पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (वय ८९ वर्षे)या व्यष्टी साधनेच्या बळावर संतपदी आरूढ !

सनातनच्या ३९ व्या संत (व्यष्टी संत) पू. श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढेआजी !

राहता (जि. अहमदनगर) येथे भावपूर्ण वातावरणात सन्मान सोहळा

पू. श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (उजवीकडे) यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या त्यांच्या कन्या सौ. वैशाली राजहंस

पू. श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (उजवीकडे) यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या त्यांच्या कन्या सौ. वैशाली राजहंस

राहता, २७ जानेवारी (वार्ता.) – येथील श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढेआजी यांच्या निवासस्थानी २५.१.२०१४ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कोपरगाव येथील साधकांच्या सत्संगात संगणकीय प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या सनातनच्या पू. स्वातीताई खाडये यांनी श्रीमती लोंढेआजी यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली आहे, असे सांगून त्या संत झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. या वेळी लोंढेआजींचे कुटुंबीय आणि उपस्थित साधक यांना भावाश्रू दाटून आले. त्यानंतर पू. लोंढेआजी यांचा सन्मान ६१ टक्के आध्यात्मिकपातळी असलेल्या त्यांच्या कन्या आणि सनातनच्या साधिका सौ. वैशाली धनंजय राजहंस यांनी शाल अन् श्रीफळ देऊन केला. या वेळी पू. लोंढेआजी यांचे २ पुत्र, २ स्नुषा, ५ नातू आणि २ नातस्नुषा, तसेच कन्या सौ. वैशाली राजहंस आणि जावई श्री. धनंजय राजहंस उपस्थित होते.

पू. श्रीमती लोंढेआजी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, “संतांनी माझ्यावर आयुष्यभर केलेल्या कृपेमुळे मला आजचा आनंदाचा क्षण अनुभवता येत आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. साकुरी येथील संत प.पू. उपासनी महाराज आणि प.पू. गोदावरी माताजी यांनी माझ्याकडून साधना करवून घेतली. संकटकाळी त्यांनी मला अनुभूती देऊन माझी श्रद्धा दृढ केली. प.पू. कलावतीआईंनी मला त्यांच्या सेवेची संधी दिली. तसेच माझ्या मुलीमुळे(सौ. वैशाली राजहंस यांच्यामुळे) माझा सनातनशी संपर्क आला. प.पू. डॉक्टरांचे ग्रंथ वाचायला मिळाले. या सर्व संतांचे आशीर्वाद लाभल्याने हे सर्व घडले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असूनही संतांच्या कृपेमुळेच मला यजमानांनी भारतातील सर्व तीर्थांचे दर्शन घडवून आणले.”

या प्रसंगी श्री. रामकृष्ण लोंढे आणि श्री. भालचंद्र लोंढे (पू. आजींचे दोन पुत्र) यांनी भावपूर्णपणे मनोगत व्यक्त केले. पू. श्रीमती लोंढेआजी आणि त्यांचे दोन्ही पुत्र प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला सनातनच्या कार्यासाठी अर्पण करतात. पू. आजींचे ज्येष्ठ पुत्र श्री. रामकृष्ण लोंढे हे त्यांच्या दुकानातून सनातनचे ग्रंथ, साप्ताहिक सनातन प्रभात आणि सनातन पंचांग यांचे वितरण करतात. अलीकडेच राहता नगरवासियांनी पू. लोंढेआजी यांना ‘आदर्श माता’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment