वर्ष १९९२ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची मुंबई येथे गुरुपौर्णिमा झाली. तेव्हापासून मला प.पू. रामानंद महाराज यांचा सत्संग आणि सहवास लाभला. त्यांच्यामध्ये एक आदर्श शिष्य, गुरु, परात्परगुरु अशी अनेक रूपे पहाण्याचे मला भाग्य लाभले. प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव आणि भंडारे या निमित्ताने प.पू. रामानंद महाराज यांच्यासारखे सहजावस्थेतील संत कसे असतात ? हे अनुभवता आले. मी, माझे याऐवजी सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा त्यांचा भाव असायचा.

P_Ramanand_Maharaj
प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका
ramjidada_payari0001_clr
मोरटक्का आश्रम येथील श्रीगुरुमंदिर अन् रामजीची (प.पू. रामानंद महाराज यांची) पायरी

 

२. वाढदिवसाच्या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांची पाद्यपूजा करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभणे आणि
दुसर्‍या दिवसापासून अध्यात्मप्रसार करतांना चांगल्या अनुभूती येणे

शीव, मुंबई येथे प.पू. डॉक्टर साधकांचे वाढदिवस साजरे करत असत. वर्ष १९९६ मध्ये माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी प.पू. रामानंद महाराज तेथे आले होते. त्या वेळी मला त्यांची पाद्यपूजा करण्याची आणि वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. दुसर्‍या दिवसापासून सोलापूर येथे अध्यात्मप्रसार करतांना चांगल्या अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांच्या सांगली येथील पहिल्या अध्यात्मप्रसाराच्या दौर्‍याच्या वेळी प.पू. रामानंद महाराज आमच्यासमवेत होते.

 

३. उच्च कोटीचे संत असूनही सहजतेने आणि प्रेमाने वागणे

प.पू. रामानंद महाराज मोठे संत आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी असतांनाही आमच्याशी नेहमी सहजतेने अन् अत्यंत प्रेमाने वागायचे. त्यांचा चैतन्यमय सहवास सर्वांना हवाहवासा वाटायचा.

 

४. सनातनच्या कार्याला आशीर्वाद असणे

भजन, भंडारा आणि भ्रमण हा त्यांचा त्रिसूत्री अध्यात्मिक कार्यक्रम असतांनाही सनातनच्या कार्याला त्यांचा नेहमी सकारात्मक प्रतिसाद अन् आशीर्वाद असायचा.

 

५. प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटलेल्या
भजनांप्रमाणे प.पू. रामानंद महाराज यांनी
म्हटलेल्या भजनांतून आकाशतत्त्वाची अनुभूती येणे

प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आकाशतत्त्वाची अनुभूती देणारी आहेत. त्यांनी म्हटलेली भजने ध्वनीमुद्रित झाली आहेत. त्यांतील काही भजने संग्रहात नव्हती. ती सर्व भजने प.पू. डॉक्टरांनी प.पू. रामानंद महाराज यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून घेतली. ही भजनेही आकाशतत्त्वाची अनुभूती आणि आनंद देणारी आहेत. यावरून प.पू. भक्तराज महाराज यांच्या देहत्यागानंतर निर्माण झालेली पोकळी प.पू. रामानंद महाराज यांनी भरून काढली, असे वाटले. सनातनच्या साधकांसाठी ते प्रेरणास्थान होते. प.पू. भक्तराज महाराज यांची उणीव त्यांनी भक्तांना भासू दिली नाही. यावरून त्यांचे महान कार्य लक्षात येते.

त्यांनी देहत्याग केला असला, तरी सूक्ष्मातून ते सतत सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या रूपाने आमच्यासमवेतच आहेत, याची सतत जाणीव होत आहे. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने प.पू. रामानंद महाराज यांचा सत्संग मिळाल्याविषयी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. शिवाजी वटकर, मुंबई (१३.३.२०१४)